असाही एक दिवस (Short Story: Asahi Ek Divas)

असाही एक दिवस (Short Story: Asahi Ek Divas)

असाही एक दिवस

– प्रिया श्रीकांत

एअर फोर्स स्टेशन कलाईकुंडा, तत्कालीन देशातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म असलेल्या खडकपूर रेल्वे स्टेशनाजवळ वसलेलं एक छोटंसं गाव. खरं तर, वायुसेनेमुळेच नावारूपाला आलेलं. घरसंसाराला लागणाऱ्या किरकोळ वस्तू एअर फोर्स स्टेशनमधेच मिळत, पण इतर जीवनावश्यक वस्तू व मोठ्या खरेदीसाठी मिदनापूरला जावं लागे. त्यासाठी वायुसेनेने आपल्या P.S.I. या संस्थेतर्फे एका खाजगी बसची सोय केलेली होती. कलाईकुंडा व मिदनापूर मधला रस्ता तसा धोकादायक होता. दोन्ही बाजूंनी घनदाट शेत जंगले होती. आसपासच्या वस्तीत राहणारे लोक खाजगी वाहनांनी जाणाऱ्यांची लहानमोठी लूटमार करत. म्हणून शॉपिंगला जायचं असलं की PSI बस सुरक्षित वाटायची. हे लुटारू लोक बारीक किडकिडीत बांध्याचे स्थानिक रहिवासी असत; पण तेथील राजकीय नेत्यांकरता अशी अन् आणखी काही अवैध कामं करतात असं ऐकण्यात आलं होतं. प्रत्येक ठिकाणचं राजकारण असतंच ना!

दिवस ठरवून मी माझ्या आठ वर्षाच्या मुलीला घेऊन खरेदीला निघाले. माझ्या अत्यंत महत्वाच्या शॉपिंग लिस्टमधे सगळ्यांना आवडणारे मिष्टी दोही, चांगल्या दणकट बांधणीचे खराटा, झाडू, घासण्या इ. वस्तू होत्या. झाडू, खराटे ‘क्षुल्लक’ असेनात का; पण त्यातही चॉइस नको का? अशी अतिउत्साही मी – खरेदीला कुठेही केव्हाही तयार!

श्रावणातले ते पावसाळी दिवस. दूरवर पसरलेली भाताची शेतं, जबाकुसुम आणि तगरीच्या फुलांनी जिकडेतिकडे शोभा वाढवलेली होती. बसच्या खिडकीबाहेर दिसणारी सृष्टी मोहमयी वाटत होती. मिदनापूर जवळ आलं. कालीमंदिराच्या बाजूला बस स्टॉप होता. तिथून पायी चालत गेलं की थोड्याच अंतरावर ‘शहर’ होतं.

मुलीला व पिशव्या सांभाळीत खाली उतरले. मला आश्चर्य वाटलं – एरवी तुरळक हालचाल असणाऱ्या ठिकाणी आज जिकडे तिकडे खूप गर्दी होती. राखी पोर्णिमेला अजून आठवडाभर अवकाश होता. अन् दुर्गापूजेला तर त्याहूनही जास्त. मग ही गर्दी कशासाठी? जवळच्या दुकानदाराला विचारलं. त्यानं मोडक्या तोडक्या बंगाली-हिंदीमधे सांगितलं की शंकराचार्यांचे परमशिष्य श्री राघवेंद्र ज्योतिर्मयजी त्यांच्या इतर गुरुबंधूंसमवेत येणार होते. म्हणून त्यांच्या दर्शनाकरता सबंध मिदनापूर लोटलं होतं. कालीमंदिराच्या प्रांगणात प्रवचने होणार होती. दर्शनार्थी तर सकाळपासून रांग लावून उभे होते. रस्ते माणसांनी फुलून गेलेले. बस थांबल्यावर कंडक्टर म्हणाला होता, “मॅम, आज रॉयचौधरी मिष्टान्न भंडाराच्या कोपऱ्याजवळ बस थांबेल. ठीक सहा वाजता. वेळेवर या; उशीर करू नका.” मी होकारार्थी मान डोलावली होती. तो तसं का म्हणाला हे मला आत्ता कळलं. श्री राघवेंद्र ज्योतिर्मयजी जिथून जाणार होते तिथे भक्त मंडळी आधीच गर्दी करून उभी होती; म्हणून थोडा बदल केला होता. त्या गर्दीतून वाट काढीत मी मुख्य रस्त्यावर आले.

दुकाने नेहमीसारखी सज्ज होती पण फारसे गिऱ्हाईक नव्हते; नेहमीची वर्दळ नव्हती. मला बरं वाटलं.

यादीतल्या बहुतेक वस्तू मनाप्रमाणे घेऊन झाल्या. ‘कलकत्ता’ साड्यांची नवी व्हरायटी बघण्यातही बराच वेळ गेला. शेवटी मिष्टी दोहीचे मडके घेतले. ही बंगाली मिठाई आम्हाला भारी प्रिय! पिशव्या सामानाने भरलेल्या. ‘स्वच्छतेची उपकरणे’ मनासारखी मिळाली होती. तीही माझ्या खांद्याजवळ लटकत होती. मुलीला घेऊन कशीबशी ठरवलेल्या बसस्टॉपजवळ आले. बस यायला अजून ५-१० मिनिटे वेळ होता. मी दूरवर नजर टाकली. सगळीकडे माणसेच माणसे! हवेत उदबत्ती व धूपचा सुगंध. झेंडू व तगरीच्या माळा हाती घेतलेले भक्तगण आपल्या गुरूंची वाट पाहत होते. तसा उशीरच झाला होता. काठपदराच्या साड्यांमधे आकर्षक दिसणाऱ्या बंगाली महिला भजनं गात होत्या. एकूणच वातावरण भक्तिमय झालेलं.

गुरूंबद्दल उत्सुकता असली तरी मला घरी परतायची घाई होती. केवढी ही गर्दी!! इतक्यात टाळ मृदुंगाचा आवाज वाढला. दुरून एक मॅटॅडोर येताना दिसली. कालीमंदिराजवळ प्रचंड धक्काबुकी.. टाचा उंचावलेल्या, माळा हातात घेतलेले, गुरूंच्या एका झलकेकरिता आटापिटा करणारे पुढे सरसावले. पण हे काय? मॅटॅडोरने रस्ता बदलला. दोन्ही बाजूला भक्तांच्या गर्दीला टाळून ती मॅटॅडोर रॉयचौधरी दुकानाला वळसा घालून माझ्या समोर थांबली! दार उघडलं. त्यातून भगवी वस्त्रे धारण केलेली पाच-सहा गुरुशिष्य मंडळी खाली उतरली. सगळ्यांच्या चेहेऱ्यावर शांत भाव होता. मध्ये श्री राघवेंद्र ज्योतिर्मयजी होते. सतेज चेहरा, धारदार नाक, मस्तकी चंदन तिलक, वय साधारण पस्तीस, सडसडीत अंगकाठी. त्यांचं व्यक्तिमत्व अत्यंत प्रभावी होतं. मोहक… कुणीही मोहात पडावं असं मोहक स्मित…

एकच गलबला झाला. स्वागताकरता तासन् तास ताटकळलेली मंडळी हारतुरे घेऊन धावत येत होती… माझ्यासमोर प्रश्न उभा राहिला. ज्यांच्या दर्शनाकरता लोक इतके ताटकळत उभे होते, जय्यत तयारीने वाट बघत होते ते गुरू साक्षात् माझ्यासमोर उभे होते. मी थोडीफार नास्तिक, वाटलं तर देवाची मनोमन आराधना करणारी. ‘गुरु’ वगैरे न मानणारी, म्हणून क्षणभर गडबडले. हात जोडावे की नको, आशीर्वाद घ्यावा की नको? ही माझ्या मनातली चलबिचल त्या गुरूंनी तत्काळ ओळखली. त्यांनी विचारलं, “मां, तुझा ईश्वरावर विश्वास नाही? म्हणजे सामान्यतः इतरांचा असतो तितका… होय ना?” धीरगंभीर आवाजात बोलले. त्यांची नजर माझ्या कडच्या पिशव्या, झाडू खराट्यावर गेली. मोहक स्मित करत ते म्हणाले, “देव शोधण्याकरता काही करण्याची, कुठेही जाण्याची गरज नाही. आपापल्या परीने तो शोधावा. संसार चांगला करावा, प्रपंचात न संपणारी कामे असताना, दिवसातून एकदा तरी मनापासून  त्या विधात्याचे स्मरण करावे. तेवढंही पुरेसं आहे.” असं म्हणून आपल्या गळ्यातली फुलांची माळ माझ्या मुलीच्या गळ्यात घातली व मला नमस्कार करीत झटपट पुढे निघूनही गेले. त्यांच्यामागून ती गर्दीही. हा कसला योगायोग होता? मी विचारात असताना बस आली. मी मुलीसह बसमधे चढले. तो ड्रायव्हर जोरजोरात सांगत होता, “ये गुरुशाबको छोटे र्‍स्तेसे मंदिर पहुंचना था, इसलिए रास्ता बदला. नही तो हम सबको दर्शन मिलता था उनका कालिमंदिरके पास…” मी झाडू, खराटा व पिशवीकडं बघितलं आणि मुलीच्या गळ्यातल्या माळेकडंही!

का कुणास ठाउक, बरीच वर्षे ती सुकलेली माळ मी सांभाळून ठेवली.