आठवणी दाटतात… (Short Story: Aathavani Daa...

आठवणी दाटतात… (Short Story: Aathavani Daatatat)

आठवणी दाटतात…


– मृदुला गुप्ता

आठवणींवर आठवणी दाटून येत होत्या… गतकाळातील झरोक्यांमधून झिरपत त्या माझ्या मनाच्या चौकटीतून डोकावत होत्या. पण या कडू-गोड आठवणी खरवडून आता काय उपयोग होता?
सलीलच्या घरातली ही माझी पहिलीच सकाळ होती. सुमेधा गेल्यानंतर अडूनच बसलो होतो, “मी कुठेच जाणार नाही. या वडिलोपार्जित घरातच मी अंतिम श्‍वास घेईन…” असा मी धोशा लावला होता. सलील आणि त्याची बायको पूजा यांनी तेव्हा माझं म्हणणं मान्य केलं. पण महिना संपताच माझं सर्व काही आवरून आपल्यासोबत घेऊन आले. आत्ता दोन वर्षांपूर्वीचीच तर गोष्ट आहे…
ती पहिलीच सकाळ तर होती… “पप्पा, हा घ्या चहा.” दोघांसाठी चहा घेऊन सलील आला. माझ्याजवळ बसून चहा पिऊ लागला. “काय रे, पूजाला बरं नाही का?” मी चिंतीत होऊन विचारलं.
“ती बरी आहे. पण काय आहे की, तिला सकाळी सकाळी खूप कामं असतात. अन् तुम्हाला लवकर चहा लागतो. म्हणून मग मीच करून आणला.”
“बरं केलंस.” मी म्हणालो. पण
मला हटकून सुमेधाची आठवण
आली. मी सकाळी फिरून येताच
ती मला गरमागरम चहाचा कप आणि वर्तमानपत्र हाती देत होती. वर्षानुवर्षं तिच्या या कामात कधीच खंड पडला नाही. तिलाही घरात ढीगभर कामं असायची. चार-चार मुलांचे टिफिन तयार करायचे. त्यांना शाळेसाठी तयार करायचं. या सर्व गोष्टी ती एकट्यानेच करायची. तिला मदत करावी, असं मला कधी वाटलंच नाही. ‘तुझी तब्येत बरी नाही, तर राहू दे… आज मीच बनवतो चहा.’ असं कधी बोलावसंही वाटलं नाही.
अलीकडे गतकाळाच्या आठवणी फार येतात. या सलीलसारखाच मी आपल्या पत्नीकडे, सुमेधाकडे का
लक्ष देऊ शकलो नाही? या विचारांनी मन खिन्न होतं…
दोन वर्षांपूर्वीच, प्रदीर्घ आजारानंतर सुमेधाने या जगाचा निरोप घेतला होता. संसाराचं रहाटगाडगं ओढता ओढता ती बहुधा शरीराने झिजली होती. माझं सुमेधाशी लग्न झालं,
तेव्हा आमचं कुटुंब मोठ्ठं होतं. माझे आई-बाबा, दोन बहिणी अन् एक लहान भाऊ. आम्हा सगळ्यांच्या मागे सुमेधा पायाला चक्री लागल्यागत फिरायची.
“वहिनी, माझा नाश्ता तयार झाला का?”
“अहो वहिनी, माझे कपडे इस्त्री केलेत का?”
“सुमेधा, माझी पूजा आटोपली. चहा देतेस ना!”
“मला दुकानात जायला उशीर होतोय. माझा टिफिन आधी तयार कर बघू…” चारी बाजूंनी तिच्याकडे मागण्या मांडल्या जायच्या. सुमेधा मात्र शांतपणे प्रत्येकाला उत्तर द्यायची नि त्यांच्याकडे लक्ष पुरवायची.
स्वतःकडे लक्ष द्यायला मात्र तिच्याकडे वेळच नव्हता. अन् मीही तिच्याकडे अजिबात लक्ष देत नव्हतो. कारण ही सर्व गृहिणीची कर्तव्यच आहेत, हाच विचार मनात असायचा.
भाऊ-बहिणीच्या जबाबदार्‍या सांभाळता सांभाळता आमची मुलं कधी मोठी झाली, ते कळलंच नाही. आम्ही म्हातारपणाकडे वाटचाल करू लागलो होतो नि मुलं आपापल्या संसारात रमली.
“पप्पा, आज नं पूजा आपल्या मैत्रिणींबरोबर बाहेर जातेय. ते लोक सिनेमाला पण जातील. खूप दिवसांपासून त्यांचं ठरतंय. तुम्ही असं करा की, जरा लवकर जेवून घ्या. म्हणजे मग ती नवीन जेवण बनवून ठेवेल. तुम्ही नंतर वाढून घ्या.”
“ठीक आहे. मी वाढून घेईन माझं जेवण. तिला सांग, माझं जेवण बनवून ठेव.” मी सलीलला निश्‍चिंत केलं.
माझ्यासाठी हा बदल नवाच होता.
मला सुमेधाची पुन्हा आठवण झाली. ती कधीच अशी बाहेर गेली नव्हती. स्वयंपाक करून ती बाहेर गेली,
असं कधीच घडलं नव्हतं. मला तर ताट वाढून कसं घ्यायचं, तेही माहीत नव्हतं. ती ज्याप्रमाणे ताट वाढून पुढ्यात ठेवेल, ते चवीनं जेवायचं एवढंच मला ठाऊक होतं. घरातली
सर्व माणसं तिच्यावरच अवलंबून होती.
आपणही घराचा विचार न करता बाहेर फिरायला जावं, असं तिला कधी वाटलं नसेल का? रोज एकच चाकोरीतलं जीवन जगून तिला कंटाळा आला नसेल का? मी तरी हौसेने तिला कधी बाहेर फिरायला नेलंच नाही. मी सलीलसारखा विचार कधी करू शकलोच नाही. शॉपिंग, पार्टी या कारणांनी पूजाचं सतत बाहेर जाणं-येणं चालूच असायचं. त्यांना एकच मुलगी, तीही मेडिकलला… हॉस्टेलमध्ये राहते. त्यामुळे संसार फक्त राजाराणीचा. त्यात पुन्हा सलील पूजाची मर्जी राखून असतो…
“माझ्या साड्यांचं पार पोतेरं झालंय हो! मुलांसाठी पण काही वस्तू घ्यायच्यात.” सुमेधाने भीत भीत एक दिवस माझ्याकडे पैसे मागितले होते.
“तू पण कमालच करतेस हं अगदी. अलीकडेच आपण मुलांना कपडे केलेत. आजकाल घरखर्च किती होतो, कल्पना तरी आहे का तुला? आता दोनेक महिने तरी पैसे मागू नकोस.” मी चिडून बोललो होतो. त्यावर सुमेधा निमूटपणे माझ्या पुढ्यातून निघून गेली होती. बहुधा तिच्या डोळ्यांत पाणी आलं होतं. किती निष्ठुर नवरा होतो मी! या विचारांनी मला गलबलून आलं. मी तिला पैसे देऊ शकत नव्हतो, अशातला भाग नव्हता. पण बायको आणि मुलांवर नवरेशाही… हुकूमशाही गाजविण्याची माझी ती पद्धत होती…
आठवणींवर आठवणी दाटून येत होत्या. गतकाळातील झरोक्यांमधून झिरपत त्या माझ्या मनाच्या चौकटीतून डोकावत होत्या. पण या कडू-गोड आठवणी खरवडून आता काय उपयोग होता? ती तर हे जग सोडून निघून गेली होती. जिथे कुठे असेल, तिथे नक्कीच सुखात असेल. तशी ती होतीच खूप चांगली…
इथे या खोलीत बसून राहिलोय. भूतकाळाच्या सावल्या जरा जास्तच लांब पसरलेल्या दिसताहेत. पुरुषी अहंकार म्हणून ज्या गोष्टी मी अगदी स्वाभाविक समजत होतो, त्याच आज माझ्या मनात अपराधीपणाची जाणीव निर्माण करीत होत्या.
सुमेधाच नव्हे, तर मुलांशीही मी ताठ्यानेच वागलो होतो. तिन्ही मुलींनी तर माझ्याकडे कधी काही मागितलंच नाही. राहिला सलील… तर त्याच्या गरजांना मी नेहमीच नकार देत राहिलो. आपल्या आईच्या मध्यस्थीने मुलं आपले निरोप माझ्यापर्यंत पोहचवित होते.
सलील आणि पूजाचे आपल्या मुलीशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत. ते पाहून मला आश्‍चर्य वाटतं. परवाचीच गोष्ट घ्या. माझी नात, वरदा हिचा पूजाला फोन आला. “आई अगं, पप्पांना विचारून माझ्या अकाऊंटमध्ये वीस हजार रुपये भर ना!” अचानक एवढे पैसे कशाला हवेत, असं विचारावंसं पूजाला वाटत होतं. पण तिचा प्रश्‍न खोडून लावत सलीलच म्हणाला, “अगं, तशीच गरज भासली असेल, म्हणून तर तिने पैसे मागवलेत. तू जराही काळजी करू नकोस. माझा माझ्या मुलीवर पूर्ण विश्‍वास आहे.” एवढा विश्‍वास मी आपल्या मुलांवर कधीच दाखवला नव्हता. हा एक नवीनच अनुभव होता माझ्यासाठी…
“पप्पा, झोप येत नाही का? खोलीत प्रकाश दिसला म्हणून आलो.” सलीलने जवळ बसून माझे पाय दाबायला सुरुवात केली. “कसला विचार करताय पप्पा? आईची आठवण येतेय का?” त्याच्या जिव्हाळ्याच्या शब्दांनी… प्रेमळ स्पर्शाने माझ्या मनात काटा फुलू लागला.


“हो बेटा. कधी कधी तुझ्या आईची खूप आठवण येते. जिवंतपणी तिची कदर केली नाही मी. कधी कधी मला खूप अपराधी वाटू लागतं. तुम्हा नवरा-बायकोमधला समंजसपणा पाहिला की मन प्रसन्न होतं. तुमचं प्रेम आयुष्यभर असंच टिकून राहू दे, हेच देवाजवळ मागणं आहे.”
“पप्पा, अहो जे झालं ते झालं. त्याच्याविषयी दुःखी होऊन काही उपयोग आहे का? आईच्या त्या जीवघेण्या आजारावर तुम्ही पाण्यासारखा पैसा खर्च केला ना! उपचारात काहीही कमी पडू दिलं नाही तुम्ही. त्या काळात तुम्ही सदैव काळजीत असायचा. आईबद्दलचं तुमचं प्रेमच त्यातून दिसत होतं ना! तिलाही या गोष्टीची जाणीव होतीच ना हो!”
“तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे सलील. पण त्या दिवसांत मी तिचा हात हातात घेऊन तिला धीर तरी दिला होता का? तिच्या खांद्यावर थोपटून कधी तिचं सांत्वन तरी केलं होतं का मी? नाही ना… काही क्षण तरी माझ्याजवळ येऊन बसा हो, असे भाव तिच्या केविलवाण्या डोळ्यांतून व्यक्त होत होते. माझ्या सहवासासाठी तिचं मन तडफडत असेल, पण तिची वेदना मी समजू तरी शकलो का? माझा अहम्भाव माझ्या भावुकतेच्या आड येत होता.” माझ्या डोळ्यांत पश्‍चात्तापाचे अश्रू दाटून आले.
“विषय निघालाच आहे, तर आज मीही माझं मन मोकळं करतो पप्पा. मी लहान होतो, तेव्हा मी आईला नेहमी उदास बघायचो. मला वाईट वाटायचं. तेव्हाच मी निश्‍चय केला की, मी जिच्याशी लग्न करीन, त्या माझ्या पत्नीच्या डोळ्यांत कधीच अश्रू येऊ देणार नाही. म्हणूनच आई ज्या ज्या सुखाला पारखी झाली होती, ती सर्व सुखं मी पूजाला देऊ इच्छितो. तिला पैशांची कमतरता भासू नये, हाच माझा प्रयत्न असतो. ताई, जेव्हा आईकडे खर्चाला पैसे मागायची, तेव्हा तिची गरज भागविण्यापुरते पैसेही तिच्याकडे नसायचे. ही वेळ पूजावर येऊ नये, म्हणून लग्नानंतर लगेचच मी तिला हातखर्चासाठी वेगळी रक्कम देऊ लागलो. पूजानेही मला कधी निराश केलं नाही. तिने अतिशय कौशल्याने संसार सांभाळला. तिचा समंजसपणा आणि घरसंसार सांभाळण्याचं कौशल्य, यांची गुरूमाई माझी आईच होती. दोघींचं एकमेकींवर केवढं तरी प्रेम होतं.” सलीलही भावुक झाला होता.
“पप्पा, तुम्ही तुमच्या विचारसरणीनुसार आयुष्य घालवलं. आज जमाना बदलला आहे. स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने अधिकार मिळत आहेत. कधी कधी मी विचार करतो की, पूजाचा त्याग काय कमी आहे? मी सांगितल्यावर तिने लगेच आपली चांगली नोकरी सोडली. कारण आईच्या पश्‍चात तुम्हाला काहीही त्रास होऊ नये, असं मला वाटत होतं… असो. रात्र फार झाली आहे. आता तुम्ही झोपा. तुमच्या आणि आईच्या आशीर्वादाच्या बळावरच आमच्या जीवनात भरपूर सुख आलं आहे. आई, तर स्वर्गातून आमच्यावर लक्ष ठेवून असेल…” सलील झोपायला गेला. पण जाता जाता त्याने माझ्या कपाळाचं अतिशय प्रेमाने चुंबन घेतलं.