आधार (Short Story: Aadhar)

आधार (Short Story: Aadhar)

आधार


अश्‍विनीला अभिनवच्या फोटोकडे पाहिल्यानंतर, त्याचे बोलके, पाणीदार डोळे जणू आपल्या होकाराचीच वाटत पाहत असल्याचं जाणवलं आणि तिनं अभिनवला होकार दिला.
अश्‍विनी सुंदर, सुशील, मनमिळाऊ मुलगी. आई-वडिलांची एकुलती एक. त्यामुळे लहानपणापासून लाडात वाढलेली; स्वतःच्या मनाप्रमाणे बी.एस.सी. इन कॉम्प्युटर सायन्सची पदवी घेतलेली. पदवीपर्यंतचं शिक्षण होताच घरच्यांनी अश्‍विनीच्या मागे लग्नाचा तगादा लावला.
“अगं आशू, ऐक तर. आई कासावीस होऊन बोलत होती. आत्तापर्यंत स्वतःच्या मर्जीप्रमाणे वागत आलीस. किमान लग्न तरी आमच्या मर्जीनं कर.”
“अगं आई, मी कुठे नाही म्हणाले.
लग्न तुमच्या इच्छेनेच करेन. पण…”
“पण काय?” आई.
“तुम्ही स्थळ शोधा. मुलगा मी पसंत करणार. बोल मंजूर?”
“हो, चालेल.” आई आनंदानं बोलून गेली आणि तयारीलाही लागली.
अश्‍विनी सुंदर आणि सुशिक्षित असल्याने स्थळ शोधायला अडचण आली नाही.
रोज घरबसल्या एक ना एक स्थळ येत असे. त्यातून आई-बाबा पसंत करून काही बाजूला ठेवू लागले.
अखेर मनाप्रमाणे दोन स्थळं पसंत पडली. नाव ठेवण्यास कुठेही जागा नव्हती. दोघंही एकापेक्षा एक सरस, सुंदर आणि सुशिक्षित. आई-बाबांनी अर्थातच निर्णय आशूवर सोपवला. पहिला अभिनव पाटील दिसायला स्मार्ट, एका कंपनीत उच्च पदावर कार्यरत होता. घरी फक्त आई आणि वडील. वडील उच्च पदावरून निवृत्त झाले होते. दुसरा विवेक. स्वतःचा बिझनेस. कामात हुशार, गुणी. घरी आई-वडील आणि एक बहीण.
“आशू, आता तुलाच निर्णय
घ्यायचा आहे की दोघांपैकी तुला कोण पसंत आहे.” दोघांच्या फोटोकडे पाहत बाबा म्हणाले.
बाबांनी दोन्ही फोटो आशूकडे दिले. आशू दोन्ही फोटोंकडे पाहून विचार
करू लागली. दोघंही सरस वाटत
होते. पण अश्‍विनीला अभिनवच्या फोटोकडे पाहिल्यानंतर, त्याचे बोलके, पाणीदार डोळे जणू आपल्या होकाराचीच वाटत पाहत असल्याचं जाणवलं आणि तिनं अभिनवला होकार दिला.
त्यानंतर रीतसर बघण्याचा कार्यक्रम आटोपला. दोन्ही कुटुंबाच्या संमतीनं लग्नाचा मुहूर्त निश्‍चित झाला. अभिनवच्या परिवारास आशू मनापासून आवडली होती. आणि पहिल्या भेटीतच अभिनवनं आशूच्या मनात जागा निर्माण केली होती.
लग्नाचा दिवस उजाडला. तिच्या
आईच्या जिवाची अक्षरशः घालमेल चालली होती. बाबाही अस्वस्थ होते. लाडकी लेक दुसर्‍याच्या घरची सून होणार, या भावनेनेच त्यांना भरून आलं होतं. तर आशू एकीकडे आईवडिलांना सोडून जावं लागणार म्हणून उदास आणि दुसरीकडे अभिनवसारखा जीवनसाथी लाभला म्हणून आनंदीही होती.
सप्तपदी पार पडली आणि आशू अभीची झाली. नव्या घरात तिचा
प्रवेश झाला. नवं घर, नवीन माणसं… आशू सारं पाहतच राहिली.
“अश्‍विनी, हे आहे तुझं नवं घर. कसं वाटलं सांग बघू?” सासूबाई आनंदानं विचारत होत्या.
उत्तरादाखल आशू फक्त लाजली.
“तुला कोणत्याही गोष्टीची गरज वाटली तर मला सांग, अभिनव तर आहेच.” सासूबाई मायेनं बोलत होत्या.
अभिनव खूप प्रेमळ, काळजी करणारा होता. आशूला काय हवं, काय नको, तिला कसं खूश ठेवायचं, हे त्यानं चांगलंच जाणलं होतं. सासू-सासरेही आईबाबांप्रमाणे जीव लावत. या सुखानं आशू अगदी भारावून गेली होती.
पण नशीबापुढे कुणाचंही काही चालत नाही, हेच खरं. आशू आनंदात न्हाऊ बघत होती आणि तो कठोर विधाता वेगळीच लीला रचत होता.
आशूच्या लग्नाला तीन महिने लोटले. या तीन महिन्यात तिला सर्वांची, सर्वांच्या स्वभावाची, आवडी-निवडींची सवय झाली होती. पण अभीच्या वागण्यात मात्र काहीसा बदल जाणवू लागला होता. अभी उशिरापर्यंत ऑफिसमध्येच राहायचा. सुट्टीच्या दिवशीही काही ना काही कामानिमित्त तो घराबाहेरच राहू लागला होता. ही परिस्थिती आईबाबांच्या नजरेतूनही सुटलेली नव्हती. एकदा अभी रात्री अकरा वाजता घरी आला. आशू त्याची वाट पाहत वरच्या रूममध्ये पलंगावर पडल्या पडल्या विचार करत होती. अभी हॉलमध्ये येताच आईनं प्रश्‍न विचारला,


“हल्ली ऑफिसमधून घरी यायला तुला खूप वेळ होतो.”
“अगं आई, काम
खूप वाढलंय आणि संसाराची जबाबदारीही आहे. मेहनत करायला नको?” अभी सहज उत्तर देऊन चालता झाला. अभीची नजर काहीतरी
वेगळं सांगत असल्याचं आईच्या लक्षात आलं आणि अभी निघू गेल्यानंतर आईबाबा दोघं एकमेकांकडे संशयी नजरेने पाहत राहिले.
आई आणि लेकाचं संभाषण आशूनं ऐकलं होतं आणि ती खूश झाली होती
की, आपला नवरा आपल्यासाठी इतके कष्ट करत आहे. आणि याच समजुतीत तिचे दिवस जाऊ लागले. पुढे पुढे अभिनवचं वागणं आशूला जास्तच खटकू लागलं. आधी तो उशिरा आला तरी आशूसोबत बोलायचा, तिला मिठीत घ्यायचा; पण आता तो बोलतही नसे. कामाचं टेन्शन असेल, म्हणून आशूही दुर्लक्ष करू लागली. पण आशूला दिवस गेले तसं तिला अभीच्या वागण्याकडे
लक्ष द्यावं लागलं. आशूला दिवस गेल्याचं ऐकून तिचे आईबाबा, सासूसासरे सगळे आनंदी होते. पणऽऽऽ अभी? काहीच बोलला नाही. आनंद तर दूरच, पण तो घरातून निघून गेला नि तीन दिवस झाले तरी घरी परतला नव्हता. आता अश्‍विनीला त्याच्या वागण्याची शंका येऊ लागली. या वेळी मनाला समजवण्याचे प्रयत्नही निष्फळ ठरले.
रात्री जेवणाच्या टेबलवर आशूने सासू-सासर्‍यांशी या विषयावर बोलण्याचा विचार केला. अभिनव घरातून जाऊन तीन दिवस झाले, तरी कुणालाही त्याचा कॉल, मेसेज आला नव्हता. न राहवून आशूनं विषय काढलाच,
“आई, मला अभिनवबद्दल तुमच्याशी काही बोलायचं होतं.” निःश्‍वास टाकत अश्‍विनी बोलून गेली. सासूसासरे इतक्या दिवसापासून आशूची नजर चुकवत होते, पण आज नाइलाज होता. त्यांनीही मग तिच्याशी स्पष्टच बोलायचं ठरवलं.
“बेटा अश्‍विनी, आम्हाला माहीत आहे
जे होत आहे,
ते चुकीचे आहे. पण आधी आमचं ऐकून घे. मग आमचं काही चुकतंय का ते सांग.”
आशू अवाक्
होऊन त्यांचं बोलणं
ऐकतच राहिली.
“अभीच्या कॉलेजमध्ये केतकी नावाची एक मुलगी होती. दोघांचं कधी सुत जुळलं ते कळलंच नाही. पुढे दोघांचं शिक्षण एकत्रच झालं. अभिनवचं तिच्यावर अतिशय प्रेम होतं. परंतु, प्रेम ध्येयापर्यंत पोहोचण्याआधीच दोघांची ताटातूट झाली. केतकीनं अभीला काहीही कल्पना न देता, एका बिझनेसमॅनशी लग्न केलं. तिच्या या वागण्यामुळे अभी पुरता कोलमडला होता. एकटा राहू लागला होता. पण मी आणि त्याच्या आईने धीराने त्याला यातून बाहेर काढलं. तुझ्याशी लग्न झाल्यावर परिस्थिती बदलेल असं आम्हाला वाटलं आणि झालंही तसंच. पण…” बाबांचे डोळे पाणावले होते.
आशू हे सगळं निःस्तब्ध होऊन
ऐकत होती. बाबांच्या बोलण्याने
जणू तिचा श्‍वासच रोखला गेला…
“पण काय बाबा?” आशूनं अवंढा गिळून बाबांना विचारलं.
बाबा काही बोलूच शकले नाहीत.
मग आई बोलती झाली,
“केतकी अभीच्या आयुष्यात परत आली आहे.”
या एका वाक्याने अश्‍विनीवर जणू आभाळच कोसळलं.
“अभीच्या अशा वागण्यानं आम्हीही त्रासलो होतो. म्हणून आम्ही परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आम्हाला कळलं, केतकीनं तिच्या नवर्‍याला घटस्फोट दिला आहे आणि ती पुन्हा अभीच्या जीवनात येऊ पाहत आहे.” एवढं बोलून आई रडू लागली.
अश्‍विनी अवाक् होऊन ऐकत होती. आईच्या रडण्याने तिची तंद्री तुटली. ही वेळ संताप, क्रोध, पश्‍चात्ताप करण्याची नसून आई-बाबांना आधार देण्याची आहे, हे ओळखून आशू बोलती झाली,
“आई-बाबा तुम्ही काळजी करू नका. सर्व काही ठीक होईल.”


आशूनं आई-बाबांना तर आधार दिला, पण स्वतः मात्र आतून खचली होती. का बरं नियतीनं तिच्यासोबत हा खेळ खेळावा? तिने तिच्या आई-बाबांना याची कल्पना दिली नव्हती.
अभी नक्की परत येईल, अशी तिला खात्री वाटत होती. आणि तिसर्‍या दिवशी अभी परत आला. आई-बाबांना आनंद झाला. पण त्यांना काय माहीत? हा आनंद क्षणिक आहे.
अभी आत येताच बोलून गेला, “आई-बाबा मी केतकी शिवाय राहू शकत नाही. नशिबानं मला पुन्हा संधी दिली आहे, ती मी सोडू शकत नाही.”
हे ऐकताच बाबाही चिडून बोलले, “जा, खुशाल जा. पण माझ्या घरात तुला आता जागा नाही.”
अभीला जणू हेच हवं होतं.
तो निमूटपणे स्वतःच्या रूममध्ये
गेला. बॅगमध्ये सामान भरलं आणि अश्‍विनीकडे एक नजरही न टाकता
तो निघून गेला, कायमचा…
अभिनवला जाऊन आता बरेच महिने लोटले होते. अश्‍विनीने आई-बाबांना कसलीही कल्पना दिली नव्हती. अश्‍विनीचं बाळंतपण जवळ आलं होतं. आईने बाळंतपणासाठी घरी येण्याचा हट्ट केल्यामुळे अश्‍विनी आईकडे गेली. अभी कामानिमित्त अमेरिकेला गेला असल्याचा बहाणा केला.
पण जे व्हायचं तेच झालं. आशूने एका सुंदर मुलाला जन्म दिला आणि तिथं घरी अभीने घटस्फोटाची नोटीस पाठवली. ती पाहून सासू-सासर्‍यांच्या पायाखालची जमीनच सरकली.
आता अश्‍विनीने आई-बाबांना
सर्व हकिकत सांगितली. आणि आपण सासू-सासर्‍यांचा आधार बनून त्यांच्यासोबतच राहणार असल्याचंही
तिनं सांगितलं. आशूचे विचार ऐकून आई-बाबांनाही आपल्या लेकीचा अभिमान वाटला.
वर्षामागून वर्षं गेली. आशूने
मुलाचं नाव प्रतीक ठेवलं. प्रतीक आता तीन वर्षांचा झाला होता. अश्‍विनी सासू-सासर्‍यांकडे राहून नोकरी करत होती. अभीशिवायही दिवस सुखाने
जात होते. परंतु, नियतीचा खेळ
अजून संपलेला नव्हता. आशूची परीक्षा अजून बाकी होती.

एक दिवस आशू कामावरून जरा लवकरच परतली. काम कमी होतं, आज लवकर घरी जाऊन सर्व जण कुठेतरी फिरायला जाऊ, या विचारानं ती घरी आली. घरी आल्यावर तिनं पाहिलं तर आईबाबा हॉलमध्येच बसलेले होते. प्रतीक झोपला होता नि आईबाबा काहीशा चिंतेत दिसत होते. न राहवून आशू त्यांच्यासमोर जाऊन उभी राहिली.
आई बोलू लागल्या, “अश्‍विनी, आज अभिनव आला होता.”
अश्‍विनी काहीही भाव न दर्शवता ऐकत होती.
“अभीला घर सोडून जाण्याचा पश्‍चात्ताप होत आहे. तो आमच्याशिवाय राहू शकत नाही. त्याला परत या घरात यायचं आहे. आणि खरं तर आम्हालाही त्याच्याशिवाय कुणाचा आधार आहे? आम्ही अभिनवला संमती दिली आहे. केतकीही सोबत असेल, पण तू काळजी करू नकोस. आम्ही कधीही तुला अंतर देणार नाही.” सासूबाई एका दमात बोलून गेल्या.
अश्‍विनी सरळ वर आली,
पलंगावर पडून रडता रडता विचार करू लागली. ‘आमच्याशिवाय?’ याचा अर्थ आशू लावत होती. म्हणजे फक्त आई आणि बाबांशिवाय…? अभिनवशिवाय कुणाचा आधार नाही? मी माझ्या आयुष्यातले आनंदाचे, महत्त्वाचे क्षण न जगता ज्यांचा आधार बनले, आज ते मला नाकारत आहेत. किती सहज बोलून गेले की, दुसरा आधार नाही?
अश्‍विनी मनाशी
निश्‍चय करून उठली, सगळं सामान एका बॅगेत भरलं. ज्या घरात दुसर्‍यांच्या आधारासाठी ती राहिली होती, त्याच घरात आता आश्रित बनून राहणं तिला जमणार नव्हतं. ती आता त्या घरात एक क्षणही राहू इच्छित नव्हती. असा विचार करून अश्‍विनी प्रतीकला घेऊन तडक निघून गेली, कायमची… आता प्रतीकच तिचा एकमेव ‘आधार’ होता.
– सबा शेख

कोण पळाले? (Katha – Kon Palale?)