नोबेल विजेती लेखिका : ॲनी एनोरक्स (Nobel Prize ...

नोबेल विजेती लेखिका : ॲनी एनोरक्स (Nobel Prize Literature: Annie Ernaux)

नोबेल विजेती लेखिका : ॲनी एनोरक्स

—— सुधीर सेवेकर

गुरुवार दि. ६ऑक्टोबर रोजी ,म्हणजे भारतीय कालगणेनुसार विजयादशमी वा दसऱ्याच्या दुसऱ्याच दिवशी इ. स.२०२२ सालचा साहित्याबाबतचा नोबेल पुरस्कार घोषित झाला आणि तो ॲनी एनोरक्स या फ्रेंच लेखिकेस घोषित झाला. त्यादिवशी प्रसारमाध्यमातून ॲनीची जी छायाचित्रे प्रसिद्ध झाली ,ती पाहिल्यावर ही लेखिका नसून हॉलिवूडची कुणीतरी प्रख्यात जेष्ठ अभिनेत्री आहे असेच अनेकांना वाटले असेल. मलाही आरंभी तसेच वाटले.  अत्यंत बोलका चेहरा  व डोळे लाभलेली आज वयाच्या ब्याऐंशीव्या वर्षात असलेली स्त्री ही अभिनेत्रीच अधिक वाटली . वाटते .

तिच्या कादंबऱ्यांवर आधारित इंग्रजी चित्रेही यापूर्वी गाजलेली आहेत. खुद्द तिनेही अभिनेत्री म्हणून काम करावे असाही खूप प्रयत्न हॉलिवूड सिनेसृष्टीने केला. परंतु या देखण्या आणि विलक्षण बोलक्या चेहऱ्याच्या लेखिकेस सिनेसृष्टीचा मोह कधीच आकर्षित करू शकला नाही. “ मी एक स्त्री आहे आणि मी एक लेखिका आहे. आणि हीच माझी ओळख आहे.” असे ही स्त्री यापूर्वी अनेकदा प्रसारमाध्यमांना निक्षून म्हणालेली आहे. असो.

ॲनी ही जन्माने फ्रेंच आहे. तिचा जन्म १ सप्टेंबर १९४० चा. म्हणजे तिचे आजचे वय ब्याऐंशी वर्षांचे आहे. या वयात तिला हा नोबेल पुरस्कार तिच्या लेखनाबद्दल , साहित्यक्षेत्रातील कामगिरीबद्दल घोषित झालाय. तो मिळवणारी ती पहिली फ्रेंच लेखिका आहे. आजवर ११९ लोकांना साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळालाय. त्यात केवळ सतरा महिला आहेत. महिला – स्त्रिया यांचे जीवनाचे आकलन पुरुषांपेक्षा खूप वेगळ्या जाणिवांचे , संवेदनक्षमतांचे असते असे सर्वसाधारणपणे मानले जाते. परंतु साहित्याच्या नोबेल पुरस्कारात लेखिकांचे प्रमाण खूप कमी आहे  आणि म्हणून ॲनी एनोरक्स हिचे एक आगळेवेगळे महत्त्व आहे.

ॲनीस हा पुरस्कार मिळण्याचे महत्त्वाचे कारण आहे तिने सातत्याने भाषा , आर्थिकगट आणि लिंगभेद या तीन मुद्यांवरून समाजात, जगात असलेल्या भेदाभेदीवर खूपच सुस्पष्ट आणि सडेतोड पद्धतीने केलेले लेखन हे आहे. ॲनीचा जन्म श्रमजीवी ,कष्टकरी पालकांच्या पोटी १/९/१९४०रोजी झाला. पण तिचे शालेय शिक्षण प्रामुख्याने उच्चभ्रू आणि लब्धप्रतिष्ठित कुंटुबातील मुली शिकत अशा शाळेत झाले. त्यामुळे वर्गभेद ,लिंगभेद , भाषाभेद यामुळे मिळणारी वागणूक , त्यातील असमानता इत्यादी अत्यन्त संवेदनक्षम वयात ॲनीच्या वाट्याला आले. आणि त्यातून एक प्रखर सामाजिक भान तिच्यात निर्माण झाले. म्हणूनच वयाच्या जेमतेम अठरा वर्षांपासून ती गरीब , दुर्दैवी मुलामुलींच्या उन्हाळी शिबिरात स्वयंसेवक म्हणून काम करू लागली. आरंभी तिने त्यामुळेच शाळाशिक्षिका म्हणूनही काम केले. त्यानंतरची वीसपंचवीस वर्षे मात्र तिने विद्यापीठीय स्तरावरची प्राध्यापिका म्हणून व्यतीत केली.

विवाहित पुरूषासोबतचे प्रेम  तिची पहिली कादंबरी इ. स. १९७४ मध्ये प्रसिद्ध झाली. तिची फ्रेंच साहित्यात चर्चा खूप झाली. पण जागतिक स्तरावर ती गाजली नाही. जी गाजली ती तिची “अ सिंपल पॅशन” नामक इंग्रजीत प्रसिद्ध झालेली कादंबरी. त्यात एक स्त्री एका विवाहित परदेशी मुत्सद्याच्या प्रेमात पडते -त्याची कहाणी सांगितलेली आहे. अशा प्रेमाबाबत त्या स्त्रीने अजिबात स्वतःला “गिल्टी” किंवा अपराधी मानू नये. कारण ते प्रेम मनापासूनचे असते. म्हणून त्याबाबतची लज्जा कुणी बाळगू नये असे या कादंबरीत ॲनीने सडेतोडपणे मांडले होते. त्यामुळे हा विचार ,हा दृष्टीकोन जगभर वाखाणला गेला.

त्याचप्रमाणे खुद्द ॲनीने तिच्या जेमतेम तेविसाव्या वर्षी जो गर्भपाताचा अनुभव घेतलेला होता , तो तिने तिच्या “ द हॅपनिंग” या कादंबरीत मांडलाय. तेंव्हा फ्रान्समध्ये गर्भपात कायदेशीरदृष्टया अवैध मानला जाई . या कादंबरीवर नंतर चित्रपट निघाला. तोही खूप गाजला. त्याच दरम्यान “लेस ॲनीस” हे तिचे मूळ फ्रेंच भाषेतील लेखन जे इ. स. २००८ मध्ये प्रसिद्ध झाले होते —- ते इ.स. २०१७ मध्ये इंग्रजीत अनुवादित होऊन जगासमोर आले. तेही खूप गाजले.

यामध्ये ॲनीने दुसऱ्या महायुद्धानंतर फ्रान्समध्ये जे मूल्यव्यवस्था ,समाजव्यवस्था यात काय बदल झाले ते खूप सृजनशीलतेने मांडले. ते जगभर गाजले. कारण अनेक देश — समुदाय , यांना त्यात स्वतःचेच प्रतिबिंब दिसले. याच दरम्यान ॲनी एनोरक्स यांना अनेक विद्यापीठांनी मानद डॉक्टरेटही दिली.

गेटिंग लॉस्ट : इ.स. १९७२ ते १९८१ या दहा वर्षात एक लेखिका म्हणून विकसित होण्याची ,फुलण्याची माझी महत्वपूर्ण वर्षे होती हे ॲनी स्पष्ट्पणे सांगते. ती स्वतःला स्त्रीमुक्तीवादी वैगेरे मानत नाही. पण स्त्रीमुक्ती चळवळीची मी एक प्रशंसक नक्कीच आहे. कारण गेली पन्नास -साठ वर्षे ती जे लेखन करीत आहे त्यात ती लेखणीचा उपयोग सामाजिक असमानतेविरुद्ध एखाद्या कट्यारीसारखा म्हणजे तीक्ष्ण हत्यारासारखा करते आहे. फ्रान्समध्ये तर ती लोकप्रिय आहेच. परंतु तिच्या साहित्याचे अनुवाद जेंव्हा इंग्रजीतून प्रसिद्ध व्हायला लागले तेंव्हापासून ती जगभर मशहूर झालीय. अनेक विदयापीठांनी तिला मानद “डॉक्टरेट” दिलीय.

तिचे “ गेटिंग लॉस्ट” हे इंग्रजी अनुवादित पुस्तक नोबेल पुरस्कार घोषणे पूर्वी केवळ कांही दिवस प्रकाशित झाले. त्याला विलक्षण प्रतिसाद जगभर मिळतोय.

अशा या ॲनी एनोरक्स या फ्रेंच लेखिकेस — नोबेल पुरस्कार विजेत्या लेखिकेस अभिनंदन आणि सलाम!

—— सुधीर सेवेकर