न सुटणारं ग्रहण (Na sutnar grahan)

न सुटणारं ग्रहण (Na sutnar grahan)

By Atul Raut in

दाराला आतून कडी नव्हती, नुसत्या लॅचवर ठेवलं होतं. कुंदा असं कधीच करत नाही, म्हणून जरा शंका होती.
ती नेहमीसारखी दिसत नाहीये…

इन्स्पेक्टर मोरे तीन-चार पोलिसांसह आले. आल्याबरोबर त्यांनी प्रश्‍न विचारायला सुरुवात केली…
“हं, आता सांगा. फोन कोणी केला?
यांना आधी कोणी पाहिलं?… अं, तुम्ही इथंच राहता का?…”
ते आल्याबरोबर कामाला लागले होते. चौकशी करणं आणि त्यातून गुन्हेगाराचा शोध
घेणं, हे त्यांचं कामच होतं. इथे तर आत्महत्या की खून की नैसर्गिक मृत्यू, हेही शोधायचं होतं.
“मी पाहिलं तिला आधी. मी शेजारी राहते,” सरितानं सांगितलं.
“हे दार उघडच होतं का? तुम्ही आत
कशा शिरलात?”
“नाही. दार उघडं नव्हतं. मी पहिल्यापासून सांगते. काय झालं ते… काल आमच्याकडे आलेले पाहुणे यु.एस.ला गेले. त्यांना सोडायला आम्ही दोघं रात्री एअरपोर्टवर गेलो होतो, त्यावेळी या कुंदाच्या घरी दिवा दिसला. घरी म्हणजे, तिच्या बेडरूममध्ये! ती एकटीच राहते आणि आत्ता सकाळीही हा दिवा चालूच होता. रात्री मी चौकशी केली नाही, कारण ती वाचत असेल,
टी.व्ही. बघत असेल किंवा काही काम करत असेल, असं मला वाटलं. पण आत्ता सकाळीही हा दिवा चालूच होता म्हणून बेल वाजवली, दार ठोकलं, फोनही करून पाहिला. तरी काही नाही! मग जरा भीती वाटली. सतीशला, माझ्या मिस्टरांना आणि या अनुराधाला हाक मारली.
ही इथेच तिसर्‍या मजल्यावर राहते. आम्ही तिघी मैत्रिणी आहोत. मग माझ्याजवळच्या तिच्या चावीनं दार उघडलं. दाराला आतून कडी नव्हती, नुसत्या लॅचवर ठेवलं होतं. कुंदा असं कधीच करत नाही, म्हणून जरा शंका होती. दार उघडल्यानंतर आम्ही दोघी आत गेलो, हे दोघेही पाठोपाठ आले. तेव्हा हे दृश्य दिसलं. ती नेहमीसारखी दिसत नाहीये, म्हणून भीती वाटली आणि तुम्हाला फोन केला.” सरितानं सविस्तर सांगितलं.
“नेहमीसारखी दिसत नाही, म्हणजे नेमकं काय? आणि आणखी काही वेगळं दिसतंय का इथे? दुसरं म्हणजे, त्यांचे कोणी नातेवाईक… कुठे असतात? त्यांना फोन केला का तुम्ही? कधी येतात का इकडे? तुम्ही ओळखत असाल नं? बाई एकट्या का राहायच्या? नातेवाईक गावी असतात का?” इन्स्पेक्टर मोरेंनी धडाधड प्रश्‍न विचारले.
“नाही, तिला नातेवाईक कोणी नाहीत. म्हणजे, दूरचा काका की मामा कोणीतरी आहे. तो अमेरिकेत असतो, तो आत्तापर्यंत कधीच आलेला नाही. कधीतरी त्याचा फोन येतो. त्याचा फोटो दाखवला होता तिनं एकदा. पण हां, तिचा एक मित्र येतो, पण आम्ही ओळखत नाही त्याला. तिचं लग्न ठरलं होतं. तिच्या बोटात लाल खड्याची मोठी अंगठी होती, ती पाहिली होती. बाकीचे दागिने ती काढून ठेवत असे, पण अंगठी चोवीस तास बोटात असे. ती आता दिसत नाहीये. आणि कुंदा नेहमी टवटवीत, हसरी दिसत असे. आता पाहा कशी, घाबरल्यासारखी, रडवी दिसतेय. आणि हो रात्री झोपताना ती अशी साडीमध्ये कधीच नसायची, गाऊन घालून झोपत असे. बाकी काही वेगळं नाही वाटत मला!” सरिता कुंदाकडे विषण्ण नजरेनं पाहत होती.
“ताई, त्या मित्राशीच लग्न ठरलं होतं का यांचं? कधी आला होता तो इकडे? काही माहीत आहे?”
“नाही नं. काल तर आम्ही… तसं तर गेला आठवडाभर आम्ही पाहुण्यांच्या गडबडीत होतो. त्या आधी एकदा तो आलेला माहीत आहे. साधारणपणे दोन-तीन दिवसांतून त्याची फेरी असतेच. कधी कधी दोघं फिरायला, सिनेमाला वगैरे जातात. ती सांगायची कधीतरी, गेल्या आठ-दहा दिवसांत आम्ही भेटलोच नाही.” सरिता सांगत होती.
“आई, कालच आले होते ते डॉक्टरकाका!” छोटा कुणाल मध्येच म्हणाला. मोरेंनी त्याच्याकडं पाहिलं.
“कोण डॉक्टरकाका, म्हणतोस तू?” मोरेंनी विचारलं.
“म्हणजे या मावशींकडे यायचे नं ते… त्यांच्या गाडीवर ती डॉक्टर लिहिलेली पाटी होती. म्हणजे ती नाही का… लाल प्लसची खूण असते आणि त्यावर डॉक्टर असं इंग्लिशमध्ये लिहिलं असतं, तो स्टिकर लावलेला होता. म्हणून मी त्यांना डॉक्टरकाका म्हटलं! ते नेहमी त्याच गाडीतून येतात. मावशीला एकदाच त्यांच्या गाडीतून नेलंय त्यांनी. नाहीतर कधी कधी वेगळी टॅक्सी करून जातात. मी बघितलंय.” कुणाल लहान असला तरी खूप हुशार दिसला.
“तू ओळखतोेस का या डॉक्टरकाकांना?” मोरेंनी चौकशी सुरू केली.
“नाही, म्हणजे तसं ओळखत नाही; पण त्यांची गाडी
नक्की ओळखेन. त्या गाडीचा नंबर पण माहीत आहे मला!” कुणाल मजेत सांगत होता.
“हो का? सांग बरं नंबर.” इन्स्पेक्टर मोरे म्हणाले.
कुणालनं नंबर सांगितला, गाडीचा पांढरा रंग सांगितला. गाडीचं वर्णनही केलं. इन्स्पेक्टर मोरे चकित झाले. पण त्यांनी चेहर्‍यावर तसं दिसू दिलं नाही. ते थोडे विचारात पडले.
“हा नंबर… तुला खात्री आहे? तू ओळखशील का या डॉक्टरकाकांना? सांग बरं कसे दिसतात?” इन्स्पेक्टर
मोरेंनी कुणालला विचारलं.
“हो, ओळखेन की, तसे गोरे आहेत; पण खूप गोरे नाहीत. केसांचा छान भांग पाडतात आणि चष्मा लावतात. तो नवीन पद्धतीचा आहे. माझ्या बाबांसारखा नाहीये. जरा उंच आहेत.” कुणालचं उत्तर.
“बरं, मी आता थोडं काम करतो. नंतर तुला बोलावतो. त्यावेळी सांगेन तू काय करायचं ते! आता जा खेळायला!”
इन्स्पेक्टर मोरे झटपट कामाला लागले. त्यांनी कुंदाच्या लँडलाईनवरून फोन केला.
“हॅलो डॉक्टर, मी काय बोलतो ते आधी ऐका, तुम्ही बोलू नका. आता तिथे तुमच्या बाजूला कोणी आहे का?”
“नाही.”
“ठीक. तुमचा तो पुतण्या, तुमची गाडी वापरतो का?”
“हो.”
“मला वाटलंच होतं. तर आता इथे एक महिला मेलेली आहे. मी तपास करतोय. हा खून असावा, अशी शंका आहे.
पण प्राथमिक तपासणीसाठी तुमच्या पुतण्याला तुमची गाडी घेऊन पाठवा. तुम्हाला काम आहे, म्हणून तुम्ही येऊ शकत नाही असं सांगा, पण त्यालाच पाठवा; तुमची गाडी घेऊन, लवकर हे महत्त्वाचं. बाकीचं मी नंतर सांगेन.”
“मोरे साहेब!” डॉक्टर काळे मध्येच म्हणाले, “मी या शैलेशला पाठवलं तर चालेल का? आत्ता मला येता येणार नाही. हा माझा पुतण्या आहे. आत्ता इथे आलाच आहे. तोही डॉक्टर आहे, त्याला पाठवतो. हो, हो लगेच येईल तो. माझी गाडी देतो, म्हणजे लवकर पोहोचेल. कुठे ते सांगा. बरं बरं त्यालाच फोन देतो. त्याला सांगा पत्ता. शैलेश घे फोन. मोरेकाका काय पत्ता सांगतील तिथे जा.
एक बॉडी सापडली आहे. प्राथमिक तपासणी कर, म्हणजे बॉडी पोस्टमार्टेमला नेता येईल. घे.”
“हॅलो, मोरेसाहेब, मी शैलेश… काकांनी सांगितलं मला, सांगा पत्ता… ओके. मी लगेच निघतो. ठेवतो फोन.” शैलेशनं फोन ठेवला आणि तो निघाला.
मोरेंनी मुद्दाम चुकीचा पत्ता सांगितला होता. मोरेंना खात्री होती, शैलेश बरोबर कुंदाच्या फ्लॅटवरच येईल. मग ते कुणालला काय करायचं, ते सांगू लागले.
“हा डॉक्टर इथे येईल. तू फक्त तोच आहे का, ते मला खूण करून सांगायचं. पण माझ्याकडे बघायचं नाही. आईला काहीतरी हो/नाही असं सांगायचं. त्याला समजता कामा नये. करशील एवढं? तू करशील, मला खात्री आहे, तू खूप हुशार आहेस!”
कुणाल पटकन म्हणाला, “होऽऽऽ! जमेल की. ‘हो’ आई
मी येतो घरी किंवा ‘नाही’ मी खेळतोय असं सांगेन! चालेल
नं पोलीसकाका?”
“हो, गुड! आता मी कामाला लागतो. तुम्ही सगळे तुमच्या घरी किंवा बाहेर कुठेही जा. इथे आत थांबायचं नाही. आम्हाला आमचं काम करू दे. ओके.” मोरेंनी सर्वांना बाहेर घालवलं.

शैलेशची गाडी थांबली, तो उतरून बिल्डिंगकडे पाहत पाहत आत शिरला. कुणालनं त्याला वरून पाहूनच ओळखलं होतं, तरी तो जरा थांबला. शैलेश लिफ्टमधून बाहेर पडला आणि कुंदाच्या फ्लॅटकडे येऊ लागला.
“हो, आई, मी घरी येतो. मला भूक लागलीय.” कुणालनं मोठ्या आवाजात आईला सांगितलं. इन्स्पेक्टर मोरेंना खात्री होतीच, पण परत एकदा कन्फर्म केलं त्यांनी. कुणालची साक्ष काढावी लागेल, असं मनात म्हणत त्यांनी शैलेशला बॉडी दाखवली आणि त्याची प्रतिक्रिया जाणू लागले.
शैलेशनं प्राथमिक तपासणी केली आणि सांगितलं, “बहुतेक ही आत्महत्या असावी. इथे कुठे काही…”
“किती वेळापूर्वी मृत्यू झाला असावा असं वाटतं तुला?” इन्स्पेक्टर मोरेंनी मध्येच विचारलं.
“मला वाटतं झोपेच्या गोळ्या वगैरे काहीतरी घेऊन झोपली असेल बाई. इथे कुठे खुनाची लक्षणं दिसत नाहीत. वेळ तशी नक्की सांगता येणार नाही, पण झोपताना गोळ्या घेतल्या असणार! आता त्या मुद्दाम घेतल्या की, चुकून घेतल्या ते कळायला मार्ग नाही.” शैलेशनं आपलं मत नोंदवलं.
“हो, तेही खरंच म्हणा! आता पोस्टमार्टेमनंतरच काय ते कळेल. चला रे, ठसे वगैरे घेऊन झाले नं? अरे, आमचे पण ठसे घे. या कॉटच्या पाठीवर मी हात ठेवला होता, शैलेशनंही ठेवला होता. आमचे दोघांचेही घे, म्हणजे ते वगळता येतील. त्या शेजारच्या बाईंचेही घे. त्या इथे कधीतरी येतात, तेव्हा त्यांचेही सापडतील कुठेतरी… तेही वगळावे लागतील. कळलं ना?”
ठसे तज्ज्ञाने सर्वांचे ठसे घेतले. शैलेशलाही नाही म्हणता येईना, मग पोलीस अ‍ॅम्ब्युलन्समधून कुंदाची बॉडी पोस्टमार्टेमसाठी पाठवली आणि तिच्या फ्लॅटला कुलूप लावून सील करून इन्स्पेक्टर मोरे आणि इतर सर्व बाहेर पडले.

“बाईंचे दागिने गहाळ झाले, म्हणजे चोरी वगैरे झाली असणार!” शैलेशनं उगीचच मत मांडलं.
“त्या चोरानंच जबरदस्तीनं गोळ्या दिल्या असतील का?” शैलेश जास्त बोलून अडकत चालला होता. पण त्याला ते कळत नव्हतं. इन्स्पेक्टर मोरेंची खात्री पटत चालली. त्यांनी मग दागिने कुठे विकले असावेत, असा विचार करून तपास सुरू केला. तेव्हा रुपचंद मारवाड्याच्या पेढीवर तपास लागला. त्यानंही शैलेशचंच नाव घेतलं. शैलेशचा फोटोही रुपचंदने ओळखला. तिथंही त्यानं काकांचीच गाडी नेली होती. दागिने रुपचंदने दाखवले. अंगठी त्यांच्याकडूनच केली होती. त्याची खरेदीची पावतीही दाखवली त्यांनी. आणि कुंदाच्या खुनाच्याच दिवशी,
हे सर्व दागिने रुपचंदकडे विकले होते.
इन्स्पेक्टर मोरेंनी एक वेगळाच निर्णय घेतला. शैलेशची आणखी खोलात जाऊन चौकशी केली आणि त्यात खूपच माहिती मिळाली. त्याच्या फसवाफसवीचे खूप किस्से उजेडात आले. जास्तीत जास्त पुरावा गोळा करून नंतर इन्स्पेक्टर मोरेंनी एकदा शैलेशला घोळात घेतले.
“शैलेश, आई कशी आहे तुझी?” इन्स्पेक्टर मोरेंचा मिश्किल प्रश्‍न.
“माझी आई तर केव्हाच गेली. चार-पाच वर्षं तरी झाली असावीत.” शैलेशनं सहज सांगितलं.
“हं, आता बोल. हे असं का केलंस तू?” इन्स्पेक्टर मोरेंचा टोकदार प्रश्‍न.“मी काय केलं काका?” त्याने भोळेपणाचा आव आणला.
“त्या राणेबाईंचा खून तू का केलास? ते सांग. तुझ्या विरुद्ध खूप पुरावे आहेत. पण कारण समजलं नाही. ते तूच
सांगू शकशील.”
“काका, काय बोलताय तुम्ही? कसले पुरावे? पुरावा
कसा मिळेल तुम्हाला? अशक्य! उगीच काहीतरी सांगू नका.” शैलेश चाचरत बोलत होता.
“तू दीपचंदकडे दागिने विकलेस?”
“दीपचंद नाही, रुपचंद काका! रुपचंदच्या पेढीवर!”
शैलेश मध्येच म्हणाला. पण इन्स्पेक्टर मोरेंकडे पाहिल्यावर त्याची चूक त्याच्या लक्षात आली.
“म्हणजे तू पुरावा मिळू नये असे सर्व प्रयत्न केलेस, पण तरीही तुझ्या नकळत ते तिथे राहिले आणि ते आम्हाला मिळाले! तू फक्त कारण सांग! म्हणजे तू डॉक्टर नाहीस… कसलाही डॉक्टर नाहीस, साधा पीएचडी डॉक्टरही नाहीस,
हे तिला कळलं, की तुझे फसवाफसवीचे धंदे तिला कळले,
की तिनं लग्नाचं टुमणं लावलं, की तुझं दुसरं प्रकरण-लफडं तिला कळलं! यातलं कोणतं कारण किंवा अजून वेगळंच काही कारण झालं? अर्थात तू सांगितलं नाहीस तर आम्ही तेही शोधून काढू. इतकं शोधलं तर तेही शोधता येईलच की!
आत्ता सांगत नसशील तर राहू दे. नंतर कोर्टातच सर्व कबुलीजबाब दे! आम्हाला कसला पुरावा मिळाला हे पाहिजे
नं तुला. सांगतो- एक म्हणजे, तुला चुकीचा पत्ता देऊनही
तू बरोबर राणेबाईंच्या घरी आलास. दुसरं, शेजारच्या कुणालनं, त्या सात वर्षांच्या मुलानं तुला बरोबर ओळखलं. तिसरं,
मी दीपचंद म्हणालो तर तू लगेच ते दुुरुस्त करून रुपचंदची पेढी असं सांगितलंस… आई आजारी आहे, आत्ता रात्रीच्या गाडीनं जायचं आहे, म्हणून कॅश द्या, चेक नको असं रुपचंदला सांगितलंस. आणि हे दागिने कुंदाचा खून करून त्याच दिवशी विकलेस तू! चौथा पुरावा, राणेबाईंच्या घरात ठिकठिकाणी
ठसे सापडले तुझ्या हाताचे. आणखी कोणते पुरावे हवेत?
आता कारण सांगतोस, की कोर्टातच बोलणार आहेस?” इन्स्पेक्टर मोरेंनी जरा दमात घेतलं. पण शैलेश काही बोलत नव्हता. त्याचा चेहरा आणि त्याची देहबोली मात्र खरं काय
ते सांगत होती.
इन्स्पेक्टर मोरेंनी खूण करून दोन कॉन्स्टेबलना आता बोलावलं आणि शैलेशची लॉकअपच्या दिशेनं वरात नेली. त्याच्या चेहर्‍याची रया पार गेली होती. चंद्रासारख्या मुखड्याला ग्रहण लागल्याचं दिसत होतं. इन्स्पेक्टर मोरेंनी दीर्घ निःश्‍वास टाकून खुर्चीत अंगं टाकलं!