आठवणीतली दिवाळी (Memories Of Diwali)

आठवणीतली दिवाळी (Memories Of Diwali)

आठवणीतली दिवाळी


– दादासाहेब येंधे

खेडं म्हणजे शेतकरी, मजूर, बारा बलुतेदार यांचं गोड साम्राज्य. सगळ्यांनाच एकमेकांची आपुलकी असायची, जिव्हाळा असायचा. पैशांपेक्षा अधिक किंमत होती माणसाला. म्हणूनच एकमेकांना मदत करत माणसं दिवाळी साजरी करायचे.
वाळीचे दिवस आले की मला तीस-चाळीस वर्षापूर्वीची गावाकडची दिवाळी आठवते. पाऊस गेलेला असायचा आणि सगळीकडे पिवळसर उन्ह पसरलेलं असायचं. भातशेतीची जवळ-जवळ सर्व कामं पूर्ण होऊन पीक हातात आलेलं असायचं.
दसर्‍याचं सोनं लुटून येईपर्यंत येणार्‍या दिवाळीचे वेध लागायचे. हा सण सर्वांचा; विशेषतः मुलांचा फार आवडता. गावातील सर्वजण हा सण आपापल्या कुवतीनं साजरा करीत. गावातील व्यापारी, मुलं, स्त्रिया यांचा हा सण साजरा करण्यात विशेष सहभाग असे. पेठेतील दुकानदार हा सण उत्तमरितीने साजरा करीत असत. दुकानाची रंगरंगोटी करून पेढीच्या मुख्य भिंतीवर सुवाच्च अक्षरात, लाल रंगात शुभ-लाभ लिहिलं जायचं. शुभ-लाभाच्या दोन्ही बाजूला स्वस्तिक रेखाटलं जायचं.
गोड साम्राज्य खेडं म्हणजे शेतकरी, मजूर, बारा बलुतेदार यांचं गोड असं साम्राज्य. सगळ्यांनाच एकमेकांची आपुलकी असायची, जिव्हाळा असायचा. विविध पक्षांच्या विविधरंगी पाट्या तेव्हा नव्हत्या हे विशेष. अशा अनेक गोष्टींनी माणसं माणुसकी बाळगून होती. पैशांपेक्षा अधिक किंमत होती माणसाला.
म्हणूनच एकमेकांना मदत करत माणसं दिवाळी साजरी करायचे. दिवाळी म्हणजे नवे कपडे, दिवाळी म्हणजे गोडधोड जेवण, दिवाळी म्हणजे फटाके असं आजच्यासारखं समीकरण तेव्हाही होतं. क्वचित घरांमध्ये फराळाचं केलं जायचं. आमच्या घरात मात्र असं काही होत नव्हतं. शेजारच्या सखू वहिनी चिवडा, शंकरपाळे, अनारसे वगैरे करायच्या. मग आम्ही काही मुलंत्यांच्या घरी गेलो की त्या आम्हाला खायला द्यायच्या.
दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी
गाई-म्हशी कुणाच्या, लक्ष्मणाच्या..
लक्ष्मण कुणाचा..आईबापाचा..
दे माई खोबर्‍याची वाटी..
वाघाच्या पाठीत घाली काठी..!
हे बालगीत आठवलं की जाणीव होते दिवाळीची. दिवाळी हा एक आगळा वेगळा सण.. ज्याची आतुरता अगदी महिनाभर अगोदर असते. खरी दिवाळी आमच्या गावाकडची. तेव्हा दिवाळीत पाऊस नसायचा. गणपतीला आणलेले उरलेले फटाके दिवाळीसाठी उत्सवाला बांधून राखून ठेवले जात असत. पहिल्या आंघोळीला घरातली ज्येष्ठ मंडळी लवकर उठून आंघोळ करून कारेटं फोडायची, मग मुलांना उठवायची. लाडू आणि चहासोबत मस्त कुरकुरीत शंकरपाळ्या हा स्पेशल फराळ असायचा. त्यावेळी पहाटे प्रचंड थंडी असायची. ओल्या अंगाने कारेटं फोडायचं.


पावसाचा लपंडाव
पहिल्या आंघोळीच्या दिवशी घर शेणानं सारवून रांगोळी काढली जायची. एवढ्या थंडीत उठून आंघोळ करायला जीवावर यायचं. न्हाणीत पाणी कडकडीत तापलेलं असायचं, माडाची चुडता आणि सुकी लाकडे जळत असताना जसजशी आंघोळ व्हायची, तशी घरातली माणसं मडक्यात पाणी ओतायची. कारेटं फोडून ‘गोविंदा रे गोपाळा.. यशोदेच्या तान्ह्या बाळा’ बोलले जाई.
गावाकडची ती मेहनती माणसं सकाळीच हा उत्साह घेऊनच शेतात भात कापणीसाठी निघायची. बांबूच्या काठ्यांचा आकाश कंदील बनवायला आठ दिवस लागायचे. खळ्यात दांडीला अडकवून त्यात निरांजन ठेवले की रात्री सुंदर असा आकाश कंदील दिसायचा. कुणी बोट बनवायचे. गावाकडच्या दिवाळीत मुंबईकर नातेवाईक फराळ डब्यातून पाठवायचे. करंज्या वगैरे करायला तेव्हा वेळच नसायचा. कारण भातकापणीची घाई आणि पावसाचा लपंडाव असायचा.
कापडाच्या गौळणी
सगळी आवराआवर करताना त्रेधातिरपीट व्हायची. पैसे मोजकेच असायचे. पगारदारांचा पगार व बोनस झाला की, कपडे खरेदी व्हायची एवढेच, पण शेतीभाती करणार्‍या कुटुंबात मोठी खरेदी नव्हती. भाऊबीजेला बहिणीला साडी आणि भावासाठी बहीण शर्टपीस-पँटपीस अथवा रेडिमेड शर्ट घ्यायचे. गुरांच्या गोठ्यात शेणाने वाडा बनवून कारेटी अर्धी कापून छोट्या कपड्यांची खोळ बनवून गौळणी बनविल्या जायच्या. त्यांची पूजा केली जायची. वाडी-उपार करून मग जेवणाचा कार्यक्रम असायचा. बटाटा-वाटाण्याची उसळ आणि गोडीडाळ असं सुग्रास जेवण असायचं. भात कापून झालेल्या कोपर्‍यात भाताच्या काडीच्या पुढचा भाग कापून बॅटरी बनवली जात होती. मोठ्या भागात कापडाच्या बॉलने लगोरी हा खेळ खेळला जायचा.
गावातली काही माणसं उद्योगासाठी सुरत, नवसारी वगैरे शहरात गेलेली होती. दिवाळीच्या प्रकाशपर्वात ही मंडळी हमखास गावी यायची. तेव्हा त्यांचा थाट फार भारी राहायचा. तरुण मुलं अमिताभ, जितेंद्र, शशी कपूर, ऋषी कपूर यांच्यासारख्या बेलबॉटम पॅन्ट, नक्षीदार शर्ट, शर्ट पॅन्टमध्ये खोचून वरून लावलेला भल्यामोठ्या बक्कलचा बेल्ट, डोळ्यांवर भारी गॉगल, केसही तसेच हिरोंसारखे भांग पाडलेले, हिप्पी किंवा बिटल कट केलेले, पायात छान छान सुट घातलेले हे हिरो लोक आम्हाला तिथल्या गमती सांगायचे, त्यांच्या तिथल्या सुखी जीवनमानाविषयी सांगायचे, चित्रपटांच्या गोष्टी सांगायचे.ते सगळं ऐकून आम्ही मुलं हरखून जायचो. दिवसभर त्यांच्या मागे-मागे फिरत राहायचो.
या सार्‍या आठवणीच आहेत. चार दिवस दिवाळीचे संपले की, पुन्हा आपला कारभार सुरू.