त्याचे तया कळाले (Katha – Tyache taya Kalale)

त्याचे तया कळाले (Katha – Tyache taya Kalale)

By Atul Raut in

आराधनानं मात्र मनात म्हटलं, “हो रे गणराया, माजा तुझ्यावरच भरोसा हाय रे! या माझ्या शत्रूला, विश्‍वासच्या डोक्यात शिरलेल्या व्हॉट्सअ‍ॅप असुराला नष्ट कर. तूच आता काहीतरी चमत्कार करून विश्‍वासला साक्षात्कार दाखव!”

आज कित्ती दिवसांनी आराधनानं विश्‍वासच्या आवडीचा बटाट्याचा रस्सा केला होता. खरं तर साधा रस्सा… असं वाटेल कुणालाही! पण विश्‍वासला आवडणारा बटाट्याचा रस्सा फक्त आराधनालाच जमायचा. म्हणजे जमत असे. कारण गेल्या कित्येक दिवसात काय, महिन्यात तिने तो रस्सा केलाच नव्हता. त्यामुळे त्याची भट्टीच तिला जमेना. कधी तिखट कमी, तर कधी तेल जास्त! कधी चिंच कमी, तर कधी कसुरी मेथी जास्त! मग तिने त्याचा नादच सोडला. म्हंजे रस्सा रुसलाय माझ्यावर! त्याचा रुसवा काढायला हवा.
आपल्या लेकाचा, प्रल्हादचा रुसवा काढण्याचं तंत्र माहीत आहे आपल्याला! थोडा वेळ जाऊ द्यायचा, थोडं दुर्लक्ष करायचं, नंतर त्याचा आवडीचा बेत करायचा जेवणात, की गेला रुसवा! पण या बटाट्याच्या रश्याचा रुसवा असा कसा काढता येईल? आराधनेला स्वतःचंच हसू आलं. हं! तर मग काही महिने रस्सा नकोच करायला. जाऊ दे थोडा काळ. आणि ती मात्रा लागू पडली. आज इतक्या महिन्यांनी अगदी पहिल्यासारखा रस्सा झाला. तिचा आनंद तिच्या सर्वांगावर उमलून आला. “व्वा! आराधना! जिंकलंस गं बाई!” असं ती स्वतःशीच पुटपुटली. स्वतःशीच संवाद साधायची ही तिची अगदी जुनी सवय. ती सवय आताही होतीच. त्या दिवशी तिच्या गुल्लू मावशीने तिला फोन केला. म्हणाली, “अगं आराधना, आज येशील माझ्याबरोबर शॉपिंगला?”
“शॉपिंगला? येईन की! पण राजश्रीताई कुठे गेलीय?”
“अगं तिच्या मुलाची परीक्षा आहे गं, मला किनई सोनाराकडे खरेदी करायची आहे, तू असलीस तर…”
“अगं येते मी. काळजी नको करूस.”
त्या दिवशी आराधना रात्रीपर्यंत गुलू मावशीबरोबर होती. फार काही शॉपिंग नव्हतं. शेजारणीच्या नातवासाठी एक छोटीशी सोन्याची अंगठी खरेदी करायची होती. रात्री झोपताना थोडा निवांत वेळ पाहून आराधना विश्‍वासला म्हणाली, “अहो, आज कसली धम्माल आली सांगू तुम्हाला, गुलू मावशीबरोबर खरं तर नेहमीच मजा येते…”


पण विश्‍वासचं सगळं लक्ष मोबाईलवर… त्यातील व्हॉट्सअ‍ॅपवरच्या व्हिडिओ क्लिप्सवर… मेसेजेसवर… त्याने मान वर करूनही तिच्याकडं पाहिलं नाही की हुंकारही दिला नाही. आराधना हिरमुसली. या व्हॉट्सअ‍ॅपपायी आपल्या नवर्‍याला आपल्याकडे बघायलाही फुरसद नसावी? इतक्यात तिच्यापुढे मोबाईल धरून विश्‍वास म्हणाला, “आराधना, ही क्लीप बघ. अगं ही बाई शिळेवर गाणी म्हणते. शीळ घालणंच किती कठीण! तर ही शिळेवर काय मस्त गाणी गातेय बघ. अगं लावणीसुद्धा गाऊ शकतेय. मला लागली कुणाची उचकी… ओळखता आलं ना?”
विश्‍वास त्या ‘शीळ’ फाट्यावर अडकला होता. तिला कुणाची उचकी लागली असेल, याचा अंदाज करण्यात अगदी रंगून गेला होता. तरीही आराधना नेटानं बोलत राहिली. म्हणाली, “अहो, आता गिरगाव किती बदललंय… गुलू मावशीने पण घर अगदी नव्यासारखं केलंय. तुमची आठवण काढली बरं तिने. तुमच्यासाठी चकल्या दिल्या आहेत अगदी आरळ!”
आराधनानं बोलता बोलता चेहर्‍याला, हाताला क्रीम लावलं. त्याचा मंद सुगंध दरवळला. “तो ये बात है, तुम्हारे मुलायम चेहरे की…” असं म्हणत तिच्या गालावर ओठ टेकवणारा विश्‍वास या सुगंधानेही मोहरला नाही.
“अहो, अहो… कसला तरी मस्त वास दरवळतोय.” आराधनानं त्याच्या खांद्याला हलवत म्हटलं.
“आराधना, ही…ही… व्हिडिओ क्लीप बघ… अगं जपानमध्ये भूकंप झाला ना तेव्हा… अगं बघ… इमारती तरीही शाबूत आहेत. एखाद-दुसरी पडतेय… पण कमाल आहे जपानी लोकांची. किती रिसर्च केलाय त्यांनी, भूकंपावर मात करायला! घरंसुद्धा अगदी हलकीफुलकी बांधतात, माहीत आहे का? माणसं पण कमी मरतात बरं का त्यामुळे… शिकलं पाहिजे त्यांच्याकडून…”
विश्‍वासचे डोळे जणू त्या मोबाईलवर चिकटले होते. चित्त त्या क्लीपवरच्या घटनेवर… आराधना तिचं मस्तक त्याच्या रुंद खांद्यावर टेकवणार होती. त्याचा हात हातात घेऊन त्याला काय काय सांगणार होती. गुलू मावशीच्या शेजारच्या बाईंनी ‘ही लग्नाची आहे का?’ असं विचारलं, तेव्हा गुलू मावशी म्हणाली, “हिला सोळा वर्षांचा मुलगा आहे; पण माझी आराधना आहेच सुंदर नि चवळीची शेंग…”
तेव्हा आपल्याला विश्‍वासची खूप आठवण आली होती, हे तिला खुलवून सांगायचं होतं. तरीही ती प्रयत्न न सोडता म्हणाली, “काय हे विश्‍वास? लक्ष कुठे आहे तुमचं?”
“तुझं ऐकतोय तर सगळं. हं, गोरेगावची आत्या काय म्हणाली तुला?” विश्‍वासनं विचारलं.
“कर्मं माझं! अहो गिरगावची मावशी… तिच्याबद्दल बोलतेय मी.”
“गिरगाव काय नि गोरेगाव काय! दोन्ही सारखंच. अगं ए आराधना, हे बघ तरी… वाच… लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेलेल्या भक्ताला घरच्या गणपतीनं विचारलं, ‘सोनू, तुजा माज्यावर भरोसा नाय काय?’ मस्त आहे नां?” विश्‍वास विचारत होता. आराधनानं मात्र मनात म्हटलं, “हो रे गणराया, माजा तुझ्यावरच भरोसा हाय रे! या माझ्या शत्रूला – विश्‍वासच्या डोक्यात शिरलेल्या व्हॉट्सअ‍ॅप असुराला नष्ट कर. तूच आता काहीतरी चमत्कार करून विश्‍वासला साक्षात्कार दाखव!”
आजही आराधना अगदी नववधूसारखी विश्‍वासची जेवणासाठी वाट पाहत होती. प्रल्हाद कॉलेजच्या सहलीनिमित्त गोव्याला गेला होता. खूप दिवसांनी आराधनाच्या मनात पुन्हा आशेचा अंकुर फुटला होता. या व्हॉट्सअ‍ॅपमुळे तिला विश्‍वासकडून काय काय ऐकून घ्यावं लागत होतं. त्याची मुक्ताफळं तिला आठवली.
“तू अगदी अडाणी आहेस, म्हणून तू तुझ्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअ‍ॅप घालून घेत नाहीस.” असं विश्‍वास एक दिवस तिला वैतागून म्हणाला, तेव्हा ती एवढंच म्हणाली होती, “विश्‍वास, अहो, मला प्रत्यक्ष भेट हवी असते. मनापासून संवाद करावासा वाटतो. दादाचा, आई-बाबांचा, सगळ्यांचा प्रेमळ, आश्‍वासक, उबदार स्पर्श हवा असतो रे!”
“हे सगळं जुनं झालं. पण तुला जीन्स-टॉप नको, तर नऊवारीचाच कासोटा घट्ट बांधायला आवडतो ना? मग?”
“अहो… तसं नव्हे… तुम्हीसुद्धा बोलताना पूर्वी मला गालावर लाडानं चापटी मारायचा… हातात हात घेत असू तेव्हा गप्पा मारताना! नवरा-बायकोच्या प्रेमात असे प्रेमाचे, जिव्हाळ्याचे स्पर्श जगण्याला उभारी देतात.”
“अगं पण या अ‍ॅपमधून किती नॉलेज मिळतं. जगाच्या पाठीवर कुणाशीही पटकन संपर्क साधता येतो. माहितीचं भंडार आहे हे!”
आराधनानं पटकन विचारलं, “सांगा बरं, प्रल्हादच्या एका जवळच्या मित्राचं नाव…?”
“अंऽऽऽ जवळचा मित्र… कुणाचा… प्रल्हाद?…ऽऽऽ हं हं… प्रल्हाद.”
“म्हणजे, आपला एकुलता एक मुलगा, आठवतं ना?”
“शहाणीच आहेस!… स्वतःचा मुलगा नाही आठवणार? तर काय म्हणतेस त्याच्या मित्राचं नाव…!  अगं सोप्पं आहे… तेऽऽऽ हे… अगं, ते हे…” विश्‍वासला पुढे काही बोलता येईना. तसं तो म्हणाला, “आराधना, तू ना डबक्यातल्या बेडकीसारखी आहेस. त्याच लहानशा डबक्यात उड्या मारतेस, त्यातच खूशही आहेस! कारण तुला बाहेरचं ह्यूऽऽऽज जग दिसतंच नाही. या जगात काय काय घडतंय ते कळतच नाही. डोळे उघड आराधना! बघ ही दुनिया! डबक्यातून महासागरात ये… मार उडी. अवघा एकच अ‍ॅप तर मोबाईलमध्ये घ्यायचाय… आणि आमच्यासारखा ज्ञानाचा खजिना सर कर… नशा चढू दे त्या अ‍ॅपची… मजा येईल मग तुलाही…”


आराधना भरल्या डोळ्याने नि भरल्या मनाने त्याचे शब्दांचे बाण झेलत होती. व्हॉट्सअ‍ॅपवरून याने आपल्या मनाचे इतके लचके तोडावेत? एम.एस्सी. आहे ना मी? फिजिक्स, केमिस्ट्री मीच शिकवते ना तुझ्या लेकाला? विश्‍वास, मी आता चाळीशीकडे झुकतेय, नवर्‍याची साथ, त्याचा सहवास, त्याच्याशी हितगुज करणं… हवंय रे मला… पण प्रत्येक रोमँटिक क्षणाला तुला मला ट्रम्पचं राजकारण, त्याचं चुकीचं धोरण वाचून दाखवावसं का वाटतं? कुणी तरी वेड्यासारखी केलेली आत्महत्येची क्लीप का दाखवावीशी वाटते? माझ्या डोळ्यातली तुझ्याबद्दलची आस तुला दिसत नाही का? कशी दिसणार? त्या व्हॉट्सअ‍ॅपने तुझे डोळे, दृष्टी, नजर सगळं सगळं हिरावून घेतलंय रे! आणि हे तुला कसं कळत नाही? पूर्वी आपण एकमेकांजवळ बसून गुजगोष्टी करायचो. तू माझे लहान मुलीसारखे लाड करायचास… माझी प्रत्येक गोष्ट तुला माहीत असायची… नव्हे तू इंटरेस्ट देऊन दिवसभरातील सगळं मला विचारायचास… मी, प्रल्हाद आणि तू! आपलं इवलसं जग! पण त्यातच अवघ्या विश्‍वरुपाचं दर्शन घडायचं आपल्याला! आता मात्र बाहेरचं विश्‍व हेच तुझं जग झालंय.
“विश्‍वास, आजकाल तुम्ही निर्जीव वस्तूंना कुरवाळता, प्रेमाने जपता, हळुवार स्पर्श करता… पण सजीव जिवलगांना मात्र हाडतुड करता… गाडीला स्क्रॅच गेला तर तुमचं मन कळवळतं. पण जिवंत माणसांच्या मनाला घरं पाडता, जखमा करता, तुमच्या कटु शब्दांनी… नि त्याची जाणीवही तुम्हाला नाही. तुमचं चित्त मोबाईल, गाडी, लॅपटॉप अशा निर्जीव वस्तूंत. तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपवरचा मजकूर वाचता येतो; पण बायकोचं मन वाचता येत नाही. तिच्याशी बोलायला विषयच सुचत नाही. फ्रिज होता तुम्ही… यंत्र बनता. पेट्रोल, डिझेल दरवाढीचे मेसेजेस नि राजकारणावरचे उपहासगर्भ विचार वाचून दाखवण्यापेक्षा तुमचे स्वतःचे विचार, तुमचं स्वतःचं म्हणणं ऐकवा हो मला… नाहीतर आपल्यात दुरावा निर्माण होईल. कारणाशिवाय दरी निर्माण होईल. कसं सांगू? तुमच्यात मला मोबाईल दिसतो. व्हॉट्सअ‍ॅपच्या काळ्या आवरणात असलेला! भीती वाटते हो मला आता!”
“तुम्ही मला मूर्ख, अडाणी म्हणता आणि व्हॉट्सअ‍ॅपवर एखादी अगदी नगण्य बातमी वाचून मला विचारता, आराधना, अगं इथे ना, मेंढी आणि बकरी या दोनच प्राण्यांचं दूध पितात. बघ! ही मेंढी बघ, म्हैसच वाटते. खरं तर ती म्हैसच असते. पण कुणीतरी तिला मेंढी म्हटलंय म्हणून आपण मेंढीच म्हणायचं. आपण बुद्धी गहाण ठेवायची आणि मलाही म्हशीला मेंढी म्हणायला भाग पाडायचं, शिवाय वर मलाच अडाणी म्हणून अपमानित करायचं? कुठल्याही माहितीची शहनिशा न करता ती खरी मानून, विचार न करता इतरांना फॉरवर्ड करण्याची घाई करायची. हे काय बुद्धिमान माणसाचं लक्षण आहे? लग्नानंतर तुम्ही मला एम.एस्सी. करायला लावलं. आज मी व्हिजिटिंग लेक्चरर म्हणून काम करते, ते तुमच्या पाठिंब्यानेच; पण आता हीच बायको तुमच्यासाठी एकदम कुचकामी ठरावी? का? तर तिला व्हॉट्सअ‍ॅपमध्ये इंटरेस्ट नाही!” विचार करता करता आराधनाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. इतक्यात लॅचकीने दार उघडून विश्‍वास हॉलमध्ये आला. सोफ्यावर बसलेल्या आराधनेकडे पाहून तो म्हणाला, “वाढ लवकर. मिटिंग आहे तीन वाजता. बघ, आलो ना वेळेत? वाढ…”
जेवताना आराधना म्हणाली, “विश्‍वास रस्सा कसा झालाय?”


“किती फालतू गोष्टीत तू डोकं घालतेस गं तुझं? एवढं शिक्षण घेतलंस, तर व्हॉट्सअ‍ॅपवर ये ना, किती मजा येईल तुला! किती छान वेळ जाईल. मग तुला कळेल मी त्यात एवढा का मग्न होतो ते!”
आराधना गप्पच राहिली. गप्प राहणंच शहाणपणाचं होतं. तिने शांतपणे जेवून घेतलं. पाठचं सगळं स्वयंपाकघरातलं काम आटोपलं. घाईघाईनं आपली लॅपटॉपची बॅग घेऊन विश्‍वास निघून गेला. तिनेही बेडरूममध्ये येऊन अर्धवट वाचायचं राहिलेलं पुस्तक पुन्हा वाचायला घेतलं. वाचता वाचता तिला झोप कधी लागली ते कळलंच नाही. तिला जाग आली ती टेलिफोनच्या घंटीने!
“हॅलो.” आराधनानं फोन घेतला.
“अगं आई, तू मोबाईल ऐकला नाहीस? अगं बाबांची वाट लागलीय…” प्रल्हाद घाईघाईत बोलत होता.
“कऽऽऽ काऽऽऽय?”
“अगं व्हॉट्सअ‍ॅपवर बघितलं ना मी. एका बाईबरोबर बाबा रोमान्स करतानाची क्लीप आहे. अगं माझे मित्र मला काय काय विचारताहेत बाबांबद्दल…”
“अरे, हे फेक असणार! तुझे बाबा असे नाहीत अरे!”
“ते मला माहीत आहे, पण लोकांचं काय गं आई? शिवाय बाबांनी न बघता स्वतःचेच हे असे फोटो फॉरवर्ड केलेत व्हॉट्सअ‍ॅपवरून. आई मी येतोय घरी संध्याकाळपर्यंत…”
आराधनानं रिसिव्हर जागेवर ठेवला. काय झालं हे माझ्या साध्या सरळ नवर्‍याच्या बाबतीत? पण देवाने हा असा साक्षात्कार द्यावा? इतक्यात तिचा मोबाईल वाजला, “अगं आराधना, काय हे प्रकरण गं, तुझ्या नवर्‍याचं?”
“अगं अरु, जावईबापूंचं हे काय गं असं? खोटं आहे ना सगळं हे? पण लोकांना काय सांगणार?”
“अहो मॅडम, तुमच्या यजमानांचं असं का व्हावं हो?”
“अगं आराधना, तू गाफील राहिलीस गं बाई!”
हे आणि असे शेरे, असे प्रश्‍न आराधनाला साऽऽरखे विचारले जात होते. मिटिंग संपवून विश्‍वास त्याच्या ऑफिसमधून बाहेर पडला नि त्याने लगेच मोबाईल काढून आधी व्हॉट्सअ‍ॅप पाहिलं. अरे बाप रे! हे माझे फोटो? हा मी? कोण ही बाई? आणि हे माझ्या मित्रांचे अहेर? हे असले चाळे, कधीपासून करतोस असे प्रश्‍न…
विश्‍वासचं डोकं गरगरायला लागलं. कसाबसा तो घरी आला. आराधनानं दार उघडलं. विश्‍वास तिच्याकडं केविलवाण्या चेहर्‍यानं बघत होता. त्याच्या त्या हताश, दीनवाण्या, हतबल चेहर्‍याकडे आराधनाला बघवेना. त्याच्यावरच्या प्रेमाने तिचा ऊर भरून आला. कंठ दाटून आला. त्याच्या हातातली बॅग तिने जमिनीवर ठेवली आणि आवेगाने दारातच उभ्या असलेल्या आपल्या लाडक्या नवर्‍याला-विश्‍वासला तिने कडकडून मिठी मारली. अगदी गच्च. आता त्यानेही तिला प्रेमानं जवळ घेतलं.


“आराधना, खरंच सांगतो…”
“काही सांगू नका मला विश्‍वास. असे चुकीचे फोटो, क्लिप्स येतात व्हॉट्सअ‍ॅपवर… त्यात काय? चला… चहा घेऊ या.”
चहा-खाणं झाल्यावर विश्‍वास म्हणाला, “आजपासून व्हॉट्अ‍ॅप बंद करणार मी!”
“मुळीच नाही विश्‍वास! उलट आजपासून मीही व्हॉट्सअ‍ॅपवर येणार!” आराधना लाडिकपणे बोलली.
“म्हणजे?” विश्‍वासने विचारलं.
“म्हणजे आजपासून आपण दोघांनी, दोघांचेही व्हॉट्सअ‍ॅप एन्जॉय करायचे; पण एकत्रपणे आणि…” आराधना हसत सुटली.
“आणि काय, आराधना? अगं सांग ना, अगं बोल…” विश्‍वास उतावीळपणे म्हणाला.
आराधना हसतच म्हणाली, “हां, बडे धोके है, बडे धोके है इस राह में। बाबुजी धीरे चलना, ये व्हॉट्सअ‍ॅपके प्यार में, जरा संभलना…”
“जरा नही, पुरा संभलना.” म्हणत विश्‍वासही तिच्या हसण्यात सामील झाला.

– प्रियंवदा करंडे