सौभाग्यवतीचा एक उपास (Katha – Saubhagyavaticha ...

सौभाग्यवतीचा एक उपास (Katha – Saubhagyavaticha Upas)

By Atul Raut in

जग बदलत आहे, माणसं बदलत आहेत, तसे उपासाचे प्रकारही बदलत आहे. कधी ‘कॉम्प्युटर उपास’, कधी ‘मोबाईल उपास’, तर कधी ‘टी.व्ही. उपास’!  असाच टी.व्ही.चा रिमोट बिघडला आणि आम्हाला उपास घडला.

आठवड्यातून एक दिवस दूरचित्रवाणी, म्हणजेच टी.व्ही.चा उपास करा, असं नाशिक मध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातल्या वाचन संस्कृती वरील परिसंवादात एका वक्त्याने ठासून सांगितलं होतं. नाशिकमध्ये एक दिवस टी.व्ही. बंद अशी चळवळ केल्याचंही त्यांनी आपल्या भाषणात सांगितलेलं मला आठवलं. आज अशा प्रकारच्या चळवळीची प्रकर्षाने गरज आहे, असं मला वाटतं. होतं काय? एखादं चांगलं पुस्तक प्रकाशित होतं, मासिकांतून चांगले लेख आलेले असतात, वाचायचे म्हणून बाजूला ठेवतो, पण वेळ मिळत नाही. ही माझ्याप्रमाणे अनेकांची तक्रार असेल.
तर एकदा माझा आणि माझ्या पत्नीचा काही कारणांनी टी.व्ही. उपास घडला. सर्व मराठी वाचकांना समजा असा उपास घडला किंवा कुणी मुद्दामच केला, तर मराठी वाचन संस्कृतीला थोडे बरे दिवस येतील का? मला आणि सौला हा उपास कसा घडला, माहीत आहे?
जग बदलत आहे, माणसं बदलत आहेत, तसे उपासाचे प्रकारही बदलत आहे. कधी माउसदेव, कधी कीबोर्ड रुसले म्हणून ‘कॉम्प्युटर उपास’, कधी ‘मोबाईल उपास’, तर कधी ‘टी.व्ही. उपास’!
असे उपास आधुनिक इलेक्ट्रॉनिक उपकरणं बिघडल्याने घडत आहेत. असाच टी.व्ही.चा रिमोट बिघडला आणि आम्हाला उपास घडला. रविवारी रात्री टी.व्ही. बघितला होता; पण सोमवारी सकाळी सेटटॉप बॉक्स चालूच होईना. रिमोट आपटून-धोपटून बटणं दाबून पाहिली; पण सेटटॉप बॉक्स बंद तो बंदच. निष्कर्ष हाच की, रिमोट बिघडला! आता तो दुरुस्त करायला हवा. आमच्या केबलवाल्याचं ऑफिस तसं घरापासून जवळच आहे. तरीही त्याला फोन लावला, “अहो, रिमोट चालत नाही. टी.व्ही. बंद झालाय हो.”
“रिमोट घेऊन या. बघतो काय झालं आहे ते!” त्याने ताबडतोब उत्तर दिलं.
केबलच्या ऑफिसमध्ये रिमोट घेऊन गेलो.


डॉक्टर पेशंटला तपासतात तसं त्याने रिमोट तपासलं. “साहेब, रिमोट दुरुस्त होईल, असं वाटत नाही.”
“मग तुमच्याकडे नवीन असेल ना?” मी लगेच प्रश्‍न केला.
“आमच्याकडे असतात. पण आज नेमका स्टॉकमध्ये नाही. तुम्ही असं करा, बाहेर एखाद्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या दुकानात चौकशी करा. कदाचित तो तुमचा रिमोट रिपेअरही करून देईल, न पेक्षा नवीन देईल.” केबलवाल्याने माझ्या मनातल्या सर्व प्रश्‍नांना उत्तरं दिली.
न कर्त्याचा वार शनिवार असतो, असं म्हणतात. पण तो सोमवार होता. आणि आमच्या भागातली सर्व दुकानं तेव्हा बंद असतात. म्हणजे, माझ्या दृष्टीने तो न कर्त्याचा वार होता. सर्व बंद दुकानं न्याहाळत मी मला परिचित असलेल्या एका इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या दुकानाकडे माझा मोर्चा वळवला. म्हटलं बघू या, एखादवेळी दुकान उघडं असायचं!
सोमवार माझा घातवार नव्हता. दुकान उघडं होतं. एक नोकर कचरा काढत होता, तर आत एक माणूस काहीतरी दुरुस्त करत होता. मी झटकन माझा रिमोट, त्याच्यासमोर ठेवला.
“रिमोट चालत नाही,” मी म्हटलं.
“सेल बदलले आहेत का?” त्याचा प्रतिप्रश्‍न.
मी म्हटलं, “अहो, आत्ताच बदली केले आहेत. तरीही चालत नाही.” त्याने रिमोटमधले सेल काढून त्याच्या उपकरणाने त्यांची साइज बघितली. कारण लांबी-रुंदी कमी जास्त असेल, तर सेल बरोबर काम करत नाहीत. पण माझ्या नशिबानं सेल रिमोटमध्ये बरोबर बसत होते. हे बघा, रिमोटच्या आत प्रॉब्लेम आहे. एका तासाने येता का? मी देतो रिपेअर करून.”
इतकं बोलल्यानंतर मी उड्याच मारायला हव्या होत्या. कारण केबल ऑपरेटरच्या म्हणण्याप्रमाणे तीन-साडेतीनशे नव्या रिमोटला पडणार होते. पण इथं तर जुनाच रिपेअर होणार होता. दुकानदाराने माझं नाव, मोबाईल नंबर लिहून घेतला आणि रिपेअर झाला की, फोन करतो असंही सांगितलं. त्यामुळे मी घरी आलो.
एक-दीड तास झाला तरी त्याचा फोन आला नाही म्हणून मीच त्याला फोन केला, तेव्हा त्याने उत्तर दिलं, “साब, अभी तो रिपेअर नही हो सकता. कल दोपहर तक करके देता हूँ.”
आता यावर मीच काय, माझ्याजागी दुसरा कोणी असता तरी काय केलं असतं? त्यातून सोमवार म्हणजे पुष्कळशी दुकानं बंद. हा भेटला हे भाग्यच! पण माझ्या पत्नीचं, सुषमाचं काय? एव्हाना तिच्या आवडीच्या मालिका होऊन गेल्या होत्या. आता रिमोटच मिळणार नसल्यामुळे रात्री उशिराही पाहता येणार नव्हत्या.
सोमवार असा मालिकाविना गेला. मंगळवारी अकरा वाजताच दुकानदाराकडे जाऊन बसलो. म्हटलं, “पठ्ठ्या रिपेअर करतोस की नाही, ते बोल?” यावेळी सोमवारी भेटलेल्या दुकानदाराचा मोठा भाऊ होता.
मला म्हणाला, “रिपेअर होने का चान्सेस कम हैं. नया ही ले लो. ”
मी पठ्ठ्याला म्हटलं, “अरे, तू रिपेअर केला नाहीस, तर माझ्याकडे दुसरा मार्ग आहे का? नवीन घ्यायलाच हवा.”
त्याने मंगळवारचा संध्याकाळचा वायदा केला, नवीन रिमोटचा!
संध्याकाळी सातला त्याच्या दुकानात मी हजर झालो. चेहर्‍यावर उसनी दिलगिरी दाखवत दुकानदार म्हणाला, “साब, क्या बताऊं, मेन दुकानसे माल आया ही नहीं. कल सुबह चोक्कस देता हूँ. सेंट परसेंट देता हूँ.”
हात हलवत मी घरी परतलो. सुषमाने सोमवारचा दिवस टी.व्ही.विना काढला होता. आता मंगळवारही तसाच जाणार होता…
बुधवार उजाडला. अहो, टी.व्ही. व्यसनाधीन लोकांचा मला वाटतं दिवस कसा तरी जातो, पण सायंकाळचे सात वाजले की, त्यांच्या जिवाची घालमेल होते. किती छान छान मालिका! माझ्या घरीही स्थिती हीच. सायंकाळी
पाच वाजता रिमोट मिळणार होता. आम्ही दोघंही सायंकाळची वाट पाहत होतो. पाच वाजताच दुकानदाराला फोन लावला.


“साब, अब तक आया नहीं. पण सात बजे तक नक्की येणार.” दुकानदार म्हणाला.
आता याच्यावर विश्‍वास कसा ठेवायचा? अहो, सात वाजता फोन केल्यावर सांगायचा की, कल सुबह दस बजे चोक्कस!
मी परत परत फोन करत होतो आणि बरोब्बर सायंकाळी सात वाजता फोन आला, “रिमोट आला.” पठ्ठ्याने शब्द राखला.
धावत-पळत जाऊन रिमोट आणला. पहिल्यांदा घरी येऊन ‘टेस्ट’ करून बघितला. रिमोट बरोब्बर होता. टी.व्ही. चालू झाला होता… बुधवारी संध्याकाळी आठ वाजता!
देवाला प्रसन्न करण्याकरिता म्हणून माणसं उपास करतात. बदलत्या युगात माणसांना कम्पल्सरी हे काही आधुनिक उपास करावे लागतील. सुषमाला, माझ्या पत्नीला चक्क तीन दिवस केवळ रिमोट न मिळाल्याने टी.व्ही.चा उपास घडला. केवढे क्लेश झाले तिच्या जिवाला. ‘रेशीमगाठी’तली मेघना, ‘का रे दुरावा’मधली अदिती तीन दिवस भेटली नाही तिला! कशामुळे, तर रिमोट देवाच्या अवकृपेने!
कुणी विचारील, काय हो तुम्ही नाही का या मालिका पाहत? म्हटलं तर बघतो, म्हटलं तर नाही. कारण पत्नीसोबत या मालिका न पाहणं हा फार मोठ्ठा सोशल क्राइम आहे. “आमच्या यांना कसलीच आवड नाही. अगदी अरसिक आहेत. सारं लक्ष त्या जळल्या मेल्या पेपरात.” ही शेलकी विशेषणं टाळायची असतील, तर बाबांनो निवडक मालिका बघा, बघतो असं दाखवा. मांडीवर पेपर ठेवून पत्नीचं लक्ष नाही असं पाहून, खुशाल बातम्या वाचा.
आता मूळ मुद्दा, सुषमाला रिमोट नसल्याने तीन दिवस टी.व्ही. उपास घडला; पण मला मात्र ते तीन दिवस मेजवानीच मिळाली. मेजवानी कशी? सांगतो. आवडीच्या दोन-तीन पुस्तकांचा मी फडशा पाडला. मित्रांनी आवर्जून वाचा म्हणून सांगितलेले; पण बाजूला पडलेले असे मासिकांतले तीन-चार लेखही वाचले.
रोज राइम्स वाचून काढल्या आणि वर बोनस म्हणून मराठी गाण्यांची एक कॅसेट मनसोक्त ऐकली. आता रिमोट चालू आहे. पण तुमचा रिमोट कधी बिघडला, तर मी झोडलेली मेजवानी तुम्हीही झोडा. तुम्हाला वाचनाचा छंद नसेल, तर दुसर्‍या कुठल्याही छंदासाठी हा बंदचा उपासकाळ तुमच्यासाठी मेजवानीचाच काळ असेल.
– शं. रा. पेंडसे