संस्कार (Katha – Sanskar)

संस्कार (Katha – Sanskar)

By Atul Raut in

“आई घाईघाईने कुठे निघालीस ग?”
“सव्वा दहाच्या आत बँकेत पोहोचायला हवं.”

“बँक अकरा वाजेपर्यंत उघडी असते. आम्ही सोडतो तुला.”

“तुमचं नाही आटपायचं तोपर्यंत. मला उशीर होईल. मी तिला साडे दहा वाजता बोलावलंय. त्याच्या आधी पैसे काढायला हवे.”

“तिला म्हणजे सुशिलाबाईंना ना?”

“होय. पण आता प्रश्‍नोत्तरं आणि वादविवाद नको, मला जाऊ दे.”

मुलांच्या चेहर्‍यावर पसरलेल्या दाट नाराजीकडे दुर्लक्ष करून मालिनी बाहेर पडली. ऋणांतून अंशतः मुक्त झाल्याच्या समाधानात तिचा दिवस पार पडला. सुहास्य वदनाने तिने संध्याकाळी मुलांचे स्वागत केले. चहासाठी टेबलावर तिघेही बसले असताना मोठ्या मुलाने मनोजने तडक विषयाला हात घातला.
“आई, तू हे काय आरंभलयस?”

“आता कसला आलाय आरंभ? आता तर अखेर.”

“उगीच विषयांतर नकोय. तुझ्या लक्षात आलंय आम्हाला सुशिला बद्दल बोलायचय.”

“मी तिला पैसे का दिले हे विचारायचं असेल ना?”

“दर महिन्याला कर्जाचा हप्ता फेडतात तशी देतेस.”

“केवढं मोठं कर्ज आहे तिचं माझ्यावर. सात जन्म नाही फिटायचं.”

“कधी गरज पडली तुला कर्जाची?”

“हाडाचे धंदेवाईक तुम्ही. तुम्हाला फक्त आर्थिक कर्जच माहिती असणार.”

“असं कोड्यात बोलू नको.”

“आता विषय निघालाच आहे, तर आमची म्हणजे तुमच्या पप्पांची आणि माझी जीवनगाथाच तुमच्यासमोर उघडी करते. तसे तुम्ही आता चांगलेच जाणते झाला आहात.”

“म्हणूनच त्या वैरिणीला चारापाणी का पुरवतेस हा संभ्रम आहे.”

“ती वैरीण नाही. माझी बहीण आहे पाठराखण करणारी.

आमचा जीवनप्रवास ऐका आणि तुम्हीच ठरवा. आमच्या वैवाहिक जीवनाला सुरुवात झाली ती अप्पा बळवंत चौकातल्या दामले वाड्यात. दोन खोल्यातला टुकीचा संसार. आम्ही दोघं पुण्यात आणि सासरे सासूबाई नाशिकला. ह्यांची कारखान्यातली नोकरी. पोटापुरता पगार. अपार कष्ट आणि असामान्य जिद्द ह्याच्या भांडवलावर भराभर वर चढत गेले. मालकाची मर्जी संपादन केली. त्यांना पप्पांना कंपनीत भागीदार करून घेतलं. मी खेड्यांतून आलेली. फारसं शिक्षण नाही. परंतु सासूबाईंच्या दूरच्या नात्यातली म्हणून आमचं लग्न जमलं. हे भागीदार झाले तोपर्यंत तुमचा जन्म झाला होता. घरातलं काम आणि तुमचं संगोपन ह्यातच मी समाधानी होते.”

“त्याच प्रगतीच्या झपाट्यात पपांनी स्वतःची फॅक्टरी सुरू केली असणार. त्यात सुशिलाबाईंचा काय सहभाग?”

“तो झपाटा असा झटक्यात सांगून संपण्यासारखा नाही. धीर धरा आणि लक्ष देऊन ऐका. आमचं जीवन समृद्ध झालं. पण ह्यांची महत्त्वाकांक्षा अफाट होती. जिवाचं रान करून त्यांनी स्वतःचा कारखाना काढला आणि धंद्यात लक्षणीय प्रगती केली. ते काही काही धंद्यातल्या गोष्टी सांगत. मला आकलन होत नसे. थोरामोठ्यांत ह्यांची उठाबस व्हायला लागली, पार्ट्या, मिटींग्ज असत. मी बरोबर असावं अशी त्यांची इच्छा असायची, पण मला एक प्रकारचा न्यूनगंड होता म्हणा, भीती वाटत होती म्हणा. मी त्यांना साथ नाही देऊ शकले. एखाद्या झंझावातासारखी त्यांची प्रगती , झुंजार व्यक्तिमत्त्व, थिटी पडले मी. परिणामी आमच्यात खटके.”

“मालन, मुलं आणि घरकाम ह्याच्या बाहेरही जग असतं.”

“माहिती आहे मला. पण मी ह्याच जगात रमते. बाहेरचं जग मला परकं वाटतं.”

“माझ्या बरोबरच्या इतर धंदेवाईकांच्या बायका बघ. किती हुशार, स्मार्ट. नवर्‍याच्या बरोबरीने सर्वत्र वावरतात. किती छाप पडते त्यांची. नाहीतर तू गावंढळ. जागळासारखं राहणं. कसलं वाचन नाही की कसला छंदही नाही.”

“अहो, त्या शहरांत वाढलेल्या, शिवाय शिकलेल्या. मला तसं वागणं जमणार आहे का?”

“मुळातच तुझा नन्नाचा पाढा. स्वतःला सुधारण्याची इच्छाच नाही, तर मार्ग कुठून दिसणार?”

“स्वतःला सुधरायचं म्हणजे काय करायचं, हेच मला उमगत नव्हतं. मनोमन स्वतःला दोष देत मी तुमच्या संगोपनावर लक्ष केंद्रित करत होते. दिवसेंदिवस आमच्यातलं भावनिक अंतर वाढत गेलं. सुसंवादापेक्षा विसंवादच जास्त. तुमच्या कौतुकांत मात्र त्यांनी कधीच कमतरता ठेवली नाही. तुमच्या सर्वांगीण प्रगतीवर त्यांचं सतत लक्ष असायचं. तेव्हा आम्ही कॅम्पमध्ये राहत होतो. त्या पॉश एरियात सुद्धा मला कसली विलोभनं पडली नाहीत. माझी राहणी तशीच असली तरी ह्यांच्या राहणीमानात झपाट्याने बदल होत होता. एका गाडीच्या जोडीला दुसरी आली. हातात सिगरेट आली आणि घरात दारूच्या बाटल्यांची बुचं उडायला लागली. माझ्या संसाराची न थांबवता येणारी घसरण मी दुःखाचे आवंढे गिळून सहन करीत होते. भीती होती तुमच्यावरच्या संस्काराची. त्याच दरम्यान कारखान्याला अमाप फायदा झाला. ह्यांनी कोथरूड भागात हा बंगला विकत घेतला. मग तर काय घरातच पार्ट्यांना ऊत यायचा. धडधडत्या अंतःकरणाने मी मनोगत व्यक्त केलं. “अहो, मुलांच्या संस्कारक्षम वयात त्यांच्या डोळ्यादेखत पिणं, सिगारेट ओढणं मला योग्य वाटत नाही.”

“मला शहाणपण शिकवू नकोस. ती माझीसुद्धा मुलं आहेत.”

“त्यांनी जरी मला धुडकावून लावलं, तरी माझ्या सूचनेची दखल घेतली, कारण नंतर तुमच्यासमोर सिगरेटही ओढली नाही आणि बाटलीला सुद्धा स्पर्श केला नाही. क्वचित शनिवार, रविवार सगळे मित्र गोळा होत तेव्हा वरच्या मजल्यावर कार्यक्रम चाले, परंतु त्याची आपल्याला झळ लागत नव्हती. नंतर ते क्लबवर जायला लागले. नेहमी घरी उशिराच येत. म्हणजे तुम्ही झोपल्यावर, बहुतेक धुंदावस्थेत. अजूनपर्यंत तुमच्यासाठी राखून ठेवलेला रविवार क्लबला समर्पण केला. मी अटकाव केला असता, तरी त्यांनी दाद दिली नसती. सकाळी नाश्त्याच्या वेळी मात्र तुमच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असे. होताच तुम्ही बापसे बेटे सवाई. तुमच्या मनात त्यांच्याबद्दल कायम आदरच राहील ह्याची मी काळजी घेत होते. अर्थात् होतेच ते तसे अफाट कर्तृत्व आणि उत्तुंग व्यक्तिमत्त्व. सुट्टीचा दिवस एकत्र घालवावा असं मला मनापासून वाटायचं, “पूर्वी आपण रविवारी एकत्र बाहेर जात असू. तसे जाऊ या ना. मुलांना तुमचा सहवास हवाहवासा वाटतो.”

“बाहेर जायला मीच कशाला? एक गाडी ड्रायव्हर सहीत तुमच्या दिमतीला आहे. लागतील तितके पैसे देईन मी.”

“पैशाचं काय घेऊन बसलात? तुमच्याबरोबर जावं ही इच्छा.”

“मुलांना त्यांचे मित्र आहेत आणि मला वाटतं घरातल्या व्यापांत आपल्याला नवरा आहे हे तू विसरली आहेस.”

“असं कसं म्हणता? तुमची धंद्याची कामं केवढी वाढलीयत. राहवलं नाही म्हणून बोलले.”

“नशीब, व्याप वाढलाय हे तुझ्या लक्षात आलं. खरंच आहे ते. धंदा चौफेर प्रगती करतोय. मी असा वेळ फुकट नाही घालवणार. तुला त्यातलं काही कळणार नाही. उगीच वाद नको.”

“अशाच वहिवाटीतून जीवन जगत जात असताना मला ह्यांच्या वागणुकीत बदल जाणवायला लागला. क्लबमधून लवकर घरी यायला लागले. रविवारी थोडाच वेळ बाहेत जात. कधी टी.व्ही. पाहत. कधी तुमच्याशी गप्पा मारीत.

मित्रांचे येणेजाणे सुद्धा कमी झालं. काही विचारण्याचं धैर्य नव्हतंच. माझा संसार मार्गी लागल्याची जाणीव होऊन मी मनोमन सुखावले. सुखाला तडा गेला आदितीच्या, माझ्या मावस बहिणीच्या फोनने.

“ताई, काल भावोजींना बंडगार्डनजवळ पाहिलं. गाडीत होते. जवळ एक बाई होती, तुझ्याच वयाची.“

“अगं, मिटिंगला गेले असतील. हल्ली बिझनेसमध्ये बायका सुद्धा असतात. त्यांच्यापैकी असेल कोणीतरी ह्या बाजूला येणारी.”

“मी जरी समर्थन केलं तरी शंकेची पाल मनांत चुकचुकलीच. हळूहळू इतर नातेवाईक आणि शेजारीपाजारी सुद्धा आडून आडून बोलायला लागले. असह्य होणारा कोंडमारा तोंडावाटे बाहेर पडला.”

“अहो, लोक तुमच्याबद्दल हल्ली काही बाही बोलतात.”

“काही बाही, म्हणजे नक्की कशाबद्दल.”

“म्हणजे एक बाई सतत तुमच्याबरोबर असते.”

“ते होय. खरं आहे ते.”

जी बाब माझ्यासाठी गंभीर होती, तिला त्यांच्या लेखी विशेष महत्त्व नव्हतं, की ते बोलणं टाळत होते ते मला कळेना. दबकतच मी विचारलं.

“कोण आहे ती? नाव काय तिचं?”

“काय करणार तू तिची माहिती ऐकून? पण उत्सुकता आहेच तर सांगतो.”

“सुशिला कारखानीस तिचं नाव. धंद्याची उत्तमजाण आहे. आपल्या कंपनीत काम करते. मला खूप मदत होते तिची.”

“एकदा भेटेन म्हणते.”

“सुशिलाला? कशाला? जाब विचारायला? की तिची हाकलपट्टी करायचीय?”

“नाही. ह्यातलं काहीही नाही. फक्त तुमच्यावर छाप पाडणारं व्यक्तिमत्त्व जवळून न्याहाळायचंय. वचन देते मी काहीही बोलणार नाही. त्यांनी दिलेली माहिती फक्त ऐकेन.”

“पण कुठे भेटणार? घरी येणं तिला अवघड वाटेल.”

“रविवारी मुलं सहलीला जाणार आहेत, तेव्हा बोलवा. निवांत बोलू आम्ही.”

“सुंदर नसली तरी उठावदार व्यक्तिमत्त्व. चेहेर्‍यावर विद्वत्तेच्या वलयाला आत्मविश्‍वासाची जोड ह्या सर्वांनी मी मनोमन भारावून गेले. ह्यांच्या निवडीला मनातल्या मनात दाद देत, सरबत देऊन मी तिचं स्वागत केलं.”

“बसा सुशिलाताई.”

“मालिनीबाई, एक विनंती आहे. नुसतं अगं सुशिला म्हणा. धाकटी बहीणच समजा ना मला आणि मनमोकळं बोला.”

“आवाजातला गोडवा कुणालाही आकर्षित करील असाच होता. मनात काही काळंबेरं असल्याचा मागमूसही चेहेर्‍यावर दिसत नव्हता. स्पष्टपणे काहीही विचारणं अवघड वाटत होतं.”

“सुशिला, मला फक्त तुझ्या जीवनाची वाटचाल आणि आमच्या कंपनीतला सहभाग ह्याबद्दल जाणून घ्यायचं आहे. माझ्या मनात तुझ्याविषयी कोणताही आकस नाही किंवा मी तुला दोषही देत नाही.”

“तसं असामान्य किंवा अलौकिक माझ्यात काहीच नाही. माझ्या आईवडिलांची मी एकुलती एक मुलगी. वडिलांचा इथेच पुण्यात गारमेंटचा धंदा होता. लहानपणापासून धंदा आणि त्यासंबंधीचे व्यवहार ह्यात मला विलक्षण रस. धंद्यातल्या सर्व बाबींचं बाळकडू मला घरांतून मिळालं. मी बी. कॉम् नंतर एम.बी.ए. केलं. नंतर धंद्यात पद्धतशीर लक्ष घातलं. पपांचा पी. ए. उदय कारखानीस कष्टाळू, प्रामाणिक, धंद्याची उत्तम जाण असणारा उमदा तरुण जीव ओतून मदत करत होता. म्हणजे त्यावेळी तसंच वाटत होतं. त्याची घरी वारंवार येजा असे. पपांच्या गळ्यातला ताईतच होता तो. आमचा परिचय होताच. हळूहळू तो वाढीला लागून मैत्री आणि प्रीतीच्या वाटेने जाऊन गोड शेवट म्हणजे आम्ही विवाहबद्ध झालो. धंदा चांगलाच फोफावत होता. आम्ही दोघं धंद्याचे व्यवहार चोखपणे सांभाळत होतो. सर्व काही सुरळीत चालू असताना पपांना पॅरालिसिसचा झटका आला. आई खचली. मला कायम त्यांच्याजवळ राहायला लागायचं. उदयने धंद्यात आणखी एक भागीदार घेण्याचा प्रस्ताव मांडला. हो म्हणण्याशिवाय मला गत्यंतर नव्हतं. धंदा उदयच्या आणि माझ्या नावावर असला तरी सर्व व्यवहार तोच सांभाळत होता. आवश्यक तिथे मी सह्या करीत असे. पपांच्या आजारपणामुळे मनावर निराशेचे दाट ढग आले होते. माझं फॅक्टरीच्या कामात लक्ष नव्हतं. उदय भरपूर पैसे आणून देई व अधूनमधून काही कागदांवर सह्या घेई. शेवटचा जवळजवळ एक महिना पपांची अवस्था दयनीय झाली होती. आई मानसिक संतुलन हरवून बसली होती. त्यातच पपांचा देहांत झाला. धक्क्यातून बाहेर पडल्यावर माझ्या मनात फॅक्टरीचा विचार आला. तेव्हा लक्षात आलं की, बरेच दिवस उदयने माझ्या सह्या घेतल्या नव्हत्या. पपांच्या ढासळत्या तब्येतीचा तणाव होता, मला त्रास दिला नसावा असं वाटलं.”

“उदय, मी आता घराबाहेर पडते रे.”

“म्हणजे नक्की काय करणारेस?”

“फॅक्टरीत येईन म्हणते.”

“कशाला? तू घरी राहून आईची काळजी घे ना.”

“जनाबाई असतात दिवसरात्र तिच्याजवळ. घरात राहून वेड लागेल मला.”

“मग फॅक्टरीत येण्यापूर्वी हे कागद वाचून काढ.”

“ते कागद वाचल्यावर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. फॅक्टरी म्हणजे सगळा धंदाच उदय आणि तिसरा भागीदार ह्यांच्या नावावर होता. तो भागीदार उदयचा मावस भाऊ होता. माझ्यासाठी होत्याचं नव्हतं झालं होतं. आमच्या वाट्याला राहता बंगला. बँकेतली सेव्हिंग्ज आली होती. महिना ठरावीक रक्कम आईच्या हयातीपर्यंत मिळणार होती. म्हणजे मला पूर्णतः वार्‍यावर सोडलं होतं.”

“केवढी घोर फसवणूक ग सुशिला, ती सुद्धा आपल्या माणसाकडून.”

“मी राहता बंगला विकला आणि आता राहते तो वाडा खरेदी केला. सोबतीला म्हणून एक कुटुंबवत्सल भाडेकरू ठेवला. उदयची हाकलपट्टी केली. अंतरी विश्‍वासघाताचं दुःख, भविष्याची चिंता ठेवून आईच्या नकळत सर्व व्यवहार करणं म्हणजे माझ्यासाठी तारेवरची कसरत होती. प्रचंड तणाव जाणवत होता. सर्व भावना होरपळून त्यांची राख झाली त्या काळात. सहा महिन्यांनी उदयने घटस्फोटाचे पेपर्स सही करिता पाठवले. मी साफ नकार दिला आणि त्याचे सर्व कारनामे वर्तमानपत्रात दिले. माझ्या संसाराच्या चितेवर स्वतःच्या सुखाची पोळी भाजण्याचा त्याला अधिकार नाही.”

“मग तू आमच्या धंद्यात कशी आलीस?”

“काही वर्षांपूर्वी एका सेमिनारमध्ये तुमच्या साहेबांची आणि माझी भेट झाली. दोघांच्याही भाषणाला श्रोत्यांनी उत्तम दाद दिली होती. सेमिनारनंतर आम्ही खूप चर्चा केली. त्यांचं धंद्यातलं ज्ञान आणि वाचन अफाट होतं. त्यानंतर कधीतरी ओझरती भेट व्हायची. फॅक्टरी माझ्या हातातून गेल्याचं कळल्यावर फोन करून ते मला भेटायला आले. त्यांना कंपनीत माझा सहभाग हवा होता. त्यांनी मला मॅनेजरची पोस्ट देऊ केली. नाहीतरी घरी बसून मी नैराश्येच्या गर्तेत जात होते. वाटलं ज्ञानाला सुद्धा उजाळा मिळेल. मी पुन्हा बाहेरच्या जगात प्रवेश केला. साहेबांना अनेक प्रकल्प सुचत. आम्ही चर्चा करून ते प्रत्यक्षात आणत असू. बरेचसे फलदायी होत. माझं मन विचारात घेतल्याशिवाय सहसा ते कोणतीही गोष्ट करत नसत.”

“छे हो. एवढ्या उंचीची वैचारिक प्रगल्भता असणार्‍या माणसाला मी काय सल्ला देणार? त्यांच्या झंझावती प्रगतीची मी फक्त साक्षीदार होते.”

“खरं तर तिच्या सान्निध्यामुळे तो झंझावात जरासा शांत झाला होता. त्यांना हवी असलेली साथ तिच्याकडून मिळत होती. तिचा सहवास आणि सतत धंद्याच्या प्रगतीचे विचार ह्यामुळे त्यांचे सिगारेट, क्लब, दारू कमी म्हणजे जवळजवळ नाहीसंच झालं. त्यांचं नातं फक्त धंद्यापुरतं मर्यादित आहे, ह्याविषयी माझी खात्री झाली तरीसुद्धा तिने उलगडा केलाच.”

“ताई, धंद्याशिवाय मला कशातच इंटरेस्ट नाही. तुमच्या संसारसुखाला माझ्यामुळे कधीच बाधा येणार नाही. वचन देते.”

“माझ्या सर्व शंकाचं निरसन करून ती गेली. दिलेलं वचन तिनं पाळलं. पुन्हा कधीही तिनं आपल्या घरात पाऊल ठेवलं नाही. ती पपांच्या आयुष्यात आली नसती तर ते अधिकाधिक व्यसनाधीन झाले असते. धंद्याचा बोजवारा वाजलाच असता आणि आपण दुःखाच्या खाईत लोटले गेलो असतो. तिच्यांत आणि माझ्यात एक नाजूक रेशमी नातं निर्माण झालंय, ना रक्ताचं ना सहवासाचं. ते मला आयुष्यभर जपायचंय.”

“आई, तुला नाही वाटत की ते नातं पपांच्या बरोबर संपलं.”

“मी उच्च शिक्षित नसले तरी भावनांची आणि नात्यांची उकल मला समजते. म्हणून ते नातं संपलं असं मला वाटत नाही. त्याचं कारण जाणून घ्या. पपांना धंद्यात तिची भरपूर मदत झाली. नव्हे ती होणार हे ओळखूनच ते तिला बोलवायला गेले. पपांच्या उतारवयात तुम्ही दोघं धंद्यात लक्ष घालायला लागलात. तिची उपस्थिती तुम्हाला रुचत नाही. हे ओळखून ती स्वतःच बाजूला झाली. तेव्हा तुमच्या पपांनी धंद्यातल्या तिच्या योगदानाविषयी तुम्हाला काही सांगितलं असेल असं नाही वाटत मला. ते तर सोडाच, परंतु जिच्यामुळे आपल्या धंद्याची बरकत झाली तिच्या निवृत्तीनंतरच्या भविष्याची तरतूद केला आहे का? गरज सरो आणि वैद्य मरो ही वृत्ती.”

“तरतूद वगैरे ही पपांची जबाबदारी नव्हतीच.”

“का? इतरांना पेन्शन, फंड नाही देत? तिला फक्त दरमहा पगार मिळत होता.  एकेकाळची एवढ्या मोठ्या इस्टेटीची मालकीण आज एका वाड्यात साठवलेल्या पुंजीवर गुजराण करत एकाकी जीवन जगते आहे. तुम्हाला नाही कळायच्या माझ्या भावना. शेवटी एक स्त्रीच दुसर्‍या स्त्रीचं नातं समजू शकते. पण मला आमच्यातलं नातं जपायचं आहे. अखेरच्या दिवसात सुद्धा पपांना तिची आठवण झाली नाही. त्यांच्या निधनानंतर मी तिला फोन केला होता, परंतु तिने येण्याचं नाकारलं. निव्वळ आपल्या घरातलं वातावरण गढूळ होऊ नये म्हणून. पुरुषाला मोहाचा शाप आणि स्त्रीला त्यागाचं वरदान असतं हेच खरं. माझ्या सद्सद्विवेक बुद्धीचा संकेत आहे की तिच्या आधारवडाच्या सावलीतच माझा संसार फोफावला आहे. हे तिचं माझ्यावरचं कर्ज आहे. जन्मजन्मांतरी न फिटणारं. अंशतः का होईना मी ते फेडणार आहे. पपांनी माझ्या नावावर भरपूर ठेव ठेवली आहे. दरमहा मी तिला पाच हजार देणार. अर्थात् तशी तिची अपेक्षा नाही आहे. नव्हे, तिला ते माझे उपकारच वाटतात. तुम्हाला न सांगता सुद्धा मी हा व्यवहार करू शकत होते. परंतु माझ्याच काय पण तुमच्या सुद्धा आयुष्याला धोक्याच्या वळणावरून कलाटणी देऊन एका सुखद वाटेवर आणून सोडणार्‍या व्यक्तीची माहिती असावी हीच माझी इच्छा होती. हे सर्व जाणून घेतल्यावर तुमच्या मनातला तिच्या विषयीचा आकस कमी झाला तर मी तुमच्यावर केलेल्या संस्कारांचं चीज झालं असं मी समजेन.”

रेखा नाबर