प्रेमांकूर (Katha – Premankur)

प्रेमांकूर (Katha – Premankur)

By Atul Raut in

आलियाचा खूप गोंधळ उडत होता. वडील वारल्यानंतर देशमुखांनीच सुमनताईंना आधार दिला होता. परंतु, लग्न करून आपल्याला देशमुखांकडे जायचं आहे, याबाबत आलिया अनभिज्ञ होती.
आलिया आज खूप खूश होती. तिला पुण्याच्या नामवंत कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगला अ‍ॅडमिशन मिळणार होतं. आलियाची आई, सुमनताई पण चिंतामुक्त झाल्या होत्या. आलियाचा विवाह पुण्यातच होणार होता. त्यामुळे तिच्या शिक्षणाचा लग्नात अडथळा निर्माण होणार नाही, ही बाब त्यांच्यासाठी महत्त्वाची होती. “गुणाची गं लेक माझी. उद्या सकाळी देशमुखांकडे जाऊ आपण. ते तुझ्या अ‍ॅडमिशनचं पाहून घेतील.”
“नक्की, मला तर कधी कॉलेजमध्ये जाऊ असं होतंय आई.”
दुसर्‍याच दिवशी सकाळी दोघी मायलेकी देशमुखांकडे पोहोचल्या. दरवाजा उघडताच देशमुखताईंनी हसून दोघींचं स्वागत केलं.
“या सूनबाई, आज आमच्या घराला पाय लागले तर तुमचे.” सूनबाई शब्द ऐकताच आलियाचा चेहरा पडला.
“अहो, तसं नाही व्याहीण बाई, लग्नापूर्वीच सासरी वारंवार चकरा मारणं बरं नाही दिसत. बरोबर की नाही.”
“सुमनताई या जुन्या गोष्टी झाल्या. मी तर म्हणते, तुम्ही आलियाला आता इथेच ठेवा. तुमची होस्टेलची फीही वाचेल आणि मुलीची काळजीही वाटणार नाही तुम्हाला गावाकडे.”
“अहो पण, लोक काय म्हणतील…”
“काही म्हणणार नाहीत लोक. आज जर सदाशिव जिवंत असता, तर त्याने आलियाला माझ्याकडेच ठेवलं असतं.” देशमुख मध्येच बोलले.
“आपलं हक्काचं घर असताना आलियानं होस्टेलला राहिलेलं आम्हाला चालणार नाही. हवं तर तुम्ही याला आमचा हट्ट समजा.” देशमुखताई आग्रहानं बोलू लागल्या.
या संभाषणात आलियाचा खूप गोंधळ उडत होता. देशमुख जोडपं अधूनमधून गावाकडे त्यांच्या घरी येई. वडील वारल्यानंतर देशमुखांनीच सुमनताईंना आधार दिला होता. परंतु, लग्न करून आपल्याला देशमुखांकडे जायचं आहे, याबाबत आलिया अनभिज्ञ होती.
“चल आलिया, आपण कॉलेजला जाऊन येऊ.”
“हो नक्कीच.”


अ‍ॅडमिशन घेऊन आलिया काकांसोबत घरी परत आली.
“सुमनताई, आठ दिवसांनी कॉलेज सुरू होणार आहे. तेव्हा सगळं सामान घेऊन तुम्ही आलियाला आमच्याच घरी आणायचं आहे.”
“आता तुमच्यापुढे मी काय बोलणार, भाऊ.”
“चला ताटं घ्या लवकर. भूक लागली आहे मला खूप.”
सगळे जण सोबतच जेवायला बसले. आलियाला कधी आईशी एकांतात बोलू, असं झालं होतं. पण संधीच मिळत नव्हती. चार वाजता दोघीही गावाकडे परत जायला निघाल्या. एसटीत बसताच आलियाचे प्रश्‍न सुरू झाले.
“ही काय भानगड आहे, आई लग्नाची?”
“भानगड काय, तुझे वडील वारले होते, तेव्हाच देशमुखांनी तुला त्यांची सून करणार असा शब्द दिला होता. प्रतिष्ठित लोक आहेत. शिवाय आपल्यावर त्यांचे खूप उपकार आहेत. ते होते म्हणून मला गावाकडे नोकरी मिळाली आणि आपलं पोट भरलं. नाहीतर रस्त्यावरच येणार होतो आपण.”
“पण लग्न? कोणाशी? मुलगा कोण? मी तर त्याला अजून एकदाही पाहिलेलं नाही.”


“देशमुखांचे ज्येष्ठ चिरंजीव श्री. सुखात ठेवेल तो तुला. काही चिंता करू नको.” आलिया एसटीतील खिडकीतून बाहेर पाहत होती; पण डोक्यात विचारांचं थैमान चालू होतं.
आठ दिवसांनी आलिया देशमुखांकडे येऊन पोहोचली. सुमनताई चार वाजताच तिला सोडून गावाकडे निघून गेल्या. संध्याकाळी सात वाजता आलिया हॉलमध्येच बसली होती. तेवढ्यात श्री त्याची बॅग घेऊन घरात दाखल झाला. आलियानं एक क्षण त्याला पाहिलं आणि पुन्हा नजर पेपरमध्ये वळवली. श्री त्याची बॅग घेऊन सरळ त्याच्या खोलीत शिरला. देशमुखांचे कनिष्ठ चिरंजीव पार्थ घरात कमीच राहत असे. रात्री सर्वजण सोबतच जेवायला बसले. आलिया आणि श्रीची खुर्ची समोरासमोरच होती. श्री चोरून अधूनमधून आलियाकडे बघत होता. आलिया मात्र खाली मान घालून निमूटपणे जेवत होती.
“काय रे श्री, कसा गेला तुझा आजचा दिवस?”
“छान बाबा.” छान हा शब्द आलियामुळेच श्रीच्या तोंडातून बाहेर पडला होता.
“छान म्हणजे कसा गेला?” देशमुखसाहेब श्रीची मजा घेत होते.
“असाच.”
“काय हो तुम्ही पण माझ्या बाळाला छळता?”
“बाळ आता नवरदेव झालं आहे तुमचं, मिसेस देशमुख.”
अशा प्रकारे वारंवार घरात थट्टामस्करी चालू असे. कधी देशमुखकाका-काकू, नाहीतर पार्थ. श्रीही सतत बोलण्याची संधी शोधत असे. पण आलियाला एका महिन्यातच हे सर्व खटकू लागलं होतं. मात्र आईला सांगून उपयोग नाही, हे तिला माहीत होतं. त्यामुळे आलिया तिच्या डायरीतच तिचं मन मोकळं करत असे.


“आयुष्यात मला काहीच चॉइस नाही. मला हो-नाही बोलण्याची संधीही नाही. आज बाबा असते, तर त्यांनी पहिलं मला विचारलं असतं, मला श्री आवडतो का नाही? त्यांनी अजून एक-दोन स्थळं शोधली असती माझ्यासाठी. माझ्या पसंतीचा मुलगा शोधला असता बाबांनी. आज खरंच आयुष्यात खूप खूप आठवण येते आहे बाबांची…” आलियाने डायरीत लिहिलं होतं.
आलिया आता सतत श्रीला टाळायचा प्रयत्न करू लागली. त्याच्यासोबत डायनिंग टेबलवर जेवणाचा प्रसंग आल्यास ती भूक नाही म्हणून जेवणच टाळत असे. काही दिवसांनी देशमुख काका-काकू आठ दिवस युरोप फिरायला गेले. आता मात्र आलियासाठी श्रीला टाळणं शक्य नव्हतं. दुसर्‍याच दिवशी सकाळी आलियानं नाश्ता बनवला. दोघंही डायनिंग टेबलवर नाश्ता करत होते.
“संध्याकाळी बाहेर येशील का डिनरला?”
“आणि पार्थ भाऊंचं काय?”
“तो चार दिवस बाहेरगावी गेला आहे.”
“पाहू, तुम्ही संध्याकाळी घरी तर या.”
संध्याकाळी श्री लवकरच घरी परतला. सात वाजता दोघंही हॉटेलमध्ये जेवायला गेले. जेवण करून बाहेर पडत असताना आलियाला तिच्या मैत्रिणी भेटल्या.
“हाय आलिया, हू इज धिस हॅण्डसम गाय बेबी? बॉयफ्रेंड?”
“चूप गं, मी ज्यांच्याकडे राहते त्या बाबांच्या मित्रांचा, देशमुखकाकांचा मुलगा आहे.”
श्री सर्व काही ऐकत होता. आलियाचं उत्तर त्याला खटकलं होतं. घरी येताच श्रीनं त्याच्या रूममध्ये पिक्चर पाहायला आलियाला बोलवलं.
“आज मी खूप दमले आहे. उद्या पाहू.”
सकाळी श्री आलियाला कॉलेजला सोडण्यासाठी हट्ट करू लागला. “नाही, नको. अजून कॉलेजमध्ये सर्व जण प्रश्‍न विचारतील मला.”
“सांगायचं ना मग आपलं लग्न ठरलेलं आहे.”
“पण मला नाही जायचं आहे ना तुमच्यासोबत कॉलेजला.” आलिया अचानक उद्धटपणे बोलून गेली.
आता मात्र श्री विचार करू लागला. आलिया नाश्ता करून पटकन निघून गेली. श्री मात्र सी.एल. टाकून दिवसभर घरीच बसला. उत्सुकता म्हणून श्री आलियाच्या खोलीत शिरला आणि त्याने दिवसभरात आलियाची डायरी वाचून काढली.
“आज बाबा असते, तर मला हे लग्न करावं लागलं नसतं,” हे वाक्य त्याला चांगलंच झोंबलं. तो संध्याकाळी आलिया येण्याची वाट पाहू लागला. आलिया पाच वाजता परतली. हॉलमध्ये सोफ्यावर बसली.
“तू समजतेस काय स्वतःला? माझे आई-बाबा जबरदस्ती करत आहेत का तुझ्यावर लग्नासाठी? तुला लग्न करायचं नसेल, तर स्पष्ट सांग ना त्यांना. त्यांच्याशी बोलता येत नसेल, तर मला सांग. मी बावळटासारखा सतत तुझ्या मागेमागे फिरतो आहे आणि तू…”
श्री एकदम चिडून बोलत होता. त्याचा आवाज ऐकून पार्थही हॉलमध्ये येऊन बसला.


“तसं नाही…” आलिया घाबरत बोलत होती. तिच्या डोळ्यातलं पाणी गालांवर ओघळायचंच बाकी होतं.
“मग कसं आहे? स्वतः काहीही प्रयत्न करायचा नाही आणि वरून नशिबाला, माझ्या घरच्यांना दोष द्यायचा. इतका साधा निर्णय मांडता येत नसेल, तर काय उपयोग आहे शिक्षणाचा?”
आता मात्र आलिया रडत रडत खोलीत निघून गेली. दुसर्‍या दिवशी सकाळी देशमुख घरी येताच श्रीने मी दुसरी मुलगी पसंत केली आहे, असं सांगून लग्नाला नकार देऊन टाकला. देशमुखांची सर्व बोलणी श्रीनं ऐकून घेतली; पण आलियाचं नाव मध्ये घेतलं नाही. पुढच्याच महिन्यात श्री कंपनीतर्फे अमेरिकेत जाण्यासाठी तयारी करू लागला. आलियाला आता अपराधी वाटू लागलं. मी विनाकारण चुकीचा विचार करत होते का? श्रीच्या अशा वागण्यानं उलट तो तिला जास्तच आवडू लागला. आपल्याकडून मोठी चूक झाली, याची जाणीव तिला झाली. ती सतत त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होती; पण तिची हिंमत होत नव्हती. तो घरात असताना ती सतत चोरून त्याला बघत असे; पण त्याच्याशी नजरानजर होताच ती घाबरून पळून जात असे. अखेरीस एक दिवस देशमुख कुटुंब श्रीला सोडण्यासाठी एअरपोर्टवर निघालं. घरात कोणीच नव्हतं. आलिया खिडकीतून एकटक श्रीला पाहत होती. गाडी नजरेआड होताच ती पळत गेटजवळ आली आणि ढसाढसा रडू लागली. तेवढ्यात पार्थ आला.
“आलिया, काय झालं? का रडते आहे?”
“पार्थ, श्रींना थांबवा ना. ते आता जर गेले, तर मला पुन्हा कधीच भेटणार नाहीत.”
“आपण दोघंही एअरपोर्टवर जाऊ, उठ लवकर.” एअरपोर्टवर गाडीतून उतरताच आलिया श्रीसाठी सैरावैरा धावू लागली. श्रीला पाहताच ती दोन्ही हात जोडून रडू लागली.
“आय अ‍ॅम सॉरी. मी तुमच्याशी स्वतःहून बोलायला हवं होतं; पण आता मला पुन्हा एकदा तुमच्या आयुष्यात येण्याची संधी द्या. त्यावेळी मला एकदम नाही कसं म्हणावं तेच समजत नव्हतं. तुम्ही माझी परिस्थिती तर समजून घ्या.”
“नक्कीच, मी पण जरा जास्तच रागानं बोलत होतो त्या दिवशी. पण आता नक्की मनापासून हो आहे ना तुझं, की अजून काही…?”
“का मला लाजवता?”
“नाही गं, आता पुन्हा तुझ्यामुळे मला आईबाबांची बोलणी खावी लागणार, हे नक्की.”

– अर्चना पाटील