परतफेड (Katha – Paratfed)

परतफेड (Katha – Paratfed)

“बघ, आभा! आज पुन्हा गोळी घ्यायची विसरलीस,” म्हणत उमेशने गोळी आणि पाण्याचा ग्लास आभाच्या हातात दिला.
“घेते मी नंतर. अजून पोळ्या व्हायच्या आहेत,” आभाचं निर्विकार उत्तर. तरीही उमेशच्या अति आग्रहास्तव तिला गोळी घ्यावीच लागली.
संध्याकाळी बाहेर पडतानाही, “तू शॉल घे बरोबर, किती वारा सुटलाय…”
उमेशचं हे असं बोलणं शेजारीही ऐकत. त्यांनाही वाटे, ‘किती काळजी घेतात बायकोची!’ किटी पार्टीमध्येही आभाच्या मैत्रिणी म्हणायच्या, “अगं आता साठी उलटल्यानंतर उमेशजी जास्तच पुढेपुढे करताहेत, नाही का? किती बारीकसारीक गोष्टींमध्ये काळजी घेतात गं तुझी. नाहीतर माझे हे! आपला पेपर, मोबाईल, टीव्ही रिमोट समोर असला की, मी घरात आहे की नाही हेही गावी नसतं!” नयनाने लटका राग दाखवला.
पण वस्तुस्थिती अशीच होती की, उमेश बायकोच्या अवतीभवती असायचा. 65 वय चालू होतं. दोघांच्या काही गोळ्या सुरू झाल्या होत्या. आभाचं तितकसं लक्ष नसायचं; पण उमेश मात्र ‘काय हवं, नको’ व्यवस्थित पाळायचा. मग मित्रही फिरकी घ्यायचे; पण ते हसण्यावारी नेलं जाई. मूळ मुद्दा असा की, उमेश आभाला खूप जपायचा; पण आभा मात्र स्वत:तच गुंतलेली. जणू उमेशची काळजी तिला नकोशी होती. पण सांगते कुणाला? नात्यातले, ओळखीपाळखीचे, सगळेच दोघांचं कौतुक करत. विशेषत: उमेशचं! “एकुलती एक बायको आहे ना. मी काळजी घेतली नाही तर कोण घेणार बाबा? मग मी नको तिच्यासाठी करायला? ती खूश तर काय हवं आणखी?”
हे साठीनंतरचं उफाळून आलेलं उमेशचं प्रेम इतरांकरता जरी कौतुकाचा विषय असलं तरी, आभाकरता तसं मुळीच नव्हतं!
त्या दिवशी नवीन पुलावरून राइडला जात असताना उमेशने बाजूला कार एकदम थांबवली, “आभा, मी येतोच दोन मिनिटांत,” म्हणून तो गेला. ती विचार करत बसली, काय असेल बरं? असू दे. बघू या. आभानं समोरच्या आरशात न्याहाळलं. पाठीमागून उमेश येत होता. हातात दोन आइस्क्रीमचे कप्स होते.
“घ्या हो बाईसाहेब. टेस्ट बघा, सांगा आपल्या आईबाबांना नवरा किती लाड करतो ते!” तो दिलखुलास हसला. आभाने फक्त मर्यादित स्मित केलं. मनात म्हटलं, विचारायचं तरी कोणतं फ्लेवर पाहिजे, सरळ घेऊन आला आणि हातात कोंबलं.
“अहो हे काय?” तिनं विचारलं.
“तू खायचं काम कर,” उमेशनं हुकूमच सोडला.


आभाला तिचं लग्न आठवलं. लोअर मिडल क्लास घरातली आभा लग्न होऊन सासरी आली. माहेरी सगळीच काटकसर. काही नवीन घ्यायचं म्हणजे दहादा विचार करावा लागे. आईबाबांचा हा गुण तिच्यातही उतरला होता. सगळे समजुतीने घेणारे, वागणारे असल्याने कौटुंबिक जिव्हाळा खूप होता. सासरी खूप श्रीमंती नसली, तरी कसलीही ददात नव्हती. सगळं छान होतं. उमेशही तसा मोकळ्या स्वभावाचा, आभानं देवाचे आभार मानले. संसार सुरू झाला.
दिवस उलटत होते, काळ पुढे धावत होता. आता दोन मुलांच्यात वेळ भरकन उडून जायचा. पण एक विचित्र भावना मनात उफाळून यायची. उमेशसोबत ती स्वत: कुठेतरी हरवल्यासारखीच झाली होती. तो ही म्हणायचा, ‘अहो मिसेस उमेश, तुमची बढती झालीय आता.’ किंवा ‘तू अपग्रेड झाली आहेस इथे आल्यावर, बरं का!’ असं बरंच काही.
आभाला माहेरची कधी कधी तीव्र आठवण होई. तिथे स्वत:च्या अस्तित्वाची जाणीव होई. हरवलेली ‘ती’ सापडायची. इथे तिने खूपदा ऐकलं होतं, ‘दहादा विचार करायला हे तुझं माहेर थोडंच आहे?’ किंवा ‘लक्षात असू दे राणी, तू मिसेस उमेश आहेस!’ हे प्रौढी मिरवल्यासारखं त्याचं बोलणं तिला विद्ध करून जायचं. ‘तुमच्याकडे ते तसं, आमच्याकडे हे असं बघ.’ या तुलनेमध्ये दर्पोक्ती असायची. उमेशच्या जाण्यायेण्यावर घराचं ताळतंत्र चाले. आपल्या आवडीचं गाणं ऐकावसं वाटलं तर, ‘काय बोअर गाणी ऐकतेस तू! तुझा चॉइसही काय म्हणावं?’ कधी आवडीचा चित्रपट बघावा वाटला तर, ‘ए, ती गाणी म्हणताहेत तोपर्यंत मी हेडलाइन बघतो.’ झालं! रिमोट फरकन ओढला जायचा.
ती आभा हळूहळू मिटत गेली. कोणी म्हणेल, ‘एव्हढं काय त्यात? प्रत्येक घरी काही ना काही असतंच!’
हो, असतं ना. आणि त्या व्यक्तीवर होणारा परिणाम ही!!!
बेल वाजली. दारात नमिता उभी होती.
“आभा, माझ्यासोबत येशील का? मला तुझी गरज आहे. तुझ्या ओळखीही करून देते. बघ, तुला कसं वाटतंय.” नमिता दरवर्षी आपल्या आजी-आजोबांच्या प्रेमळ आठवणीं निमित्त काही ठरावीक दिवशी वृद्धाश्रमात जाऊन वेळ घालवी. त्यांच्या करिता एखादी चांगली डिश किंवा त्यांना आवडेल असं खाणं बरोबर नेत असे. गप्पागोष्टींमध्ये दिवस सरतो, घरी परतताना मन आनंदी होतं. तिथले आजी-आजोबाही या स्नेहामुळे खूश असतात. तिथेच कुमुदशी भेट झाली. आभाच्याच वयाची. आईवडील आधीच गेलेले. चार ठिकाणी कामं करून भाऊ-बहिणींचं पालनपोषण करायची. आभालाही तिथं वेळ घालवणं हा वेगळाच अनुभव वाटला. वेगवेगळ्या स्वभावाची, विविध क्षेत्रातली भरपूर अनुभव असलेली संध्याछायेत वावरणारी ही मंडळी आभाला खूप आवडली.
“तुम्हीदेखील येत जा कधीतरी अधूनमधून,” कुमुद आभाला म्हणाली, “आवडेल तुम्हाला.”
त्या तिघी अशाच अधूनमधून भेटत राहिल्या आणि मैत्री घट्ट होत गेली.
घरी पोहोचल्यावर आईचा फोन आला, “गेट-टूगेदर ठरवलंय. सगळे नातेवाईक जमणार, बर्‍याच दिवसांनी सगळे भेटणार, नाही तरी हल्ली वेळ कुणाला असतो एकमेकांच्या घरी जायला! चार-पाच तास गप्पाटप्पा खाणंपिणं! मजा येईल, सगळे या, जावईबापूंना सांग आधीच.” आईनं प्रेमानं आग्रहाचं निमंत्रण दिलं.
कार्यक्रमाच्या दिवशी उमेश ‘थांब गं, थांब गं’ करत उशिरापर्यंत लोळत पडला. नंतर मोबाईलवर कुणाकुणाशी बोलणंही झालं. आरामशीरपणे चाललं होतं. आधीच अर्धा-पाऊण तास उशीर झालेला. आभाने धाडस करून विचारलं, “मी जाते पुढे. तुम्ही या नंतर!”
पण उमेश कसला ऐकणारा, “अगं कोण नवीन माणसं आहेत ती? तीच काकू, आत्या, मामा, काका. अमक्याचं काय झालं? तमका कुठंय, काय करतोय! बाकी काय नवीन बोलणार तुम्ही?” आभाची री ओढत उमेश संथपणे पेपर चाळत बसला. नकळत तिला तंबी दिल्याची जाणीव झाली. पुढे हॉलवर पोहोचले तेव्हा तब्बल दीड तास उशीर झाला होता. आभा मनात संतापानं फणफणत होती.
पण इलाज नव्हता. भेटीगाठी होतच होत्या. इतक्यात उमेश वर आला आणि “आभा, वुई विल हॅव अर्ली लंच,” म्हणाला. म्हणजेच ‘आवरतं घे. मला कामं आहेत!’ ची सूचनाही होती. उमेशला आभाच्या माहेरच्यांशी वैर जरी नसलं, तरी सख्यही नव्हतं. जेवढ्यास तेव्हढं! आत्मीयता नाही, नात्यातला गोडवा तसूभरही कुठेच नव्हता.


पुढे सुट्टीमध्ये मुलांना आजी-आजोबांजवळ पाठवण्याऐवजी पॅकेज ठरवून प्रवास करायचा, कधी देशात, तर कधी देशाबाहेर. आभा जगरहाटी पाळत होती. समाजात बायकांची स्थिती खूपदा कोंडीत असल्यासारखी असते. विवाहानंतर तर नीतिमत्ता, संस्काराचं ओझं तिच्यावरच लादलं जातं. जणू काही लग्न यशस्वी करून दाखवण्याची जबाबदारी तिच्या एकटीचीच आहे. पुन्हा ‘नवर्‍यानं मारलं अन् पावसानं झोडपलं’ सारख्या म्हणीतून तिला ‘लक्षात असू दे हं’ ची तंबीही असते. स्वत:ला विसरून, मिटवून संसार रेटायचा अशीच मानसिकता.
कधी कधी आभा विचारात पडे, ‘मला इतकं अधुरं… एकाकी पडल्यासारखं का वाटतं? कदाचित समाज म्हणेलही, ’सुख बोचतंय तिला!’
मुलांच्या परीक्षा झाल्यानंतर या वर्षी सिंगापूर आणि इतर देश मिळून पंधरा दिवसांची ट्रिप ठरली. निघण्यापूर्वी आभा मुलांना घेऊन माहेरी आली. मनसोक्त गप्पा झाल्या. आभाशी आभाची गाठ पडली. मधूनमधून उमेशचे फोन येतच होते; पण तिनं मनावर घेतलं नाही. या वेळी आईबाबा थोडे थकल्यासारखे वाटत होते. निघताना आभाच्या चेहर्‍यावरून बाबांनी हात फिरवला… थरथरता. “परदेशी जात आहात, तब्येती सांभाळा!” आभा त्या स्नेहाने चिंब झाली. जड पावलांनी घरी परतली.
“अगं, तू काय नवीन नवरी आहेस इतकं माहेर माहेर करायला? तीनतीनदा फोन करूनही इतका उशीर? माझ्याशी लग्न झालं म्हणून उद्धारलीस. नाहीतर तू म्हणजे आहेस काय?” उमेश फणकार्‍यानं म्हणाला. ऐकणार्‍याला वाटेल, घरोघरी असे संवाद असतील. त्याचं काय? आभा ऐकून घेत असली, तरी तिच्या मनात नकळत एक भिंत तयार होत होती. आणि उमेश त्यावर एकेक वीट रचत होता.
मुलं सिंगापूर बघून खूश झाली. भरपूर बघण्या-करण्यासारखं होतं. दिवस जात होते. फिरणं, प्रवास चालला होता. 12 दिवस झालेही. आता शेवटचा टप्पा राहिला होता. तीन-चार दिवसात परतायचं. अचानक कॉल आला.


बाबा गेल्याची दुःखद बातमी. आभाच्या पायाखालची जमीनच सरकली. आत्ताच तर भेटलो त्यांना! आता या जगातच नाहीत? कधीही भेटणार नाहीत? केवळ अविश्‍वसनीय!
आभानं ताबडतोब निघायचा निर्णय घेतला; पण तिला निघताच आलं नाही. उमेशनं तिला बसवलं, शांतपणे अधिकारवाणीनं म्हणाला, “हे बघ, निघताना भेटलीस नं तू? यातच सुख मान. आता नाही तरी तू अंतिम कार्याला पोहोचू शकणार नाहीस. फ्लाइट्सचा प्रॉब्लेम आहे. नाही तरी चार दिवसांत पोहोचतोच आहोत आपण! कम ऑन, इट्स लाइफ… इट गोज ऑन! बी प्रॅक्टिकल!!!” किती निर्मम, पोकळ शब्द! चार-पाच तासाचाच प्रवास होता, तिला बाबांचं शेवटचं दर्शन मिळालं असतं; पण…
“झालं ते झालं. आता पुढे बघ,” उमेशचा सल्ला!आभानं खूप सांगून पाहिलं, रडली, भेकली, रागावली आणि नंतर शांत झाली. नंतरचे तीन-चार दिवस आले-गेले. उमेश मुलांना रमवत होता; पण तिच्या बाबतीत मात्र संवेदनहीन कोरडाच राहिला.
परतल्यावर आईला बघून बांध फुटला. अश्रूंना वाट मोकळी झाली. आईला मिठीत घेऊन, तिची आईच झाली. धाकटा भाऊही बावरलेला. पाठीवर फिरणारा बहिणीचा हात किती आधार देणारा होता!
सगळ्यांच्या जगण्यात फरक पडला. आता आभाला आपल्यावर माहेरच्या जबाबदारीची जाणीव होऊ लागली. उमेशही सांत्वना करता आला होता. ‘आता पुढे बघा’चा कोरडा व्यवहार सांगितला. “भावाने समजून वागायला हवं. लहान नाही तो,” म्हणत आभाला, ‘तू माहेरच्यात जास्त लक्ष घालायची गरज नाही,’ हे सुचवलं. उमेशची दिनचर्या मात्र त्याला हवी तशीच होती. तो घरी असला तर तिने घरी असायलाच हवं.
‘का? कुठे? कशासाठी?’ असे प्रश्‍न विचारायचे नाहीत. दिवस जात राहिले.
मध्यंतरी कुमुदही भेटली. तिचे भाऊ-बहीण शिक्षण घेऊन आपापल्या संसारात रमले. तिची अडगळ कुणालाही नको होती, म्हणून तीही वृद्धाश्रमात दाखल झाली. म्हणायला कुटुंब होतं, पण ‘कशी आहेस?’ असं विचारायलाही कोणीच नव्हतं. लग्न, संसार, मुलं-बाळं सगळ्यांची आवड असूनही तिला काहीच मिळालं नाही. नाही म्हणता एक आभाच जवळची.
बघता बघता आभाची मुलंही पदवीधर होऊन, जॉब मिळून, लग्न करून आपापल्या संसारात मग्न झाली. उमेशला पुढे येणारं पक्व म्हातारपण दिसत होतं. नवरा घेत असलेल्या काळजीत आभाला सहृदयता, संवेदना जाणवली नाही. सगळं काही सुंदर, मनोहर; पण रिकामं. मोठं शून्य असल्यासारखं!
का कोण जाणे, आभाला असं वाटलं की, कुमुदला जाऊन भेटावं. मनमोकळेपणाने गप्पा झाल्या.
“आभा, भाग्यवान आहेस गं तू! दृष्ट लागावं असं सगळं आहे तुझ्याकडं. हौशी नवरा, मुलं-बाळं, संसार, सामाजिक प्रतिष्ठा, सगळं मिळालंय तुला. तुझी दृष्टच काढायला हवी बाई!” कुमुदचं हे बोलणं ऐकून आभाला थोडं अपराधिक वाटलं. पण स्वतःला चाचपडताना आपलं पारडं हलकं आहे, याची जाणीव झाली. ते इतरांना सांगूनही कळणार नाही. तिने स्वतःला एका कप्प्यात बंद केलं.
“आभा, सगळं जप गं बाई! माझ्याकडे बघ. मग काही बोलायलाच नको.”
उमेशचा स्वतःबद्दलचा कौतुकमिश्रित अहंकार आभाला सदा टोचणी देत असायचा. एक मन म्हणायचं, ‘उमेश खरं तेच बोलताहेत. त्यांच्यामुळेच तर मला सौभाग्य लेणं मिळालंय. त्यांच्यामुळेच प्रतिष्ठा, सगळीकडे हळदीकुंकवाचं बोलावणं, सुवासिनीचं कौतुक, हे सगळं नवर्‍यामुळे तर आहे. नाही तर प्रौढ कुमारिका, घटस्फोटितांना कोण बोलावतं? आभा ‘सौ. उमेश’ असल्याने हा सगळा थाटमाट, सगळं गोड कौतुक! हे सामाजिक सत्य स्वीकारायलाच हवं.’
आभा दुःखी होती, असंही नव्हतं. पण संसारामध्ये मिसळून जाणं, हरवून जाणं नव्हतं. एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून आदर आणि सन्मान नव्हता. कुणालाही सांगून अर्थ नव्हता. आणि आभा ही सांगणार्‍या व्यक्तींमधलीही नव्हती.


आज प्रभात फेरी करून आल्यावर दार उघडायला आभा समोर आलीच नाही. पण दार आतून बंदही नव्हतं. आभाला हाका मारत उमेश घरात आला. “अरे काय हे? मी यायची वेळ माहीत असते ना, मग कुठे गेली? घरभर फिरला, सगळं व्यवस्थित होतं, डायनिंग टेबलवर चहा, नाश्ता, फळं सगळं तयार होतं. आपल्या बेडरूममध्ये आल्यावर लग्नातल्या शालूवर ठेवलेलं पाकीट दिसलं. उमेशने घाईघाईनं उघडून वाचायला घेतलं.
“उमेश, प्रामाणिकपणे सांगते, ‘प्रिय’ लिहावंसं वाटलं नाही. मी माझा मार्ग निवडलाय. मी तुम्हाला कोणताही दोष देत नाही. सगळ्या सांसारिक जबाबदार्‍या पूर्ण झाल्या आहेत. सगळे दागिने आणि सौभाग्यालंकार कपाटात ठेवले आहेत. आईबाबांनी दिलेल्या दोन बांगड्या आणि चेन बरोबर नेत आहे. मी मुलांना आणि माझ्या भावाला या निर्णयाबद्दल कळवलं आहे. वृद्धाश्रमातल्या कुमुदबाईंना तुमच्याबद्दल सगळी माहिती आहे.
तुम्ही निर्णय घेऊ शकता. डिव्होर्स पेपर्सवर मी सही केलेली आहे. आपण आता मुक्त आहोत.”
उमेश थरथरत उभा होता. अगदी अनपेक्षित, अकल्पित घटना. असं वाटत होतं की, चिलखत घातलेल्या अस्त्रशस्त्राने सज्जित योद्ध्याला हळूच कुणीतरी घोड्यावरून खेचून धूळ चारली. आधी रडू उफाळून आलं होतं. पोटात खड्डा पडला होता. पण आता संताप होत होता. ‘काय कमी केलं मी? त्याची हीच किंमत? मला? मला सोडून खुशाल निघून गेली?’ पुढचे काही दिवस तर नको नकोसे करणारे होते. लोकांचे प्रश्‍न, खोचक नजरा, ‘बायको चक्क सोडून निघून जाते म्हणजे काय?’
फोन, तपास करून काहीही उपयोग नव्हता. काही दिवस विचारात गेले. मग एक निश्‍चय केला. ज उमेश वृद्धाश्रमाच्या त्या पायर्‍या चढून गेला आणि कडी वाजवली. दार उघडलं. आत जाताच उमेश म्हणाला, “कुमुदला भेटायचं आहे.”
-प्रिया श्रीकांत