पमीची साळुंकी (Katha – Pamichi Salunki)

पमीची साळुंकी (Katha – Pamichi Salunki)

By Atul Raut in

आई-ताईची गोड आठवण करून देणारी साळुंकी पाहून पमी गहिवरली. अवघ्या कायेचे नयन करून ती त्या साळुंकीला पाहत राहिली.

आजची सकाळ पमीला अगदी खूऽऽऽप आगळीवेगळी वाटली. वाटणारच! उठल्या उठल्या पमीने घराच्या अंगणात नजर टाकली तर काऽऽऽय! चक्क एक गोडुली साळुंकी अंगणात नाच करत होती. नाच म्हणजे उड्या मारत होती. तिला पाहून पमीचं मन माहेरच्या अंगणात बागडायला लागलं. तिथं बागेत साळुंक्या अशाच उड्या मारायच्या. मग पमी गाणं म्हणायची, “टांग टिंग टिंगा ग, टांग टिंग टिंगा.”

आणि स्वतः पण नाचायची. “कार्टे, काय वेडे वेडे चाळे करतेस्? अग पमे, त्या साळुंक्यांना तू बिघडवतेस… बघ कशा नाजूकपणे उड्या मारताहेत… नाही तर तू! धटिंगण मेली…” असा अभिप्राय अर्थात् आईकडून पमीला लगेच मिळायचा. पण पमीला त्या रिस्पॉन्सचा अर्थ कधी कळलाच नाही. कुठल्याच मराठी डिक्शनरीत ‘कार्टे’चा अर्थ मिळणार नाही म्हणा! आणि ‘धटिंगण’ म्हणजे सुदृढ असं तिला तिच्या ताईने एकदा सांगितलं होतं.

आताही पमीला ते सर्व आठवलं. आई-ताईची गोड(?) आठवण करून देणारी साळुंकी पाहून पमी गहिवरली. अवघ्या कायेचे नयन करून ती त्या साळुंकीला पाहत राहिली.

“अगंबाई, राजेशला पण बोलवूया, हे मनोरम दृश्य पाहायला.” असा विचार मनात येताच पमी किंचाळली.

“राजेश, धाव, धाव, अरे ये रे लवकर…”

राजेश अर्थात ‘नवरा’ या प्राणीवर्गात मोडत असल्यामुळे त्यावेळी पहाटेचं(!) ‘साखरस्वप्न’ बघत होता. त्यात आज तर स्वर्गातली अप्सराच त्याच्यापुढे सिनेमात दाखवतात त्याप्रमाणे मद्याचा चषक त्याच्या हातात देऊन अंगाला हेलकावे देत नाचत होती. राजेश मद्याचे घुटके घेत घेत तो नाच बघत होता आणि अशा रंगात आलेल्या दृश्याच्या वेळी पमी ‘राजेश, धाव, धाव…’ असं ओरडली नि राजेशचा स्वप्नभंग झाला. “अं… मी इथेच आहे? पृथ्वीवर? छेऽऽ… पमी कुठे कडमडली पहाटे पहाटे! ” म्हणत राजेशने चादर फेकून दिली आणि तो गॅलरीत आला.

तर पमी पुन्हा किंचाळली, “अरे राजेश, लवकर ये ना, बघ तरी.” राजेशने अंगणात पाहिलं.

“काय बघू?” राजेशने वैतागून विचारलं.

“अरे, काय ‘काय’? ही साळुंकी बघ कशी उड्या मारतेय्…” म्हणत पमीने राजेशचा हात धरून त्याला खेचून साळुंकी दिसेल असं उभं केलं.

“अगं हो हो. तुटेल ना हात माझा! उगाच नाही तुझी आई तुला धटिंगण म्हणायची…” राजेशनं रागानं म्हटलं.

“टोमणा कशाला मारतोस रे राजेश, उगाचच्या उगाच?” पमीलाही आता आत्मसन्मानाची जाणीव झाली.

“उगाचच्या उगाच? अगं, इतक्या पहाटे बेंबीच्या देठापासून किंचाळून काय बघ म्हणतेस तर ही काळुंद्री!…” राजेश खोलीत जात म्हणाला. तशी त्याला थांबवून

पमी म्हणाली, “ए, काळुंद्री कोणाला म्हणतोस?” पमीला आता चेव आला.

“अगं अगं… हिला… या उड्या मारणार्‍या साळुंकीला…”

“क…काऽऽऽय? या गोडुल्या सुंदर साळुंकीला?

अरे काय वाटतं की नाही तुला राजेश?…” पमीने चवताळून विचारलं.

“अगं… अगं… मी तुला नाही म्हटलं गं बाई.

ऐक… त्या साळुंकीला म्हटलं अगं…” राजेश पमीला समजावत म्हणाला.

“अरे, एक वेळ मला म्हणाला असतास तर चाललं असतं रे, पण त्या मुक्या जिवाला… माझ्या आई-ताईच्या गोड आठवणींना तू काळुंद्री म्हणालास? क्षमा माग आधी…” पमीनं फर्मान काढलं.

“बरं बाई पमे, क्षमा कर. इंग्लिशमध्ये पण म्हणतो सॉरी!” राजेश हात जोडत म्हणाला.

“अरे वेड्या, माझी नाही…”

“तुझी नाही? मग कुणाची?” राजेशला आता वैताग आला होता. अप्सरेचा नाच बघायच्या ऐवजी त्या साळुंकीचा नाच बघायला लागत होता. चहा, चहा असा जोराने ओरडून आक्रोश करावासा वाटत होता त्याला.

“कुणाची काय कुणाची राजेश? तू काळुंद्री कोणाला म्हणालास?…” पमी वकिलाच्या थाटात विचारत होती.

“अं… साळुंकीला म्हणालो…” खाली मान घालून राजेश उत्तरला.

“हो ना! मग आता साळुंकीची जाऊन क्षमा माग. म्हणावं हे साळुंके…” पमीला मध्येच अडवत राजेश किंचाळला,“अगं पमे, तू बरी आहेस ना? अगं मी आता अंगणात जाऊन त्या साळुंकीची क्षमा मागू?”

“हो! हो! हो! इथून नाही, जा आधी.”

राजेश म्हणाला, “अग पमे, ऐक ना, आपल्या दोघांना किनई चहा हवाय् गं. म्हणून डोकी फिरलीत आपली!”

चल हे बघ, मी वरूनच अगदी हात जोडून, तिला आत नेलं नि म्हटलं,“झालं ना समाधान?” तशी आवेगाने पमी म्हणाली, “नाही! आम्हा बायकांना मुळी किंमतच नाही!” आता तर ती रडतच सुटली. राजेशला कळेना, हे प्रकरण एवढं चिघळलं तरी कसं?

“अगं, काय तरी काय? चल बघू, आता फ्रेश होऊ नि…”

“राजेश, का रे तू असा माझा अपमान करतोस? तू खाली जाऊन त्या साळुंकीची क्षमा का नाही मागितलीस? आज तू क्षमा मागेपर्यंत मला काही खायचं-प्यायचं नाही. किती सहन करू मी?…”

“अग, पमे, काय झालंय काय तुला? थांब, मी चहा करून आणतो.”

पण पमी जराही बधली नाही. आज सोक्षमोक्ष झालाच पाहिजे.

“हे बघ राजेश, आज तू कळस गाठलास. माझ्या माहेरच्या माणसांचं जाऊ दे, पण माझ्या माहेरच्या साळुंकीचाही तू वर्णभेदावरून अपमान केलास… तुझं माझं नातं संपलं. त्यात तू …”

पमीला अडवत राजेश म्हणाला,“बास हा तुझी नाटकं! बस तशीच एकटी! नातं संपलं ना आपलं. बरं झालं.”

“म्हणजे वाटच पाहत होतास ना घटस्फोटाची?

घे घटस्फोट.” पमी रडतरडत म्हणाली.

“आपलं नातं संपलं.” म्हणत राजेश बाथरूम मध्ये गेला नि यथावकाश सर्व आवरून बाहेर पडला. जाताना तो एकही अक्षर पमीबरोबर बोलला नाही उलट जाताना त्याने रागाने धाडकन दार बंद केलं. मग पमीनंही आरामात आपलं सर्व काही आवरलं. ब्रेकफास्ट घेतला. तोपर्यंत बारा वाजले होते.

“वाजू देत बारा. आता आपलं पोट भरलंय तेव्हा जेवण नकोच बनवूया… त्यात भांडण झालंय… म्हणजे आता आपण फ्रीऽऽऽ बर्ड…” असा विचार करत पमीने टिव्हीवर तिची मालिका लावली नि ती मजेत कॅडबरी खात मालिकेमधल्या जोडप्याची भांडणं एन्जॉय करू लागली. मालिकेतही नायक-नायिकांमधील भांडणामध्ये नवरा रागारागाने घर सोडून जीव द्यायला जातो आणि मग शेजारचे काका एन्ट्री करतात. रडणार्‍या नायिकेला धीर देत ते काका तिला म्हणतात,“पोरी, रडू नकोस. भांडायच्या आधी विचार करायला हवा होतास. आता… तो गेला.” तशी नायिका ‘नहीऽऽ’ असं म्हणत लगेच मोबाईल घेऊन नवर्‍याच्या शोधासाठी बाहेर पडते, असा सीन चालू असतो. ते पाहून पमी एकदम दचकली. तोच तिचा मोबाईल वाजला.

“हॅलो.” पमी म्हणाली.

“अहो वैनी, मी भास्कर बोलतोय… अहो राजेशचा मित्र…”

“अं… न… नाही… म्हणजे नाही ओळखला आवाज.” पमी गोंधळून म्हणाली.

“वैनी, अहो तुमचं राजेशबरोबर भांडणबिंडण झालंय का हो?”

“अं… म्हणजे भांडण असं नाही… मतभेद… काय झालं राजेशला? ” पमी आता पार घाबरली होती.

“अहो, आमच्या बायकोला राजेश इथल्या मोबाइल कंपनीत फोन रिचार्ज करायला आलेला दिसला. पण तो म्हणे अगदी रडवेला दिसला….”

पण ‘बरं बरं’ म्हणत पमीनं फोन बंद केला. एवढ्या कडक उन्हात राजेश एवढ्या लांब रिचार्ज करायला का बरं गेला? अरे देवा! त्या मालिकेतल्या नवर्‍यासारखा… कुठे… जिवाचं काही… नुसत्या विचारानेच पमीला घाम सुटला. तिने कपाट उघडून मालिकेतील नायिकेसारखा वेश करून मोबाईल नि छत्री घेऊन विषण्ण मनानं पतिव्रतेच्या थाटात राजेशला शोधायला ती बाहेर पडली. एसी टॅक्सीत बसून ती मोबाईल कंपनीच्या दुकानासमोर उतरली. दुकानात शिरली. तो तिथे नाही हे कळताच ती त्याला शोधत निघाली. नेमका राजेश घराच्या दिशेला लागला होता. घरच्या त्या मूर्ख साष्टांग नमस्काराच्या नाटकात तो नुसता कावला होता. पमी म्हणजे नुसती माठ आहे माठ! बरं झालं, जरा बाहेर पडायला कारण तरी मिळालं. मोबाइलचंही काम झालं नि मुख्य म्हणजे पमीपासून थोडा वेळ पळता आलं.

इतक्यात ‘राऽऽजेश’ अशी पमीची करुण हाक त्याच्या कानी आली.

“अगं तू इथे कशी कडमडलीस?”

“तुझ्या भास्करनं फोनवर सांगितलं… म्हणे तू रडवेला दिसलास त्याच्या बायकोला… तिने…” पमी धापा टाकत बोलत होती.

“मॅड आहे तो भास्कर आणि त्याची दीड शहाणी बायको… मी माझा वॉक घेत मोबाइल रिचार्ज करायला…” त्याला मध्येच अडवत पमी म्हणाली, “इतक्या दूर? उन्हातान्हात? मला वाटलं रागाच्या भरात… काही बरं वाईट… तर नाही ना करणार तू, म्हणून लग्गेच तश्शी घराबाहेर पडले. तुझ्या काळजीने.”

“होऽऽ? काळजीने? तश्शी म्हणजे अशी नटून थटून? आणि एसी टॅक्सीवर दोनशे रुपये गेलेच असणार…” राजेश चरफडत म्हणाला. तशी लगेच पमी म्हणाली, “अरे, तुझ्यापुढे दो सौ रुपये क्या चीज है?”

“कळलं… चल आता घरी… टॅक्सीऽऽ…”

राजेश ओरडला,“अगं पाय उचल ना.”

“अरे ऐक ना राजेश, अरे मला किनई या उन्हामुळे ज्यूसची तहान आणि पिझ्झा-बर्गरची भूक लागलीय. चल ना रे रेस्टॉरंटमध्ये… तुझ्यासाठी तश्शीच भुकेली बाहेर पडले रे…” पमीने अति क्षीऽऽण स्वरात म्हटलं.

राजेशनं आता कपाळावर हात मारला. हे साळुंकी प्रकरण भलतंच महागात पडणार! म्हणून तो शरणागती पत्करून म्हणाला, “पमे, हे बघ इथे देखील साळुंकी आहे… ही बघ…”

“हो… असू दे की! तिचं काय?” पमीनं न समजून विचारलं.

“अगं तिचं काय, काय? हिलाच घालतो की साष्टांग नमस्कार आणि माफीही मागतो.” असं म्हणत राजेशने फुटपाथवरच त्या साळुंकीपुढे साष्टांग नमस्कार घातला आणि म्हणाला, “हे साळुंके, मला माफ कर. आय अ‍ॅम सॉरी!”

आजूबाजूची माणसं हसत असतानाच राजेश मात्र निर्विकारपणे उठून उभा राहून कपडे झटकत म्हणाला, “झालं समाधान पमे? चल आता घरी जाऊन जेवू या. दमलोय मी.”

तशी पमी म्हणाली, “अरे पण राजेश, तुझ्या काळजीत मला जेवण करायचं सुचलंच नाही.”

त्यावर राजेश म्हणाला,“अगं, मुगाची खिचडी टाक! चल, चल… टॅक्सीऽऽऽ” आणि दोघं टॅक्सीकडे निघाले.