नाईलाज (Katha – Nailaj)

नाईलाज (Katha – Nailaj)

By Atul Raut in

गोविंदराव आता तसे एकटेच होते. चार वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीचं अचानक निधन झालं होतं. एकच मुलगा, तोही अमेरिकेत स्थायिक झाला होता. परंतु, बँकेतील त्या मुलीचं बोलणं ऐकून, तिचा हसरा चेहरा पाहून त्यांना का कोण जाणे, तिच्याबद्दल आत्मीयता वाटू लागली!

दोन दिवस लागोपाठ सुट्टी असल्याने महिन्यातील शेवटचा आठवडा असूनही बँकेमध्ये गर्दी होती; पण पैसे काढणं आवश्यकच होतं. गोविंदराव रांगेमध्ये उभे राहिले. रांग हळूहळू पुढे सरकत होती. जवळ जवळ अर्ध्या तासाने गोविंदरावांचा नंबर लागला. त्यांनी विड्रॉअल स्लिप आणि पासबुक खिडकीतून दिलं. खुर्चीवर देशपांड्यांच्या जागी नवीन मुलगी बसली होती. तिनं स्लिप तपासली. स्लिपच्या मागे गोविंदरावांनी नोटा कशा हव्यात ते लिहिलं होतं, पण सही केली नव्हती.
“काका, स्लिपच्या मागे तुम्ही सही केलेली नाही.” असं म्हणत तिनं गोविंदरावांना स्लिप दिली.
“क्षमस्व, क्षमस्व,” असं म्हणत गोविंदरावांनी सही केली. तोपर्यंत तिनं पैसे मोजून ठेवले होते. तिनं स्लिप घेऊन गोविंदरावांना पैसे दिले. तिचे आभार मानत त्यांनी पैसे घेतले आणि ते बाजूला झाले. पण थोड्या वेळेतही तिचं बोलणं ऐकून, तिचा हसरा चेहरा पाहून गोविंदरावांना का कोण जाणे, तिच्याबद्दल आत्मीयता वाटू लागली!


गोविंदराव आता तसे एकटेच होते. चार वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीचं अचानक निधन झालं होतं. एकच मुलगा, तोही अमेरिकेत स्थायिक झाला होता. तसे गोविंदराव दोन वेळा त्याच्याकडे गेले होते; पण तिथे दिवसातला बराच वेळ एकटंच राहावं लागत असल्यानं ते अलीकडे मुलाकडे जात नव्हते. इथे ते एकटे असले तरी, वेळ घालवण्यासाठी घराजवळ ग्रंथालय होतं, देऊळ होतं, चांगलं उद्यान होतं. काही लांबचे नातलग, समवयस्क मित्र घराजवळच राहत होते. शिवाय वीस वर्षांपूर्वी खरेदी केलेला फ्लॅट होता. मिळत असलेल्या पेन्शनमध्ये भागत होतं आणि वर थोडी शिल्लक दर महिन्याला पडत होती. राधाबाई सकाळी येऊन दोन वेळचा स्वयंपाक करून जात, तर कुमुद धुणं भांडी करून फ्लॅट स्वच्छ ठेवायची. ईश्‍वर कृपेनं गोविंदरावांची तब्येतही चांगली होती. कधी तब्येत बिघडली तर चार-पाच महिन्यांनी त्यांचे फॅमिली डॉक्टर घरी येऊन औषधं-इंजेक्शन देऊन जात असत. दैनंदिन जीवन चांगल्या प्रकारे जात होतं.
गर्दीमुळे रांगेत फार वेळ उभं राहायला लागू नये यासाठी गोविंदराव महिन्याच्या वीस-पंचवीस तारखेलाच पेन्शन काढण्यासाठी बँकेत जात, त्याप्रमाणे ते आज बँकेत गेले होते. एकच खिडकी चालू होती आणि तिथे मागच्याच वेळची मुलगी होती. गोविंदरावांचा नंबर आल्यावर त्यांनी विड्रॉअल स्लिप त्या मुलीकडे दिली.
“आज स्लिपच्या मागे सही केली आहे ना?” त्या मुलीने गोविंदरावांना विचारलं.
गोविंदराव त्या मुलीकडे आश्‍चर्यानं पाहू लागले. याचा अर्थ 20-25 दिवसांपूर्वीचं अजून तिच्या लक्षात आहे तर! “यावेळेस आठवणीनं केली आहे.” गोविंदरावांनी हसत हसत सांगितलं.
त्या मुलीनं स्लिप तपासली. स्वाक्षरी तपासली. गोविंदरावांना पाहिजे होत्या त्याप्रमाणे नोटा दिल्या. आपल्या मागे कुणी उभं नाही, हे गोविंदरावांच्या लक्षात आलं. त्या मुलीशी आता दोन मिनिटं बोलता येणं शक्य होतं.
“नुकतीच बदली झाली का?” गोविंदरावांनी विचारलं.
“बदली नाही. अगदी पहिलंच पोस्टिंग इथं झालंय.”
“बँकेच्या या शाखेत एकंदरीत काम जास्तच वाटतं.”
“अहो काका, आता कोणत्याही बँकेमध्ये जास्तच काम असतं.”
“खरं आहे.” असं म्हणून गोविंदराव खिडकीपासून बाजूला झाले. आपल्या मागे दोघे उभे आहेत, हे त्यांच्या लक्षात आलं होतं.
आज त्या मुलीशी बोलणं फार झालं नाही, पण जे काही झालं ते एखाद्या सुहृदयाशी झालं आहे, असंच गोविंदरावांना वाटलं. त्यानंतर गोविंदरावांचं त्या बँकेत पाच-सहा वेळा जाणं झालं. तिच्याशी झालेल्या बोलण्यातून तिच्याबद्दलची थोडी फार माहितीही कळली.
ती सांगलीची आहे. बँकेच्या नोकरीसाठी तिची निवड झाली; पण नेमणूक सांगलीस न होता या शाखेत झाली. घरात एकट्याच राहणार्‍या एका साठीच्या बाईंच्या घरी ती राहते. नाव माधवी आहे… वगैरे. “माधवी या एकेरी नावानं संबोधलं, तर चालेल का,” असं गोविंदरावांनी विचारल्यावर तिनं पटकन ‘चालेल’ म्हणून सांगितलं. गोविंदरावांनाही ती काका म्हणू लागली.


एक दिवस नेहमीप्रमाणे गोविंदराव देवदर्शन, ग्रंथालय वगैरे आटपून घरी आले; पण आज टेबलवर पोळीचा डबा, भाजीचं छोटं पातेलं, वरणभाताची भांडी दिसली नाहीत. याचा अर्थ काही अडचणीमुळे राधाबाई आल्या नाहीत. भूक लागलेली असल्यानं गोविंदरावांनी जनसेवेमध्ये जाण्याचं ठरवलं. दाराला कुलूपलावून ते बाहेर पडले. जनसेवामध्ये त्यांनी मिनी थाळीची ऑर्डर दिली.ते आजूबाजूला पाहू लागले. तेवढ्यात त्यांना माधवी आत येताना दिसली. गोविंदरावांनी तिला हात केला.
“काका तुम्ही आज इथं कसे?” खुर्चीवर बसत माधवीनं विचारलं.
“राधाबाई आज आलेल्या नाहीत, म्हणून यावं लागलं. तू इकडे कशी?”
“मी ज्यांच्याकडे राहते त्या यमूताई सकाळीच त्यांच्या एका नातेवाइकाकडे गेल्या आहेत. माझ्यापुरतं मी काही केलं असतं; पण आज बाहेर जेवावं असा विचार केला. इथं आले आणि तुमची भेट झाली.”
“मी मिनी थाळी मागवली आहे. तू काय घेणार?”
“मलाही मिनी थाळी.”
थाळी येईपर्यंत आणि जेवताना गोविंदराव व माधवी यांचं बोलणं झालं.
माधवीला आईवडील नाहीत. तिच्यापेक्षा मोठ्या असलेल्या भावाकडे ती राहते. वडील आणि काही दिवसांनी आई अचानक गेल्यामुळे भावाला शिक्षण न घेता नोकरी करावी लागली. नंतर बाहेरून परीक्षा देऊन त्यानं पदवी मिळवली. सुरुवातीचे दिवस फार कष्टात गेले. भावाने लग्न केल्यानंतर बायकोच्या पायगुणामुळे त्याची परिस्थिती सुधारली. माधवी बी.कॉम. असली तरी तिनं नोकरी करण्याची आवश्यकता नाही, असं त्याचं म्हणणं होतं. पण त्याची नाराजी पत्करून माधवीनं बँकेची परीक्षा दिली. परीक्षेत चांगले गुण मिळाले आणि तिची निवड झाली. निवड झाली खरी; पण नेमणूक सांगलीबाहेर झाली. यमूताईंची ओळख निघाली. बरेच दिवस त्या एकट्या राहत होत्या, साठी ओलांडल्यावर एकटं राहणं नको या विचारानं त्यांनी माधवीला जागा दिली; वगैरे माहिती गोविंदरावांना मिळाली. तसंच गोविंदराव एकटेच राहतात. त्यांचा मुलगा, सून, नातवंडं अमेरिकेत असतात वगैरे माहिती माधवीला मिळाली.
जेवताना दोघांचं जे काही संभाषण झालं त्यावरून माधवीचं बोलणं, वागणं मर्यादशील आहे, हे गोविंदरावांना जाणवलं. ती ज्या घरी जाईल तिथे चांगल्या प्रकारे संसार करेल, असं गोविंदरावांना वाटू लागलं.
बँकेमध्ये गोविंदरावांचं माधवीशी फारसं बोलणं होत नसे. पण रस्त्यामध्ये, बागेमध्ये अशी कुठे भेट झाली की, त्यांच्यात जास्त वेळ संभाषण चाले. असंच एकदा बागेत बोलत असताना माधवीला मैत्रिणीनं हाक मारली. कोणी हाक मारली, हे पाहण्यासाठी माधवी मागे वळली आणि गोविंदरावांना तिच्या पाठीवर रुळणारा केसांचा लांबसडक शेपटा दिसला. गोविंदरावांच्या पत्नीचे केस असेच लांबसडक होते. वयाची साठी ओलांडली तरी तिचा एकही केस पांढरा झालेला नव्हता. माधवीच्या लांबसडक केसांकडे आपलं आधी कसं लक्ष गेलं नाही, याचं त्यांना आश्‍चर्य वाटलं.
माधवीची राहणी तशी अगदी साधी होती. एकदा गोविंदरावांनी माधवीला गंमतीनं विचारलं, “माधवी, तुला नवीन फॅशनचे कपडे आवडत नाहीत का? अगं बर्‍याच मुली वेगळ्या वेगळ्या प्रकारचे कपडे वापरतात.”
“मला साधे कपडे आणि साधी राहणीच आवडते.”
“साधेपणा तसा चांगलाच. पण होतं काय! लग्न झाल्यावर मुलीला सासरच्या माणसांचं, नवर्‍याचं ऐकावं लागतं. स्वतःच्या आवडीनिवडीला मुरड घालावी लागते. पण एक कर. नवरा किंवा सासरचे सांगतात म्हणून किंवा वेणीफणी करताना त्रास होतो म्हणून तुझे लांबसडक केस मात्र कापू नको.”
“काका, असं कसं करेन मी?
ती मला देवानं दिलेली देणगी आहे.”
गोविंदरावांना माधवीचं बोलणं ऐकून बरं वाटलं. पुढे आठ-दहा दिवसात गोविंदरावांना माधवी दिसली नाही. तिचा फोनही आला नाही. गोविंदरावांनी बँकेत चौकशी केली, तेव्हा माधवी रजा घेऊन सांगलीला गेली आहे, असं त्यांना कळलं. गोविंदरावांना काळजी वाटू लागली. दुसर्‍याच दिवशी गोविंदराव बाहेर पडणार, तोच टेलिफोनची घंटा वाजली. गोविंदरावांनी फोन उचलला. पलीकडे माधवी होती.
“कालच रात्री उशिरा मी सांगलीवरून आले. आज संध्याकाळी सातच्या सुमाराला मी तुमच्या घरी येते, चालेल?”
“चालेल. मी घरी थांबतो.”
का कोण जाणे, गोविंदरावांना माधवीचा आवाज आज थोडा वेगळाच वाटला. संध्याकाळी दाराची घंटा वाजली. गोविंदरावांनी घड्याळात पाहिलं. सात वाजले होते. त्यांनी दार उघडलं. दारात माधवी उभी होती.
“कॉफी घेणार ना?” गोविंदरावांनी आत येत माधवीला विचारलं.
“घेणार, पण कॉफी नेहमीप्रमाणे मी करणार.” असं सांगून ती आत गेली. तिने हातपाय धुतले आणि दोघांसाठी कॉफी बनवून आणली. गोविंदरावांनी कॉफीचा एक घोट घेतला आणि कॉफी नेहमीसारखी झाली नाही, हे गोविंदरावांना जाणवलं.
“काय म्हणतीय सांगलीची ट्रीप? अचानक गेलीस. तिथली काही खबरबात?”
“माझ्या भावानं माझं लग्न ठरवलं आहे.”
“अगं, चांगली बातमी आहे की. अभिनंदन.” गोविंदरावांनी अभिनंदन केलं खरं; पण सांगताना माधवीच्या डोळ्यात पाणी आलं होतं.
“लग्न ठरलं आहे असं सांगताना तुझ्या डोळ्यात पाणी? लग्न तुझ्या मनाविरुद्ध तर ठरवलं नाही ना!”
“तसंच आहे.” माधवीनं रडक्या स्वरात सांगितलं.
“माधवी पहिली तू शांत हो. नंतर सगळं सांग.” काही वेळ कुणीच काही बोललं नाही. नंतर माधवीनं बोलायला सुरुवात केली…


माधवीनं जे काही सांगितलं त्यावरून गोविंदरावांना परिस्थितीचा अंदाज आला. माधवीचं सासर म्हणजे एकत्र राहणारं आणि अत्याधुनिक विचारांचं सधन कुटुंब. मोठा बंगला, सोन्या-चांदीचा मोठा व्यवसाय. परंतु, माधवीचा नियोजित नवरा तिच्या माहितीनुसार आळशी, फारसा न शिकलेला आणि कर्तृत्व नसलेला होता. लग्न झाल्यावर माधवीनं नोकरी करायची नाही, ही सासरच्यांची अट होती. आता ठीक आहे. पण पुढे सख्ख्या, चुलत भावांचे संसार सुरू झाले की, सर्वजण वेगळे होतील; मग संपत्तीच्याही वाटण्या होतील. माधवीच्या नवर्‍याला भरपूर पैसे मिळाले, तरी ते जन्मभर पुरणार नाहीत. नवरा पुढे काही करेल याची शक्यता नाही आणि माधवीला त्यावेळी चांगली नोकरी मिळणंही कठीण होऊन आर्थिक अडचणी पुढे उभ्या राहतील…
माधवी फार पुढचा विचार आजच करत होती.
“मग भावाला तसं स्पष्ट सांगत का नाहीस?” गोविंदारावांनी विचारलं.
“भावाला आणि वहिनीला माझं म्हणणं पटत नाही. सासरच्या मंडळींनी कधी कोण जाणे, मला पाहिलं आणि मी त्यांच्या मनात भरले आणि त्यांनी भावाकडे मला चक्क मागणी घातली.”
“मी बोलू का तुझ्या भावाशी?” गोविंदारावांनी विचारलं.
“भावानं सर्व ठरवलं असताना मला त्याच्या विरोधात जाता येणार नाही. आईवडिलांच्या मागे आर्थिक अडचणी असूनही त्यानेच माझा सांभाळ केलेला आहे. त्याच्या मनाविरुद्ध मी आता नोकरी करतेय. त्याबद्दलची कटुताही त्यानं मनात ठेवली नाही. म्हणूनच मी या स्थळाला होकार दिला आहे. माझ्यावर त्याचे जे उपकार आहेत, त्याची अंशतः ही फेड आहे, असं मी समजते.”
मनाविरुद्ध का होईना; पण माधवीनं होकार दिल्यामुळं गोविंदरावांना काही बोलता येईना. पण त्यांना मनातून वाईट वाटलं. एका रविवारी माधवी सकाळीच गोविंदरावांकडे आली. अर्थात आधी तिनं तसा फोन केला होता.
“काल मी माझ्या नोकरीचा राजीनामा दिला.”
“म्हणजे तुझ्या लग्नाची तारीख ठरली तर. केव्हा आणि कुठे आहे?”
“अजून बरोबर महिन्यानं. सांगलीला. भावाकडून तुम्हाला लग्नपत्रिका येईलच. मीदेखील आमंत्रण करते. माझ्या लग्नाला जरूर यायचं.”
“लग्नाला मी येईनच. पण तुझ्या मनाविरुद्ध होतं आहे, याची रुखरुख आहे.”
“काका, आयुष्यात सगळ्याच गोष्टी मनासारख्या होतात का? मनासारखं शिक्षण घेतलं, मनासारखी नोकरी मिळाली, भाऊ आणि वहिनी चांगली मिळाली. आता काही गोष्टी मनाविरुद्ध होत आहेत. पण महिन्याची वेळ आहे, तोपर्यंत मानसिक तयारी होईलच.”
“ते ठीक आहे. पण लग्नानंतर या म्हातार्‍याला विसरू नको.”
“काका, मी तुम्हाला आणि यमूताईंना कसं विसरेन? स्वतःच्या मुलीप्रमाणे तुम्ही मला समजता. या परक्या शहरात माझ्या परिचयाचं, नात्याचं कुणी नाही ही उणीव तुम्ही मला अजिबात भासू दिली नाही. बरं, मी आता येते. परत येईन किंवा फोन करेन.” असं म्हणून माधवी उठली. रिकामे कप धुऊन, पुसून जागेवर ठेवले. गोविंदरावांना तिनं वाकून नमस्कार केला. आत्तापर्यंत रोखून धरलेले डोळ्यातील अश्रू तिने वाहू दिले. काही वेळाने डोळे पुसून ती बाहेर पडली. इकडे गोविंदरावांचे डोळेही अश्रूंनी भरले होते. लग्नपत्रिका मिळाल्यानंतर गोविंदरावांनी सांगलीला जायची तयारी केली. पण निघण्याच्या आदल्याच दिवशी चार-पाच महिन्यांनी येणारा पाहुणा, म्हणजे ताप आला. मित्राच्या मदतीनं माधवीच्या भावाला कळवलं. यमूताई तर लग्नाला येणारच नव्हत्या. गोविंदरावही येत नाहीत, हे कळल्यावर माधवीला वाईट वाटलं. दिवस जात होते. गोविंदरावांना माधवीची आठवण यायची. माधवीही अधून मधून फोन करून खुशाली कळवायची. एक दिवस माधवीचा गोविंदरावांना फोन आला. येत्या रविवारी सकाळी नऊ वाजता मी भेटायला येते, असं तिनं सांगितलं. गोविंदराव रविवारची वाट पाहू लागले.
रविवारी सकाळी पावणे नऊलाच दारावरची घंटा वाजली. गोविंदरावांनी अधीरतेनेच दार उघडलं. समोर एक मुलगी उभी होती. तिने भारी किंमतीचा पिवळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस घातला होता. खांद्यावर हिरव्या रंगाची ओढणी. हातामध्ये भारी किमतीची पर्स, मनगटावर भारी घड्याळ, लावलंय की नाही अशी शंका येणारं कपाळावरचं कुंकू, ओठही फिकट गुलाबी रंगानं रंगवलेले, दरवळणारा सुगंधित सेंट… सर्व पाहून गोविंदरावांच्या चेहर्‍यावर प्रश्‍नचिन्ह उमटलं.
“असं काय पाहता काका? मला घरामध्ये येऊ द्याल की नाही?”
आवाजावरून माधवी असल्याचं गोविंदरावांनी ओळखलं. थोड्याच दिवसात केवढा मोठा बदल झाला होता माधवीमध्ये!
“या तुझ्या पेहरावामुळे मी तुला ओळखलंच नाही आणि तुझे ‘अहो’ कुठे आहेत?”
“मी एकटीच आली आहे. आम्ही दोघं येतोय, असं मी सांगितलंच नव्हतं.”
“बरं, आत तर ये. बस. मी पाणी आणतो.”
“तुम्ही बसा काका. जरा वेळाने मी कॉफी करते नेहमीसारखी.”


“रागावू नको विचारतो म्हणून. पण हे वेषांतर कशासाठी? कुठे नाटकात काम…”
“एका अर्थाने माझ्या संसारात मी नाटकच तर करत आहे. माझं सासर आधुनिक विचारांचं आहे, हे मी आधीच सांगितलं होतं.”
“आणि पाठीवरचा लांबसडक केसांचा शेपटाही कापलेला दिसतोय. तरी मी तुला सांगितलं होतं की, केस कापू नकोस.”
“आता मी परस्वाधीन आहे. सासूबाई, चुलत सासूबाई, नणंदा यांचे कमी-जास्त केस कापलेले आणि माझे लांबसडक, हे चमत्कारिक नसतं का दिसलं?” माधवीची असमर्थता गोविंदरावांच्या लक्षात आली.
कॉफीबरोबर बिस्किटं खाताना इकडच्या-तिकडच्या गप्पा झाल्या. थोड्या वेळानं निघतेवेळी माधवीनं गोविंदरावांना वाकून नमस्कार केला. गोविंदरावांनी माधवीला शुभाशीर्वाद दिले आणि नको नको म्हणत असताना तिच्या हातात अहेराचं पाकीट ठेवलं. शेवटी न राहवून दोघांचेही डोळे पाणावले. माधवीच्या पाठीवरून मायेने हात फिरवत गोविंदराव म्हणाले, “आता रडायचं नाही. सगळं ठीक होईल. पुढच्या वेळी अहोंना नक्की आण.”
माधवीनं परत गोविंदरावांना नमस्कार केला नि ती बाहेर जाण्यासाठी वळली. पाठमोर्‍या माधवीला पाहून गोविंदरावांना कससंच झालं. माधवीच्या पाठीवर तिच्या लांबसडक केसांचा शेपटा आता रुळत नव्हता!
– सतीश परांजपे