कोण पळाले? (Katha – Kon Palale?)

कोण पळाले? (Katha – Kon Palale?)

By Atul Raut in
  1. अलीकडे टॉवर संस्कृती म्हणजे काहीही झालं तरी तिन्ही त्रिकाळ दरवाजा बंद! असा अलिखित नियमच झालेला आहे. झाला आजार तरी नो शेजार! कुणाचीही ओळख नसणं यालाच प्रतिष्ठीतपणा आलेला आहे; पण सूर्यदर्शन सोसायटी मात्र याला अपवाद होती.
    करकरे कॉलनीतला सूर्यदर्शन सोसायटीचा टॉवर हां हां म्हणता सोळा मजली कधी झाला व तेथील बैठ्या घरवजा चाळीतले लोक कधी तिथे राहायला गेले; याचा आजूबाजूच्या दोन मजली चाळी, बैठी कौलारू घरे यातील भाडेकरूना पत्ताच लागला नाही. जेव्हा त्यांनी खालपासून वरपर्यंत विद्युत रोशणाईने टॉवर मढवून मोठ्या दणक्यात सत्यनारायण घातला तेव्हा त्यांना कळलं. करकरे कॉलनीतला गणेशोत्सव, तिथली झगमगती सजावट, 18 फूट श्रीची भव्य मूर्ती याची त्या विभागात नव्हे तर अख्ख्या मुंबईत ख्याती झाली होती. नवसाला पावणार्‍या लोकप्रिय लालबागचा राजा या महागणपतीचे दर्शन घ्यायला फार दूरवरून भक्तगण येतात. यूपी, बिहार, अहमदाबाद, सिलोन, रायबरेली एवढेच नव्हे तर क्रिकेटसाठी प्रसिद्ध असलेल्या कॅरेबियन बेटातून भाविक दर्शनासाठी येत असतात असे तिथले कार्यकर्ते आर्जवाने इतर भक्तगणांना सांगतात. तीन तास लाइन लावून, झालं बाबा एकदाचं श्रींचं दर्शन, असं म्हणून स्वतःला भाग्यवान समजणारे भक्तगण ताठरलेले पाय मोकळे करण्यासाठी करकरे कॉलनीतल्या गणेशोत्सवाला हमखास हजेरी लावत.
    नयनरम्य सजावट, अफाट रंगी-बेरंगी विद्युत रोशणाई पाहून भाविक गणेश दर्शन घ्यायचं सोडून हाच झगमगाट पाहत बसतात. तिथल्या गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष भरत भोसके हे आल्या गेल्या पाहुण्यांना म्हणजे नगरसेवक, समाजसेविका तसेच समस्त भक्तजनांना मोठ्या भाविकतेनं सांगतात, “आमचा गणेशोत्सव फार जुना आहे. शंभर वर्षांपूर्वी टिळक गिरगावात गोरेगावकरांच्या चाळीतल्या गणपतीला आले होते ते पुण्याला परत जाता जाता न चुकता आमच्या गणेशाचं दर्शन घेऊन गेले होते.” एखादी गोष्ट खरी खोटी करण्यास वेळ नसल्यामुळे लोक एका कानानं ऐकतात व दुसर्‍या कानानं सोडून देतात, ही गोष्ट अलहिदा!
    अलीकडे टॉवर संस्कृती म्हणजे काहीही झालं तरी तिन्ही त्रिकाळ दरवाजा बंद! असा अलिखित नियमच झालेला आहे. झाला आजार तरी नो शेजार! कुणाचीही ओळख नसणं यालाच प्रतिष्ठीतपणा आलेला आहे; पण सूर्यदर्शन सोसायटी मात्र याला अपवाद होती. सर्व भाडेकरूंची पहिल्यापासून ओळख असल्यामुळे सर्वांचे दरवाजे रात्री झोपण्याच्याच वेळी बंद होत. सकाळी रजनीताई बाजूच्या माईआजीना ‘कसा झाला आहे पहा जरा’, म्हणून शिरा देत होत्या, तर दुसर्‍या मजल्यावरच्या नमिता नाशिककर वहिनी सहाव्या मजल्यावरच्या जया जोशी वहिनींना नाशिकचं भडंग पाठवत असत. निदान या सोसायटीत तरी माणुसकी लिमिटेड झाली नव्हती. या सोसायटीतल्या तिसर्‍या मजल्यावरच्या 303 च्या ब्लॉकमध्ये गुलाबताई राहायच्या. सोसायटीतल्या तळमजल्यापासून ते सोळाव्या मजल्यापर्यंतच्या महिला वर्गांचा सकाळ संध्याकाळ त्यांच्या घरी राबता असायचा. पन्नाशीच्या आसपास असलेल्या महिला, भगिनी, ताई, वहिनी यांच्यामध्ये त्या कमालीच्या लोकप्रिय होत्या. त्यांनी प्रथम मोफत शिवणकला वर्ग चालवला. तो संपतो न संपतो तर लगेच भरतकाम, मग वारली पेंटिंग, नृत्याचे वर्ग, गाण्याचा क्लास असा क्रम चढत गेला. कधी काळी विद्यार्थी दशेत या सर्व वर्गांचा अभ्यासक्रम त्यांनी केला होता. प्रत्येकानं एकतरी कला शिकून घेतली पाहिजे असं त्या आपल्या विद्यार्थ्यांच्या कानीकपाळी ओरडून सांगत असत. त्यामुळे अगदी रविवारीसुद्धा त्यांचा क्लास सुरू असे. हे सर्व फुकट असल्यामुळे पालकही मुलांना आनंदानं परवानगी देत. गुलाबताईंना सुरुवातीला कलेची अजिबात आवड नव्हती, पण इतर मुलांचं पाहून त्याही शिकल्या आणि अग्रेसर झाल्या.


गुलाबताईंना चिंताक्रांत, सचिंत चेहरा करून बसलेलं पाहून 13 व्या मजल्यावरील शमिता साने अवाक होऊन त्यांच्याकडे पाहतच राहिल्या. ‘आम्ही सहाजणी’च्या वासंतिक विशेषांकात एका भगिनीनं टाकाऊ वस्तूंपासून बनवलेल्या शोभिवंत वस्तूंचा फोटो व ही कल्पना आपणांस रस्त्यावर कशी सुचली? त्याचा आपण कसा पाठपुरावा केला याबद्दल माहितीवजा लेख छापून आला होता. वातावरणातील तणाव दूर करण्याकरिता खोटं खोटं हसत शमिता म्हणाली,“गुलाबताई, माझ्याकडे महिला वर्गांसाठी एक नवीन विषय आहे. ‘कचर्‍यातून कला’ हा वर्ग तुम्ही अजून घेतलेला नाही. शिवाय मटेरियलचे पैसेही लागत नाहीत.”
“शमिता, राग मानू नको. पण सध्या लोकसेवा हा विषय मी जरा बाजूला ठेवला आहे. माझी मुलगी स्वाती 30 वर्षांची झाली तरी तिचं अजून लग्न जमत नाही. माझ्या काकांनी आणलेल्या स्थळाला तिनं न पाहताच नकार दिला. मामाच्या मित्राच्या मुलाला धडधडीत नकार दिला. काल बाळच्या बँकेतल्या मित्रानं तिच्यासाठी चांगलं पैसेवालं, शिकलं-सवरलेलं स्थळ आणलं होतं, तेही नावं ठेवून नाकारलं. अशानं तिचं लग्न कसं होणार?”
“त्यात काय एवढं मॅडम, माझी चाळीशी आली तरी माझं लग्नं झालं नाही. आई-बाबा म्हणतात, असेल तुझ्या लग्नात विघ्न तर कधीतरी होईल दूर.”
“मॅडम, विघ्न कधीतरी भग्न होईल. पण लग्न लांबलं की मग होता होता मारामार! कधी शनि आडवा तर कधी राहू पुढे उभा राहतो नि मग लग्नाचे तीन-तेरा वाजले म्हणूनच समजा.”
“मला धीर द्यायचा सोडून घाबरवतेयस की काय? ही पळून बिळून गेली तर मग नातेवाईक काय म्हणतील? तेव्हा काय करावं तेच मला कळत नाही. कार्टीला मांजरं फार आवडतात. लहानपणी तिला माझ्या मामाकडे वसईला घेऊन जायची तेव्हा तिथे मामाच्या मोठ्या घरात मांजरांचा गोतावळाच होता. तेव्हापासून स्वाती म्हणतेय, आपण मांजर पाळूया.”
“मग मला वाटतं, तुम्ही घरात एखादं मांजर आणून पाळाच. तुम्हाला विरंगुळा आणि स्वातीची पण इच्छा पूर्ण होईल. लग्न सुद्धा लवकर जमेल.”
गुलाबताईंनी आपल्या घरात मांजर पाळली आहे व ती सयामी मांजरासारखी दिसते; ही खबर अख्ख्या सूर्यदर्शन सोसायटीमध्ये पसरायला वेळ लागला नाही. मांजर घरात आल्यापासून स्वाती खूष झाली; पण बाबांचा चेहरा मात्र त्या दिवसापासून दुर्मुखलेला दिसायला लागला होता. कारण त्यांच्या लहानपणी त्यांच्या घरातील पाळीव मांजरानं त्यांच्या पायावर पंजा मारून जखम केली होती. तेव्हापासून त्यांचा मांजरांवर भयंकर राग होता. माय-लेकींना जमेल तेवढा विरोध करूनही घरात आलेलं मांजर पाहून त्यांचं मनस्वास्थ्य बिघडलं होतं. पण गुलाबताईंच्या पुढे त्यांचं काहीच चालत नसल्यामुळे त्यांना नमतं घ्यावं लागलं.


गुलाबताईंनी मांजर आणलेली आहे म्हणून त्यांचं अभिनंदन करण्यासाठी त्यांच्या घरी समस्त महिला वर्गाची एवढी वर्दळ वाढली की त्या गोंधळामुळे त्यांना स्वतःला जेवण घेता येत नव्हतं तसेच मांजराची योग्य ती काळजीही घेता येत नव्हती. पहिल्या मजल्यावरच्या कोकरे वहिनी हसत हसत म्हणाल्या, “गुलाबताई, तुमची भाटी अगदी गुटगुटीत आहे हो, तुमच्या घरात काय उंदीर झाले आहेत का? म्हणून ही वाघाची मावशी घरात आणलीत?”
अगदीच ह्या दिसताय तुम्ही… कुठे काय बोलावं तेच कळत नाही. ढालगज मेली, असा चेहरा करीत गुलाबताई नाराजीच्या स्वरात म्हणाल्या, “काहीतरीच काय बोलताय शारदा वहिनी… तुमच्या घरात उंदीर झाले होते तेव्हा तुम्ही कुत्रा आणला होतात…(महिला मंडळातून जोरदार हशा उमटला) अहो, स्वातीनं पहिलीत असताना मांजरीसाठी हट्ट धरला आणि तो आता पूर्ण झाला. आता तिची तिशी उलटायला आली. आणि शारदा वहिनीसाहेब माझ्या मनीचं स्वीटी असं झकास नाव ठेवलंय, आमच्या स्वातीनं; अगदी तिच्या नावाशी मिळतं जुळतं! तिच्यावर खूप प्रेम करते ना ती… ”
“स्वाती कुठे घरात दिसत नाही?” नेहमी भिरभिरत्या नजरेनं सर्वांकडे पाहणार्‍या किरकिरे वहिनी संशयानं इकडे-तिकडे पाहत म्हणाल्या. मागे त्यांनी आपल्या मुलाचं विनयचं स्थळ सुचवलं होतं स्वातीसाठी; तेव्हा जाड भिंगाचा चष्मा लावणारा रातआंधळा नवरा मला नको असं सांगून स्वातीनं त्यांचा धडधडीत अपमान केला होता, तो त्या अजून विसरल्या नव्हत्या.
“स्वाती ना, महाबळेश्वरला गेली आहे, तिच्या ऑफिसमधल्या मैत्रिणींसोबत पिकनिकला…”
“एवढ्या थंडीत?”
“काय करणार हवी तेव्हा सुट्टी मिळत नाही ना! जाऊ दे. लग्न होऊन सासरी गेल्यावर तिला थोडंच सगळीकडे जायला मिळणार आहे?”
(पण त्यासाठी लग्न तर व्हायला हवं, इति किरकिरे वहिनी. मनातल्या मनात… मला आतल्या गोटातून बातमी मिळाली आहे, स्वातीचं कुठेतरी गोलमाल चाललं आहे ते! पळून जाईल तेव्हा समजेल.)
तेवढ्यात स्वीटी मोठमोठ्यानं म्याँव म्याँव करायला लागली. गुलाबताई उठल्या.“सोना, माझी छोनी ती, स्वातीताईची आठवण आली…भारी बाई प्रेमळ.(स्वीटी संपूर्ण तोंड उघडून म्याँवऽऽऽ) समजलं… माझ्या लाडकीला भूक लागली आहे. तुला हॉर्लिक्स टाकून गरमागरम दूध देते. मग तर झालं. (सर्वजणी हसतात.) हसू नका. आमची स्वीटी संपूर्ण शाकाहारी आहे.” असं म्हणून गुलाबताई घाईघाईनं स्वैपाकघरात गेल्या.
“काय बाई कोडकौतुक मांजरीचं!” असं म्हणून समस्त महिला वर्ग उठला, तेवढ्यात कोणीतरी म्हटलं, नळाला पाणी आलं. मग तर एका मिनिटात सर्वत्र सामसूम. धडाधड दरवाजे बंद करून सर्वजणी पाणी भरायला गेल्या. कारण दोन दिवस रस्ते दुरुस्तीच्या वेळी सोसायटीच्या पिण्याच्या पाण्याचा पाईप फुटल्यामुळे पाणीच आलं नव्हतं. दोन दिवस टॉवरवासींच्या तोंडचं पाणी पळालं होतं. सर्वजण महापालिकेच्या कामगारांना तोंडातल्या तोंडात लाखोली वाहत होते.
मग एके दिवशी ती भयंकर बातमी अख्ख्या सूर्यदर्शन सोसायटीमध्ये हां हां म्हणता पसरली. प्रत्येकाच्या तोंडी एकच आवाज ‘गुलाबताईंची स्वीटी पळाली’. जो तो त्यांच्या सांत्वनासाठी त्यांच्या घरी पळाला.
“हे कसं घडलं? कधी गेली? कुठे गेली?” सतरा तोंडे, अठरा प्रश्‍न… त्यांना उत्तरं देता देता गुलाबताईंच्या नाकी नऊ आले. गुलाबताईंचे मिस्टर गोपाळराव पेपर चेहर्‍यावर धरून गालातल्या गालात हसत होते. त्यांचा उदास चेहरा एकदम उजळलेला दिसत होता. सदैव उघडा असणारा गुलाबताईंचा दरवाजा गेले दोन दिवस बंद होता. अचानक आपल्या मांजरीला ढोमे काकांचा रानबोका दिसतो काय आणि लव अ‍ॅट फर्स्ट साइट असं होऊन ती आपल्याला झिडकारून पळून जाते काय, हे सर्व त्यांच्या आकलनाच्या पलीकडचं होतं. आपली स्वाती दोन दिवसाच्या पिकनिकला जाते आणि चार दिवस झाले तरी पत्ता नाही. फोन केला तर स्विच ऑफ येत होता. एवढ्यात गुलाबताईंचा मोबाइल वाजला, पलीकडे कोकरे वहिनी होत्या.


“गुलाबताई. एक आनंदाची बातमी आहे. तुमच्या स्वातीनं त्यांच्या ऑफिसमधल्या रविराजे बरोबर लग्न केलं, ती दोघं महाबळेश्वरला हनिमुनला गेली आहेत. आटोपल्यावर येतील तुमचा आशीर्वाद घ्यायला. काळजी करू नका.” कोकरे वहिनींनी गुलाबताईंनाच नव्हे तर सोसायटीतील सगळ्याच महिलांना स्वाती व स्वीटी दोघंही पळून गेले असल्याचं सांगितलं.
दुसर्‍या दिवशी गुलाबताईंच्या बंद दरवाजावर बाहेरून कोणीतरी जोरजोरानं धडका मारीत होतं. त्यांनी रागानं दरवाजा उघडला तर दारात त्यांची मांजरी स्वीटी आणि तिच्या पाठोपाठ ढोमे काकांचा गलेलठ्ठ बोका!
‘या या नवपरिणीत जोडपं… तुम्हाला सर्व गुन्हे माफ!’ गुलाब वहिनी हसत हसत म्हणाल्या. त्या पाठोपाठ स्वाती आणि तिचा नवरा रविराजे! आल्या आल्या त्यांनी गुलाबताईंच्या पायावर लोटांगण घालून माफी मागितली. आई-बाबांनीही त्यांना उदार अंतःकरणानं माफ केलं.
– विनायक शिंदे