खिसेकापू (Katha – Khisekapu)

खिसेकापू (Katha – Khisekapu)

By Atul Raut in

काही खिसेकापू चांगलेही असतात. आपल्या धंद्याशी प्रामाणिक. त्यांचं काम फक्त पैशांशी असतं. खिसेकापू ही पाहायची गोष्टच नव्हे, ती अनुभवायची गोष्ट आहे. मी त्यांच्याशी बोललोय. त्यांनी माझ्याशी दोस्तीही केलीय.

 

तुम्ही खिसेकापूंना पाहिलं नसेल. पण खिसा कापला गेल्यावर तुम्हाला त्यांचं अस्तित्व जाणवलं असणार. खिसेकापू ही पाहायची गोष्टच नव्हे, ती अनुभवायची गोष्ट आहे. मी त्यांना पाहिलंय. त्यांच्याशी बोललोय. त्यांनी माझ्याशी दोस्तीही केलीय. मी त्यांच्याकडून खिसा कसा कापायचा ते शिकलोय. त्यांनी मला विचारलं,

“तू काही हे काम करणार नाहीस. मग काय करणार आहेस ते शिकून?“ मी म्हटलं “माझा खिसा ‘तुमच्यापासून‘ कसा वाचवायचा? ते मला समजून घ्यायचंय.” अन् त्यांनी मला त्यांची कला दाखवली. अर्थात, त्यासाठी माझी तितकीच तळमळही होती.

मी पहिल्या खिसेकापूपर्यंत कसा पोहोचलो? तेही सांगतो. माझ्या एका मित्राचं पाकीट मारलं गेलं. आठशे रुपये + नुकताच काढलेला पास + पॅनकार्ड, आधारकार्डच्या कॉपीज अशी काही महत्त्वाची कागदपत्रं होती. त्यांनी पैसे काढून घेतले. अन् एका मुलाला

20 रुपये देऊन मित्राकडे पाठवलं. ‘जा… पाकीट देऊन ये. सांग रुळात पडलं होतं म्हणून.’ काही खिसेकापू चांगलेही असतात. आपल्या धंद्याशी प्रामाणिक. त्यांचं काम फक्त पैशांशी असतं. मी त्या पोराचा पाठलाग केला. त्या खिसेकापूपर्यंत पोहोचलो. त्याच्याकडून खिसे कसे कापायचे, हे शिकलो. त्याने मला त्याच्यापर्यंत पोहोचल्याबद्दल माझ्या मित्राचे निम्मे पैसे, 400 रुपये परत केले. “तू आजपासून माझा दोस्त झालास,” तो म्हणाला,

“हे 400 रुपये मित्राला दे. और याद रख अपुन का एरिया बांद्रा से बोरीवली तक है.” त्याने मला त्याचं कार्ड दिलं. मी त्याला वडापाव खाऊ घातला. मित्राला त्याचे 400 रुपये दिले. मी संपूर्ण कहाणी सांगितली नाही. म्हटलं राहू देत. तुला पैशांची जरुरी पडेल. ऐन वेळेला केलेल्या मदतीबद्दल मित्रानं मला नंतर दोन-तीनदा ‘हाय’ चहा पाजला.

दुसर्‍या वेळी दुसरा एक खिसेकापू भेटला ट्रेनमध्ये. चौथी बैठक मिळालेली. मी डुलकी घेत होतो. “काय को धक्का मारता है?… भीड में होता है।…” माझ्याजवळच भांडण चाललं होतं. मी डोळे किलकिले करून बघितलं. एक अँग्लो इंडियन तरुणी, तिच्याबरोबर तिचा मित्र अन् माझ्या शेजारी उभा असलेला गबाळा, बावळट माणूस यांच्यात भांडण (?) चाललं होतं. तरुणी… तिचा मिनी टाईट स्कर्ट गुडघ्याच्या बराच वर आलेला. जोगेश्‍वरी… पार्ला… गेलं. भांडण संपेना. “अच्छा तुने बीच में हात डाला. 500 रुपये निकाल. झगडा खतम करते हैं।… ये ले 500 का पत्ता और फूट…” ते जोडपं सांताक्रुझला उतरलं. मला राहवेना. मी विचारलं, “तुने कुछ किया था क्या? तो 500 रुपये काय को दिया?”

“वो, अपुनने उसका जेब काटा. 500 के तीन नोट मिले. एक उसकोही दिया. एक मै अपने लिए रखता हूँ. एक तेरे लिए. ये ले.” त्याने मलाही पैसे ऑफर केले. “मेरेकु कायको?” मी विचारलं. “गाडी में कितने लोग थे. एक ने पुछा नहीं, सिर्फ तू ने पुछा इसलिए.” तो खारला उतरला नि मी बांद्य्राला उतरलो. दुसरी गाडी पकडून चर्चगेटला गेलो.

मी अन् माझी मानलेली मुलगी हायवेने बोरीवलीला येत होतो. एक माणूस उभा होता. त्याला लिफ्ट हवी होती. मी मुलीला म्हटलं, “घेऊया का त्याला? गरीब दिसतोय बिचारा.” त्याला दहिसरला जायचं होतं. म्हटलं बोरीवलीला सोडतो. पुढे रिक्षाने जा. तो तयार झाला. न होऊन सांगतो कुणाला? मी अन् तो मागे बसलो. मुलगी समोरही बघत होती अन् तिचं लक्ष आमच्या बोलण्याकडेही होतं. आम्ही एकमेकांना नाव विचारलं. व्यवसाय विचारला. मी म्हटलं, “मी सहाय्यक अभियंता आहे.” तो म्हणाला, “मी खिसेकापू आहे.”

कुठल्या माणसाला आपण आत घेतलं? या विचाराने मुलगी कावरीबावरी झाली. माझ्याकडे खाऊ की गिळू? अशा नजरेनं पाहू लागली. तिचा चाकावरचा ताबा क्षणभर सुटला. तिने लाल दिवा असतानाही कार पुढे नेली. अपघात झालेला नव्हता; पण मामा (हवालदार) आला. त्याने मुलीचं लायसेंस ताब्यात घेतलं. आम्ही दोघंही उतरून रदबदली करत होतो; पण तो बधला नाही. कुठून त्या खिसेकापूला लिफ्ट दिली? असं मलाही झालं. मी परत ड्रायव्हरच्या बैठकी शेजारी बसलो. बोरीवलीपर्यंत आम्ही तिघं गप्पच होतो. बोरीवलीला आम्ही वळणार, तर त्याने विनंती केली. “दहिसर चेकनाक्यापर्यंत सोडाल?” मुलीला सांगितलं “सोडूया त्याला.” पोरगी रागातच होती. दहिसर चेकनाक्याला गाडीनं यू-टर्न घेतला. तो उतरला. म्हणाला, “तुम्हाला माझा राग आला असेल ना? आज धंदाच झाला नव्हता. म्हणूनच लिफ्ट मागितली अन् अचानक ‘धंदा’ झाला. कधी? कुठे? नाही विचारलंत?” तोच म्हणाला, “मामाने तुमचं लायसेंस घेतलं अन् मनात विचार आला. आपल्या उपकारकर्त्यांवर थोडं का होईना, उपकार करायची हीच नामी संधी आहे. अन् मग काय?… हे घ्या ताई, तुमचं लायसेंस. दोन हजार रुपयांच्या दोन नोटाही मिळाल्या. एक तुम्हाला नि एक मला. नाही म्हणू नका…” म्हणून तो त्वरेने चालता झाला. आम्ही आ-वासून बघतच बसलो.

मालाड. संध्याकाळच्या वेळी चढणार्‍या, उतरणार्‍यांची एकच गर्दी असते. ‘पाकीट मारा… पाकीट मारा.’ एक शेठ बोंबलत होता. “कितने थे?” “पुरे 1 लाख,” तो म्हणाला. “इतनी रोकड काय कू रखते हो?” “सौ के सौ नोट. वो मिलना चाहिये… मारेंगे…” मी त्वरेने एक्झिट गेटपाशी आलो. या गदारोळात कोण सापडतो?… खिसा जड लागला. हळूच पाहिलं, ती गड्डी माझ्या खिशात होती. खिसेकापूनं माझ्या खिशात ती गड्डी सरकवली असणार. गर्दी ओसरली की, परत ती गड्डी माझ्या खिशातून उडवायची, हा त्याचा बेत असणार. पण काहीतरी गडबड झाली अन् ती गड्डी माझ्याच खिशात राहिली. पोलिसांकडे जावं का? नको. त्यापेक्षा मीच त्या शेठला शोधून काढायचं अन् त्याच्याकडे ती गड्डी द्यायची ठरवलं. मुंबईत सर्वसाधारणपणे डबा, गाडी, नेहमीचे उतारू सहसा बदलत नाहीत. चौथ्या दिवशी मला तो शेठ भेटला. म्हटलं, “ती गड्डी माझ्याकडे आहे.” त्यानं संशयानं माझ्याकडे पाहिलं.

मी त्याला जे घडलं असावं, ते सांगितलं. तो म्हणाला, “गड्डी कुठाय?” म्हटलं,“बोरीवलीला माझ्या घरी.” मालाड-बोरीवली त्या दिवशी त्याच्याच खर्चानं रिक्षानं गेलो. त्याला गड्डी दिली. एका खोलीतील संसार. कनिष्ठ मध्यमवर्गीयाचं घर. तो म्हणाला, “तू वेडा आहेस रे. ती गड्डी ठेवून घ्यायची ना. नाही तरी खिसेकापूने मारली, असंच मी समजत होतो.” म्हटलं, “शेठ ते पैसे माझ्या घामाचे नाहीत. मी कसे घेणार?” त्यानं ती गड्डी फोडली. अंदाजे निम्मे पैसे माझ्या बायकोच्या हातात ठेवायला गेला. म्हणाला, “चोळी-बांगडीला देतोय. नाही म्हणू नकोस.” तिनेही ते पैसे घेतले नाहीत. त्यानं मुलांना खाऊसाठी म्हणून पैसे दिले, तर मुलंही ते पैसे घेईनात. “एकजात पागल कुटुंब मी आज बघतोय,” तो म्हणाला. “हे बघ, माझं मिठाईचं दुकान आहे. मुलांना मिठाई पाठवतो. ती घेतली नाहीस तर बघ.” मला धमकी देऊनच तो गेला.

दुसर्‍या दिवशी एक माणूस आला. मी कचेरीत, मुलं शाळेत, बायको मुलांना शाळेत सोडायला गेलेली. घराला कुलूप पाहून तो थांबला. त्याच्या हातात साजूक तुपातल्या 25 मिठाईच्या छोट्या पेट्या होत्या. शेजार्‍यापाजार्‍यांना कुतूहल… हा फाटका माणूस. याच्याकडे एवढे मिठाईचे बॉक्सेस घेऊन कोण थांबलंय? बायको आल्यावर तिच्या हातात मिठाईचे बॉक्सेस देऊन तो चालता झाला. ती नकोच म्हणत होती. तीन-चार शेजारी डोकावले. त्यांनाही तिनं एक-एक बॉक्स दिला. पुढे सात-आठ दिवस आम्ही साजूक तुपातली मिठाईच खात होतो आणि येणार्‍या-जाणार्‍यांना खिलवत होतो. कोण खिसेकापू? कोण पासर? माहीत नाही, मला मिठाई देऊन गेला.

एक शाळकरी मित्र. त्याच्याकडे कधी गेलो तर त्याची आई लाडू, वडी, चिवडा असं काहीतरी हातावर ठेवायचीच. ती जुनी गोष्ट झाली. तो सायंकाळी घाबर्‍या घुबर्‍या चेहर्‍याने आला. म्हणाला, “माझी आई…” “तिचं काय?” मी विचारलं. “ती नानावटी इस्पितळात अ‍ॅडमिट आहे. उद्या तिचं ऑपरेशन आहे अन् मला ताबडतोब पंचवीस हजार रुपयांची सोय करायची आहे.” तोही माझ्यासारखाच फाटका. म्हटलं, “तुझी काहीच सोय झाली नाही?” म्हणाला, “पीएफ विथड्रॉअल केलं होतं रे, पण खिसा कुणीतरी कापला.”

“कुठे?”

“जोगेश्‍वरीला,” तो म्हणाला.

‘जोगेश्‍वरी’ म्हणताच डोक्यात एकदम लाल दिवा लागला. म्हटलं, “माझ्याकडे 25 हजार नाहीत; पण होईल सोय काही तरी. चल.”

“कुठे?” तो.

“म्हटलं, चल तर खरं.”

माझ्याकडे एका खिसेकापूचं कार्ड होतं, ज्याचा बांद्रा ते बोरीवली एरिया होता. त्याला शोधून काढलं. त्याचा पत्ता होता, जोगेश्‍वरीचा उस्मानभाई. इस्माइल युसुफ कॉलेजच्या मागची झोपडपट्टी. तिथे गेलो. उस्मानभाई ‘टाइट’ होता. त्याची झोपडी पॉश होती. दाराशी मवाली बसला होता. “क्या काम है बे?”

मी त्याला उस्मानभाईचं कार्ड दाखवलं.

“कार्ड है क्या? जाओ अंदर.”

आत गेलो. उस्मानभाई फुल टू… बोलावं की नाही? या विचारात मी.

“बोल.” त्यानं फर्मावलं.

मी त्याला मित्राचं पाकीट मारलं गेल्याचं सांगितलं. म्हटलं पंचवीस हजार होते. आईच्या ऑपरेशनसाठी त्याने पीएफ विथड्रॉअल केलं होतं. मी माहिती पुरवली.

“किसकी माँ?” त्याचा प्रश्‍न.

“मेरे दोस्त की. मगर दादा वो अपुन की माँ जैसी है.”

“अरेऽऽऽ पहले आने का ना? वह रकम सब लडको में बाँटी गयी. उन्होंने उडा भी दी होगी.”

“ठीक है दादा. चलते है.” मी जायला निघालो. “अरे! घर आये हो. खाली हाथ जाओगे क्या? अरे… जा, 2 कप चाय और फरसाण लेके आ.” त्याने दाराशी बसलेल्या मवाल्यास सांगितलं. तो गेला.

“देख भाई, अब 12 घंटे है. अपुन के लडके ओव्हर टाइम करेंगे, जो भी पैसा मिलेगा नानावटी में पहुंच जायेगा. में बांद्रा-चर्चगेटवाले दादा से भी बात करता हुं. कुछ भी हो माँ के ऑपरेशन में पैसा कम

नहीं पडने दुंगा.”

आम्ही चहा आणि फरसाण घेतलं आणि निघालो.

“तू फिकीर मत कर. तेरा काम हो जाएगा,” त्याने माझ्या मित्राला समजावलं.

त्याची पोरं पाकीटमारीत यशस्वी होतील का? ते कुणाची पाकिटं मारतील? श्रीमंतांची की मध्यमवर्गीयांची?… या विचारातच आम्ही घरी पोहोचलो. आमच्यापुढे दुसरा कुठलाच मार्ग नव्हता. बँक आम्हाला थोडीच कर्ज देणार? आमच्यापाशी होतंच काय? ना कुणा मोठ्या माणसाची ओळख, की जो बँकेच्या सीइओला फोन करू शकेल किंवा काही तारण… दुसर्‍या दिवशी किरकोळ रजा टाकली. नानावटीत स्वागतिकेला मित्राच्या आईचा वॉर्ड

नंबर, कॉट नंबर सांगितला… 3-13. ती म्हणाली,

“कोण कोण माणसं येऊन पैसे जमा करून जाताहेत. आत्तापर्यंत

28 हजार झालेत.”

“25 हजार पेक्षा जास्त?” मी ओरडलो. उस्मानभाई आणि मित्र आला.

मित्राने उस्मानभाईंना साष्टांग प्रणिपात केला.

“अरे, अपुन के लडकों का मिष्टेक था. नहीं तो तेरे दोस्त को मेरे पास काय को लाता?”

स्वागतिकेने 25 हजार रुपये घेतले आणि उरलेले मित्राला परत केले. त्याने ते उस्मानभाईंना परत केले.

“अपुन दिया हुआ पैसा वापस नहीं लेता. क्या?” तो म्हणाला. त्या दोघांनी ते पैसे माझ्याकडे सरकवले.

मी त्याला सांगितलं, “कॅँटिनमध्ये ठेवू. आईला बघायला जे जे कुणी येतील, त्यांना चहा-बिस्किटं द्यायला कँटिंगवाल्याला सांगू.” माझा हा तोडगा

मान्य झाला. त्याच्या आईला बघून आल्यानंतर

मलाही चहा-बिस्किटं मिळाली. ऑपरेशनला आणखीही पैसे लागले. तेही उस्मानभाईने दिले. “तुम दोनो कडका. और तुम्हारी माँ अपुन की माँ नही है क्या?” त्याचं स्पष्टीकरण.

माहिम रेल्वेस्थानक. माझं एका डॉक्टरकडे काम होतं, म्हणून उतरलो होतो. काम झालं. परत बोरीवलीला जायचं म्हणून रेल्वेस्थानकावर आलो. पाहतो तो काय? हार्बर लाइनवर एक माणूस रुळांबाहेर पडलेला. त्याला कुणीतरी गाडीतून ढकललं होतं. त्याला मुका मार लागलेला. मी त्याला घेऊन परत त्या डॉक्टरकडे गेलो. म्हटलं, “याला ट्रीटमेंट दे. हवं तर ठेवूनही घे. मी उद्या येऊन पैसे देऊन जाईन.” डॉक्टर हो म्हणाला. दुसर्‍या दिवशी गेलो. तो अन् डॉक्टर माझी वाटच बघत होते. त्याला फक्त मुका मार लागलेला.

डॉक्टरांना विचारलं, “ट्रीटमेंट आणि एक दिवस राहण्याचे किती पैसे द्यायचे?” डॉक्टर म्हणाले,

“हा तुझा कोण?” म्हटलं. “तसा कुणी नाही. माणुसकीच्या नात्यानं याला तुझ्याकडे आणलं.”

“असं असेल तर मीही याला माणुसकीच्या नात्यातूनच ट्रीटमेंट दिलीय. जा घेऊन त्याला.”

आम्ही बाहेर आलो.

तो म्हणाला, “मी खिसेकापू आहे. माझा एरिया बांद्रा-चर्चगेट आहे. तुला मी तुझ्या अडचणीच्या वेळी नक्की मदत करीन. हा माझा वादा आहे.” त्याला म्हटलं, ठीक आहे. पण मनात विचार आला… हा मला कशी अन् कुठे मदत करणार?

तिसर्‍या दिवशीची गोष्ट. माहिम रेल्वे स्थानकावरून गाडी सुटलेली. टी.सी. आला. मी पँटच्या खिशात पास काढण्यासाठी हात घातला. ओह. पँट बदललेली. खिशात पास-पाकीट नाही. माझा कावराबावरा चेहरा पाहून टी.सी. नेमका माझ्याकडे येऊन टपकला.

मी टी.सी.ला सांगितलं, “माझ्याकडे पास आहे. पण तो घरी. आज मी पँट बदललीय. त्यामुळे माझ्याकडे

पैसेही नाहीत.”

“उतर खाली.” त्यानं माझी मान पकडली. अपमान झालेला. उतरणं भाग होतं. मी त्याला सांगण्याचा प्रयत्न करत होतो. तिकिटाचे आणि दंडाचे पैसे नंतर रेल्वेला मनिऑर्डरने देईन… पण…“ “आलाय प्रामाणिक. उतर खाली.” टी.सी.ने मला धमकीच दिली.

“वह नही उतरेगा. तू उतरेगा.” दुरून आवाज आला. मी बघतो… तर तोच खिसेकापू… ज्याला मी डॉक्टरकडे घेऊन गेलो होतो.

“तू चिंता मत कर. मैं हू ना.” त्यानं मला आश्‍वस्त केलं. टी.सी.कडे बघून तो त्याच्यावरच गुरगुरला.

“तू टी.सी. कहलाता है ना? तेरा ड्रेस, बॅच, आयकार्ड कहाँ है? खामखा गरीब आदमी को परेशान करता है?” हे बोलत असताना त्या खिसेकापूच्या साथीदारांनी त्या टी.सी.चा बॅच, आयकार्ड, त्याच्याकडील पैसे उडवले होते. त्याच्या साथीदारांनी काम फत्ते झाल्याची आपल्या बॉसला खूण केली. आता तो खिसेकापू

टी.सी.ला भारी होता. “बोल तेरे साथ क्या करने का? तू स्टेशन पर उतर जा, नहीं तो में चलती गाडी से ढकेल दुंगा.”

आता तो टी.सी. खिसे शोधू लागला. “मैं टी.सी. हूँ. किसी ने मेरा आयकार्ड और बॅच मारा लगता है.”

“अच्छा, तू कहता है वो सच और ये कह रहा

है ये झुठ है क्या?” खिसेकापूच्या दुसर्‍या साथीदारानं त्याचा गळा पकडला… टी.सी. पुढच्या स्टेशनवर उतरला. त्या खिसेकापूच्या साथीदाराने माझ्याकडे

टी.सी.च्या मारलेल्या 500च्या दोन नोटा सरकावल्या. “रहने दे… घर पहुंचेगा तब तक ये नोट काम आयेंगे.” मग तो खिसेकापू आणि त्याचे साथीदार एलफिस्टन रोडला उतरून चालते झाले.

मला अन् बायकोला गिरगावला लग्नाला जायचं होतं. नको नको म्हणत असताना तिने भरपूर दागिने घातले होते. बोरीवलीला ट्रेनमध्ये उडी मारून मी तिसरी सीट पकडली. चौथी सीट तिच्यासाठी ठेवली. तीही गर्दीतून आली. गाडी सुरू झाली. पाहतो तो काय? बायकोच्या गळ्यात बोरमाळ नाही. कुणीतरी उडवली होती. मी जाम रागावलो. “गाडीच्या गर्दीतून जायचं, इतके दागिने घालायचेच कशाला?” आता ती काय बोलणार? पण बायकोच ती. तिने मलाच दोष दिला. “खिसेकापू तुमच्या ओळखीचेच आहेत ना? मग माझी बोरमाळ त्यांनी उडवलीच कशी?”

“ते मला ओळखतात, तुला नाही,”

मी सारवासारव केली. लग्न झालं. जेवण झालं.

स्वागत समारंभाला न थांबता आम्ही परतायचं ठरवलं. आम्ही पुन्हा चर्नी रोड स्टेशनवर आलो. दुपारची

वेळ. अजूनही कचेर्‍या सुटायच्या होत्या. त्यामुळे गाड्यांना गर्दी फारशी नव्हती. आम्ही फास्ट गाड्या जिथून सुटतात, त्या फलाटावर थांबलो होतो.

एक कुबडीवाला भिकारी आम्हाला बोलवत होता. भिकार्‍याचं आमच्याकडे काय काम? म्हणून आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. आम्ही त्याच्याकडे बघत नाही

हे पाहून त्याने आम्हाला थांबण्याची खूण करून समोरच्या स्लो गाडीच्या फलाटावरून उडी मारून,

रूळ क्रॉस करून तो आमच्याकडे आला. मी त्या भिकार्‍याला देण्यासाठी एक-दोन रुपयाचं नाणं काढलं. तो म्हणाला, “मी भिकारी नाही. तुम्ही परत गाडीनेच जाणार म्हणून तुमच्यासाठी थांबलो होतो.”

“अरे पण का?” मी विचारलं.

“ताईंची बोरमाळ आमच्याच एका माणसानं बोरीवलीला उडवली… पण नंतर आमच्या लक्षात आलं, ही तुमची बायको आहे. पण तोपर्यंत तुम्ही बांद्रा क्रॉस केलं होतं. बरं दोन्ही एरियातील खिसेकापू दादा तुमचे दोस्त म्हणून ती बोरमाळ त्या माणसाने आमच्या माणसांच्या स्वाधीन केली. ही घ्या तुमची बोरमाळ.

हे साहेब तुमच्यासोबत नसते, तर ही बोरमाळ तुम्हाला मिळाली नसती,” तो बायकोला म्हणाला.

“बरं मी येतो, तुमची गाडी येतेय. तुमच्यासाठी म्हणून इथे सकाळपासून थांबलोय,” असं बोलून तो कुबडीवाला चालता झाला. बक्षीस घ्यायलाही थांबला नाही. मोठाच विलक्षण अनुभव. नाही का?