फेसबुक डॉट कॉम (Katha- Facebook Dot.com)

फेसबुक डॉट कॉम (Katha- Facebook Dot.com)

गेल्या वर्षी हीच प्रियंका लॅपटॉप आणि मोबाईलवर आपल्या फेसबुकवरील दोस्तांशी सतत चॅटिंग करत होती. तेव्हा त्या रागाने बोलल्या पण होत्या, “प्रियंका अशी फेसबुकवर चिकटून राहशील तर आपल्या आसपासची नाती कशी सांभाळशील?”
लग्नानंतर जवळपास एक वर्षाने प्रियंका आणि समीर ताईसाहेबांकडे हैदराबादला आले होते. सासरहून प्रियंका आपल्या आईकडे  पुण्याला जाण्यास निघाली होती, पण ताईसाहेबांच्या आग्रहाखातर हैदराबादला थांबली होती. ती अगदी आनंदाने इथल्या घरात वावरत होती. ताईसाहेबांना प्रियंकाच्या लहानपणापासूनच तिचा लळा लागला आहे. त्यांना दोन मुली झाल्या होत्या. त्यानंतर दिराच्या घरात प्रियंकाचा जन्म झाला. तर तिचे आपल्या मुलींसारखेच लाड त्यांनी केले. त्यांच्या सारखेच फ्रॉक, स्कर्ट वगैरे कपडे त्या घेऊन देत. तिचे सारे हट्ट पूर्ण करीत, तिला त्यांचा लळा कधी लागला, ते कळलंच नाही. आता हैदराबादच्या मुक्कामात प्रियंका ताईसाहेबांना सासरच्या मंडळींच्या गोष्टी सांगत असताना तिच्या मोबाईलची मधुर घंटा किणकिणली. “अगबाई, ताईसाहेब माझ्या दिराचा फोन आहे. आज दिवसभर त्यांच्याशी बोलणंच झालेलं नाही…” असं बोलून प्रियंका फोनवर बोलू लागली. अघळपघळ बोलून झाल्यावर ती आपल्या जावेशी पण बोलली. बोलणं झाल्यावर प्रियंका म्हणाली, “ताईसाहेब, आता जरा सासू आणि सासर्‍यांशी पण बोलून घेते. म्हणजे आजची बोलाचाली पूर्ण होईल. नंतर तुमच्याशी बोलते. म्हणजे मला क्षमा करा हं…”
प्रियंकाला डायनिंग टेबलजवळ एकटीलाच सोडून ताईसाहेब स्वतः स्वयंपाकघरात निघून गेल्या. मलाई कोफ्त्याची तयारी करता करता, त्यांच्या मनात विचार आला, गेल्या वर्षी हीच प्रियंका लॅपटॉप आणि मोबाईलवर आपल्या फेसबुक वरील दोस्तांशी सतत चॅटिंग करत होती. तेव्हा त्या रागाने बोलल्या पण होत्या, “प्रियंका अशी फेसबुकवर चिकटून राहशील तर आपल्या आसपासची नाती कशी सांभाळशील?
सासरच्या लोकांशी सामंजस्य कसं प्रस्थापित करशील?”
“अहो ताईसाहेब, एक फ्रेंड रिक्वेस्ट आणि दोन अपडेटस्ला उत्तर देते. मग फेसबुकवरून लॉगआऊट करते. नंतर लॅपटॉपवर मला प्रोजेक्ट पण पूर्ण करायचा आहे. फेसबुक तर मी फक्त 15 मिनिटंच पाहते.” प्रियंकानं आपलं स्पष्टीकरण देत म्हटलं. आजकाल लोकांना फेसबुकने कसं जखडून ठेवलं आहे. ते ताईसाहेबांना चांगलंच ठाऊक होतं. त्या स्वतःदेखील काही महिन्यांपासून फेसबुक वर दिसतात. संगीताची आवड असणार्‍या गु्रपमध्ये त्या सामील आहेत. दिवसातून दोनदा तरी त्या फेसबुकच पेज उगडून नक्कीच बघतात. त्यांचे बरेचसे फेसबुक फ्रेन्डस् आशा भोसले आणि मुकेश यांची गाणी पोस्ट करतात. पण कुणी लता मंगेशकरांचे गाणं पोस्ट केलं, की त्या ऐकल्याशिवाय राहत नाहीत. आपल्या फेसबुक लिस्टमध्ये त्यांनी शाळेतील एकाही स्टाफ मेंबरला समाविष्ट केलेलं नाही. आपल्या अपडेटस् वर स्टाफने चर्चा करावी, हे त्यांना आवडणारं नाही. आजकालच्या तरुण मुलींसारखा त्या फेसबुकचा वापर करत नाहीत. अन् त्यावर जास्त कुणाशी चॅट देखील करत नाहीत. आपल्याला पण थोडाफार फेसबुकचा नाद लागला आहे, हे त्या जाणून आहेत. पण त्याची खबर कुणालाच नाही. मायक्रो ओव्हन बंद झाल्याचा आवाज झाला नि ताईसाहेब भानावर आल्या. ओव्हन मधून बटाटे काढून त्या सोलू लागल्या. मोबाईलवर सगळ्यांशी बोलून झाल्यावर प्रियंका स्वयंपाकघरात आली अन् त्यांना गळामिठी घातली.“ताईसाहेब, माझी सासू सांगत होती की. आपल्या घरातील सगळ्यांनी म्हणजे सातही जणांनी दररोज एकमेकांशी बोललंच पाहिजे.”
“हे सात जण कोण?” प्रियंकाला मधेच थांबवत ताईसाहेबांनी विचारलं.
“मी आणि समीर, दीर अंकित, त्याची बायको सोम्या, सासूबाई, सासरे आणि आजी. सासूबाई म्हणतात की, दररोज बोलाचाली केल्याने एकमेकांशी सुसंवाद राहतो. त्याच्याने दुरावा जाणवत नाही. आपण एकमेकांपासून दूर असतो,
ते अंतरही अशा बोलण्याने कमी होते.”
“म्हणजे ज्याप्रमाणे आपण फेसबुकवर स्टेटस टाकतो, एकमेकांचे अपडेटस् वाचतो तसं.” ताईसाहेबांनी फोड करून सांगितलं. त्यावर प्रियंका खळखळून हसली. ते थांबल्यावर ती म्हणाली, “काय म्हणता? म्हणजे तुम्ही पण फेसबुकवर असता? मला फेस नाही, तर बुक कुठून आणू, असं तुम्ही गंमतीने बोलत होतात, मग हे कसं घडलं?”
“घडलं खरं. पण काय ग, तुझी सासू तर मार्क जुकरबर्गच्या वरताण फेसबुक वापरते. एका जागी बसून आपली सर्व बातचीत एकमेकांशी शेअर करणं, हीच तर फेसबुकची कन्सेप्ट आहे. पूर्वीच्या काळी लोक चावडीवर बसून गप्पा मारत.
गल्लीमोहल्ल्यातले लोक तिथं एकत्र जमत. अंगणातही खाट टाकून गप्पा रंगायच्या. आता तर एकमेकांना भेटायला देखील लोकांना वेळ नसतो.”
“तेच तर सासूबाईंचं म्हणणं आहे. ह्या धावपळीच्या युगात आपापसात बोलण्यासाठी सगळ्यांनीच निदान अर्धा तास तरी वेळ काढला पाहिजे. आमच्या घरातल्या सदस्याला सहा लोकांशी बोलायला हवं. प्रत्येक व्यक्तीने जर पाच निमिटाचा वेळ काढला तर अर्ध्या तासात 36 लोकांशी बातचीत झालीच म्हणून समजा.”


“अरे व्वा! तुझी सासू तर मार्क जुकरबर्ग पेक्षा जास्त हुशार म्हटली पाहिजे. पण यापेक्षा वरताण तर एक फेसबुक कित्येक वर्षांपासून चालत आलं आहे. ते माझी आजी चालवत होती. ती पोस्टकार्डच्या माध्यमातून कमालीचे छान फेसबुक चालवत होती.” प्रियंकाशी बोलता बोलता ताईसाहेब जुन्या आठवणीत रंगून गेल्या. स्वयंपाकपाणी आणि धुणीभांडी झाली की, त्यांची आई दुपारच्या वेळी आपल्या दोन्ही सुनांकडे पोस्टकार्ड सुपूर्द करायची.
“मुलींनो, आता आपल्या नणंदांना पत्र लिहा बघू,” शी सुरुवात करून मोठी सून हिराला म्हणायची, “लिही तुझ्या नणंदेला.आत्ताच मी कैर्‍या कापून सुकायला ठेवल्या आहेत. तू येशील तोवर लोणचं तयार होईल…” आणि लहान सून रज्जीला सांगायची, “तू सुवर्णाला लिही, म्हणावं या खेपेला तुझ्या सासूला पण सोबत घेऊन ये. आमचं घर लहान असेल, पण मन मोठं आहे. कसलीही काळजी करू नका.”
पत्र लिहिता लिहितो दोन्ही सुना आपल्या घरच्या अपडेटस् जाणून घेत असत. आईच्या माध्यमातून नणंद- भावजयेत होणारा संवाद नाती बळकट करत होता. आईचं बोलणं संपल्यावर वहिन्या पण आपल्या मर्जीच्या दोन तीन ओळी लिहीत असत. अशा रितीने सासूबाईंचे संवाद मुलींपर्यंत पोहचत असत. अन् वहिन्यांच्या हस्तलिखित संवादाने नणंद-भावजय एकमेकांच्या नजीक येत. हे पत्र आईने लिहायला लावलं आहे की, वहिनीने याचा विचारसुद्धा नणंदांच्या मनात येत नसे. “हे पोस्ट कार्ड फेसबुकच्या अपडेटस्पेक्षा कमी होतं का?” असा प्रश्‍न प्रियंकाला विचारून ताईसाहेब भावुक झाल्या. “आपल्या मधल्या पिढीला हे कळलंच नाही की, आईने लिहायला लावलेल्या पत्रांद्वारे नणंद-भावजयांमधील नात्यांचे पूल बांधले गेले. पण आमच्या पिढीत नात्यांच्या दोन वेगवेगळ्या स्तंभावर हे पूल बांधले गेलेच नाहीत. त्यामुळे मला प्रत्येक नातेसंबंधात दुरावा दिसून आला…”
ताईसाहेबांच्या स्वरात एक वेदना जाणवत होती. त्या विचार करू लागल्या की, जगभरातील दोस्तांना एकत्र आणण्याचे काम फेसबुक करते आहे, तर मग गराच्या कुटुंबप्रमुख किंवा समाजाचा प्रमुख आपल्या संवादाच्या माध्यमातून हे
काम अधिक चांगल्या प्रकारे का करू शकत नाही?
“तुझ्या सासूबाई हे काम अतिशय चांगल्या प्रकारे करताहेत प्रियंका,” कढईमध्ये कोफ्ते घालत ताईसाहेब म्हणाल्या. “तर काय! मला पण सगळ्यांशी बोलायला खूप आवडतं. सगळ्यांशी बोलल्याशिवाय चैन पडत नाही. काहीतरी कमतरता जाणवते. अन् दिवस चांगला जात नाही.”
“हं, काही तरी लाइक करणं राहून गेल्याची चुटपुट लागून राहते तसंच ना!” आणि प्रियंका व ताईसाहेब जोरजोरात हसू लागल्या.
– संगीता सेठी

त्याचे तया कळाले (Katha – Tyache taya Kalale)