धग (Katha – Dhag)

धग (Katha – Dhag)

By Atul Raut in

“­­­छोटी, जा. शेवंताबाईला निरोप देऊन ये की, उद्या हळद कुटायची आहे. धुणी- भांडी करायला लवकर ये”. आईने आज्ञा दिली व मी धाकट्या बहिणीला बरोबर घेऊन निघाले. घराच्या मागच्या रस्त्यावरच मातीच्या चाळीत शेवंताबाईचं बिर्‍हाड. बिर्‍हाड कसलं! दोन खोल्यांचं छोटं घर ते आणि इन मिन दोनच माणसं राहणारी, धुणी-भांडी करणारी शेवंता व तिच्या नात्यातला तिने सांभाळ केलेला मुलगा रंगनाथ राहत होते. कोणी लोहार, कोणी रोजंदारीवर काम करणारे मजूर, कोणी गाई म्हशी सांभाळणारे…
सगळ्या कष्टकर्‍यांच्या कुणब्यात रंगनाथ अजून आठवी-नववीत असेल.  आमच्यापेक्षा चार-पाच वर्षांनी मोठा. विनाकारण भटकायचा. कामधाम नाही. कुठेही जा, काहीही उनाडक्या करा… शेवंताचं पोटचं मूल नसल्याने तिचंही फारसं लक्ष नसे. किंबहुना रंगनाथच्या बाबतीत निष्काळजी वाटायची. रंगनाथच्या खर्‍या कुटुंबाबद्दल कोणालाच काहीही माहिती नव्हती. कधी तो आमच्या घरी असाच शेवंताबाई बरोबर यायचा. कधी माळ्यावर चढ, कधी खड्डे खण, कधी सरपणाकरिता लाकडाच्या ओंडक्यातून सालं ओरबाड, कधी रस्त्यावरच्या मारामार्‍या… उद्देश हीन, निरर्थक भटकत होता. दादांनी कित्येकदा शेवंताबाईला सांगितलंही, रंगनाथला मार्गी लावण्यासाठी काही विचार करायला; पण शेवंताला कसलीही फिकीर नव्हती – पेक्षा तिची इच्छाही दिसत नव्हती. कदाचित पोटचा मुलगा नव्हता म्हणून नाही.आई-वडिलांच्या तोंडून हे संभाषणही बरेचदा ऐकलं होतं. एकदा असंच होळी करीता वाळक्या झाडांच्या शोधात आम्ही मुलं-मुली इकडे तिकडे फिरत होतो. इतक्यात समोरून रंगनाथ आला. ‘’होळी करता फिरता व्हय्?


हिरीच्या पाठी जा, बोरीचं झाड पार सुकलं हाय बगा, अन् मोट्टं हाय. धाडधाड पेटंल! बगाच मज्जा!” हो ना करता आमच्या मुलांच्या टोळक्याने धाडस केलं व विहिरीच्या पाठीमागे जाऊन उखडलं ते झाड आणि फरफटत, खजिना लुटल्याच्या आनंदाने, नाचत नाचत आलो. खूपदा असं झालंय. रंगनाथला विचारलं की काम झालंच म्हणून समजा. त्याला बरंच काही माहीत असतं. त्याच्या घराच्या दारात खूपदा बसलेला असतो. निरुद्देश! असं वाटायचं की काहीतरी शोधतोय तो. शेवंता व रंगनाथमधे फारसं सख्य नव्हतंच. रंगनाथ, म्हणूनच फार पोरका वाटायचा. एकटा व हरवलेला.
दादांना पत्रकारितेतून वेळ मिळाला की ते आम्हा मुलांना घेऊन दूरदूरच्या शेतात माळरानावर, टेकड्यांवर फोटोशूट करता घेऊन जायचे. दादा कॅमेरा घेऊन फिरायचे. आम्ही तिथल्या शेतातच हुंदडायचो, शेतकर्‍यांबरोबर जेवायचो, बकर्‍या कुत्र्यांबरोबर खेळायचो, रानावनातून काट्याकुट्यातून भटकंती करायचो. आमच्या अंगवळणी पडलं होतं व आम्ही सगळी मुलं खूपच मजा करायचो. आज सुलोचनाच्या शेतावर रंगनाथही होता. दरवर्षीप्रमाणे वीर नाचणार होते. मग रंगनाथही मदतीला आला होता.
दादांच्या गळ्यातला कॅमेरा बघून रंगनाथला खूप भारी वाटायचं. ‘’अहो मास्तर दादा, फोटू कसा वं काडत्यात? भाईर दिसतं ते फोटू मंदी कसं छापलं जातंय्? कसं कळतंय् काय टिपावं, काय नाय?” मग दादा हसून त्याला सांगतात, ‘’अरे रंगनाथ, चांगलं ते घ्यावं. डोळ्यांना बरं वाटतं ते टिपावं.” दादांची चर्चा चाले. त्याची दादांवर श्रद्धा होती. जणू बाहेरच्या जगाची ओळख व घडामोडी त्याला दादांकडून कळल्यावर त्याला खात्री वाटते. एकदा त्याने एक विचित्र मागणी केली. ‘’दादा, तुमची जुनी प्यांट असेल तर माज्या करता ठिवा.” हे शेवंताला कळल्यावर तिनं त्याचं तोंडच रंगवलं. ‘’नुसतं खाल्लं की फिरायला मोकळा, मवाली कुठला! चार दिडक्या कमवत नाही. दादांची पॅन्ट कशाला पायजे?” शेवंताने पुरता झोडपून काढला रंगनाथला. दुसर्‍या दिवशी उतरलेला चेहरा घेऊन रंगनाथ आमच्याकडे येऊन म्हणाला, ‘’चूक झाली माजी. पुन्ना नाय मागनार. मास्तरदादा, आईबाप असते तर मी मोट्टा मानूस झालेलं लय आवडलं असतं त्येंना. मला पन असंच मोट्टं व्हायचंय. माज्याकडं कायबी नाय. शाळा बी नीट केली नाय. आत्ते रागराग करते. काय करू? पन मला असंच नाय र्‍हायचं. मला तुमच्या हाताखाली कामाला ठिवा. मी जीव लावून काम करंल. मास्तरदादा तुम्ही लई फिरलात. कसं असतं भाईरचं जग, कशी असतात, कशी वागतात लोकं. हितल्यासारकंच का समदीकडं?”
त्याच्या बोलण्यात तळमळ होती. एक उत्साही शरीर व मन कसल्याशा ओझ्याखाली दबलेलं, पण तरीही डोळे उघडून जग बघायची धडपड स्पष्ट होती.
‘’ रंगनाथ, काय रे! अभ्यास नको, शाळा नको. उनाड फिरतोस, मग कसं होणार तुझं? मी एका जागेवर नसतो. कामासाठी कधी इकडे कधी तिकडे. तुला ठेवून मी काय करू? तुझं तुलाच बघावं लागेल. कमीत कमी दहावी तरी हो. मगच
काही बघता येईल. एवढं तरी होईल का?” रंगनाथ काहीच बोलला नाही. खाली मान घालून जरा वेळ बसला व नंतर काही न बोलता निघून गेला आमचंही कुटुंब मोठं होतं. दादा कष्ट करत होते व आईची शाळा असल्याने घर खाऊन-पिऊन होतं पण जबाबदार्‍याही खूप होत्या. दिवस जात होते. आम्ही आपल्या कामात मग्न होतो. छावणी जवळ असल्याने कधीकधी सेनेचे फोटो काढायची ऑर्डरही मिळायची. मग रंगनाथही फोटोतल्या सैनिकांकडे बघून खुश व्हायचा.
एका वेगळ्याच जगात हरवायचा. दादांना खूप प्रश्न विचारायचा. एके दिवशी शेवंताकडून कळलं की काही पुस्तकं आणून रंगनाथ एकटाच काहीतरी वाचत असतो. काहीसा अभ्यास चाललाय त्याचा. मग दादांनी त्याला बोलावलं. ‘’अरे अभ्यास करतोस? किती चांगली गोष्ट!! येत जा काही अडचण असेल तर”.


तो म्हणाला, ‘’मास्तरदादा, एक सांगा. आपल्या देशाशी लडाई करनारे शत्रू कोन हायेत? अस्सा खात्मा केला पायजेल त्येंचा!” हे ऐकून दादा मनातच हसले. आणि एक दिवस शेवंताबाई धाय मोकलून रडत ओरडत आली. ‘’अवं सुंदराबाई अन् मास्तरसाहेब, आम्हा गरिबांची चाळ पाडाया आल्येत. कुटं जावं आता? थोड्या वेळात रंगनाथ ही धावत आला. घामाघूम, रडवेला, हताश!
‘’अवं मास्तर दादा, आमचं घर पाडत्यात ते. ती आमची चाळ. हे कोण आले पाडायला?” बराच तमाशा झाला. रडारड झाली. लोक बेघर झाले होते. दादांनी ठरवलं. परसात छोटीशी बाग होती. तिथेच साफसूफ केली, छप्पर घातलं तर तात्पुरती तरी सोय होईल त्यांची. आई-दादा एवढंच करू शकत होते. दुसर्‍या दिवशी गाठोडी बांधून शेवंताबाई व रंगनाथ आले. तीन दगडांची चूल, बागेचा कोनाडा, पण छप्पर होतं. रस्त्यावर नव्हते. इतर जण तर फारच वाईट अवस्थेत होते. बागेत का होईना, त्यांच्याबरोबर राहणं आम्हालाही विचित्र वाटत होतं. पण करणार काय?
‘’मास्तरदादा, आमची घरं पाडून, आम्हाला हाकलून कब्जा केला त्येंनी. बळकावलं बगा सगळं.” रंगनाथ चिडलेला, संतापलेला होता.
‘’अरे त्यात नवीन काही नाही. आपला देश पण असाच बळकावायला बसलेत शत्रू. पण आपले शूर जवान आहेत ना लढायला. जे आपलं आहे ते सांभाळून ठेवता आलंच पाहिजे. तुमची दुसरी सोय होईपर्यंत रहा. मी बघतो तोपर्यंत.” असेच काही दिवस गेले. शेवंताबाईनेही आपला दूरचा एक नातेवाईक शोधून काढला. त्याच्या इथे बिर्‍हाड हलवलं. निघताना रंगनाथ दादा आईच्या पाया पडला.
‘’मास्तरदादा येतो” त्याला खूप बोलायचं होतं भरभरून, पण शब्द सुचत नव्हते. खूप तोकडा पडत होता. पण दादांनी त्याला जवळ घेतलं. ‘’रंगनाथ, अरे जग असंच आहे. टिकायचं असेल तर भक्कम व्हावंच लागतं. तुला काय करायचं ते आता तरी ठरव. वेळ वाया घालवू नकोस. तुलाच सगळं करायचं, बघायचं आहे”.


पुढे खाली मान घालून रंगनाथ ऐकत होता. मग उठला व तडक निघाला. त्यानंतर रंगनाथ आमच्याकडे यायचा थांबला. शेवंताबाई मात्र कामाला येतच होती. तिचंही हळूहळू बस्तान बसलं होतं. त्या नातेवाईकानेही स्वार्थी हेतूने त्यांना ठेवून घेतलं होतं. आपल्या घरादाराकरता फुकट राबणारी माणसं मिळाली होती त्याला. वर उपकारकर्ता म्हणून मिरवतही होता. जीवन पुढे जात राहिलं. शेवंताबाईनंही काम सोडलं.
कधी गाठ पडली तर खुशाली कळायची. रंगनाथाने दोन-तीन वर्षात कशीबशी दहावी केली व कोर्सला जातो म्हणून गेला तर अजून आलाच नव्हता. आम्हालाही काहीच माहीत नव्हतं. आम्ही पण शाळा संपवून कॉलेजला पहिल्या वर्षी प्रवेश घेतला. चाळीच्या ठिकाणी पक्की घरं झाली होती. आसपास पण बराच बदल झालेला होता. दादांची पत्रकारिता व फोटोग्राफीचा पसारा आणखीनच वाढला होता.
आम्ही मुलां-मुलींपैकी सगळ्यांनी आपापल्या वाटा निवडल्या होत्या. दादाआईचं मिलिटरी प्रेम आमच्यातही भरपूर होतं; पण प्रत्यक्षात मात्र कोणीच सुरक्षासेनेचं करिअर निवडलं नव्हतं. का कुणास ठाऊक! आई मास्तरीण म्हणून दादांना ‘मास्तर’ (फोटो वाले मास्तर, पेपर वाले मास्तर) असं विशेषण लागलं होतं. पण सगळ्यांना कळायचं ती व्यक्ती कोण. कोणालाही पत्ता सहज मिळेल. आम्ही सगळे जण आपापल्या व्यापात गुंतलेले. मधून मधून काही मुले-मुली यायची व दादांबरोबर ‘पुढे काय करायला हवं?’ याबद्दल त्यांच्या चर्चा व्हायच्या. वर्षे जात राहिली.
सकाळचे दहा वाजले असतील. सगळे आपापल्या कामात. दादा जुन्या निगेटिव्हज् बघण्यात दंग होते. इतक्यात नवा नेपाळी वॉचमन आला. ”दादाजी, आपके कोई पूछता है.”
‘’असेल कोणीतरी”, असं मनात म्हणत दादा पुन्हा कामात गुंतले. ‘’ओ मास्तर दादा” ही हाक कानी पडली. मी पुस्तकातून मान वर करून पाहिलं. कोण आलंय?
इतक्यात तो नवयुवक येऊन दादांच्या पाया पडला. ‘’अहो, कोण तुम्ही?” दादांनी नीट चष्मा केला, ‘’अरे तू? ‘’
‘’ दादा, मी रंगनाथ. लान्स नायक रंगनाथ. पहिली सुट्टी मिळाली. कालच घरी आलो. दादा मी आर्मीत आहे आता.” दादा, आई, आम्ही सगळे कौतुकाने आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे बघत राहिलो. कुठे तो रंगनाथ आणि कुठे हा नवयुवक? इतका स्मार्ट! मिल्ट्रीच्या क्रू कट मध्ये छान दिसत होता!! त्याच्या एकंदरीत व्यक्तीमत्त्वात जमीन-आस्मानाचा फरक पडला होता. अत्यंत आत्मविेशासाने भरलेला, पीळदार शरीरयष्टी व लक्ष्य गवसलेला हा रंगनाथ समोर उभा होता. दादाही कडकडून भेटले. ‘’अरे, रंगनाथ नाव काढलंस् तू!! शाब्बास!! कधी कुठे गायब झाला होतास कळालंच नाही आणि आत्ता असा आलास! मी खूप खूप खुश झालो.” दादांना काय बोलावं सुचत नव्हतं. रंगनाथही गहिवरलेला होता. पण थोड्या वेळाने तोही सावरला. ताठ कण्याने बसला. अटेन्शनमध्ये बसल्यासारखा!


‘’दादा चाळीतून बाहेर पडावं लागलं. धक्का होता तो माझ्यासारख्याला. मी काहीच नव्हतो. मी काय करावं हेही कळत नव्हतं. पण त्या प्रसंगाने धडा शिकवला. तुम्हीच म्हणायचे ना, जे चांगलं ते टिपा. तुमच्याकडूनच लष्कराच्या गोष्टी ऐकल्या.
‘युद्धात शत्रू आपल्याच घरावर चाल करून आपलं घर बळकावतो’ म्हणजे काय? हेही कळलं. तुमच्यात परसदारीच्या बागेत राहिलो ना आम्ही! त्यानंतरच ठरवलं. हे सगळं आता बदलायचं. आत्तेही जन्मभर परकीच राहिली, पण आता तिला बरोबरच ठेवणार मी. पण दादा हक्काचं घर म्हणून हे घर डोळ्यासमोर यायचं व हक्काची माणसं म्हणून तुम्ही सगळे. खूप काही शिकलो मी. त्याचं अबकड तुमच्या तोंडून शिकलो होतो. मास्तरदादा, माणुसकीचं भान राखून आमच्यासारख्यांनाही माणूस म्हणून मान देत तुम्ही जवळ ठेवून घेतलं, तेव्हा लाचारी, उद्वेग, कमीपणा वाटला नाही. तुम्ही आमचा मान तेव्हाही राखला, मी हे कधीच विसरणार नाही. तुम्ही कुठेही असा, मी कुठेही असेन, पण माझं पहिलं हक्काचं घर हेच असेल मास्तर दादा.” म्हणत रंगनाथन अश्रूंना वाट मोकळी करून दिली. आम्हीही गहिवरलो काही वेळाने स्वतःला सावरलं. ‘’दादा, बाग बघू का?”
रंगनाथाची उत्सुकता कळाली. ‘’जा रे, बघ जाऊन.” दादांनी डोळ्यांनीच आम्हाला खुणावलं. आम्ही तिथेच थांबलो. रंगनाथ परसदारी बागेत गेला. भूतकाळाचे क्षण पुन्हा जगला. मनसोक्त भेटीनंतर निघताना दादा म्हणाले, ‘’रंगनाथा, जे चांगलं ते योग्य, तेच बरोबर तू टिपलंस. अभिमान वाटतो मला.”
‘’ मास्तरदादा, आता दुश्मन युद्धाची धमकी देतात तेव्हा मी पण म्हणतो, सामने आओ मैदान में!!!”