करोनाशी झुंज (Katha –...

करोनाशी झुंज (Katha – Coronashi Zunj)

By Atul Raut in

करोनाचं वादळ इराण मार्गे युरोपमध्ये जाऊन पोहचलं होतं. फ्रान्स, जर्मनी, इटली, स्पेन अशा सगळ्या देशांमध्ये धुमाकूळ चालू झाला होता. भारतामध्ये हे वादळ कधीही येऊ शकतं आणि आपण त्यासाठी तयार राहिलं पाहिजे, अशा बातम्या येऊ लागल्या. संकटं काही सांगून येत नाहीत, पण भारताच्या बाबतीत मात्र हे संकट सांगूनच येत होतं. जणू ते सांगत होतं मी येतोय्, बी प्रिपेअर्ड!
फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा आठवडा होता. मी अतिशय आनंदात होते. माझ्याकडे शेजन व्हिसा होता आणि हातात म्युनिचचं तिकीट होतं. मार्चमध्ये होणार्‍या इंटरनॅशनल कॉन्फरन्ससाठी माझी निवड झाली होती. आणि मी तिथे भारतातर्फे जाणार होते. आपण बाबा लई खूश होतो. तेव्हा टी.व्ही. वर चीन मधील वुहान येथे करोना नावाचा साथीचा रोग आलाय्, परिस्थिती गंभीर आहे, असं काहीसं ऐकू येत होतं. त्याचं गांभीर्य तेव्हा काहीच जाणवलं नव्हतं. युरोप आणि चीनचा काय संबंध? अशी मी मनाची समजूत काढली आणि पुढच्या कामाला लागले. मार्च महिना उजाडला. करोनाचं वादळ इराण मार्गे युरोपमध्ये जाऊन पोहचलं होतं.
फ्रान्स, जर्मनी, इटली, स्पेन अशा सगळ्या देशांमध्ये धुमाकूळ चालू झाला होता. भारतामध्ये हे वादळ कधीही येऊ शकतं आणि आपण त्यासाठी तयार राहिलं पाहिजे, अशा बातम्या येऊ लागल्या. तशातच आमच्या घरी फतवा निघाला.
प्राचीने जर्मनीला जाऊ नये. ऑफिसमधले सहकारीपण म्हणू लागले. तू युरोपला जाऊन रिस्क घेऊ नकोस. शेवटी हो नाही करता करता मी तिकीटं कॅन्सल केली. बॅग रिकामी केली व पासपोर्ट त्याच्या जागेवर स्थानापन्न केला. मनात मी विचार करत होते, काय आहे काय हा करोना? मी स्वतः हॉस्पिटलमध्ये काम करत असल्यामुळे व हॉस्पिटलच्या डिझॅस्टर मॅनेजमेन्ट कमिटीमध्ये असल्यामुळे पुढे घडणार्‍या सर्व गोष्टींची मी साक्षीदार होणार होते. हे मला मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात खरं वाटलं नव्हतं. तसं पाहिलं तर जर्मनी, फ्रान्स, इटली हे सगळे देश पायाभूत वैद्यकीय सुविधांमध्ये भारताच्या खूप पुढे आहेत.
दर 12 माणसांमागे एक असा त्यांच्याकडे हॉस्पिटल बेड आहे. अद्ययावत मेडिकल साधनसामग्री आहेत. चांगले डॉक्टर्स आहेत. तेथील लोक पैशांनी फार चांगले आहेत. थोडक्यात म्हटलं तर पैसा आहे., मशीन्स आहेत, तंत्रज्ञान आहे, डॉक्टर्स आहेत, बेडस् आहेत. सर्व काही आहे. तरीही करोनामुळे या सर्वांची एवढी धुळधाण झाली; हे म्हणजे भारतासाठी धोक्याची घंटा होती. त्या देशांची धुळधाण का उडाली? या संकटाचा सामना करण्याची त्यांची तयारी नव्हती. संकटं काही सांगून येत नाहीत, पण भारताच्या बाबतीत मात्र हे संकट सांगूनच येत होतं. जणू ते सांगत होतं मी येतोय्, बी प्रिपेअर्ड!


’आयसीएमआर’ च्या गाईडलाईन्स, मुंबई महानगरपालिकेबरोबरच्या मिटींग्ज् आणि आरोग्य मंत्र्यांच्या भेटी, या सगळ्यांचे सार काढून आम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये अति दक्षता विभाग सुरू केला. वैद्यकीय उपकरणांच्या नियोजनाची जबाबदारी माझी होती. त्याच्या बरोबरच आम्ही अति दक्षता विभाग करोना विरुद्ध लढण्यासाठी सुसज्ज केला. त्यामुळे अगदी रात्री 2 वाजता काही इमर्जन्सी आली तरी आमचा विभाग पूर्ण तयार होता. दरम्यानच्या काळात देशभरात लॉकडाऊन जारी झाला. संपूर्ण मुंबई एक दिवसात थांबली. ट्रेन नाहीत, ऑटो रिक्षा नाहीत, बस नाहीत, रस्त्यावर कोणीही नाही, अत्यंत भीतीदायक चित्र… वेगाने धावणारं जग क्षणभरात थांबलं. एप्रिल, मे मध्ये सहलीचे प्लॅन करणारे आपण घरात दबा धरून बसू लागलो. मंदिरं बंद झाली. तिरुपती, वैष्णवदेवी, सिद्धिविनायक… सर्व बंद झालं.
युरोपमध्ये मृत्यूने थैमान घातलं. रोमँटिक स्थळे आता धोकादायक वाटू लागली. एकमेकांना भेटणं म्हणजे गुन्हा झाला. हॉटेल उद्योग, पर्यटन कंपनी, वेडिंग प्लॅनर्स, कॅटरर्स सगळे सगळे एका ठिकाणी थांबले. मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर हे पाच महिने पाच वर्षांसारखे वाटले. या काळात मुंबई, पुणे व संपूर्ण महाराष्ट्राला करोनाचा वेढा पडला. मी हॉस्पिटलमध्ये काम करत असल्यामुळे याची तीव्रता अधिक जाणवली. औषधांचा तुटवडा झाला. ऑक्सिजन मिळेनासा झाला. मृत्यूदर वाढू लागला. तशातच आमच्या घरातील 15 नातेवाइकांना करोनाची लागण झाली. हा काळ नुसती परीक्षा नाही तर सत्त्वपरीक्षा पाहणारा ठरला. मानसिक खंबीरपणा खूप महत्त्वाचा आहे, हे यातून मी शिकले.
करोनावर मी वरीलप्रमाणे विचार मांडले, तेव्हा मनात विचार सुद्धा केला नव्हता की, मी त्या अनुभवाची साक्षीदार होईन. अर्थात हॉस्पिटलमध्ये काम करताना आपण रिस्कवर आहोत व आज ना उद्या आपल्याला ह्या आजाराचा सामना करावा लागणार आहे याची जाणीव होती. मानसिक तयारी होती. पण करोनाने आम्हाला गाठण्यासाठी दिवाळीचा मुहूर्त निवडला. तशी करोनाची अनेक लक्षणे आहेत, पण ती वेळेत ओळखून योग्य ती कृती करणं खूप महत्त्वाचं असतं. आमच्या बाबतीत लॉस ऑफ स्मेल हे लक्षण प्रथम जाणवलं. त्यावेळी सर्दी झाली असेल, नाक बंद असेल, वाफ घेऊन बघू, असे अनेक विचार आम्ही केले पण त्याचबरोबर स्वतःला, कुटुंब व सोसायटीपासून वेगळे केले. माझे पती हृषिकेश यांना प्रथम लक्षणं दिसली. मी फॅमिली डॉक्टरकडे जाऊन औषध आणले. बुधवारी लक्षणे दिसली व आम्ही गुरुवारी अ‍ॅन्टीबायोटीक्स व डॉक्टरांची औषधं, वाफ घेणं हे उपाय चालू केले. हॉस्पिटलमध्ये फोन करून डॉक्टरांचा सल्ला घेतला. स्वॅब टेस्ट करून घ्या, असं सांगण्यात आलं. करोना आमच्यापर्यंत पोचला की काय? असा विचार करेपर्यंत शुक्रवारी सकाळी मला ताप आला, थकवा जाणवू लागला. आम्ही नवरा-बायको हॉस्पिटलात गेलो व स्वॅब दिला. दहावीच्या निकालाची जेवढी वाट बघितली नसेल तेवढी आम्ही या निकालाची वाट पाहिली. आणि दिवाळीच्या पहिल्या दिवशी आम्ही दोघंही करोना पॉझिटिव्ह झालो. पण आम्ही धीराने याचा सामना करायचा ठरवलं. दुसर्‍या दिवसानंतर करोनाने आपले रंग दाखवायला सुरुवात केली. लॉस ऑफ स्मेल म्हणजे काय हे पहिल्यांदा समजलं. कापराचा वास नाही, अगरबत्तीचा नाही. सॅनिटायझरचा नाही, बामचा नाही, कसलाच वास कळत नाही… मनात आलं काय आहे, हे सगळं? आणि त्याबरोबर प्रचंड थकवा. करोना हा स्नायूंवर अ‍ॅटॅक करतो. त्यामुळे तुम्हाला चालणं, उठणं, बसणं, काम करणं मुश्कील होऊन जातं. या काळात ऑक्सिजनचं प्रमाण मॉनिटर करणं, ताप बघणं, हे अतिशय महत्त्वाचं आहे. ते आम्ही नियमितपणे केलं. वाफ घेतली. वेळेत औषधं घेतली.


सगळे म्हणतात, करोनाने माणसांना एकमेकांपासून दूर लोटलंय. पण मी या मताशी सहमत नाही. आमच्या विलगीकरणाच्या 14 दिवसांच्या काळात संपूर्ण देवदेवेश्वर सोसायटीमधील आमच्या कुटुंबासमान लोकांनी आमचे इतके लाड केले की त्याला काही तोडच नाही. चहा, कॉफी सोडली तर वेगवेगळे पदार्थ अतिशय प्रेमाने आम्हाला आणून दिले. ”प्राची, बाहेर स्टूल ठेवतेस का? मी आज पास्ता केला आहे, आणून देते.” ”आज मी सूप केलंय. पिऊन बघ, बरं वाटेल.” ”आज मी पिझ्झा केलाय. जरा तुम्हाला चेन्ज होईल.” ”प्राची आज मी घारगे केलेत. खाऊन तर बघ, अंग इडलीचं पीठ केलंय, तुला हवे तसे डोसे, इडली घालून घे.”
आम्ही दोघं इतके भारावून गेलो की त्या भावना मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. ओळखीच्या प्रत्येक व्यक्तीने फोन-मॅसेज करून आमची चौकशी केली. या सर्व सदिच्छांमुळेच आम्ही लवकर बरे झालो, असं मला वाटतं. एक गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटते ती म्हणजे जर तुम्हाला करोनाची लक्षणं आढळली तर तुम्ही वेळेत तपासणी करणं अत्यंत जरुरी आहे. मला काही होत नाहीय, उगाच 14 दिवस घरी बसावं लागेल, कशाला टेस्ट करायची हा विचारच मुळात अत्यंत चुकीचा आहे. भलेही तुमची तब्येत चांगली आहे. पण तुम्ही ज्या लोकांना भेटाल त्यांचा जीवही धोक्यात घालू शकता. त्यामुळे नैतिक व सामाजिक जबाबदारी म्हणून तपासणी करणं व त्यापुढील नियम पाळणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे.

स्वमान (Katha – Swaman)