चौकट (Katha – Chaukat)

चौकट (Katha – Chaukat)

By Atul Raut in

लगबगीनंच तो सभागृहात पोहोचला. कोणत्या खुर्चीवर बसावं, हा विचार करता करता त्याचं रंगमंचावर लक्ष गेलं. गायिका अमृताच्या बाजूला ‘ती’ बसलेली त्याला दिसली. कार्यक्रमाच्या निमित्ताने का होईना बर्‍याच दिवसानं ‘ती’ आज त्याला दिसली होती. श्‍वेत रंगाच्या नाजूक नाजूक बुट्टे असलेल्या साडीत फारच उठून दिसत होती ती!
नील, हॉलवर पोहोचला तेव्हा कार्यक्रमाला नुकतीच कुठं सुरुवात झालेली होती. आधीचं गाणं संपून निवेदिका, शलाका माईकवर बोलत होती. तबलेवाल्याला उशीर झाल्यामुळे कार्यक्रम जरा उशिरानेच सुरू झाला होता. कार्यक्रम होता जुन्या हिंदी चित्रपटातील गीतांवर आधारित… ‘धीरे धीरे मचल’.
वेळेवर निघूनही उशीर झाल्यानं नील स्वत:वरच चरफडला होता. पण नाइलाज होता. रस्त्यात इतकं ट्रॅफिक होतं की, कार्यक्रमाला आपण मध्यांतरालाच पोहोचू की काय, असं त्याला वाटलं होतं. मध्यंतरी ठाण्याला झालेल्या, संगीतकार मदन मोहनच्या गाण्यांच्या कार्यक्रमाला त्याने आवर्जून उपस्थिती लावली होती. गाण्यांच्या आवडीतून त्या क्षेत्रातील बर्‍याचशा मंडळींशी त्याचा चांगला परिचय झालेला होता.
लगबगीनंच तो सभागृहात पोहोचला. कोणत्या खुर्चीवर बसावं, हा विचार करता करता त्याचं रंगमंचावर लक्ष गेलं. गायिका अमृताच्या बाजूला ‘ती’ बसलेली त्याला दिसली. कार्यक्रमाची संकल्पनाच तिची असल्यानं ती असणारच, हे त्याच्याही लक्षात आलं होतं. एकदम तिच्या समोर न बसता डाव्या हाताच्या तिसर्‍या ओळीमधील, शेवटच्या खुर्चीवर जाऊन तो बसला. तोपर्यंत तिचं लक्ष त्याच्याकडे नव्हतंच. कार्यक्रमाच्या निमित्ताने का होईना बर्‍याच दिवसानं ‘ती’ आज त्याला दिसली होती. श्‍वेत रंगाच्या नाजूक नाजूक बुट्टे असलेल्या साडीत फारच उठून दिसत होती ती!
एवढ्यात ‘तीन देवियाँ’ या चित्रपटातील ‘ख्वाब हो
तुम या कोई हकिकत…’ हे सदाबहार गाणं, गायक अभिजीतनं एकदम मूडमध्ये येऊन सुरू केलं. कोरसने तर जान आणली होती गाण्यात. गाणं एवढं सुंदर झालं की, तंद्री लागून रोमँटिक मूड झाला सगळ्यांचा. हळूहळू कार्यक्रम जसजसा पुढे सरकू लागला त्यासोबत तिची नजरही खुर्च्यांवर विसावलेल्या प्रेक्षकांवर इथून तिथं फिरू लागली. बघताबघता तिचं लक्ष त्याच्याकडे गेलं. ओळखीचं स्माईल तिने दिलं. पण क्षणभरच! खूप महिन्यांनी दोघांनी आज असं एकमेकांना पाहिलं होतं. तिची नजर पुन्हा प्रेक्षकांवर भिरभिरली. तो मात्र तिच्याचकडे पाहू लागला. तिला डोळ्यात भरून घेऊ लागला. असा योग बहुधा पुन्हा येणार नव्हता! दोघंही आपापल्या तत्त्वांनी बांधलेले. मनातलं त्याच्याबद्दलचं प्रेम डोळ्यातही दिसू द्यायचं नाही, अशीच जणू शपथ घेतलेली ती, अन् तिचा अनुनय असल्याशिवाय तिच्या अवतीभवतीही वावरायचं नाही,
असा पण केलेला तो!
दोघंही आपापल्या जागी ठाम!


तिच्या नुसत्या दिसण्यानेच खूश झाला होता तो.
ती… अनुराधा! प्राण होती त्याचा. कार्यक्रम सुरू असताना मधूनच त्याचं लक्ष हॉलमधील बाकी रसिक प्रेक्षकांवर गेलं. बघताबघता प्रेक्षकात बसलेली मेघा त्याला दिसली. मेघा ठाण्याची, त्याची मैत्रीण. तिनेही नेमकी पांढर्‍या रंगाचीच साडी घातलेली होती. सोनेरी रंगाची किनार असलेल्या त्या साडीत मेघाही अगदी गोड दिसत होती. खरं तर मेघाचा अन् त्याचा रूट तसा एकच होता. कार्यक्रमाला बहुधा मेघाही येईल अशी पुसटशी कल्पनाही त्याला आली होती. पण त्याने तिला फोन करायचं टाळलं होतं. मेघासोबत आलेलं अनुराधाला आवडलं नसतं, हे तो ओळखून होता.
गाण्यांसोबत उत्तरोत्तर मैफलीमधली रंगत वाढत होती. ‘वाह व्वा… वाह व्वा’, ‘क्या बात हैं’ अशा दादेनं अवघं सभागृह जणू भारून गेलं होतं.
कार्यक्रम एकदाचा संपला.
रंगमंचावर जाऊन त्याने शलाकाचे आभार मानले. तिनेच त्याला फोन करून यायचा आग्रह केला होता. आयोजकांमध्ये शलाकाही होती. निवेदनही तिचंच असल्याने काही परिचितांना तिने पर्सनली निमंत्रण दिलं होतं. आज नीलला रेंगाळायचंच नव्हतं.
लक्ष दिलं की अनुराधा भलतीच
भाव खाते, हे सवयीनं त्याला माहीत होतं. तो निघणार एवढ्यात मेघा त्याच्याजवळ आली.
“लगेच निघणार आहेस?” तिने विचारलं.
“नाही. एक, दहा-पंधरा मिनिटं तरी जातील अजून,” कार्यक्रमाला आलेल्या इतरही काही ओळखीच्या लोकांना भेटण्यात वेळ जाईल, ही कल्पना त्याला होती. ते बोलत होते एवढ्यात अनुराधाही तिथंच आली.
“चल, आपण चहा-नाश्ता घेऊ या,” असं नीलला म्हणून नाश्ता ठेवलेल्या टेबलांजवळ ती जाऊ लागली. नकळत तोही तिच्या मागोमाग चालू लागला. कसली जादू होती तिच्या बोलण्यात! ‘आपण ठरवतो काय आणि होतंय काय,’ नाश्त्याची डिश उचलत स्वत:शीच तो बडबडला. अनुराधा त्याच्या बाजूलाच उभी राहून खाऊ लागली.
“लवकरच मी नोकरी बदलणार आहे. दुसर्‍या एका नावाजलेल्या फर्ममध्ये काम होतंय,” त्याच्याही नकळत तो बोलून गेला. मनावर घातलेले बंध मनानेच झुगारून दिले होते. त्याला वाटलं ती म्हणेल, ‘मुंबई बाहेर जात नाहीयेस ना? मग ठीक आहे!’ पण…
“अरे व्वा. अभिनंदन!” अनुराधा म्हणाली. मग त्यानेही विषय बदलला.
“तुझं काय चाललंय सध्या?” तो.
“चाललंय नेहमीचं रूटीन,” ती उत्तरली. इतक्यात नाश्ता आवरून मेघाही त्यांच्याजवळ आली.
“काय गं, कसंय?” दोघांचाही परिचय असल्यानं मेघाने तिला विचारलं.
“छान चाललंय. तुझं काय नवीन?” अनुराधानेही आपला मोर्चा मेघाकडे वळवला. बोलत मेघाशी होती, पण तिची नजर मात्र नीलच्या अस्तित्वात अडकलेली. खाता खाता मेघाचं अधूनमधून घड्याळाकडे बघणं चालू होतं. श्‍वेत साड्यांमध्ये दोघीही एकदम फंडू दिसत होत्या. चहा, नाश्ता आवरून मेघासह तो सभागृहातून निघाला. पंधरा-वीस पावलंच ते पुढे आले की एवढ्यात,
“नील… नील,” शलाकाने त्याला आवाज दिला.


“स्टेशनलाच जात आहात नं, मग अनुराधालाही घेऊन जा नं तुमच्यासोबत!” असं शलाकानं म्हटल्यावर त्याने अनुराधाकडे पाहिलं. ती आपली निर्विकार! त्याला तिच्या मानी स्वभावाची जाण होती. ‘सोबत तर यायचंय, पण स्वत: म्हणायचं नाही… असं नाही तर तसंच सही!’ मनातल्या मनात तो पुटपुटला. त्याला खूप आनंद झाला होता. पण चेहर्‍यावर त्याने तो दर्शवला नाही. निघताना अनुराधाने स्माईल दिलं. तशा त्याच्याही खळ्या हसल्या.
तिघंही मग हॉलमधून सोबतच बाहेर पडले. स्टेशन सात-आठ मिनिटांवरच होतं. नीलला स्वत:चाच अभिमान वाटू लागला. डाव्या हाताला मेघा अन् उजव्या हाताला अनुराधा. अनुराधाशी त्याला बोलायला मिळावं म्हणून मेघा उगाचच दोन हात मागे चालत होती. तिच्या समजूतदारपणाचं त्याला मनोमन कौतुक वाटलं. तिच्यामुळेच आज अनुराधाचा सहवास त्याला लाभला होता. मेघासोबत येण्याच्या बहाण्यानं दोघांना आज एकमेकांची सोबत मिळाली होती. एरवी लोकलाजेमुळे एकटी असताना अनुराधा त्याच्यासोबत येणं-जाणं टाळायची. जिवलगासोबतचा नुसता सहवास किती उत्कट असू शकतो, हे त्याच्याशिवाय फक्त तीच जाणून होती. आजूबाजूचं जग त्याला आता दिसतच नव्हतं. शुभ्रधवल साडीतल्या त्या दोघी जणू दोन अप्सराच होत्या. एक मैत्रीण आणि दुसरी जिवाची जिवलग. क्षणभर त्याला वाटून गेलं, या क्षणी तरी जगातला सर्वांत भाग्यशाली माणूस आपल्याशिवाय कुणीच नाही. नशिबानं आज प्रीतीचं चांदणंच उधळलंय जणू आपल्यावर! उत्कट आणि तरल भावनांचे सारे घट आपल्याच पावलांशी रिते केले आहेत.
अनुराधालाही स्वर्ग गवसल्यासारखं झालं होतं. एवढ्या वर्दळीत असूनही आपण आभाळावरनं चालतोय की काय, असं तिला वाटत होतं. तिच्या नजरेतही नीलच्या सहवासाचं अप्रूप होतं.
वाहनांच्या गर्दीतनं रस्ता क्रॉस करताना अनुराधाला हात द्यावा, असं त्याच्या मनात येऊन गेलं. तेवढाच बहाणा तिच्या अनवट स्पर्शाचा! एकमेकांच्या सोबतीच्या सहवासानंच तृप्त झाले होते दोघंही! चालता चालता रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पेरूवाल्याकडून अनुराधाने दोन पेरू घेतले.
‘मी देते… नाही मी देतो’च्या गडबडीत मेघानंच पटकन पैसे दिले. ते देताना मेघालाही कोण आनंद झाला होता. पेरू घेताना ट्रॅफिकमुळे नील दोघांपासून दोन पावलं पुढेच होता. चालता चालता कापलेल्या पेरूच्या दोन फोडी अनुराधाने त्याला दिल्या. तिच्या हाताचा स्पर्श झालेल्या त्या फोडी; तो संभ्रमात पडला. पेरूची फोड काही सेकंद त्याने तशीच हातात धरून ठेवली. ‘ठेवू या का ही फोड अशीच सांभाळून? तेवढीच या शेवटच्या भेटीची आठवण! कोरून ठेवूया यावर मनात उठलेलं प्रीतीचं न थोपवता येणारं हे तुफान! सगळे संदर्भ तर नाही लिहिता यायचे, पण निदान आजची तारीख, वेळ, ठिकाण हे तर लिहिता येईल.’ त्याच्या मनातले विचार जणू अनुराधालाही कळले. तिचं लक्ष त्याच्याचकडे होतं.
“काय झालं?” ती.
“फारच गोड आहे,” असं म्हणून पेरूच्या फोडीवर त्याने ओठ टेकले. तशी ती शहारली. त्याच्यावर असलेल्या प्रीतीची न बोलताच तिने कबुली दिली होती. तेवढ्या नजरभेटीनंही दोघं मोहरले. मेघा आठ-दहा पावलांवर असताना ओठांनी आणखी काही बोलणं त्याला प्रशस्त वाटेना. रस्ता संपूच नये, असं त्याला झालं. पण स्टेशन जवळ आलं होतं.
“बाय,” मेघाशी हात मिळवून अनुराधाने तिचा निरोप घेतला. नजर मात्र त्याच्यावर खिळलेली. मनातला राग आता तिच्या नजरेत होता. त्याला बाय न करताच प्लॅटफॉर्म क्रमांक दोनकडे जाणार्‍या पायर्‍यांकडे ती वळली. पायर्‍या चढणार्‍या तिला तो एकटक बघत राहिला. त्याला आठवलं, मागच्या भेटीत काही कारणांवरून दोघात वाद झाला होता. प्रत्येक वेळी नशिबानेच आपली भेट व्हावी, असं तिला वाटायचं. जाणून-बुजून भेट घडवून आणणं किंवा एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगून भेटणं तिच्या तत्त्वात बसायचं नाही. तिला गिल्टी फिलिंग द्यायचं. आपण विवाहिता असताना त्याच्यासारख्या परपुरुषावरचं प्रेम व्यक्त होऊ देणं, तिला पाप वाटायचं. त्याच्याबद्दलचं प्रेम कोणत्याही प्रकारे व्यक्त होऊ द्यायचं नाही, याकडे तिचा सारखा कटाक्ष असायचा. त्यासाठी कित्ती आटापिटा चालायचा तिचा! या द्विधा मनःस्थितीनं तिच्या मनाची मात्र घुसमट व्हायची. यामुळेच तिच्या नजरेत कधीकधी प्रीतीचं चांदणं दिसायचं, पण ओठ मात्र वेगळंच काही बोलायचे. तो ते सहज ओळखायचा. तिच्यासाठी कासावीस व्हायचा. तिची घुसमट सहन न होऊन,
‘का तू अशी स्वत:ला फसवतेय?’ असं तिला म्हणायचा. त्याच्या त्या म्हणण्यावर, ‘तुझा काहीतरी गैरसमज झालाय,’ असं ती म्हणायची. चौकटीबाहेर डोकावण्याचा मोह कधी कधी तिलाही आवरायचा नाही. डोकावून झाल्यावर मात्र तिच्या नजरेत पश्‍चात्ताप दिसायचा.
लोकलच्या आवाजाने तो एकदम भानावर आला.
‘अजूनही रुसवा आहे तर!’ स्वत:शीच बडबडला. मेघाला ते ऐकू गेलं.
“रुसवा? कसला रुसवा?” मेघा.
“नाही तर,” त्याने सारवासारव केली.
“अरे, आता तू बडबडलास ते!”
“च्च… काही नाही.”
“काही नाही काय! नील, अनुराधापासून तू निग्रहाने दूर जातोयेस, हे तिलाही कळलंय रे!… आजचा तिचा तो रुसवा; त्यासाठीच होता… तू यायच्या आधी, तुझ्या बंगलोरला शिफ्ट होण्याबद्दल सगळं सांगितलं तिने मला.”
“पण मी बंगलोरला जाणारेय, हे तिला कसं कळलं?”
“तुझी ती ऑफिस कलिग दिशा, तिच्याच कॉम्प्लेक्समध्ये राहते हे विसरलास वाटतं?”
“ओह, हे असंय तर!” म्हणत… ‘तशीही मनकवडी आहे ती!’ स्वत:शीच तो बडबडला.
अनुराधाचा तो रुसवाही त्याला गोड वाटला होता. तिचं ते अबोल प्रेम आयुष्याच्या अंतापर्यंत आपली साथसंगत करत राहणार आहे, हे त्याला जाणवलं होतं.
– मनोहर मंडवाले