अतिथी देवो भव (Athiti Devo Bhava)

अतिथी देवो भव (Athiti Devo Bhava)

अतिथी देवो भव


– अ‍ॅड. अंजली ठाकूर

हलके हलके वर येणारा तो सूर्याचा लालबुंद गोळा, एका झाडावरून दुसर्‍या झाडावर उड्या मारणारी माकडे, सकाळच्या कोवळ्या उन्हात बागडणारे पक्षी- सर्वच रम्य आणि मनोहर होतं. नेहमीप्रमाणे आज पुन्हा राजवीरला, आपण बाबांच्या उद्योगात स्वतःला डांबून न घेता ह्या मोकळ्या हवेतील व्यवसाय निवडला, ह्याबद्दल समाधान वाटले.
पहाटे पाच वाजता उठून जंगलाची ताजी ताजी हवा खात, झाडं, फुलं, माती ह्याचा मिश्र सुगंध नाकात भरत पर्यटकांबरोबर सफारीला जाणं म्हणजे राजवीरला पर्वणीच वाटत असे. राजवीर होताच तसा जंगलाचा पुत्र. उद्योगपती नाईकांच्या घरी चुकून जन्मला तो. मध्य प्रदेशातील जबलपुरमधे नाईकांचे अनेक उद्योग होते आणि नाईकांच्या एम्पायरचा राजवीर एकमेव वारस होता.
मध्य प्रदेशजवळ अनेक प्रसिध्द जंगलं
आहेत. त्या जंगलांमधे नाईक कुटुंबीय नेहमीच जात असत. कधी सुट्टीत तर कधी सहल म्हणून. अन् कधी कुणी पाहुणे फिरायला आले म्हणून. त्यामुळे राजवीरनेही अनेक वेळा कान्हा, बांधवगढ ह्या जंगलात फेरफटका मारला होता. जंगलात जाण्यासाठी तो नेहमीच विशेष उत्सुक असे. अगदी लहान वयातच त्याला त्या जंगलांची अगदी खडान्खडा माहिती झाली होती. विशेषतः बांधवगढचे जंगल. त्या जंगलातील छोट्यातली छोटी पाऊलवाट कुठे जाते, पलीकडे पाण्याचं डबकं किंवा तलाव आहे का, तिथे नेमक्या कुठल्या वेळेस कोणते प्राणी पाणी प्यायला येतात, कुठल्या वाघिणीला केव्हा आणि किती बच्चे झाले. अगदी सर्व माहिती राजवीरकडे असे. ते जंगलही त्याचे फार आवडते होते आणि त्यातूनही सर्वात आवडता प्राणी होता वाघ!
जसजसा राजवीर मोठा होत होता तसतसे त्याचे जंगलाचे, वाघाचे प्रेम वाढतच गेले. आईवडिलांच्या इच्छेखातर राजवीरने युकेमध्ये जाऊन एमबीएचे शिक्षण घेतले खरे, पण त्याची विशेष आवड जंगलातच होती.
राजवीरचा बांधवगढच्या जंगलात हॉलिडे रिसॉर्ट काढायचा मनसुबा होता. जगभरातील पर्यटकांना भारतातील वनवैभव दाखवायचे, वनजीवनावर माहितीपर डॉक्युमेंटरी बनवायच्या, हे त्याचे स्वप्न होते.
पण ए.सी. ऑफिसमधे बसून मिटींग्ज् घेऊन, जगभरात करोडोंचा धंदा करायचा सोडून, ह्या मुलाला उन्हातान्हात उघड्या जीपमधून फिरायला, जंगलातल्या आडवळणात जायला का आवडतं हे नाईकसाहेबांना कळतच नव्हते. स्वतःचा एवढा मोठा उद्योग आहे तोच राजवीरने पुढे सांभाळावा असं नाईकसाहेबांना वाटणं अगदी साहजिकच होतं. पण राजवीरही आपल्या मनसुब्यावर ठाम होता. त्यामुळे सध्या नाईकांच्या घरात थोडे टेन्शनचे वातावरण होते. आपला उद्योगधंदा सोडून हा त्या वाघाच्या मागे काय लागतो, असं नाईकसाहेबांना वाटायचं.
“अरे, तोच तोच वाघ सारखा दिसला तरी कळायचं नाही तुला.”
“बाबा, असं नसतं. आपल्या फिंगरप्रिटप्रमाणे वाघाच्या चेहर्‍यावरचे पट्टे प्रत्येक वाघाचे वेगवेगळे असतात. त्यावरूनच तर वाघाची संख्या मोजली जाते.” राजवीर समजुतीच्या स्वरात म्हणाला.
“अरे काय करायची आहे ती संख्या मोजून? 40 असेल नाहीतर 400. आपल्याला काय फरक पडणार आहे त्याने?”
“हाच… हाच तर अ‍ॅटिट्यूड नाही आवडत मला बाबा. वाघाच्या संख्येवर जंगलाची स्थिती, हेल्थ अवलंबून असते आणि जेवढी जंगलं सुदृढ तेवढे आपण सुदृढ. पर्यावरण आपणच जपले पाहिजे. पुर्वीचे दोन पिढ्यांचे लोक असेच बेपर्वाईने वागले ना! वाट्टेल तशा शिकारी केल्या, जंगलतोड केली, म्हणूनच आज आपण ग्लोबल वॉर्मिंगसारख्या भयानक संकटाला तोंड देत आहोत.” राजवीर पोटतिडीकेने म्हणाला.
“ठीक आहे ना. मग पर्यावरणासाठी काम करणार्‍या संस्थेला आपण भरघोस देणगी देऊ. तुला कशाला जायला पाहिजे ते सर्व करायला?”
“बाबा, नुसत्या देणग्या देऊन सगळी
कामं होत नाहीत ना, हे तुम्हीही जाणता.
आणि सर्वात मुख्य म्हणजे, मला जंगलातच रहायला, फिरायला आवडतं. बाबा, माझं
‘वाघ’ ह्या प्राण्यावर नितांत प्रेम आहे. वाघाचं दिसणं, चालणं सर्व सर्व मला मनापासून आवडतं. बाबा, मला नाही आवडत बोर्ड मिटींग करायला, प्रोजेक्ट रिपोर्टस् घ्यायला, प्रॉडक्शन चार्ट बघायला. नाही रमत मी कुठल्याही फॅक्टरीत. मला आपल्या जंगलाचे वैभव जगातल्या पर्यटकांना दाखवायचे आहे. बाबा, मला मुक्त रहायचं आहे, मोकळा श्वास घ्यायचा आहे. प्लीज, समजून घ्या मला.” राजवीर कळवळून म्हणाला.
नाईकसाहेबही हुशार होते. राजवीरची तळमळ, ओढा ते सर्व ओळखून होते. एवढे सर्व झाल्यावर मात्र त्यांनी राजवीरला आपल्या उद्योगातून मोकळे करायचे ठरविले. त्याला ट्रॅव्हल एजन्सी, हॉलिडे रिसॉर्ट काढायचे होते,
ते करण्यास सपोर्टही करण्याचे आश्वासन
त्यांनी दिले.
नाईकसाहेबांनी एक मात्र आवर्जून सांगितले, “जसे आपल्या ह्या धंद्यात मोठा असो का लहान, प्रत्येक कस्टमर महत्वाचा असतो, तसेच तुझ्या रिसॉर्टमधे येणारा प्रत्येक अतिथी हा देवच आहे असे समज. ‘अतिथी देवो भव’ हे अगदी पक्के लक्षात ठेवलेस तर यश हे मिळेलच.”
अशा रितीने राजवीरने आपली स्वतःची पर्यटकांना जंगल सफारीला नेणारी ट्रॅव्हल एजन्सी व हॉलिडे रिसॉर्ट “द सफारी” हे बांधवगढ येथे सुरू केले. हे मात्र त्याने नाईक नावाला साजेसे असेच शानदार सुरू केले.
सुरेख ऑफिस, अद्ययावत पंचतारांकित सोयी असलेले अत्याधुनिक तंबू, सफारीला नेणार्‍या जिप्सी, भरपूर माहिती असणारे पॅम्प्लेटस्, देशोदेशींच्या अनेक ट्रॅव्हल एजन्सीशी सहयोग, मध्य प्रदेश जंगलांनी समृध्द तर आहेच शिवाय राजवीरचं जंगल त्यातील प्राण्याचं अफाट ज्ञान, उत्कृष्ट इंगजीमधे रोचक बोलणं, खेळकर व चटकन मैत्री करणारी वृत्ती ह्यामुळे राजवीर व त्याच्या ‘द सफारी’ चे नाव भारतातच नव्हे तर भारतात येणार्‍या बहुतेक सर्व परदेशी पाहुण्यांच्या तोंडी झाले.
राजवीरचे एक खूप मोठे श्रध्दास्थान होते,
ते म्हणजे जंगलातील सिध्द वनदेवी. हे वनदेवीचे मंदीर घनदाट भागात होते. पण राजवीर बांधवगढला जंगलात असताना रोज देवीचे दर्शन घेतल्याशिवाय राहात नसे. ऊन, वारा, पाऊस, थंडी काहीही असो, राजवीर सकाळ, दुपार, संध्याकाळ केव्हाही दिवसातून एकदा वनदेवीच्या दर्शनाला हमखास जात असे. ह्या सिध्द वनदेवीवर जंगलवासियांची आणि राजवीरची अतोनात श्रध्दा होती. त्याच्या मते
ती देवी त्या जंगलाचे, तेथील रहिवाशांचेही रक्षण करते.
एकदा राजवीर आपल्या नेहमीच्या जंगलातील फेरफटक्यावर गेलेला असताना, त्याला एक अतिशय धक्कादायक बातमी कळली.
एक वाघ व एका रानगवा यांच्यात जबरदस्त झटापट झाली होती. त्यात रानगवा व वाघ दोघेही जबर जखमी झाले होते. दोघांच्या झटापटीत गव्याने स्वतःचा बचावही केला होता. म्हणजे वाघाला गव्याची शिकारही मिळाली नव्हती आणि तो जखमी होऊन जंगलाच्या आत निघून गेला होता.
त्याला शोधणे आवश्यक होते. एक तर तो खूप जखमी असला तर त्याला बेशुध्द करून औषधपाणी करणे गरजेचे होते. आणि जखमी वाघ खूप डेंजरस असतो. तो अचानक हल्लाही करू शकतो. नेहमी गस्त घालणारे गाईड, जिप्सी जंगलात जात होत्या. राजवीर स्वतःही त्या मोहिमेवर गेला. पण वाघाचा ठावठिकाणा लागत नव्हता. जंगलाचे अधिकारी जरा काळजीतच होते. पण पर्यटकांचा सिझन असल्यामुळे जंगलातील सफारी नेणं ते बंद करू शकत नव्हते.
याच दरम्यान राजवीरकडे फ्रान्सहून बारा जणांचा पर्यटकांचा ग्रुप बांधवगढला भेट देण्यास आला होता. बांधवगढमधील वाघ बघणे हे त्यांचे सर्वात मोठे आकर्षण होते.
आदल्या रात्री राजवीरने त्यांना जंगलाची बरीच माहिती दिली. त्याचबरोबर त्याने वाघांचे बिहेवियर ह्यावरही बरीच माहिती दिली. जसे की, प्रत्येक वाघाची एक ठरावीक टेरिटेरी असते.
ती टेरिटेरी तो मार्क करून ठेवतो. त्या टेरिटेरीमधे दुसर्‍या वाघाला प्रवेश मज्जाव असतो. मांजरीप्रमाणे वाघीणही आपली पिल्ले वाघापासून काही महिने लपवून ठेवते. वाघ भुकेला किंवा जखमी असला तरच हल्ला करतो. भुकेला वाघ फिरत असला तर हरिणे जमीनीवरून व माकडे झाडावरून कसे सिग्नल्स देऊन सर्व जंगलाला अ‍ॅलर्ट करतात. म्हणून त्यांना जंगलाचे अलार्म सिस्टम म्हणतात. जंगलात फिरताना सर्वांनी कसे शांत पण अलर्ट रहायचे हे देखील सांगितले. अशी बरीच माहिती राजवीरने त्यांना दिली.
पहाटे उठून वाघ बघायला जाणार ह्या
कल्पनेने सर्व ग्रुप खुष होता. त्यात हे सर्व ऐकल्यावर तर उत्सुक असलेले पर्यटक फारच अधीर झाले. भल्या पहाटे, जवळ जवळ अंधारातच निघायचे होते. ठरल्याप्रमाणे सर्व तयारी, कॅमेरे, बायनाक्युलर्स, टोप्या, गॉगल्स सर्व घेऊन दोन उघड्या जिप्सीत सर्व निघाले. निघताना राजवीर वनदेवीचे स्मरण करण्यास विसरला नाही. थोडे आत गेल्यावरच हरणांचा कळप चरताना पाहून सर्व खूष झाले. पाठोपाठ दिसला मोर. तोही झाडाच्या फांदीवर बसलेला लांबलचक हिरवा-निळा पिसारा दिमाखदारपणे मिरवताना. विदेशी पर्यटक मोर, हत्ती पाहून नेहमीच खूष होतात हा राजवीरचा अनुभव
होता. हलके हलके वर येणारा तो सूर्याचा लालबुंद गोळा, एका झाडावरून दुसर्‍या झाडावर उड्या मारणारी माकडे, सकाळच्या कोवळ्या उन्हात बागडणारे पक्षी- सर्वच
रम्य आणि मनोहर होतं. नेहमीप्रमाणे आज
पुन्हा राजवीरला, आपण बाबांच्या उद्योगात स्वतःला डांबून न घेता ह्या मोकळ्या हवेतील व्यवसाय निवडला, ह्याबद्दल समाधान वाटले. त्याचबरोबर बाबांनी आपल्याला तसे करू
दिले याबद्दल त्याने बाबांचे मनोमन आभार मानले.
राजवीर थोडासा भूतकाळात रमला मात्र
आणि अचानक समोरच्या जिप्सीमधल्या लोकांच्या किंकाळ्या ऐकू आल्या. राजवीरने समोर पाहिले आणि त्याचा स्वतःच्या डोळ्यावर विश्वासच बसेना. कुठून कोणास ठाऊक एक वाघ उडी मारून समोरच्या जिप्सीमधे चढला होता. कोणाला काही कळायच्या आत त्या वाघाने एका व्यक्तीच्या खांद्याला दाताने घट्ट धरले. जिप्सतील दोन पर्यटक, ड्राइव्हर व
गाइड बाहेर उडी मारून पळून गेले. एक जण भीतीने एवढा गर्भगळीत झाला की जागचा हलूच शकत नव्हता.
ज्या माणसाला वाघाने पकडले होते तो जीवाच्या आकांताने मदतीसाठी ओरडत होता. वाघाने त्याचा खांदा तोंडाने घट्ट धरला होता व रागाने तो गुरगुरतही होता. खांद्यातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या होत्या. अशा प्रसंगी कोणीही पुढे येणे शक्य नव्हते. काय करावे कोणालाच काही सुचत नव्हते.
वाघाचा हा आकस्मिक हल्ला पाहून इतर जीपमधील पर्यटक जोरजोरात ओरडू लागले. त्याचबरोबर झाडावरची माकडे, पक्षी, हरणे सर्व धोक्याचा कॉल देऊ लागले. ह्या सर्वांचा मिळून एक अतिशय भयानक, अंगावर काटा उमटवणारा गलका सुरू झाला.
हा वाघ म्हणजे तोच जखमी वाघच असणार यात काही शंका नव्हती. त्याशिवाय कोणताही वाघ अचानक असा हल्ला करीत नाही आणि हा वाघ “तोच” असेल तर हा भुकेलाही असणार. अशा वेळेस माणसाची शिकार करणे सर्वात सोपी असते, हे वाघ जाणतो.
राजवीरही असा प्रसंग पहिल्यांदाच अनुभवत होता. त्या क्षणी त्याला आठवले ते त्याच्या बाबांचे शब्द, ‘राजवीर हे लक्षात ठेव आलेला प्रत्येक पाहुणा हा देव आहे.’ बस्स! ‘अतिथी देवो भव’ म्हणजे आता त्याचे प्राण वाचवणे हे एकच ध्येय. मग त्यासाठी मला माझे प्राण पणाला लावावे लागले तरी चालेल, असा राजवीरने निश्चय केला आणि लगेच आपल्या जीपमधून उडी मारून तो पुढच्या जीपमधे ड्राइवरच्या सीटवर चढला. तेथून तो मागे वाकून वाघाला ढकलण्याचा प्रयत्न करू लागला. आधीच तो शक्तीशाली वाघ, त्यातून त्याची घट्ट ग्रीप. वाघ तसूभरही हलला नाही. उलट त्याने त्याचे गुरगुरणे वाढवून आपला राग व्यक्त केला. पाच एक मिनिटे ह्यात गेली. राजवीरला
काही कळेना. तेवढ्यात त्याला आठवले
की, वाघाची शेपटी फार नाजूक असते.
वाघ आपल्या शेपटीस फार जपतो. राजवीरने तात्काळ खाली उडी मारली आणि मागून वाघाचे शेपूट ओढले. आणि खरेच, वाघाने आपला चावा सोडला आणि मागे वळून पाहिले. समोरचा माणूस वाघाच्या तावडीतून तर सुटला होता.
पण अती रक्तस्त्रावाने तो माणूस बेशुध्द पडला. तेवढ्यात वाघाने जीपमधून खाली उडी मारली. राजवीर त्याच्या समोर दोन फुटावर होता.
वाघ जोरजोरात गुरगुरत होता. राजवीरला स्वतःचे हात वर करून वाघाहून उंच दिसायचे होते. असे केले की, वाघ जरा नरमतो हे त्यास माहीत होते. पण राजवीर तसे करण्याच्या आत वाघाने त्याच्यावर झडप घातली.
वाघाच्या ह्या हल्ल्याने राजवीर जमिनीवर सपशेल उताणा पडला. स्वतःला सावरून तो उठायच्या आत वाघ त्याच्यावर चालून आला. आता वाघ आपल्या गळ्याचा चावा घेणार हे राजवीरला पुरते कळले. आपला गळा वाचविण्यासाठी त्याने आपला उजवा हात गळ्याभोवती धरला मात्र आणि त्याच क्षणाला वाघाने त्याचा तो हात आपल्या दाताने घट्ट धरला.
मागच्या जीपमधील पर्यटक, गाईड, ड्राइव्हर सर्व भेदरलेले, घाबरलेले आणि भीतीने अक्षरशः थिजलेले. कोणीही राजवीरच्या मदतीला येणे शक्यच नव्हते. आता राजवीर पुरता जेरबंदी झाला होता. राजवीर जमिनीवर उताणा पडलेला. त्याने गळ्याभोवती धरलेला हात वाघाने गच्च पकडला होता आणि हातातून धो धो रक्त वाहत होते. वाघ चिडून अतिशय जोरजोरात गुरगुरत होता.
आपला शेवट जवळ आला आहे… छे: जवळ काय, समोर उभा आहे, हे राजवीरला आता पुरते कळून चुकले होते. वाईट हेच वाटत होते की, ज्या प्राण्यावर त्याने अतोनात प्रेम केले, ज्या प्राण्याच्या प्रेमासाठी आईबाबांची नाराजी पत्करली, त्या आवडत्या प्राण्याच्या हल्ल्याने आणि बाबांनी सांगितलेले ‘अतिथी देवो भव’ हे व्रत मनापासून करताना, त्याच अतिथीचे
प्राण वाचवताना, मृत्यू येणार होता.
अशा अटीतटीच्या अन् शेवटच्या क्षणी राजवीरला आठवण झाली ती सिध्द वनदेवीची. त्याने मनोमन प्रार्थना केली, हे देवी, ज्या प्राण्यावर मी जीवापाड प्रेम केले, तोच प्राणी माझे प्राण घेणार? हा कुठला विरोधाभास आहे? राजवीरने हे मनोमन म्हटले मात्र आणि कसे कोणास ठाऊक वाघाने राजवीरचा धरलेला हात अचानक सोडला, क्षणभर राजवीरकडे पाहिले आणि…….. आणि जसा आला होता तसा क्षणात जंगलात नाहीसा झाला.
राजवीर वाघाच्या पाठमोर्‍या आकृतीकडे पाहात राहिला, त्याला ग्लानी येत होती. आणि तो मंदसा हसला. – थकव्याने? वाघावरच्या विलक्षण प्रेमाने? का वनदेवीवरच्या अढळ श्रध्देने?