तीस ब्रिटिश सैनिकांना यमसदनी धाडणारी वीरांगना उ...

तीस ब्रिटिश सैनिकांना यमसदनी धाडणारी वीरांगना उदादेवी पासी (Story Of A Daredevil Lady Freedom Fighter Who Killed 30 British Soldiers)


ब्रिटिशांविरुद्धच्या लढ्यांमधील लखनौच्या एका महाभयंकर लढ्याचे नेतृत्व करणारी उदादेवी ही एका दलित कुटुंबातील स्त्री होती. नोव्हेंबर 1857 मध्ये लखनौमधील सिकंदर बागेच्या लढाईच्या वेळी ब्रिटिश सैन्याला दलित स्त्री सैनिक उदादेवी हिच्या पलटणीचा सामना करावा लागला. पलटणीची प्रमुख या नात्याने उदादेवीने या युद्धात भाग घेतला. अन् हातातल्या पिस्तुलातील गोळ्यांनी बरोबर नेम धरून जवळजवळ तीस ब्रिटिश सैनिकांना तिने यमसदनी पाठवले होते. उदादेवीच्या या धाडसापुढे कँपबेल आणि ब्रिटिश सैनिक नतमस्तक झाले.
ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे साम्राज्यवादी धोरण आणि जुलमी कायदे यांच्याविरुद्ध भारतीय सैनिकांमध्ये व जनतेमध्ये तीव्र असंतोषाची लाट उसळली होती. या असंतोषातूनच 1857 च्या स्वातंत्र्यसंग्रामाचा जन्म झाला. आपला देश ईस्ट इंडिया कंपनीपासून मुक्त करायचा या एकाच उद्देशाने सारा भारत देश पेटून उठला होता. वर्षभर चाललेल्या या बंडात ब्रिटिशांचा जरी विजय झाला असला तरी भारतीयांची स्वातंत्र्य चळवळ काही शमली नाही उलट तिने चांगलाच जोर धरला. ब्रिटिशांविरुद्धच्या या बंडाळीत संपूर्ण भारत देशात अनेक घनघोर लढाया देखील झाल्या.

1857 चा स्वातंत्र्यसंग्राम
उत्तर भारतात अराजकता माजली होती. भारतीयांची वाढत चाललेली बंडखोरी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या साम्राज्याविरुद्ध वाढत असलेल्या बंडाचे फळ म्हणून दिल्ली, झांशी आणि कानपूर ही शहरे भारतीयांनी काबीज केली. भारतीय सैनिक अतिशय धाडशी व नीतिमान होते. त्यामुळेच अत्यंत प्रामाणिक व नीतिमान लढा अशी या 1857च्या स्वातंत्र्यसंग्रामाची इतिहासात नोंद झालेली आहे. भारतीय सैनिकांच्या अथक प्रयत्नांना व बलिदानाला जवळजवळ 90 वर्षांनी यश आले आणि 1947साली भारत स्वतंत्र झाला.
स्वातंत्र्यासाठी अनेक नामवंत व प्रसिद्ध व्यक्तींसह देशातील सर्व स्तरांमधील लोकांनी लढा दिला. यामध्ये तत्कालीन दलित समाजातील स्त्री पुरुषही मागे नव्हते. ब्रिटिशांविरुद्धच्या लढ्यांमधील लखनौच्या एका महाभयंकर लढ्याचे नेतृत्व करणारी उदादेवी ही एका दलित कुटुंबातील स्त्री होती. उत्तर प्रदेशातील अवध गावात एका दलित कुटुंबात जन्मलेल्या अवधच्या वाजिद हजरत अली महल याच्या सैन्यदळातील मक्का पासी या सैनिकाशी उदादेवीचा विवाह झाला. भारतीयांचे ब्रिटिशांबरोबर असलेले तीव्र मतभेद उदादेवीला तिच्या लहान वयातच लक्षात आले होते. तिने स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होण्याचे ठरवले. लढ्याच्या तयारीसाठी लागणारे मार्गदर्शन घेण्यासाठी ती बेगम हजरत अली महल यांना भेटली. बेगम हजरत अली महल या नवाब वाजिद अली शाह महल यांची दुसरी पत्नी होत्या. त्या 1857-1858 या काळात अवधच्या शासनकर्त्या होत्या. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध 1857 च्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांची प्रमुख भूमिका होती. बेगम हजरत अली यांनी उदादेवीला ब्रिटिशांविरुद्ध लढण्यासाठी स्त्रियांची एक पलटण तयार करण्यासाठी मदत करून तिला या पलटणीची प्रमुख केली. या पलटणीत उच्च घरंदाज व नामांकित स्त्रिया तर होत्याच पण दलित, अशिक्षित तसेच ज्यांचे आयुष्य अतिशय असुरक्षित आहे अशाही स्त्रिया होत्या. 1857च्या लढ्यात ब्रिटिशांना स्त्री सैनिकांशीही लढा द्यावा लागला.
गोमती नदीच्या काठावर एका वसाहतीच्या लगत ब्रिटिशांची एक चौकी होती. या चौकीला भारतीय बंडखोरांनी घेरले. त्यामुळे 1857 सालाच्या संपूर्ण उन्हाळ्यात तेथील रहिवाशांना साधन सामुग्रींपासून वंचित राहावे लागले. नोव्हेंबर 1857 मध्ये ब्रिटिश अधिकारी जनरल कोलीन कँपबेल याने भारतीय सेनानींच्या घेरावाचा भेद करून ती चौकी वाचवली. पण भारतीय स्वातंत्र्य सेनानी आपली स्थिती मजबूत करून जिवाची पर्वा न करता लढत राहिले. या घनघोर लढाईत जवळजवळ 2000 भारतीय व ब्रिटिश सेनानी मारले गेले.

सिकंदर बागेचे युद्ध
जनरल कोलीन कँपबेलची एक पलटण गोमती नदीच्या दक्षिणेकडील किनार्‍यावरून सिकंदर बागेच्या राजवाड्याच्या दिशेने कूच करू लागली. ब्रिटिशांनी अवध गावावर हल्ला केला तेव्हा उदादेवी आणि तिचे पती हे सशस्त्र लढ्यातील प्रमुख होते. या लढ्यात उदादेवीला तिच्या पतीला वीरमरण आल्याचे कळताच तिने ब्रिटिशांविरुद्ध पूर्ण शक्तीनिशी लढण्यासाठी मोहीम उघडली. नोव्हेंबर 1857 मध्ये ब्रिटिशांनी कोलीन कँपबेल या अधिकार्‍याच्या नेतृत्वाखालील लखनौमधील सिकंदर बागेची लढाई फार महत्त्वाची होती. त्यावेळी ब्रिटिश सैन्याला दलित स्त्री सैनिक उदादेवी हिच्या पलटणीचा सामना करावा लागला. पलटणीची प्रमुख या नात्याने उदादेवीने या युद्धात भाग घेतला. आपल्या पलटणीतील सैन्यांना आवश्यक त्या सूचना देऊन पुरुषी सैनिकाच्या वेषात उदादेवी एका पिंपळाच्या झाडावर चढली आणि सहज नजरेला पडणार नाही अशा जागेवरून तिने भारतीय सैन्यांवर चाल करून येणार्‍या ब्रिटिश सैन्यांवर गोळीबार सुरू केला. लपलेल्या ठिकाणाहून दूरवरील सैनिकांवर गोळीबार करणारा बंदूकधारी सैनिक झाडावर आहे हे एका चाणाक्ष ब्रिटिश अधिकार्‍याच्या लक्षात आले. त्याने आपल्या सहकार्‍यांना झाडांवर गोळीबार करायची आज्ञा दिली आणि झाडावरून खाली पडणार्‍या बंडखोर सैनिकाला पकडायला सांगितले. या गोळीबारात एका सैनिकाचा मृतदेह खाली पडला. अधिक चौकशी केल्यावर असे निष्पन्न झाले की ती एक बंडखोर महिला सैनिक असून ती उदादेवी आहे. घोडदळातील सैनिक वापरतात तसल्या दोन जड पिस्तूली तिच्याजवळ सापडल्या, त्यातील एक तिच्या हातात तर दुसरी कमरेच्या पट्टृयाला अडकवलेली होती जी पूर्ण गोळ्यांनी भरलेली होती. शिवाय गोळ्यांनी भरलेला एक बटवाही तिच्या जवळ होता. हातातल्या पिस्तुलातील गोळ्यांनी बरोबर नेम धरून जवळजवळ तीस ब्रिटिश सैनिकांना तिने यमसदनी पाठवले होते. उदादेवीच्या या धाडसापुढे कँपबेल आणि ब्रिटिश सैनिक नतमस्तक झाले. तो दिवस होता 16 नोव्हेंबर 1857.
स्त्रियांसाठी स्फूर्तीदायीनी
खरोखर उदादेवीही सर्व स्त्रियांसाठी विशेषतः दुर्बल घटकातील स्त्रियांसाठी स्फूर्तीदायीनी होती. दरवर्षीच्या 16 नोव्हेंबरला उदादेवीचा जिथे मृत्यू झाला त्या जागेवर पासी जमातीचा समुदाय एकत्र येऊन या वीरांगनेला श्रद्धांजली वाहतात व तो दिवस उदादेवीचा हुतात्मा दिन म्हणून साजरा करतात. हे लोक पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश आणि बिहार येथून येतात. त्यातील अनेकजण अतिशय दुर्गम भागातून येतात. शतकाहून अधिक काळ लोटला तरी उदादेवीचा समाज तिने देशासाठी केलेले धाडस व बलिदान विसरला नाही.
उदादेवी ही भारतीय संरक्षण क्षेत्रातील स्त्रियांसाठी प्रेरणादायी स्त्री सेनानी ठरली आहे. तिच्या स्मरणार्थ भारत सरकारने मागास जाती-जमातींच्या स्त्रियांना संरक्षण क्षेत्रात काम करण्याची संधी प्राप्त करून दिली आहे. उत्तर प्रदेश सरकारने संरक्षण क्षेत्रातील स्त्रियांच्या एका राखीव दलाला (र्झीेींळपलळरश्र ईाशव उेपीींरर्लीश्ररीू -झअउ) उदादेवीचे नाव दिले आहे.
1857च्या स्वातंत्र्यसंग्रामावर अनेक गीते व कविता लिहिल्या गेल्या आहेत, ज्यामध्ये उदादेवीच्या हौतात्म्याचा उल्लेख आहे. लखनौ इथे उदादेवीचा सैनिकी वेषातील पुतळा असून त्याच्या चौथर्‍यावर उदादेवी पासी – 1857च्या स्वातंत्र्य लढाईतील एक बंडखोर सेनानी असे कोरलेले आहे.

  • अनघा शिराळकर