या सिनेमात श्रीदेवीनं अमिताभसोबत काम करण्यास दि...

या सिनेमात श्रीदेवीनं अमिताभसोबत काम करण्यास दिला होता नकार, बिग बींनी केलं तयार (Sridevi Did Not Want to Work With Amitabh Bachchan in This Film, Big B Agreed to Her in This Way)

बॉलिवूडची दिग्गज कलाकार श्रीदेवीने एकापेक्षा एक सरस सिनेमांमध्ये काम केले आहे. एक काळ असा होता जेव्हा प्रत्येक कलाकार श्रीदेवी सोबत काम करण्यास उत्सुक असायचा. तिचे बहुतांश सिनेमे हे बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरत असत. म्हणूनच तिला लेडी अमिताभ असंही म्हटलं जायचं. परंतु याच श्रीदेवीने एके काळी महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्यास नकार दिला होता. नंतर स्वतः अमिताभजींनी तिला त्या चित्रपटात काम करण्यासाठी राजी केले होते. पाहुया तो सिनेमा कोणता होता अन्‌ त्यासंबंधीचा मजेशीर किस्सा काय होता?

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

हिंदी सिनेमामध्ये ८० पासून नव्वदच्या दशकामध्ये श्रीदेवीने ‘सोलहवां सावन’, ‘नागिन’, ‘हिम्मतवाला’ आणि ‘चांदनी’ यांसारख्या सुपरहिट सिनमांमध्ये आपल्या दमदार अभिनयाचे प्रदर्शन करून दर्शकांचे मन जिंकले होते. सौंदर्य, डान्स आणि मनमोहक अदांनी श्रीदेवीने स्वतःची स्वतंत्र अशी ओळख निर्माण केली होती. तिच्या सिनेमांतील गाण्यांवर आजही तरुणी थिरकताना दिसतात. एवढंच नाही तर एके काळी केवळ तिच्या नावावर सिनेमे चालत असत. तिच्या सौंदर्याची चाहत्यांवर इतकी भुरळ पडली होती की तिची एक झलक पाहण्यासाठी ते सिनेमाघरात जात असत. यशाच्या शिखरावर असतानाच श्रीदेवीने एका सिनेमामध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्यास नकार दिला होता.

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम

अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्यास नकार देण्यामागे श्रीदेवीची त्यांच्यासोबत कोणतीही दुश्मनी नव्हती. खरं म्हणजे, अमिताभजी ज्या चित्रपटात मुख्य नायक असतात त्या चित्रपटातील नायिकांना फारसं काम नसतं, त्या नावापुरती त्या सिनेमात असतात, अशी श्रीदेवीची समजूत होती. दरम्यान मुकुल आनंद ‘खुदा गवाह’ हा सिनेमा बनवत होते. या चित्रपटात अमिताभ बच्चन होते व त्यांनीच मुकुल आनंद यांना सिनेमामध्ये श्रीदेवीस नायिका म्हणून घ्यावयास सांगितले. कारण यापूर्वीही अमिताभ – श्रीदेवी यांनी एकत्र काम केले होते, आणि त्यांची जोडी प्रेक्षकांना आवडेल याची त्यांना खात्री होती.

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम

श्रीदेवी आपल्या सोबत सिनेमामध्ये काम करण्यास तयार नसल्याचे माहीत असताना अमिताभजींनी श्रीदेवीला सिनेमासाठी राजी करण्यासाठी एक शक्कल लढवली. त्यावेळी श्रीदेवी फिरोज खान यांच्यासोबत एका गाण्याची शुटिंग करत होती, तेव्हा बिग बींनी तिच्या शूटिंगच्या लोकेशनवर एक ट्रक भरून गुलाबाची फुलं पाठवली. इतकी फुलं पाहून श्रीदेवीने खुश होऊन अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्यास होकार दिला होता.