खर्च आवरा, संचय वाढवा (Spend Less Save More)

खर्च आवरा, संचय वाढवा (Spend Less Save More)

Spend Less Save More

खर्च करताना,आपण थोडा-थोडा म्हणत बर्‍यापैकी खर्च करतो आणि महिन्याचा जमाखर्च मांडण्याची वेळ येते, तेव्हा मात्र शिलकीत काहीच राहिलं नाही, असं लक्षात येतं. नको तिथे होणारा खर्च वाचवून आपण आपला पैशांचा संचय वाढवू शकतो.

बरेचदा आपल्याला खर्चाच्या बाबतीत नियोजन नसल्यामुळे म्हणा किंवा वेंधळेपणामुळे ‘खाया-पिया कुछ नही, ग्लास तोडा बारा आना’ अशा प्रकारच्या प्रसंगांना तोंड द्यावं लागतं. खर्च करताना आपण बर्‍यापैकी करतो; पण महिन्याचा जमाखर्च मांडताना शिलकीत काहीच राहत नाही. असा नको तिथे होणारा खर्च वाचवून आपण आपला पैशांचा संचय वाढवू शकतो.

पाण्यावर खर्च नको

नेमेचि येतो पावसाळा, या उक्तीप्रमाणे पावसाळा आला आणि गेला. आता ऑक्टोबर महिना लागला आहे. अन् ऑक्टोबर हिटने अंगाची काहिली करायला सुरुवात केली आहे. उन्हाच्या तलखीत आपल्याला हवं असतं पाणी. जागोजागी वेगवेगळ्या कंपन्यांच्या मिनरल वॉटरच्या बाटल्या सहज मिळत असल्याने आपण त्या विकत घेतो. पाणी ही जीवनावश्यक वस्तू आपल्या घरी मुबलक प्रमाणात उपलब्ध असताना आपण त्यासाठी पैसे मोजतो. काही लोक तर स्टाईल म्हणून पाण्याची बाटली हातात बाळगतात. या दिवसातच काय; पण एरव्हीसुद्धा पाणी ही आपली प्राथमिक गरज असते; पण म्हणून त्यावर पैसे खर्च करणं योग्य नव्हे. घरून निघताना पाण्याची बाटली सोबत घेतली, तर हा अनाठायी खर्च टाळता येईल. आपल्या पैशांची बचत होईल.

Spend Less Save More

सहलीचं नियोजन आधीपासूनच करा

पुढे दिवाळीच्या अन् त्याहीपुढे नाताळच्या सुट्ट्या लागणार आहेत. सुट्टी मजेत घालवण्यासाठी आपण सहकुटुंब सहलीचे बेत आखतो. त्यासाठी टूर काढणार्‍या कंपन्यांचा आधार घेतो. अशा प्रकारच्या टूर्स काढणार्‍या लहानमोठ्या कंपन्या आहेत. त्यापैकी नामांकित कंपन्यांकडे जाण्याचा आपला कल असतो. या कंपन्यांचं एक धोरण असतं, आधी स्वस्त नंतर महाग. म्हणजे, त्यांच्या सहलींच्या तारखा घोषित होतात, तेव्हा ते डिस्काऊंट देतात. अन् ऐनवेळी बुकिंग केलं की, तीच सहल जास्त किंमतीची असते. तेव्हा असं ऐनवेळी बुकिंग करणं टाळा.

आपल्या मुलाबाळांशी आणि पत्नी, भावा-बहिणींशी सल्लामसलत करून सहली आधीच बुक करा आणि आपले पैसे वाचवा. समजा चार माणसं एखाद्या सहलीला जात असतील, तर दर माणशी किती तरी पैशांची बचत होईल, ते बघा. अन् कुठल्याही टूर कंपनीकडून जर सहलीला जात नसाल, तरीही आपली स्वतःची टूर आगाऊ ठरवा. विमान कंपन्यांचंही हेच धोरण असतं. दोन-तीन महिने आधी तिकिटं काढली, तर स्वस्त पडतात. ऐन वेळी काढली तर महाग मिळतात. हॉटेल बुकिंगही आगाऊ केलं तर स्वस्त पडतं.

आटोपशीर शॉपिंग करा

शॉपिंग प्रत्येकाला आवडत असतं. त्यासाठी अगदी खास वेळ काढला जातो. म्हणजे कित्येक तास शॉपिंग आपलं चाललेलं असतं. त्यात होतं काय की, मनात ठरवलेल्या किंवा यादी तयार केलेल्या वस्तूंपेक्षा आणखी कित्येक वस्तू विकत घेतल्या जातात. समोर दिसली, चांगली वाटली म्हणून घेतली, असं करता करता सामानाचा ढीग घरात येऊन पडतो. त्यात आपण खर्च केलेले पैसे अडकलेलेच असतात ना! कित्येक वस्तू तर आपल्या आळशी स्वभावानुसार जास्त प्रमाणात घेतल्या जातात. दूध, भाज्या, गोठवलेले पदार्थ, चीझ, लोणी, ब्रेड, बिस्कीट्स, केक्स. पण होतं काय की, या सर्वच वस्तू वेळेत वापरल्या जात नाहीत. भाज्या आणि बर्‍याच वस्तू फ्रिजमध्ये अक्षरशः कोंबल्या जातात. अन् काही महिन्यानंतर त्या खराब झाल्या म्हणून टाकून दिल्या जातात. टाकून दिल्या, म्हणजेच आपले पैसे वाया गेले. यावर उपाय म्हणजे शॉपिंगला जाताना यादी केलेल्या वस्तूच विकत घ्या. शिवाय वेळ काढून शॉपिंगला जाऊ नका. आता थोडा वेळ मिळाला आहे तर शॉपिंग करूया, अशी सवय स्वतःला लावून घ्या. अन् शॉपिंगसाठी सुपरमार्केट किंवा मॉलमध्ये जात असाल, तर तिथे रेंगाळत न राहता, घाईघाईने बाहेर पडा. रेंगाळण्याचा वेळ इतर चांगल्या कामासाठी सत्कारणी लावा. अन् शॉपिंगसाठी वापरून आपले पैसे वाया घालवू नका.

वाहन जपा

आता प्रत्येक घरात एकतरी वाहन असतंच. दुचाकी किंवा चारचाकी. काही घरात ही दोन्ही वाहनं आढळतात. मुंबई सोडून पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती यासारख्या मोठ्या शहरात तर दुचाकी वाहन ही जीवनावश्यक बाब मानली जाते. म्हणून ती घरोघरी आढळतेच. वाहन घेणार्‍याला, वाहन वापरणारे एक सल्ला नेहमीच देतात. तो म्हणजे, वाहन घेणं सोपं आहे, त्याचा मेन्टेनन्स परवडला पाहिजे. अर्थात, वाहन घेतलं की, त्याच्या देखभालीचा खर्च आलाच. ही देखभाल वेळोवेळी केली नाही, तर वाहनांच्या तक्रारी वाढतात, अन् ती आपल्याला जास्त खर्चात टाकतात. ते टाळण्यासाठी आपल्या वाहनांचं वेळोवेळी सर्व्हिसिंग, टायर्सची हवा तपासणी अन् ऑईल चेकिंग न चुकता करावे. म्हणजे आपलं वाहन विनातक्रार चालत राहील. ते आजारी पडणार नाही. अन् त्याच्या दवापाण्यावर जास्त खर्च न होता, आपला संचय वाढत राहील.