रिबाँडिंग नंतर केसांची घ्या विशेष काळजी (Specia...

रिबाँडिंग नंतर केसांची घ्या विशेष काळजी (Special Care To Be Taken After Hair Rebonding)

केसांचं सौंदर्य वाढवण्यासाठी हल्ली सर्रास रिबाँडिंगचा पर्याय निवडला जातो. मात्र ही प्रक्रिया करून घेतल्यानंतर योग्य काळजी न घेतल्यामुळे केसांचं सौंदर्य वाढण्याऐवजी नुकसान होण्याचीच शक्यता अधिक असते. हे टाळण्यासाठी-
स्ट्रेट अँड शायनी केस कुणाला नको असतात…
कोणत्याही वयोगटातील स्त्री-पुरुष सर्वांनाच आपले केस सुंदर दिसावेत असं वाटतं. केस सरळ असले की, विंचरले नाहीत तरी कायम सेट असल्यासारखे दिसतात आणि त्या विरुद्ध कुरळे केस कितीही विंचरले तरी नेहमी विस्कटल्यासारखेच दिसतात. म्हणूनच हल्ली कुरळ्या केसांना सरळ करून घेण्याची, अर्थात रिबाँडिंग करण्याची क्रेझ वाढली आहे. सर्व वयोगटातील स्त्रिया आणि काही पुरुष मंडळीही हल्ली आपले केस रिबाँडिंग करून घेण्यासाठी आग्रही दिसतात. मात्र केसांचं सौंदर्य वाढवण्यासाठी रिबाँडिंगची प्रक्रिया करून घेतल्यानंतर योग्य काळजी न घेतल्यास केसांचं नुकसान होण्याची शक्यता अधिक असते. तुमच्या बाबतीत असं घडू नये, यासाठी हे मुद्दे आवर्जून लक्षात घ्या-

सुरुवातीचे तीन दिवस…
केस धुऊ नका
रिबाँडिंग करून घेतल्यानंतर किमान तीन दिवस केस कोणत्याही प्रकारे ओले होणार नाहीत याची विशेष काळजी घ्या. अर्थात, रिबाँडिंग करून घेतल्यानंतर किमान तीन दिवस केस चुकूनही धुऊ नका. अगदी केसांमध्ये घाम येणार नाही, याचीही दक्षता घ्या.

झोपतानाही केस जपा
केसांचा आकार बदलणार नाही, यासाठी झोपतानाही केस डोक्याच्या वरच्या बाजूस सरळ राहतील, असं पाहा. केस डोक्याच्या किंवा अंगाच्या खाली दबणार नाहीत, याची विशेष काळजी घ्या. शक्य असल्यास झोपताना केस पलंगावरून खाली ओघळतील, अशा प्रकारे झोपा.

केस बांधू नका
केसांवर रिबाँडिंगची प्रक्रिया करताना, विविध प्रकारची रसायनं वापरली जातात. त्यामुळे केस सरळ राहण्यासाठी मदत होते. मात्र यासाठी किमान तीन दिवस केस सरळच ठेवणं गरजेचं असतं. म्हणूनच या दरम्यान केसांना पिन, हेअरबँड इत्यादी मुळीच लावू नये. त्यामुळे केस त्यानुसार आकार घेण्याची शक्यता असते. तेव्हा हे सर्व आवर्जून टाळा. एवढंच नव्हे तर, या दिवसांमध्ये केस कानामागे ठेवू नका.

तीन दिवसांनंतर…
कंडिशनर लावा
तीन दिवसांनंतर जेव्हा केसांना शाम्पू कराल, तेव्हा शाम्पूनंतर कंडिशनर जरूर लावा. तसंच पहिल्या वेळी नेहमीपेक्षा अधिक वेळ कंडिशनर केसांवर राहू द्या. त्यानंतर जेव्हा कधी केसांना शाम्पू कराल, कंडिशनरचा वापरही अवश्य करा. यामुळे केस कायम मऊसूत राहण्यास मदत होईल.

हेअर सिरम वापरा
रिबाँडिंग करून घेतल्यानंतर केसांची चमक कायम ठेवण्यासाठी, केस धुऊन पूर्णतः सुकल्यानंतर, त्यावर हेअर सिरम लावायला विसरू नका. सिरम लावल्यामुळे केस चमकदार आणि आकर्षक दिसतात.

ब्लो-ड्राय करू नका
रिबाँडिंग केलेले केस धुतल्यानंतर त्वरित सुकवण्यासाठी ब्लो-ड्रायरचा वापर मुळीच करू नका. केस नैसर्गिक रितीने सुकू द्या.

कलर करू नका
रिबाँडिंग करून घेतल्यानंतर पुढे किमान सहा महिने तरी केसांवर कोणताही अन्य रासायनिक प्रयोग करू नका. हेअर कलर, हायलाइट इत्यादी करणं कटाक्षाने टाळा. रिबाँडिंगमुळे आधीच केसांनी खूप रासायनिक प्रयोग सहन केले असतात, तेव्हा त्यांना अधिक त्रास देऊ नका. उलट त्यांना नैसर्गिकरीत्या योग्य पोषण देण्याचा प्रयत्न करा.

गरम पाणी वापरू नका
रिबाँडिंग करून घेतल्यानंतर केसांवरून हॉट शॉवर घेणं टाळा. कारण गरम पाण्याने केस धुतल्यास ते रूक्ष होतात. केस धुण्यासाठी थंड किंवा कोमट पाण्याचा वापर करा.

लाकडी कंगवा वापरा
कंगवा निवडताना, शक्य असल्यास लाकडी कंगव्याचा पर्याय निवडा. असा कंगवा तुमच्या केसांसाठी उपयुक्त ठरेल. प्लॅस्टिकचा कंगवा घ्यायचा असेल, तर मोठ्या दातांचा घ्या.

केस झाकून ठेवा
घरातून बाहेर पडताना केस पूर्णतः झाकून घ्या. यासाठी केसांवर स्कार्फ बांधता येईल. यामुळे केसांवर प्रदूषणाचा दुष्परिणाम होणार नाही. केसांचं सौंदर्य वाढवण्यासाठी आपण केसांवर ज्या विविध प्रक्रिया करून घेतो, त्याच्या परिणामांसोबतच, दुष्परिणामांचीही माहिती करून घ्या. हे दुष्परिणाम रोखण्यासाठी काय काळजी घ्यायला हवी, ते जाणून घ्या आणि त्यांचं अनुकरणही करा. केसांचं आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी, केसांना योग्य पोषण मिळण्यासाठी नियमितपणे तेल मालीश, हेअर मास्क इत्यादी उपचार आवर्जून करा.  

तेल मालीश करा
रिबाँडिंगच्या प्रक्रियेदरम्यान केसांना भरपूर रसायनांचा मारा सहन करावा लागतो. म्हणूनच केसांचं आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी, रिबाँडिंग करून घेतल्यानंतर पुढे प्रत्येक वेळी केस धुण्यापूर्वी आदल्या रात्री केसांच्या मुळाशी तेल मालीश अवश्य करा. यामुळे केसांच्या मुळाशी रक्ताभिसरण योग्य प्रकारे होत राहील आणि केसांना योग्य पोषणही मिळेल.

हेअर मास्क
रिबाँडिंगनंतर केसांना योग्य पोषण मिळण्यासाठी, ते निरोगी राहण्यासाठी, नियमितपणे घरगुती नैसर्गिक हेअर मास्कचा वापर करा.

दही मेथी पॅक : रात्री 50 ग्रॅम मेथी भिजत ठेवा. सकाळी बारीक वाटून घ्या. मेथीच्या पेस्टमध्ये 4 टेबलस्पून दही, 1 टेबलस्पून मध आणि 1 टेबलस्पून ऑलिव्ह ऑईल मिसळून एकजीव मिश्रण तयार करा. हे मिश्रण केसांच्या मुळापासून टोकापर्यंत लावा. 45 मिनिटांनंतर केस सौम्य शाम्पू लावून धुवा.

एग बनाना पॅक : 2 केळ्यांचा गर कुस्करून घ्या. 2 अंडी व्यवस्थित फेटून घ्या. केळ्याच्या गरात फेटलेलं अंड मिसळा. त्यात एका लिंबाचा रस आणि इ जीवनसत्त्वाची एक कॅप्सूल मिसळा. मिश्रण चांगलं एकजीव करून, केसांच्या मुळापासून टोकापर्यंत व्यवस्थित लावून घ्या. 30 मिनिटांनंतर केस सौम्य शाम्पू लावून धुवा. असं आठवड्यातून दोन वेळा नियमितपणे करा.