अविरत सेवा देणार्या नर्स भगिनी (Special Article...

अविरत सेवा देणार्या नर्स भगिनी (Special Article On World Nurses Day)

आज जागतिक परिचारिका दिन आहे. त्या निमित्ताने या सेविकांच्या अडीअडचणी मांडणारा खास लेख.
कोरोनाच्या प्रादुर्भावाने जनजीवन विस्कळीत झालं आहे. असुरक्षित झालं आहे. लोकांना सक्तीने घरात बसावं लागत आहे. घरात बसून लोक कंटाळले आहेत. शरीरानं थकले आहेत नि मनाने खचले आहेत. परंतु पोलीस आणि आरोग्यसेवा अथकपणे कार्यरत आहेत. त्यातील कर्मचारी जीवावर उदार होऊन आपल्या सेवा बजावत आहेत. आरोग्य सेवेचं कार्य यात मोठं आहे. अधिक बिकट आहे. कारण डॉक्टर्स व नर्सेस यांचा कोरोनाबाधित रुग्णांशी थेट संबंध येत आहे. त्यात पुन्हा नर्सेसचे योगदान अधिक खडतर म्हणता येईल. कारण त्यांना कोरोना रुग्णांशी झुंजावं लागत आहे.

एकूणच जगभरात या परिचारिकांचं योगदान सर्वश्रेष्ठ म्हणता येईल त्यांचा विविध प्रकारच्या रोग्यांशी संबंध येतो. या रुग्णांचे स्वभाव, वर्तणूक त्यांना सहन करावी लागते. रुग्ण आपल्या आजाराने बेजार झाला असतो. तो चिडचिड करतो, आरडाओरडा करतो, कधी आक्रमक होतो. तरीपण या आपल्या नर्सेस थंड डोक्याने, सेवाभावी वृत्तीने त्याचा इलाज करत असतात. गोड बोलून त्यांना धीर देत असतात. औषधांबरोबरच आशेचे मानसिक डोस पाजून त्यांना धीर देत असतात. आपण त्यांना ’सिस्टर’ म्हणतो, पण बहिणीपेक्षा जास्त त्या आई असतात. आईच्या ममतेनं पेशंटना माया लावतात. रोगाची तीव्रता कमी व्हावी म्हणून दिलासा देत असतात. रोग्यांना बरं करण्यात ज्ञानी, निष्णात डॉक्टरांचं कौशल्य आहेच. पण ही डॉक्टर मंडळी काही मिनिटांसाठी, ऑपरेशन करतेवेळी काही तास रोग्यांजवळ असतात. नंतर हुकूम सोडून निघून जातात. पुढची सर्व जबाबदारी, औषधोपचार नर्सेस करतात. रुग्णांच्या सेवेत या नर्सेसचा जास्तीत जास्त वेळ व्यतीत होतो. साहजिकच त्यांच्या समोर वेगवेगळी आव्हाने उभी ठाकतात. त्यांच्या अडचणींना पारावार राहत नाही. जगभरात कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत असताना, नर्सेसच्या अडचणी वाढत आहेत. आपल्या देशातील या परिचारिकांना अतिशय प्रतिकूल परिस्थितीत काम करावे लागत आहे. या परिचारिकांच्या नेमक्या अडचणी काय आहेत, त्यांच्या गरजा काय आहेत नि त्या कोणत्या बिकट परिस्थितीत आपली अह र्निश सेवा देत आहेत. याबद्दल गोदरेज इंटेरिओ या कंपनीने गेल्याच वर्षी एक सर्वेक्षण केला. देशभरातील नर्सेसपैकी प्रातिनिधिक सेविकांना भेटून त्यांना समजून घेतले. या परोपकारी कार्यातून जी निरीक्षणे दिसून आली आहेत, ती खालील प्रमाणे:
आपल्या देशाची लोकसंख्या लक्षात घेता, येथील आरोग्यसेवा अपुर्‍या आहेत. ही वस्तुस्थिती आता लपून राहिलेली नाही. त्यातूनच एक भयानक सत्य समोर आलं आहे. आपल्याकडे एकूणच 6 लाख डॉक्टर्स आणि 20 लाख नर्सेस यांचा तुटवडा आहे. पूर्वीपेक्षा आता उपचाराचे स्वरूप, औषधे, उपकरणे, उपचार पद्धती यांच्यात झपाट्याने बदल होत असेल तरी नर्सेसचे काम काही सुलभ झालेले नाही. विविध उपकरणांनी रोगांचे निदान व अंदाज करणे सोपे झाले असले तरी त्यावर लक्ष ठेवण्याचे काम नर्सेसना जातीने करावे लागते. पेशंटच्या स्थितीनुसार (गंभीर, नाजूक) काही मिनिटांनी त्याच्या जवळ जाऊन या उपकरणांच्या नोंदी घेणे, त्या डॉक्टर्सना कळविणे, रोग्यांना औषधे व जेवण खिलविणे किंवा देणे, इंजेकशन – इंट्राव्हेनस देणे, त्यांना आधार देऊन बेडवर बसविणे, एका जागेवरून दुसर्‍या जागेवर हलविणे उदा. – व्हिलचेअर वरून बेडवर किंवा स्ट्रेचरवर किंवा स्ट्रेचर अथवा बेडवरुन व्हिल चेअरवर अथवा बेडवरुन स्ट्रेचरवर हलविणे अवजड ट्रॉलीज ढकलणे, इत्यादी सेवा त्यांना पेशंटजवळ जाऊनच द्याव्या लागतात. या सेवा बजावताना नर्सेसना अपरिमित शारीरिक कष्ट होतात. सतत कमरेत वाकावे लागते. ही कामे करताना शरीराला विचित्र बाक येतो. पीळ बसतो. पुरुष पेशंटला हाताळताना आवघडल्यासारखे वाटून चालत नाही. सतत उभे राहून काम करावे लागत असल्याने अतोनात शारीरिक कष्ट होतात. त्याचा मनावर तणाव येतो, तो वेगळाच. कागदोपत्री नर्सची ड्युटी 8 तासांची असते. पण पेशंट गंभीर असला किंवा पाली बदलणारी नर्स वेळेवर आली नाही किंवा येऊच शकली नाही तर हे कामाचे तास वाढतात. ओव्हरटाईम करावा लागतो. या पाहणीतून असं लक्षात आलं की 88 टक्के नर्सेसचे कामाचे तास हे 8 ते 10 तास असतात. महिन्यातून 2 ते 3 वेळा 35 टक्के नर्सेसना हे काम करावे लागते. कधी कधी 3 पेक्षा जास्त वेळा ही परिस्थिती निर्माण होते.औषधोपचार व शस्त्रक्रिया यांच्याशी संबंधित हॉस्पिटलातील जनरल वॉर्डसमध्ये 6 पेशंटला 1 नर्स सांभाळते. या वॉर्डसमध्ये पेशंटची वाढती संख्या पाहता कधी कधी तिला 6 पेक्षा अधिक पेशंट्स देखील सांभाळावे लागतात. असा प्रसंग 53 टक्के नर्सेसवर आलेला आहे. इंडियन नर्सिंग काउन्सिल यांच्या नियमानुसार, जनरल वॉर्डात पेशंट सांभाळण्याचे प्रमाणात एकास तीन असे असले पाहिजे. म्हणजे एका नर्सला तीन पेशंटची जबाबदारी असली पाहिजे. पण

प्रत्यक्षात हे प्रमाण अतिशय व्यस्त असल्याचे दिसून येते. काउन्सिलचे नियमात पुढे असंही म्हटलं आहे की जिल्हा पातळीवरील हॉस्पिटलात हेच प्रमाण एकास पाच असावे तर ओ. पी. डी. च्या क्लिनिक रूममध्ये वेगळे असावे. अन हेच प्रमाण एकास एक असे असावे. प्रत्यक्षात हे प्रमाण व्यस्तच दिसून येत आहे.

आपल्या नर्सेसना एकीकडे 8 ते 10 तास ड्युटी करावी लागते. शिवाय कामाचं स्वरूप असं आहे की सतत उभं राहून कर्तव्य करावं लागतं. अशा वेळी जेवणखाण, चहा, नाश्ता यासाठी तसेच एकूणच शरीरश्रमास विश्रांती घेणं गरजेचं ठरतं. पण कित्येकदा त्यांना जेवण, चहा वेळेवर घेणं देखील दुरापास्त होऊन जातं. 51 टक्के परिचारिकांना सलग 4 तास किंवा त्याहून अधिक तास काम करून देखील विश्रांती घेता येत नाही. हा ब्रेक घेता न आल्यामुळे शरीर व मनाचे आरोग्य बिघडते. कर्तव्य बजावताना शरीरस्थिती देखील वेदनादायक, तणाव निर्माण करणारी होते. त्यांच्या कामाची गरज म्हणून सतत उभं राहावे लागते. 74 टक्के नर्सेस सलग 4 ते 6 तास उभ्या राहतात. त्याच्याने मनावर शरीरावर तणाव येतो शिवाय पाठ, कंबर, पावले, पाय दुखू लागतात. रुग्णांची सेवा करताना त्यांच्या जागा बदलणे, उठून बसवणे या क्रिया करताना 60 टक्के परिचारिकांना पाठीतून विचित्रपणे वाकावे लागते. 55 टक्के परिचारिकांना जड वस्तू हाताळण्यात लागतात. जरुरीपेक्षा जास्त वेळ घट्ट आणि विचित्र स्थितीत पकड घेणार्‍यांचे प्रमाण 60 टक्के आहे. सर्वात दुर्दैवाची गोष्ट अशी की, रुग्णांची सेवा करताना विचित्रपणे मागे झुकण्याची वेळ 65 टक्के परिचारिकांवर येते. पाठीचा हा पीळ धोकादायक ठरू शकतो. जे पेशंट अंथरुणाला खिळून असतात. त्यांना औषध देण्यासाठी, जेवण खिलविण्यासाठी किंवा एका जागेवरून दुसर्‍या जागेवर नेण्यासाठी उठवून बसवावे लागते, अथवा उचलावे लागते. निवारीचा किंवा चामड्याचा पट्टा त्यासाठी असतो. परंतु 43 टक्के नर्सेस या पट्ट्याच्या मदतीने पेशंटला एकट्यानेच उचलतात. तर 57 टक्के नर्सेस हा पट्टा न वापरता त्यांना उचलण्याचा पराक्रम करतात. एका जागेवरून दुसर्‍या जागेवर पेशंटला ठेवण्यासाठी यांत्रिक उपकरण बर्‍याचशा खासगी रुग्णालयात उपलब्ध असते. परंतु 74 टक्के नर्सेस त्यांचा वापर करत नाहीत कारण एकतर त्याचे रीतसर प्रशिक्षण त्यांना मिळालेले नसते किंवा मिळाले असले तरी त्याचा सराव नसल्याने त्यात जास्त वेळ जातो, असा मतप्रवाह असल्याने त्या या उचल यंत्राचा वापर करत नाहीत.

या व अशा अनेक शारीरिक कष्टांनी आपल्या येथील बव्हंशी नर्सेसचे आरोग्यपणास लागलेले दिसून येते. त्यांना पाठीचे, कंबरेचे, मानेचे, पायाचे दुखणे लागते. सर्वेक्षणानुसार शरीरातील सांध्याच्या आतील मउदार अस्तर बिघडते, झिजून जाते. साधारणपणे 90 टक्के नर्सेसना या पासून आजार बळावतात. 56 टक्के जणींना पायाचे तर 51 टक्के जणींना गुढघे दुखण्याचे आजार ओढवतात . 51 टक्के टक्क्यांहून अधिक जणींना पाठीचे दुखवणे सतावते. 61 टक्के जणींना मानेचे आजार होतात. ही दुखणी सेवेत असताना अधूनमधून उदभवत असतात. त्यामुळे या सेवेकरी त्रस्त होतात. आपापल्या परीने वेदनाशामक औषधे घेऊन काम चालवतात. कारण त्यांना अराम करण्यासाठी रजा घेता येत नाही. दुखणी आली म्हणून 1 ते 3 दिवसांची रजा घेण्याचे प्रमाण 41 टक्के आढळले, तर 4 ते 6 दिवसांची रजा घेण्याचे प्रमाण फक्त 7 टक्के दिसून आले. कामाच्या ठिकाणी आपल्या गैरहजेरीने गैरसोय होऊ नये, या भावनेपोटी रजेवर जाण्याचे प्रमाण असे अल्प आहे. मात्र स्वतःचे दुःख लपवून रुग्णसेवा हे व्रत समजून सेवा देणार्‍या या परिचारिका भगिनींच समाजासाठी दिलेलं हे योगदान फार मोठं आहे. लॉकडाऊनच्या काळात पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी अत्यावश्यक सेवा देणार्‍या डॉक्टर, नर्सेस आणि पोलीस यांच्या साठी कृतज्ञ भावनेनं टाळ्या वाजवून त्यांना धन्यवाद देण्याचं आव्हान केलं होत. देशवासीयांनी या अनोख्या उपक्रमाचं कौतुक करून त्यांना साथ दिली होती व आपली कृतज्ञता, आभार व्यक्त केले होते. कोरोनाच्या काळातच नव्हे, तर एरव्ही सुद्धा रुग्णांची अविरत सेवा करणार्‍या या भगिनींना आपण कायम समजून घेतलं पाहिजे. त्यांच्या या सेवावृत्तीला त्रिवार सलाम करून कायमच आदर व्यक्त केला पाहिजे.