मुलांना द्या क्वालिटी टाइम (Spare Quality Time ...

मुलांना द्या क्वालिटी टाइम (Spare Quality Time For Children)

मागील काही वर्षांपासून मुलांना वेळ देण्यावरून ‘क्वालिटी टाइम’ ही संकल्पना रुजत आहे. क्वालिटी टाइम या संकल्पनेनुसार मुलांसाठी तुम्ही किती वेळ देता, यापेक्षा त्या वेळेचा तुम्ही किती चतुराईने वापर करता, हे महत्त्वाचं ठरतं.

नोकरीत व्यग्र असलेल्या पालकांचा मुलांशी सुसंवाद हरवत चालला आहे. त्यातून मुलांचं भावविश्‍व काहीसं एकलकोंडं झालेलं असून ही युवापिढी आततायी विचारापर्यंत पोहोचत आहे. याचं अलीकडचं उदाहरण द्यायचं तर, दक्षिण मध्य रेल्वेच्या कार्यक्षेत्रात घरातून पळून गेलेल्या 694 मुलांना पोलिसांनी पकडलं. यापैकी बर्‍याच मुलांचा त्यांच्या पालकांशी विसंवाद असल्याचं निदर्शनास आलं, अशा मजकुराची बातमी वाचली आणि आत्ताच्या सगळ्याच पालकांनी यावर विचार करावा, असं वाटलं.
मूल वाढवणं हे जेवढं जबाबदारीचं काम आहे, तेवढ्या जबाबदारीनं ते पेललं जात नाही, असं चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. किंवा मग त्या जबाबदारीचं गांभीर्य पालकांच्या लक्षात येत नाहीये, असं म्हणूया आपण. कामाच्या निमित्ताने 12-12 तास घराबाहेर राहणार्‍या पालकांना काय किंवा अगदी घरकामात व्यग्र असणार्‍या गृहिणींना काय, आपल्या मुलांना हवा तसा वेळ देताच येत नाही. अभ्यास केलात का? जेवलात का? खेळायला नाही गेलात का? अशा चौकशा करणं, म्हणजे मुलांना वेळ देणं नव्हे. या प्रश्‍नांमधून असं लक्षात येतं की, मुलांनी हे सर्व एकट्यानं करणं पालकांना अपेक्षित आहे आणि याउलट मुलांना अभ्यास करताना, जेवताना, खेळताना पालकांचा सहभाग अपेक्षित आहे.

क्वॉलिटी टाइम संकल्पना
दिवसभर नोकरी करून पालक सर्व सुखं आपल्या मुलांच्या ओंजळीत भरू पाहतात. परंतु, मुलांना हवा असतो पालकांचा सहवास. तो मिळाला नाही की, त्याची जागा टी.व्ही., मोबाईल, लॅपटॉप भरून काढतात. मागील काही वर्षांपासून मुलांना वेळ देण्यावरून ‘क्वालिटी टाइम’ ही संकल्पना रुजत आहे. क्वालिटी टाइम या संकल्पनेनुसार मुलांसाठी तुम्ही किती वेळ देता, यापेक्षा त्या वेळेचा तुम्ही किती चतुराईने वापर करता, हे पाहिलं जातं. या वेळेत तुम्ही मुलांना काय काय देता, हे महत्त्वाचं मानलं आहे. म्हणजे खेळणी, खाऊ वगैरे नाही, तर प्रेम, आधार, मुलांच्या नेमक्या आणि विशिष्ट गरजांची पूर्तता या गोष्टी अपेक्षित आहेत.
व्यग्र अशा जीवनशैलीमध्ये एकेक दिवस डोळ्यांचं पातं लवतं इतक्या जलदगतीनं पुढे सरकत आहे. असं असताना पालकांना स्वतःसाठीही उसंत मिळणं कठीण झालं असताना मुलांसाठी वेळ कुठून काढणार, अशी परिस्थिती आली आहे. किंबहुना आपण तशी परिस्थिती आणली आहे. कारण आपण सगळ्या गोष्टी वापरायला शिकतो, फक्त वेळ वापरायला शिकत नाही. त्यामुळे कितीही वेळ असला तरी तो आपल्याला कमीच पडतो. अलीकडच्याच एका निरीक्षणानंतर असं लक्षात आलं आहे की, पालकांनी त्यांच्या मुलांसोबत वेळ घालवल्यानंतर त्या मुलांच्या कार्यक्षमतेमध्ये, वर्तणुकीमध्ये, मानसिकतेमध्ये अधिक सकारात्मक बदल त्यांना दिसून आला आहे. हे सत्य आपण नाकारू शकत नाही. म्हणूनच मुलांसाठी वेळ काढायचा म्हणजे काय करायचं, ते आपण पाहूया.

मुलांसाठी वेळ कसा काढायचा?
– सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, रोजच्या रोज मुलांशी समोरासमोर बोलणं झालं पाहिजे. असं करणं शक्य नसेल तर त्यांच्यासाठी चिठ्ठ्या लिहून ठेवून संवाद साधा. उदाहरणार्थ, त्यांच्या टिफिनमध्ये एखादी चिठ्ठी लिहून ठेवा, सकाळी त्यांच्या टूथ ब्रशजवळ चिठ्ठी ठेवा. नाहीतर घरात एखादा पांढरा फलक असल्यास त्यावर त्यांच्यासाठी प्रेरणादायी असा मजकूर लिहून ठेवा.

– तुमचं तुमच्या मुलांवर प्रेम आहे, हे त्यांना आवर्जून सांगा. एवढंच नाही तर, तुमच्यासाठी ते किती महत्त्वाचे आहेत, हेदेखील त्यांना कळलं पाहिजे. तुमच्या भावना मुलांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. मुलं आता मोठी झालीत त्यांना आपल्या सोबतीची गरज नाही, असं होत नाही. वाढत्या वयाप्रमाणे त्यांच्या वर्तणुकीत बदल होणं स्वाभाविक आहे. पण पालकांनी त्या त्या वयातील आपल्या मुलांच्या गरजा ओळखून त्यांच्याशी समरस व्हायला हवं.
– पूर्वी कुटुंबातील आई-आजी मुलांवर चांगले संस्कार करण्याच्या उद्देशाने गोष्टी सांगत. आज पालकांकडे एवढा वेळ नाही. मात्र आठवड्यातून एक-दोनदा रात्री झोपण्यापूर्वी मुलांकडून एखादं छानसं गोष्टीचं पुस्तक वाचून घ्यावं.
– पालकांना व मुलांना एकत्र सुट्टी असताना त्यांनी मुलांच्या मित्र-मैत्रिणींना घरी बोलावून सिनेमागृहाचं वातावरण आणून पॉपकॉर्नची मजा घेत छानसा कार्टूनचा सिनेमा पाहावा. मुलांच्या आवडीचे खाद्यपदार्थ बनवावेत.
– शाळेतून दमून-भागून, दप्तराच्या ओझ्याखाली दबून कंटाळलेल्या चेहर्‍याने घरी येणार्‍या मुलांना सतत पाठीत धपाटे घालत अभ्यासाला बसवू नका. कधी कधी त्यांच्यातील कलात्मकतेला वाव देण्यासाठी त्यांच्या आवडीच्या गोष्टी करण्यासही प्रोत्साहन द्या. चित्रकला, हस्तकला अशा विषयांचीही गोडी लावा. घरातील जुन्या टी-शर्टवर किंवा पेपरवर रंगकाम करण्यास द्या. गरज पडल्यास त्यात त्यांना मदत करा. त्यांना त्यांचं कौशल्य दाखवण्याची संधी द्या. त्यांचं काम पाहून कौतुक करा.

– ऑफिसचं काम घरापर्यंत आणू नका. अथवा सुट्टीच्या दिवशी खरेदी करण्यात, नातेवाइकांकडे जाण्यात वेळ दवडू नका. याउलट मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष द्या. त्यांच्याशी गप्पा मारा. त्यांच्यासोबत वेळ घालवा. मुलं काही वेळा इतर मुलांच्या तक्रारी आणतात. तेव्हा त्यांचं म्हणणं समजूतदारपणानं, सहानुभूतीनं ऐकून घ्या आणि त्यांना प्रेमानं समजवा.
– शक्यतो दिवसातून एक वेळ तरी मुलांसोबत जेवा. अगदीच जमत नसेल, तर एखादं फळ एकत्र खाल्लं तरी त्यांना बरं वाटतं.
– मुलांसोबत असताना ताणतणावाच्या कोणत्याही गोष्टींचा विचार मनात येऊ देऊ नका. मुलांत मूल होऊन खेळा आणि मजेत वेळ घालवा.
– मुलांसोबत असताना मध्येच तासन्तास फोनवर मित्र-मैत्रिणींशी बोलत राहू नका. मोबाईलवर खेळ खेळत बसू नका. मुलंही तुमचंच अनुकरण करणार, हे लक्षात ठेवा.
अन्न, वस्त्र, निवारा याप्रमाणे मुलांसाठी मोकळा वेळही अत्यंत आवश्यक आहे. मुलांसह दर्जेदार वेळ घालवणं, आनंदाच्या व कमी ताणतणावाच्या दिशेने एक नैसर्गिक आणि आवश्यक पाऊल आहे. हे आपल्याला मुलांच्या जवळ आणेल. आणखी एक महत्त्वाचं म्हणजे, उद्या तुम्हाला तुमच्या मुलांच्या आठवणीमध्ये राहायचं असेल, तर ते आठवणीचे क्षण आज निर्माण करायला हवेत. त्यासाठी आपण आज त्यांच्या जीवनात असलं पाहिजे, त्यांना क्वालिटी टाइम दिला पाहिजे.