लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान सोनू निगमसोबत धक्काबुक्क...

लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान सोनू निगमसोबत धक्काबुक्की, पोलिसांत तक्रार दाखल (Sonu Nigam Attack During Live Concert)

मुंबईतील चेंबूर भागात लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान गायक सोनू निगमला मारहाण करण्यात आली आहे. सोनूसोबत सेल्फी काढत असताना ही घटना घडली. उद्धव ठाकरे गटाचे आमदार प्रकाश फातरपेकर यांच्या मुलावर हा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर सोनूने सोमवारी रात्री उशिरा पोलीस ठाणे गाठून आरोपीविरुद्ध एफआयआर दाखल केला. दुखापत झाल्याची, चुकीच्या पद्धतीने सेल्फी काढण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार त्याने केली होती. आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

चेंबूर फेस्टिव्हलच्या फिनालेदरम्यान सोनू निगम स्टेज शो करत होते. पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, आमदार प्रकाश फातरपेकर यांच्या मुलाने आधी सोनू यांची मॅनेजर सायरासोबत गैरवर्तन केले. त्यानंतर सोनू निगम स्टेजवरून खाली उतरत असताना त्याने आधी गायकाच्या अंगरक्षकाला धक्काबुक्की केली आणि नंतर सोनूलाही धक्काबुक्की केली. डीसीपी हेमराज सिंह राजपूत यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्नील फातरपेकर असे आरोपीचे नाव आहे.

घडल्या प्रकारावर सोनू म्हणाला, गाणं संपल्यानंतर मी स्टेजवरून खाली येत असताना स्वप्नील या व्यक्तीने मला पकडले. त्यानंतर त्याने मला वाचवण्यासाठी आलेल्या हरी आणि रब्बानी या माझ्या साथीदारांना धक्काबुक्की केली. मी पायऱ्यांवर पडलो. लोक जबरदस्तीने सेल्फी घेण्याचा आणि हाणामारी करण्याचा विचार करू नये म्हणून मी तक्रार दाखल केली आहे. तिथे काही लोखंडी रॉड पडले रब्बानी यांच्यावर पडले असते तर त्यांचा मृत्यू झाला असता. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की मी देखील पडणार होतो.

डीसीपी राजपूत म्हणाले, ‘मी सोनू निगमशी बोललो आहे. आरोपीला खरोखर सेल्फी घ्यायची होती की आणखी काही कारण होते हे तपासण्यासाठी आतापर्यंत आम्हाला असे कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत. आम्ही कारण शोधण्यासाठी तपास करत आहोत.

शिवसेना (उद्धव ठाकरे गट) नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी वृत्तसंस्था एएनआयला सांगितले की, हा हल्ला नाही. परफॉर्मन्सनंतर स्थानिक आमदाराचा मुलगा सोनू निगमसोबत सेल्फी काढण्यासाठी जात होता, मात्र त्यावेळी त्यांच्या अंगरक्षकाने त्याला अडवले. यावरून त्यांच्यात किरकोळ बाचाबाची झाली. त्यामुळे एक-दोन जण मंचावरून खाली पडले. दरम्यान, आमदारांच्या मुलीने मध्ये येऊन त्यांना अडवले. यानंतर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले.