‘धोंडी-चंप्या एक प्रेमकथा’ या मजेदा...

‘धोंडी-चंप्या एक प्रेमकथा’ या मजेदार चित्रपटाची गाणी प्रदर्शित (Songs Released Of ‘Dhondi-Champya’ A Comedy Marathi Film)

‘धोंडी-चंप्या एक प्रेमकथा’ हे नाव ऐकलं की कॉमेडीची, विचित्रपणाची भावना मनात येते. आहेच तसं! हा नवा मराठी विनोदी चित्रपट असून त्यात एक रेडा आणि म्हैस यांची प्रेमकहाणी आहे. त्यात तरुण नायक-नायिकेची प्रेमकथा गुंफण्यात आली आहे.

रिलायन्स एन्टरटेनमेन्ट प्रस्तुत या चित्रपटाची गाणी प्रदर्शित करण्यात आली. संगीतकार सौरभ – दुर्गेश या नव्या संगीतकार जोडीने ती स्वरबद्ध केली आहेत. हा त्यांचा पहिलाच चित्रपट. ‘प्राण्यांची प्रेमकथा व त्यावर संगीत देणे हे आव्हान होतं,’ असं या संगीतकारांनी या प्रसंगी सांगितलं.

अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांनी या चित्रपटातील गाणी गायली आहेत. दिग्दर्शन ज्ञानेश भालेकर यांचे आहे. “ज्ञानेश भालेकर यांनी त्यांच्या ‘गोलमाल’ या चित्रपटाला संगीत देण्याची मला प्रथम संधी दिली. अन्‌ मी आता यश मिळविले आहे. त्या हिशेबाने सौरभ-दुर्गेश यांना संगीतकार म्हणून भालेकरांनी संधी दिल्याने त्यांनाही पुढे यश मिळेल,” असा आशावाद अवधूत गुप्ते यांनी व्यक्त केला.

दिग्दर्शक ज्ञानेश भालेकर यांनी चित्रपटाची सुरुवात कशी झाली, हे सांगून चित्रण प्रसंगीचे काही मजेदार किस्से ऐकवले. निखिल-सायली ही जोडी यात असून सोबत भरत जाधव, वैभव मांगले, प्रभाकर मोरे, शलाका पवार हे कलावंत प्रमुख भूमिकेत आहेत. भरत जाधव यांनी चित्रण प्रसंगीचा एक मजेदार किस्सा ऐकवून एका प्रसंगात प्रभाकर मोरे यांनी चांगला अभिनय केल्याची मोकळेपणाने पावती दिली. वैभव मांगले यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केलेय

‘धोंडी-चंप्या’चे चित्रिकरण कोकणातील खारेपाटण गावात केले आहे. तेथील निसर्गसौंदर्य यात पाहायला मिळते. हा चित्रपट १६ डिसेंबरला सर्वत्र प्रदर्शित होईल.