सोनाली फोगटच्या पोस्टमार्टम रिपॉर्टनुसार अंगावर...

सोनाली फोगटच्या पोस्टमार्टम रिपॉर्टनुसार अंगावर अनेक जखमांच्या खुणा असल्याचे झाले उघड, हत्येचा गुन्हा दाखल! (Sonali Phogat’s brother makes shocking claims, ‘Sonali was raped repeatedly over Years by her PA, He Blackmailed Her By Making Videos)

बिग बॉस फेम, टिक टॉक स्टार आणि भाजप नेत्या सोनाली फोगट यांचा मृत्यू म्हणजे एक रहस्य बनत आहे. 42 वर्षीय सोनालीचा गोव्यात चार दिवसांपूर्वी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. आता सोनाली फोगटचा पोस्टमार्टम रिपोर्ट आला आहे, त्यानुसार सोनालीच्या शरीरावर अनेक जखमा झाल्या होत्या. त्यानंतर सोनाली फोगट मृत्यू प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सोनालीचे कुटुंबीय सतत तिची हत्या झाल्याचे सांगत होते. सोनाली फोगटच्या भावाने तिचे पीए सुधीर सांगवान आणि त्याचा मित्र सुखविंदर यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. आता तिच्या पोस्टमार्टम रिपोर्टनंतर गोवा पोलिसांनी सांगवान आणि त्याच्या मित्राविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

 सोनालीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला नसून तिची हत्या झाल्याचा दावा तिचे कुटुंबीय सातत्याने करत आहेत. या सगळ्यामध्ये सोनालीच्या भावाने अनेक खळबळजनक खुलासे केले असून आपल्या बहिणीवर वर्षानुवर्षे बलात्कार होत होता, तिला ब्लॅकमेल केले जात असल्याचे त्याने सांगितले आहे.

सोनाली फोगटचा भाऊ रिंकू याने सोनालीचा पीए आणि त्याच्या सहकाऱ्यावर वेगवेगळे आरोप लावून खळबळ उडवून दिली आहे. सोनालीचा पीए सुधीर सांगवान आणि त्याचा मित्र सुखविंदर सिंग यांनी तिच्यावर बलात्कार केला आणि व्हिडिओ बनवून तिला ब्लॅकमेल केल्याचा आरोप रिंकूने केला आहे.

रिंकूने तक्रारीत म्हटले की, सांगवानने तिच्यावर वर्षानुवर्षे बलात्कार केल्याचे स्वत: सोनालीने फोनवरून सांगितले होते. जेवणात अमली पदार्थ मिसळून त्याने सोनालीचा अश्लील व्हिडिओ बनवला होता, त्या आधारे तो तिला ब्लॅकमेल करत असे. सोनालीला तो धमकावत असे की, जर तिने याबाबत कोणाला सांगितले किंवा त्याच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर तिचे अभिनय आणि राजकीय करिअर बरबाद करू.

रिंकूने सांगितले की, सोनाली सांगवानवर आंधळा विश्वास ठेवायची आणि त्याने दिलेल्या कोणत्याही कागदपत्रांवरही सही करायची. 2021 मध्ये सोनालीच्या घरी चोरी झाली होती, त्यानंतर सांगवानने सोनालीच्या नोकराला कामावरून काढून टाकले आणि सोनालीच्या जेवणाची काळजी तो स्वत: घेऊ लागला. सुमारे तीन महिन्यांपूर्वी सोनालीने मला फोन करून सांगितले होते की, सुधीरने तिला खीर खायला दिली होती, त्यानंतर ती थरथर कापू लागली आणि तिचे अवयव काम करायचे बंद झाले. मी सांगवान यांच्याशीही याबद्दल बोललो, पण त्यांनी उत्तर देण्यासाठी टाळाटाळ केली.

सोनाली फोगट यांचे 22 ऑगस्ट रोजी गोव्यात निधन झाले. त्यांच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगितले जात असले तरी आता त्यांच्या मृत्यूवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. असे म्हणतात की, 22 ऑगस्टला सोनालीने तिच्या मेव्हण्याला गोव्यातून फोन करुन सुधीरने तिच्या जेवणात काहीतरी मिसळल्याचे सांगितले होते. जेवल्यानंतर तिला अस्वस्थ वाटत होते. एवढेच नाही तर २०२१ मध्ये झालेली चोरी सुधीर सांगवानने आपल्या मित्राच्या साथीने केल्याचा सोनालीला संशय होता. तिला याबाबत पोलिसांत तक्रारही करायची होती.

सोनालीने तिच्या मेव्हण्याला सांगितले होते की, माझे दोन्ही फोन, घराच्या चाव्या, एटीएम, सर्व कागदपत्रे सुधीरकडे आहेत. तो आणि सुखविंदर माझ्यासोबत काहीही करू शकतात. त्याच दिवशी सोनालीने तिच्या आईला फोन करून सांगितले की, तिचे शरीर कमजोर पडत चालले आहे. सोनालीचा मृत्यू झाल्यापासून तिचा लॅपटॉपही गायब आहे. हे सर्व पाहता तिच्या मृत्यूचे गूढ अधिकच वाढले आहे. सोनालीच्या मृत्यूचे सत्य बाहेर यावे आणि दोषींना शिक्षा व्हावी, अशी तिच्या कुटुंबीयांची आणि चाहत्यांची इच्छा आहे.