भाजप नेता आणि अभिनेत्री सोनाली फोगट यांचे हृदयव...

भाजप नेता आणि अभिनेत्री सोनाली फोगट यांचे हृदयविकाराने निधन (Sonali Phogat Haryana Bjp Leader And Tiktok Star Passed Away )

भाजप नेता आणि अभिनेत्री सोनाली फोगट यांचे हृदय विकाराने निधन झालं आहे. त्या टिकटॉक स्टार म्हणूनदेखील प्रसिद्ध होत्या. सोनाली फोगट यांचा जन्म 21 सप्टेंबर 1979 रोजी हरियाणातील फतेहाबाद येथे झाला. त्या 43 वर्षांच्या होत्या. सोनाली फोगट या भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या उपाध्यक्षा होत्या.

भाजपने तिला हिसार जिल्ह्यातील आदमपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती, तरीही त्या निवडणुकीत पराभूत झाल्या. सोनाली फोगट यांच्यासमोर 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसचे नेते कुलदीप बिश्नोई हे उमेदवार होते. भाजपच्या हरियाणा युनिटनेही त्यांची महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती केली होती.

सोनाली फोगट एक अभिनेत्री होत्या त्यांनी दूरदर्शनवर शो अँकर केले होते. सोनाली यांनी छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. विशेष म्हणजे टिकटॉक स्टार म्हणूनही त्यांची ओळख आहे. सोनाली फोगट यांनी सोमवारी रात्रीच इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. टिकटॉकसह अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध असलेल्या सोनाली फोगट बिग बॉस या रिअॅलिटी शोच्या 14 व्या सीझनमध्ये त्या सहभागी होत्या.

2006 मध्ये सोनाली फोगट यांनी हिसार दूरदर्शनमध्ये अँकरिंग करून करिअरची सुरुवात केली. दोन वर्षांनंतर 2008 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तेव्हापासून त्या पक्षाच्या सक्रिय सदस्य होत्या. मात्र 2016 मध्ये अचानक त्यांचे पती संजयचा फार्म हाऊसमध्ये संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला तेव्हा त्या प्रसिद्धीझोतात आल्या होत्या. मात्र त्यावेळी त्या मुंबईत होत्या.