सोनाली कुलकर्णीने दिले अनोखे गिरकी चॅलेंज ( Son...

सोनाली कुलकर्णीने दिले अनोखे गिरकी चॅलेंज ( Sonali Kulkarni Offered An Off Beat Challenge For Celebrity Marathi Artists )

सोशल मीडिया हे असं माध्यम आहे जिथे वेगवेगळे प्रयोग करुन लोकांपर्यंत पोहचता येतं. त्यामुळे एखादी गोष्ट ट्रेण्डींगला असेल तर सोशल मीडियावरुन ती आपल्या समजते. एखाद्या गोष्टीचे प्रमोशन करायचे असल्यास सोशल मीडियाची खूप मोठी मदत होते याची अनेक उदाहरणे आपण पाहत असतो. यामध्ये एकमेकांना अनोखे चॅलेंज देऊन त्याचे फोटो किंवा व्हिडिओ पोस्ट केले जातात आणि त्यात एकमेकांना टॅग केले जाते. पुढे ती साखळी इतकी मोठी होते की सगळीकडे त्याचा ट्रेण्ड बनतो. मध्यंतरी नथीचा नखरा चॅलेंज, 10 इयर्स चॅलेंज, आईस बकेट चॅलेंज असे अनेक चॅलेंज व्हायरल झाले होते. महत्वाचे म्हणजे हे चॅलेंज केवळ सामान्य लोकच नाही तर सेलिब्रेटीही मोठ्या उत्साहात करत असतात. आता तर या चॅलेंजचा वापर चक्क चित्रपटाच्या प्रमोशनसाठी केला जात आहे.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिच्या आगामी ‘तमाशा लाइव्ह’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सोशल मीडियावर सगळ्यांना एक चॅलेंज दिले आहे. या चॅलेंजच नाव आहे ‘हॅशटॅग गिरकी चॅलेंज’. यात सोनालीने सगळ्यांना त्यांचा गिरकी घेतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करुन तिला टॅग करण्याचे चॅलेंज दिले आहे.

सोनालीच्या ‘तमाशा लाइव्ह’ या चित्रपटातील तिचे ‘रंग लागला’ हे गरब्याचे गाणे नुकतेच रिलीज झाले. या गाण्यात तिच्या गिरकी घेतानाच्या काही स्टेप्स आहेत. त्यावरुन तिने सगळ्यांना तसेच गिरकी चॅलेंज दिले आहे. तिचे हे अनोखे चॅलेंज खूपजणांनी स्विकारले असून ते देखील त्यांचे रंग लागला या गाण्याच्या बॅकग्राराऊंड म्युझिकवर गिरकी घेतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करुन सोनालीला टॅग करत आहेत. यात अभिनेत्री प्रार्थना बेहेरे, ह्रता दुर्गुळे, आयुषी टिळक यांच्यासह अनेक कलाकारांचा समावेश आहे. 

संजय जाधव दिग्दर्शित तमाशा लाइव्ह हा चित्रपट येत्या 15 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात सोनालीने शेफाली हे पात्र साकारले असून ती एक न्यूज रिपॉर्टर दाखवली आहे. सोनालीसोबत या चित्रपटात सचित पाटील, सिद्धार्थ जाधव, पुष्कर जोग, हेमांगी कवी, नागेश भोसले, मृणाल देशपांडे, मनमीत पेम, आयुषी भावे आणि भरत जाधव प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.