….तर आपली मैत्री झाली असती’, सोनाली...

….तर आपली मैत्री झाली असती’, सोनाली कुलकर्णीने मांडले अमृता खानविलकरबद्दलचे मत (Sonali Kulkarni Express Her Feeling About Amruta Khanvilkar)

‘बस बाई बस’ या नव्याने सुरू झालेल्या मालिकेत आतापर्यंत अनेक जणींनी उपस्थिती लावली आहे. या शोमध्ये महिला सेलिब्रिटी येऊन सूत्रसंचालक सुबोध भावेसोबत गप्पा मारतात. या शोमध्ये त्यांना वेगवेगळे प्रश्न विचारले जातात.

तसेच त्यांच्याकडून काही टास्क खेळून घेतले जातात. या शोच्या मागच्या एपिसोडमध्ये अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने उपस्थिती लावली होती. यावेळी तिने आपल्या आयुष्यातल्या अनेक गंमतीजमती सांगितल्या. अनेक किस्से तिथे उपस्थित असलेल्यांसोबत शेअर केले.

या शोमधील एका टास्कमध्ये वेगवेगळ्या व्यक्तींचे फोटो दाखवले जातात. ते फोटो पाहून ती व्यक्ती आपल्या शेजारी आहे असे मानून त्या व्यक्तीबद्दलचे मनोगत मांडायचे असते. या खेळात सोनालीला अभिनेत्री अमृता खानविलकरचा फोटो दाखवण्यात आला.

तेव्हा तिला पाहून ती म्हणाली की, आपण दोघींनी करीअरची सुरुवात एकत्रच केली. आपण एकमेकींचा स्ट्रगल पाहिला. नटरंगचं यश शेअर केलं. पण त्यानंतर इतक्या वर्षांत आपण एकत्र काम केले नाही.

एकत्र काम केले असते तर कदाचित आपली छान मैत्री झाली असती. नटरंगनंतर आपल्यात वैर असल्याचे पसरवले गेले. आमच्यात काही फार मैत्री वगैरे नाही. पण ती होऊ शकली असती.  लोकांना दोन यशस्वी व्यक्तींनी एकत्र आलेलं पाहायला आवडत नाही. तसं झालं असावं. काही समज, गैरसमज नक्कीच झाले असतील.

पण इतक्या वर्षांनंतर आपण एकमेकांना समजून घेऊ शकतो. तू जो स्ट्रगल केलास, मी देखील तो केला असं म्हणणार नाही. कारण प्रत्येकाचा स्ट्रगल हा वेगळा असतो. तसाच संघर्ष मी केलाय, तो तुलाही माहीत आहे. त्याबद्दल मला आदर आहे. आपण एकत्र काम केलं तर आपल्यात नक्की मैत्री होईल, तोपर्यंत त्याची वाट पाहू….