महिलांना ‘आळशी’ म्हणणं पडलं महागात; अखेर सोनाली...

महिलांना ‘आळशी’ म्हणणं पडलं महागात; अखेर सोनाली कुलकर्णीने मागितली जाहीर माफी (Sonali Kulkarni Apologises For Women Are Lazy Statement After Backlash Here Is What She Said)

‘दिल चाहता है’, ‘मिशन काश्मीर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारलेली अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तिच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. गेले दोन दिवस सोनालीच्या एका मुलाखतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत तिने भारतीय महिलांना ‘आळशी’ असं म्हटल्याने नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. यावर कुणी चांगलं मत व्यक्त केलं तर अनेकांनी टीकाही केली. यावर सोनाली काय व्यक्त होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर सोनालीने ट्विटरवर भलीमोठी पोस्ट लिहित जाहीर माफी मागितली आहे. या घटनेतून मी खूप काही शिकले, असंही तिने या पोस्टच्या अखेरीस लिहिलं आहे.

या ट्विट मध्ये ती म्हणते, ‘मला ज्या प्रकारचा प्रतिसाद मिळाला आहे तो पाहून मी भारावून गेले आहे. यासाठी मला सगळ्यांचे आभार मानायचे आहेत. खासकरून प्रेस आणि मीडियातील लोकांचे.. ज्यांनी माझ्याशी खूपच समंजसपणे संपर्क आणि संवाद साधला. मी स्वत: एक स्त्री असल्याने इतर महिलांना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. उलट स्त्री असणं म्हणजे काय, याबाबत मी वारंवार व्यक्त झाले आहे. माझं कौतुक करण्यासाठी किंवा माझ्यावर टीका करण्यासाठी वैयक्तिकरित्या माझ्यापर्यंत पोहोचल्याबद्दल मी तुम्हा सर्वांची आभारी आहे.’

याविषयी तिने पुढे लिहिलं, ‘आपण विचारांची अधिक मुक्तपणे देवाणघेवाण करू शकू अशी आशा आहे. मी माझ्या क्षमतेनुसार केवळ महिलांनाच नाही तर संपूर्ण मानव जातीला पाठिंबा देण्याचा, त्याच्याबद्दल विचार करण्याचा आणि नात्यातील उबदारपणा शेअर करण्याचा प्रयत्न करत आहे. जर आपण स्त्रियांनी सर्वसमावेशक आणि एकमेकांप्रती सहानुभूती दाखवली तरच आपण विचारांनी मजबूत आणि आनंदी समाज निर्माण करू शकू.’

सोनालीने तिच्या वक्तव्यामुळे नाराज झालेल्यांची माफी मागितली. तिने लिहिलं, ‘हे सर्व म्हणत असतानाच जर नकळत मी कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी मनापासून माफी मागू इच्छिते. माझी तळमळ हेडलाइन्ससाठी नाही किंवा मला अशा परिस्थितीच्या केंद्रस्थानी राहायचं नाही. मी एक कट्टर आशावादी आहे आणि मला ठामपणे विश्वास आहे की हे जीवन खरंच खूप सुंदर आहे. तुम्ही दाखवलेल्या संयमाबद्दल आणि समर्थनाबद्दल धन्यवाद. या घटनेतून मी खूप काही शिकले आहे.’