सोनाली कुलकर्णी आणि सिद्धार्थ जाधव इतके भांडले ...

सोनाली कुलकर्णी आणि सिद्धार्थ जाधव इतके भांडले की एकमेकांशी 10-12 वर्षे बोलत नव्हते… आता त्यांची बट्टी कशी झाली ? (Sonali Kulkarni And Siddharth Jadhav Were Not On Talking Terms For 10-12 Years , Although They Worked Together )

मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नेहमीच तिच्या बोल्ड लूक तसेच अभिनय आणि स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच तिने बस बाई बस या मालिकेत हजेरी लावली होती. त्यावेळी तिने ती आणि अभिनेता सिद्धार्थ जाधव एकमेकांशी जवळपास 10-12 वर्षे बोलत नव्हते असा खुलासा केला. पण आता त्यांची पुन्हा मैत्री झाल्याचेही तिने सांगितले.

बस बाई बस या शोमध्ये येणाऱ्या पाहुण्यांना वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात. तेव्हा या शोचा सूत्रसंचालक असलेल्या सुबोध भावेने सोनालीला विचारले की, तुझे कधी सहकलाकारासोबत भांडण झाले आहे का ? यावर सोनालीने अभिनेता सिद्धार्थ जाधवचे नाव घेतले. तिचे हे उत्तर ऐकून तिथे उपस्थित असलेल्यांच्या भुवया उंचावल्या कारण सिद्धार्थ आणि सोनालीने अनेक चित्रपट एकत्र केले आहेत. याशिवाय सोनालीचा पदार्पणाचा चित्रपट बकुळा नामदेव घोटाळे यात देखील सिद्धार्थ जाधवच तिचा सहकलाकार होता. असे असून देखील ते 10 ते 12 वर्षे एकमेकांशी बोलत नव्हते हे ऐकून सर्वांनाच धक्का बसला.

पुढे सोनालीने त्यांच्यात मैत्री कशी झाली त्याचा एक किस्सा सांगितला. ती म्हणाली की, “सिद्धार्थ जाधव आणि मी सतत भांडत असतो. एकदा आम्ही इरादा पक्का चित्रपटाचे शूट करत होतो. त्यावेळी आम्ही एकमेकांशी काहीही बोलतच नव्हतो. आमचे कास्टिंग झाले, त्यानंतर आमचं भांडण झालं. क्षणभर विश्रांती नंतर आमचं इरादा पक्का चित्रपटाचं शूटिंग होणार होतं. त्याआधी मला केदार जाधव यांनी फोन केला आणि त्यांनी मला सांगितलं सॉरी आम्ही वेगळी मुलगी शोधतोय. त्यावेळी मी केदार जाधव यांना दुसरी मुलगी शोधण्याबाबत प्रश्न विचारला. त्यावर ते म्हणाले, तू आणि सिद्धार्थ जाधव एकमेकांचं चेहराही बघत नाही. ही रोमँटिक जोडप्याची गोष्ट आहे, मग हे शूट कसं होणार आहे? त्यावेळी मी त्यांना विचारलं, तुम्ही मला का काढत आहात, सिद्धार्थ जाधवला तुम्ही नाही काढणार…,तो तुमचा लाडका ना असे बोलून ओके सांगत फोन ठेवला होता.

त्यानंतर पंधरा-वीस दिवसांनी त्यांनी मला पुन्हा फोन केला आणि हे काम तुलाच करावा लागणार आहे. त्या भूमिकेसाठी दुसरी मुलगी अद्याप सापडत नाही असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर चित्रपटाच्या शूटींगवेळी सिद्धार्थ जाधव हा केदार जाधव यांच्यासोबत वेगळी तालीम करायचा आणि मी त्यांच्यासोबत वेगळी तालीम करायचे. मी आणि सिद्धार्थ फक्त त्या चित्रपटातील केवळ एका रोलसाठी समोरासमोर उभे राहायचो आणि त्यानंतर पुन्हा आमच्या कामाला लागायचो. जवळपास आम्ही एकमेकांशी बोलतच नव्हतो. आम्ही जवळपास दहा वर्ष एकमेकांशी एक शब्दही बोललो नाही.

त्यानंतर एकदा अचानक प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांचं निधन झालं. त्यावेळी अचानक सिद्धार्थ जाधवचा मला फोन आला आणि तो म्हणाला, आपलं आयुष्य हे किती क्षणभंगूर आहे. कधी, कुठे, केव्हा काय होईल, हे माहिती नाही. असंच अचानक कधीतरी मी गेलो किंवा तू गेलीस तर जो उरलेला असेल त्याला कायम आयुष्यभर या गोष्टींचा दोष असल्यासारखे वाटले आणि मला असे होऊ द्यायचे नाही. त्यामुळे सॉरी मी गेली दहा वर्ष तुझ्याशी बोललो नाही याची मला खंत वाटते.

मी माझ्या मैत्रिणीला गेली दहा वर्ष खूप मिस केलं आणि काय झालं असेल त्यासाठी मी सॉरी बोलतो आपण पुन्हा बोलूया का? मग आम्ही भेटलो बोललो आणि आता आम्ही एकमेकांशी बोलतो पण आम्ही अजूनही तितकेच भांडण करतो”