केस पांढरे होत आहेत… ...

केस पांढरे होत आहेत… (Solution To Grey Hair)

मी एक गृहिणी आहे. माझी नखं अतिशय खडबडीत झाली आहेत. ती सुंदर दिसावी यासाठी मी काय करू? कृपया मला उपाय सुचवा.

 • नीलम देशपांडे, बीड
  साबणात सतत काम केल्यामुळे किंवा नखांची योग्य काळजी न घेतल्यास बरेचदा नखं खडबडीत होतात. कधी कधी तर फाटतात. मात्र अशी नखंही पूर्ववत सुंदर होऊ शकतात. त्यासाठी काही उपाय योजना करता येईल. आठवड्यातून दोन-तीन वेळा राईच्या तेलामध्ये नखं दहा मिनिटांकरिता बुडवून ठेवा. तसंच नखं पिवळी पडली असतील, तर कापसाचा बोळा लिंबाच्या रसात बुडवून अलगद नखांवरून फिरवा. असं साधारण पाच मिनिटं करा. रात्री झोपण्यापूर्वी नखं स्वच्छ करून, त्यावर कोल्ड क्रीम लावून हलका मसाज करा आणि झोपून जा. नखांना फाईल करताना, एकाच दिशेने फाईल करा. तसंच क्युटीकल्स नखांची सुरक्षा करतात, त्यांना जपा. यासोबतच आहारावरही थोडं लक्ष द्या. आहारामध्ये लोह आणि प्रथिनांचा विशेष समावेश करा. यासाठी नियमितपणे बीट, खजूर, सुकामेवा, ताजी फळं, मासे, अंडी, दूध व दुग्धजन्य पदार्थ, पालेभाज्या, कडधान्य इत्यादींचा आहारात समावेश करा. या प्रकारे नखांची काळजी नियमितपणे घ्या.
  मी कॉलेजला जाते. हल्लीच माझ्या लक्षात आलं की, माझे केस थोडे थोडे पांढरे होऊ लागले आहेत. याचं मला खूप टेन्शन आलं आहे. केस पांढरे होणं मला थांबवता येईल का? तसंच पांढरे झालेले केस पुन्हा कायमचे काळे करणं शक्य आहे का? कृपया मला मार्गदर्शन करा.
 • सुगंधा बेंद्रे, पुणे
  सर्वप्रथम या गोष्टीची किंवा अन्य कोणत्याही गोष्टीची अति चिंता करणं सोडून द्या. कारण केस पांढरे होण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या अनेक घटकांपैकी हे एक मोठं कारण आहे. केस काळे राहण्यासाठी काही उपाय करता येतील. आहारात आवळ्याचा समावेश करा. माका आणि तीळ समप्रमाणात घेऊन त्याचं चूर्ण करा. हे चूर्ण एक चमचा या प्रमाणात दररोज चावून खा आणि त्यावर ग्लासभर पाणी प्या. असं सहा महिने नियमितपणे करा. तसंच अंघोळ करण्यापूर्वी केसांच्या मुळांना कांद्याची पेस्ट लावा. थोड्या वेळाने केस सौम्य शाम्पूने स्वच्छ धुवा. हे उपाय नियमितपणे केल्यास पांढर्‍या केसांची समस्या उद्भवणार नाही.
  मला फळं खायला मुळीच आवडत नाही. आई मात्र सतत फळं खाण्यासाठी मागे लागलेली असते. फळं आरोग्यासाठी उपयुक्त आहेत, हे तर मला माहीत आहेच. पण आता ती मला फळं सौंदर्यासाठीही आवश्यक आहेत, असं सांगून फळं खा म्हणून आग्रह करतेय. हे खरं आहे का?
 • मानसी पाटील, कोल्हापूर
  तुझी आई अगदी खरं बोलतेय. फळं सौंदर्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत. सौंदर्य जपण्यासाठी आणि वधारण्यासाठीही फळांचा नियमितपणे आहारात समावेश करायला हवा. तसंच फळांचा गर त्वचेवर लावल्यासही त्याचा खूप फायदा होतो. संत्रं, केळं, लिंबू, आवळा, पपई अशा सर्वच फळांचा त्वचा व केसांचं सौंदर्य वाढवण्यात मोलाचा वाटा आहे. तेव्हा आरोग्य आणि सौंदर्य जपण्यासाठी फळांशी मैत्री करच.