मऊ लुसलुशीत पाव (Soft And Readily Available Food)

मऊ लुसलुशीत पाव (Soft And Readily Available Food)

सकाळी झटपट करता येण्याजोगे पदार्थ म्हटलं की, त्यात बरेचसे पदार्थ हे पावाचे निघतील. कसाही आणि कशासोबतही खाता येणारा… अगदी कुणालाही उपाशी न ठेवणारा… आवडीने खाल्ला जाणारा ‘पाव’ हा जगात सर्वव्यापी आहे.
‘गुड फुड इज गुड मुड’ ही म्हण एकशे एक टक्के खरी असल्याचा प्रत्यय अगदी सकाळपासूनच यायला सुरुवात होते, जेव्हा मुलं ‘आज टिफिनमध्ये काय दिलंय मम्मा?’ असं विचारतात. म्हणजे त्यांच्या आवडीचा पदार्थ असेल तर त्यांच्या चेहर्‍यावर आनंद दिसतो, नाहीतर चेहरा पडतो. मग काय?… आवडीचा पर्याय असतो ब्रेड-बटर. दोनच मिनिटांत मूड पूर्ववत. कमाल वाटते एवढं सकाळी उठून छान सकस काहीतरी बनवायचं तर ते नको. हवं काय, तर साखर लावून दिलेला ब्रेड-बटर. म्हणजे ब्रेडला दुषणं द्यायला नकोत, अडल्यानडल्याला फार उपयोगी पडतो. सकाळी झटपट करता येण्याजोगे पदार्थ म्हटलं की, त्यात बरेचसे पदार्थ हे पावाचे निघतील. सॅण्डविच, भजी-पाव, जॅम-पाव, चटणी-पाव, मस्का-पाव, कटलेट, बे्रडचा उपमा वगैरे वगैरे. कसाही आणि कशासोबतही खाता येणारा… अगदी कुणालाही उपाशी न ठेवणारा… आवडीने खाल्ला जाणारा ‘पाव’ जगात सर्वव्यापी आहे.

नुकतंच मुंबईच्या पावभाजीनं सुवर्ण महोत्सवी वर्ष पार केलं, अर्थात पन्नाशी गाठली. म्हणजे बघा… आता लोकं आपल्या आवडत्या पदार्थाचं वयही लक्षात ठेवू लागलेत. वडापाव तर त्याही आधीचा… असा विचार मनात यायची फुरसत की, खाऊगल्ल्यांमधील एकेक पदार्थांची चव जिभेवर यायला लागली… वडा पाव, समोसा पाव, मसाला पाव, भुर्जी पाव, दाबेली… या सगळ्यात कॉमन होता पाव! हा कॉमन फॅक्टर म्हणजे आपल्यासारख्या कॉमन मॅनच्या जीवनातील अविभाज्य भागच म्हणावं लागेल. थोडासा गोड, थोडा सॉल्टी, मऊ लुसलुशीत किंवा कडक अशा स्वभावधर्माचा पाव कधीच खाल्ला नाही, अशी व्यक्ती सापडणं विरळ. बरं पाव हा कधीही अगदी सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र अशा नाश्त्यापासून जेवणापर्यंतच्या वेळेतही खाता येतो. म्हणजे, पोटाकडून भुकेचे संकेत मिळाले की, तात्काळ उपलब्ध होणारा पदार्थ.

पावाची कथा
खरं तर पाव हा आपला पदार्थ नाही, ती पोर्तुगीजांनी दिलेली देणगी आहे. परंतु, आज तो इतक्या सर्रासपणे आपल्याकडे बनवला, तसंच खाल्ला जातो की, तो आपलाच झालेला आहे. नि त्याच्या पालकदेशात मात्र तो कमी खाल्ला जातोय. पोर्तुगीज लोक या पदार्थाचा पाँव (झरे) असा अनुनासिक उच्चार करत असत. त्यामुळे आपणही त्यास पाव म्हणू लागलो. काही जणांचं असं म्हणणं आहे की, बेकरीमध्ये मोठ्या प्रमाणात पाव बनवताना पायांनी पीठ मळलं जातं आणि हिंदीमध्ये पायांना ‘पाव’ म्हणतात. म्हणून या पदार्थाला पाव असं नाव पडलं. अर्थात, आता सगळीकडे पीठ मळण्यासाठीच्या मशीन्स आलेल्या आहेत, तेव्हा पीठ मळण्याची ही पद्धत सर्रास वापरली जात असण्याची शक्यता नाही.

आजच्या तारखेला बाजारात पावाचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. ब्रेड म्हणजेही पावच… व्हाइट ब्रेड, ब्राऊन ब्रेड, होलव्हीट ब्रेड, मल्टिग्रेन ब्रेड. या सर्व ब्रेड प्रकारांत कमी-अधिक प्रमाणात मैदा असतोच. मैदा हा आरोग्यास फारसा चांगला नाही आणि डाएट करणार्‍यांना, तसंच उच्च रक्तदाब असणार्‍या व्यक्तींना तर तो वर्ज्यच असतो, असं आरोग्यशास्त्र सांगतं. पण जिभेपुढे कोणाचं काही चालत नाही. मग यातून सोयिस्कर मार्ग काढला जातो. म्हणजे पावाची भूक मल्टीग्रेन किंवा ब्राऊन ब्रेड खाऊन भागवली जाते. बर्‍याच लोकांना ब्राऊन ब्रेड हा गव्हाच्या पिठाचा वाटतो किंवा मल्टी ग्रेन ब्रेडमध्ये पोषक कडधान्यांचा वापर असतो, असं वाटत असतं. ते ठीक आहे. परंतु, तरीही पावाचा कोणताही प्रकार असो, त्यात मैद्याचा वापर करावाच लागतो.

क्रिस्पी मेनू
मैदा हा गव्हापासूनच बनतो. परंतु, मैदा होताना गव्हाचं वरचं आवरण पूर्णतः निघून जातं, ज्यामुळे गव्हातील पोषक मूल्यं आणि फायबर्स निघून जातात आणि केवळ स्टार्च शिल्लक राहतो. काही वेळेस जिथे मोठ्या प्रमाणावर ब्रेड बनवला जातो, तिथे मऊ आणि फुगलेला पाव बनवण्यासाठी पोटॅशियम ब्रोेमेट आणि पोटॅशियम आयोडेटचाही वापर केला जातो. बरेचदा कृत्रिम रंग किंवा कॅरेमलचा वापरही केलेला असतो. म्हणून पाव खाण्यापूर्वी त्याच्या पाकिटावरील घटकांची नावं वाचा. जेवणात कधीतरी गोड खाण्याची इच्छा व्हावी, तसं कधी मस्त खमंग खावंसं वाटलं की पावाच्या क्रिस्पी मेनूंवर बिनधास्त ताव मारायचा. पाव खायचाच झाला, तर त्यापासून वेगवेगळे पदार्थ बनवताना त्यास पौष्टीक घटकांची जोड द्या, म्हणजे आपोआपच पावाची सकसताही वाढेल. नाहीतर वेगळा पर्याय म्हणजे, ज्यांना वरचेवर पाव खायला आवडतो त्यांनी तो स्वतः घरी बनवून खा. 

पाव घरी कसा बनवायचा?
साहित्य : 500 ग्रॅम मैदा, ताजं यीस्ट, 1 टेबलस्पून डालडा, 250 मिलीलीटर पाणी, 1 टीस्पून मीठ, 2 टीस्पून साखर.
कृती : प्रथम पाणी कोमट करून घ्या. त्यातील अर्ध्या पाण्यात साखर आणि यीस्ट मिसळून झाकून ठेवा. नंतर मैदा आणि मीठ चाळून घ्या. त्यात उरलेलं पाणी मिसळून ठेवा. यीस्टच्या पाण्यावर बुडबुडे दिसले की, ते एकदा ढवळून मैद्यामध्ये मिसळा. त्यातच डालडा घालून मैद्याचा गोळा मळून बाजूला झाकून ठेवा. साधारण दीड ते दोन तासांनी गोळा फुगून जवळजवळ दुप्पट आकाराचा होतो. त्यावेळी परत एकदा मळून, त्याचे दोन भाग करून बाजूला ठेवा. त्यानंतर तेलाचा किंवा तुपाचा हात पावाच्या साच्याला लावून त्यात ते गोळे घालून 15 मिनिटांनी

ते भट्टीत भाजायला ठेवा. अर्धा ते पाऊण तासात ते भाजून तयार होतील. पावामध्ये कार्बोहायड्रेट्स, प्रथिने, फायबर, कॅलरीज आणि कॅल्शियमदेखील असतं. त्यामुळे नेहमीच पोटाचं न ऐकता जिभेचंही ऐकायचं नि पावाच्या वेगवेगळ्या पाककृती करायच्या. पावाच्या बर्‍याच वेगळ्या आणि छान पाककृती करता येतात, पैकी दोन पाककृती देत आहोत. आवडल्यास करून पाहा.

पावाची खीर
साहित्य : 1 वाटी पावाचा चुरा, 2 चमचे तूप, 1 लिटर दूध, 100 ग्रॅम साखर, स्वादानुसार वेलची व जायफळ पूड, थोडी चारोळी.
कृती : दूध थोडं आटवून घ्या. थोड्या तुपात पावाचा चुरा भाजून घ्या आणि आटवलेल्या दुधात घाला. त्यानंतर वेलची-जायफळ पूड आणि चारोळी भाजून त्यात घाला. थंड झाल्यावर खाण्यास घ्या.
टीप : पावाचे स्लाइसेस उन्हामध्ये कडकडीत वाळवून त्याचा चुरा करा.

पावाचा उत्तपा
साहित्य : अर्धा वाटी उडदाची डाळ, अर्धा वाटी मुगाची डाळ, थोडं आंबट दही किंवा ताक, 6 पावाचे स्लाइसेस, 1 मोठा कांदा, 2 टोमॅटो, थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर, 3-4 हिरव्या मिरच्या, आवश्यकतेनुसार तेल, स्वादानुसार मीठ.
कृती : उडदाची आणि मुगाची डाळ दोन तास वेगवेगळी भिजत ठेवा. नंतर दोन्ही डाळी बारीक वाटून घ्या. त्यात आंबटपणा येण्याकरीता थोडं दही किंवा ताक मिसळा. पावाचे स्लाइसेस पाण्यात थोडा वेळ भिजवून ते डाळीच्या मिश्रणात बारीक कुस्करून घाला. मिश्रणात वाटल्यास थोडं पाणी घालून धिरड्याच्या पिठापेक्षा थोडं दाट पीठ तयार करून तासभर झाकून ठेवा. मिरची, कांदा आणि टोमॅटो बारीक चिरा. उत्तपाच्या पिठात कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या घालून ढवळून मिश्रण तयार करा. तव्याला तेल किंवा तूप लावून त्यावर तयार मिश्रण थोडं-थोडं घालून पातळ पसरवा. पोकळ झाकण ठेवा. एका बाजूने झालं की, उलटून दुसरी बाजूही खरपूस भाजून उत्तपा खाली काढा. लोणचं किंवा इडलीच्या चटणीसोबत वाढा.