अशा प्रकारे सुरु झाली होती प्रियंका चोप्रा आणि ...

अशा प्रकारे सुरु झाली होती प्रियंका चोप्रा आणि निक जोनासची प्रेमकहाणी (So This Is How Interesting Priyanka And Nick’s Love Story Started)

बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत नाव आणि प्रसिद्धी मिळवणारी ग्लोबल आयकॉन प्रियांका चोप्रा आपल्या चाहत्यांच्या मनावर राज्य करते. देसी गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेली प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांची प्रेमकहाणी सर्वांसाठी एक आदर्श उदाहरण आहे. प्रियांका वयाने निकपेक्षा खूप मोठी असली तरी दोघांमधील प्रेम सर्वांनाच प्रेरणा देते. अनेकवेळा दोघांच्या घटस्फोटाच्या बातम्याही मीडियामध्ये चर्चेत होत्या, पण या बातम्यांचा त्यांच्या नात्यावर काहीच फरक पडलेला नाही. या दोघांची प्रेमकथा कधी आणि कशी सुरु झाली हे फारच कमी जणांना ठाऊक आहे.

प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांची प्रेमकहाणी म्हणजे एकप्रकारची चित्रपटाची कथाच म्हणावी लागेल. मीडियामध्ये या दोघांच्या नात्याबद्दल बरेच काही लिहिले गेले. पण एकदा निकने स्वत: आपली प्रेमकहाणी सांगितली होती.

 8 सप्टेंबर 2016 ला निक जोनासने प्रियांका चोप्राला ट्विटरवर थेट संदेश पाठवला होता. त्या मेसेजमध्ये निक जोनासने लिहिलेले की, “आपले काही म्यूचुअल मित्र आहेत त्यांचे म्हणणे आहे की आपण भेटावे.” निकच्या या मेसेजला उत्तर देताना प्रियांकाने लिहिले की, “तू मला टेक्स्ट का नाही पाठवत, माझी टीम ट्विटरवरील मेसेज वाचू शकते.” यानंतर निकने प्रियांकाचा नंबर मिळवला आणि त्यानंतर मेसेजद्वारे संभाषण सुरू झाल्याचं सांगितले.

27 फेब्रुवारी 2017 रोजी निक आणि प्रियांकाची एकमेकांशी पहिली भेट झाली होती. जेव्हा निकने प्रियांकाला समोरून पाहिले तेव्हा तो म्हणाला, तू आतापर्यंत कुठे होतीस? यानंतर दोघांच्या भेटीगाठी सुरू झाल्या. 1 मे 2017 रोजी मेट गाला इव्हेंटमध्ये दोघेही एकत्र दिसले. इथून दोघांच्या डेटिंगच्या बातम्यांना सुरुवात झाली होती. एका मुलाखतीत जेव्हा प्रियांकाला विचारण्यात आले की ती निक जोनाससोबत मेट गालामध्ये का आली होती? यावर प्रियांका म्हणाली होती की, “आम्ही दोघांनी राल्फ लॉरेनचे आउटफिट घातले होते, त्यामुळे आम्ही एकत्र जाण्याचा निर्णय घेतला आणि खूप मजा आली.”

मेट गाला इव्हेंटनंतर, 25 मे 2018 रोजी, प्रियांका आणि निकचा वीकेंड साजरा करतानाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तेव्हा या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी असल्याचे सर्वत्र म्हटले जाऊ लागले. यानंतर या जोडप्याने जुलै 2018 मध्ये साखरपुडा करुन आपले नाते अधिकृत जगजाहिर केले.

साखरपुड्यानंतर डिसेंबर 2018 मध्ये, भारतातील जोधपूर येथील उम्मेद भवनमध्ये त्यांचा एक भव्य विवाहसोहळा पार पडला. या कपलच्या शाही लग्नाला देशभरातील सर्व प्रसिद्ध सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. त्यांच्या शानदार लग्नाने सर्वांच्या हृदयावर छाप पाडली.