नाश्ता नाही म्हणजे आजाराला आमंत्रण (Skipping Br...

नाश्ता नाही म्हणजे आजाराला आमंत्रण (Skipping Breakfast May Cause Sickness)

सकाळी उठल्यानंतरही डुलकी येणं, ऑफिसमध्ये सतत जांभई येणं, थोड्या कामानंही थकवा येणं… आपल्याला असा अनुभव येतो का? यामागचं कारण सकाळी नाश्ता न करणं.
शाळेत, कॉलेजला जाणारी मुलं क्लासमध्ये लेक्चर चालू असताना झोपेची डुलकी का घेतात? अभ्यासात त्यांचं लक्ष का लागत नाही? ऑफिसला जाणार्‍या मंडळींना सकाळी सकाळी जांभई का येते? त्यांना स्फूर्ती का नसते? घरातील काम करणार्‍या गृहिणी दुपार होताच का थकून जातात? आपल्यातील बर्‍याच जणांचा असा अनुभव आहे ना..? त्याचं एकमात्र कारण म्हणजे सकाळचा नाश्ता न करणं.
खरंतर संतुलित आहारात नाश्त्याची भूमिका ही महत्त्वपूर्ण आहे. संपूर्ण रात्रभर व्यक्तीचं शरीर तथा मेंदू 10 ते 12 तास कुठल्याही आहारापासून वंचित असतं. आपलं शरीर हे एखाद्या कारप्रमाणं असतं. जोपर्यंत कारला पेट्रोल, डिझेल, गॅस मिळत नाही तोपर्यंत आपण तिला चालवू शकत नाही. त्याचप्रमाणे शरीरालाही चालवायला, दिवसातील विविध कार्य संपन्न करण्यासाठी शक्तीची गरज असते. जी आपल्याला सकाळी नाश्ता (ब्रेकफास्ट) करण्यानं मिळते. आपले पूर्वजदेखील या गोष्टीवर जोर देत होते आणि दररोज वेळ काढून नाश्ता करत होते. याला ते न्याहारी असं म्हणत. ज्यामुळे संपूर्ण दिवसभर  ते न थकता मेहनत करत असत.
सध्याच्या धकाधकीच्या जमान्यात रात्री झोपण्यास उशीर होतो. परिणामी, सकाळी उठायला उशीर होतो. मग सकाळीसकाळी कामाची अन् वेळेची मारामारी. त्यामुळे नाश्त्यासारख्या महत्त्वाच्या गोष्टीला जराही महत्त्व दिलं जात नाही. आणि मग दिवसभर आळस, सुस्ती वगैरे येते. या समस्यांपासून वाचण्यासाठी सकाळी नाश्ता करणं गरजेचं आहे.
कारण शरीर आणि मेंदूला सगळ्यात प्रथम ग्लुकोज देणारा, त्याला सजग ठेवणारा नाश्ता हाच महत्त्वाचा खुराक आहे.

नाश्ता केल्यामुळे होणारे फायदे
– संशोधनाने असं सिद्ध केलं आहे की, ज्या व्यक्ती दररोज सकाळी नाश्ता करतात त्या दिवसभर तंदुरुस्त राहतात.
– लहान मुलांची बुद्धी आणि स्मरणशक्ती तसेच क्लासमध्ये शिकण्याची इच्छा सकाळी योग्य नाश्ता केल्यानं वाढते.
– सकाळी नाश्ता (ब्रेकफास्ट) केल्यानं भूक कमी लागते आणि एकदम भरपेट खाण्याची इच्छा कमी होते.

नाश्ता न केल्याने होणारे नुकसान
– डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार नाश्ता न केल्याने हृदयरोग, स्थूलता, शारीरिक शक्ती तसेच स्मरणशक्तीत कमीपणा येतो. जे सकाळी नाश्ता करत नाही त्यांचं वजन अधिक असतं. नाश्ता न केल्याने शरीरातील हार्मोन्सचं प्रमाण बदलतं आणि कोलेस्ट्रॉल वाढतं.

नाश्ता कसा असायला हवा?
– संपूर्ण रात्रभर काहीही न खाल्ल्याने सकाळचा नाश्ता संतुलित म्हणजे 24 ते 25 टक्के कॅलरीज देणारा असावा.
– नाश्त्यामध्ये योग्य मात्रेमध्ये कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन तथा फायबरचा समावेश असावा.
– शरीराला ऊर्जा आणि फायबर पुरविणार्‍या हिरव्या भाज्या, हिरवी फळे यांचा समावेश असावा.
– दूध, अंडी, पनीर यांसारखे पदार्थ घेणेदेखील लाभदायक असते. परंतु तळलेल्या चरबीयुक्त अशा पदार्थांचा समावेश करू नये.

– त्यापेक्षा इडली, डोसा, अंड्याची पोळी, ज्वारी, बाजरी किंवा गव्हाची चपाती, दूध, चहाबरोबर किंवा फळांच्या रसाबरोबर घेता येईल.
लहान मुलांनाही नाश्त्याची सवय करून देणं गरजेचं आहे. त्यामुळेच स्वस्थ जीवनासाठी कोणीतरी खरंच म्हटलं आहे की, नाश्ता करावा राजासारखा, दुपारचं जेवण राणीसारखं आणि रात्रीचं भोजन भिकार्‍यासारखं.