मुलीच्या अंगावर खूप लव आहे ...

मुलीच्या अंगावर खूप लव आहे ( Skincare Tips for the Best Skin)

माझी मुलगी लहान आहे. शाळेत जाते. लहानपणापासूनच तिच्या चेहर्‍यावर, हातापायांवर खूप लव आहे. आता तिला यामुळे ओशाळल्यासारखं वाटतं. आता इतक्या लहान वयात व्हॅक्सिंग तर शक्य नाही. त्याशिवाय काही सोपे आणि दुष्परिणाम नसणारे उपाय करता येतील का?

लव घालवण्यासाठी तुम्ही अनेक नैसर्गिक उपाय करू शकता. घरच्या घरी करता येणार्‍या या उपायांमुळे कोणता दुष्परिणामही होणार नाही.

1.       खोबरेल तेलामध्ये हळद मिसळून, ते कडकडीत गरम करा. नंतर थंड होऊ द्या. हळद मिश्रित हे तेल नियमितपणे लव असलेल्या भागावर चोळा. यामुळे अंगावरील नको असलेली लव निघून जाईल.

2.       तिची त्वचा तेलकट असेल, तर हातापायांवर प्युमिक स्टोन घासूनही लव घालवता येईल. यासाठी अंघोळ करताना हातापायांवर भरपूर साबण लावा. नंतर त्या भागावर प्युमिक स्टोन हळूहळू गोलाकार पद्धतीने घासा. असं दोन-तीन दिवसातून एकदा करा. नक्कीच परिणाम दिसेल.

3.       चेहर्‍यावरील लव अधिक त्रासदायक वाटते. ती जावी यासाठी, चणाडाळीचं पीठ पाण्यात कालवून चेहर्‍यावर लावा. ते अर्धवट सुकू द्या. नंतर कोरड्या कापडाने हळूहळू गोलाकार चोळून काढा. असं केल्यावर पहिल्याच दिवशी लव जाणार नाही; पण काही दिवस नियमितपणे हा प्रयोग केल्यास, नक्कीच फरक जाणवेल.

माझी त्वचा काळवंडली आहे. काळवंडलेली त्वचा उजळण्यासाठी घरच्या घरी काही उपाय करता येतील का?

नक्कीच. घरच्या घरी काळवंडलेली त्वचा उजळवणं शक्य आहे. त्यासाठी काकडीच्या रसात 10 थेंब लिंबाचा रस मिसळा. हे मिश्रण चेहरा, मान आणि काळवंडलेल्या इतर भागांवर लावा. मात्र डोळ्यांभोवती, भुवया आणि ओठांवर लावू नका. 15 मिनिटांनंतर कोमट पाण्याने धुवा.

माझी मुलगी वीस वर्षांची आहे. तिची त्वचा तेलकट आहे. तसंच तिचा रंग सावळा आहे. तिने ब्लीच करण्याचा हट्ट धरला आहे. मला मात्र भीती वाटते. काय करू?

त्यात घाबरण्यासारखं काही नाही. तिला घरच्या घरी नैसर्गिक घटकांच्या साहाय्याने ब्लीच करायला सांगा.

1.       दोन-तीन कच्चे बटाटे मिक्सरमधून बारीक वाटून घ्या. हे वाटण संपूर्ण अंगाला फ्लॅट ब्रश किंवा बोटांच्या साहाय्याने लावा. 15-20 मिनिटांनंतर आंघोळ करायला सांगा. यामुळे सर्वांग उजळेल.

2.       एक चमचा तुळशीचा रस आणि अर्धा चमचा मध यांचं एकजीव मिश्रण तयार करा. सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना हे मिश्रण ताजं प्या. यामुळे कांती चमकदार होते आणि मुरुमंही निघून जातात. 3.       1 चमचा काकडीचा रस, 7-8 थेंब लिंबाचा रस आणि चिमूटभर हळद यांचं एकजीव मिश्रण तयार करा. हे मिश्रण चेहरा, गळा, मान आणि हाताच्या काळवंडलेल्या भागावर लावा. 30 मिनिटांनंतर धुवा. यामुळे त्वचेचा रंग उजळेल.