क्रिकेटपटूंच्या जीवनावर आधारित नवी वेब सिरीज ‘स...

क्रिकेटपटूंच्या जीवनावर आधारित नवी वेब सिरीज ‘सिक्सर’ (‘Sixer’ Is The New Web Series On The Life Of Cricketer)

टी२०, क्रिकेट स्पर्धेचा ज्वर सर्वत्र पसरला असताना, क्रिकेटपटूंच्या जीवनावर आधारित ‘सिक्सर’ ही नवी वेब सिरीज ॲमेझॉन मिनी टीव्हीच्या माध्यमातून प्रदर्शित होत आहे. काही वर्षांपूर्वी, एक दिवसीय क्रिकेट सामन्यात एकाच षटकात सर्व चेंडूंवर ६ षटकार ठोकून षटकारांचा राजा म्हणून प्रख्यात झालेल्या युवराज सिंगने या सिरीजची घोषणा केली. ‘जहां है सिक्सर, वहां है युवी’, असं म्हणत युवराजने सांगितले की, ‘ ‘सिक्सर’ची ही कथा खूपच सुंदर आहे. आणि या कथेने मी टेनिस बॉलने क्रिकेट खेळायचो, त्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण करून दिली आहे. ॲमेझॉन मिनी टीव्हीने एवढा अप्रतिम क्रीडाविषयक आशय मोफत आणला आहे, याचा आनंद आहे.’

या सिरीजमध्ये निकुंज शुक्ला अर्थात निक्कू या इंदूरच्या विजय नगरमधील तरुण क्रिकेटपटूच्या आयुष्याची झलक दाखवली आहे. ही व्यक्तीरेखा खंद्या क्रिकेटप्रेमीची आहे. ही भूमिका ‘बॅचलर्स’ व ‘अस्पायरंटस्‌’ फेम शिवंकित सिंग परिहारने केली आहे. टी.व्ही. एफ. ने या सिरीजची निर्मिती केली असून दिग्दर्शन चैतन्य कुंभकोणम यांचे आहे.

‘भारतात क्रिकेटच्या चाहता वर्ग मोठा आहे. सिक्सरमध्ये अनोख्या पद्धतीने मांडलेल्या कथेच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक क्रिकेटप्रेमीच्या हृदयाला स्पर्श करू, अशी आशा आहे,’ असे निर्मिती संस्थेचे अध्यक्ष विजय कोशी म्हणाले.