छोट्या मुलांसाठी ‘बेबी लिटील सिंघम’: सिंघमचा ॲन...

छोट्या मुलांसाठी ‘बेबी लिटील सिंघम’: सिंघमचा ॲनिमेशन अवतार (Singham To Entertain Kids In Animation Avatar As ‘Baby Little Singham’)

‘आता माझी सटकली’ हे परवलीचं वाक्य बोलणारा बाजीराव सिंघम हे धडाकेबाज मराठी पात्र अजय देवगणने जोरकस पद्धतीने सादर करून घराघरात पोहचवलं. त्याचा ‘सिंघम’ हा चित्रपट वेगवेगळ्या चॅनलवरून दाखविला जातो व प्रेक्षकांना रिझवतो.

हेच पात्र आता ॲनिमेशन अवतारात सादर करण्यात आलं आहे. अन्‌ शनिवार – रविवारी डिस्कवरी किड्‌स चॅनलवर ‘बेबी लिटील सिंघम’ या मालिकेतून आता छोट्या मुलांच्या मनात घर करणार आहे. रिलायन्स ॲनिमेशन आणि रोहित शेट्टी (‘सिंघम’चे दिग्दर्शक) यांनी हा बेबी सिंघम सहनिर्माते म्हणून सादर केला आहे. बैजुज्‌ क्लासेस आणि विकफिल्ड हे या मालिकेचे प्रायोजक आहेत.

बेबी सिंघम हा खोडकर आणि लोकांची चेष्टामस्करी करत खलनायकांशी लढणार आहे. आपल्या दुष्मनांशी तो हसतखेळत मुकाबला करणार आहे. त्यामुळे कार्टुन नेटवर्क प्रेमी छोट्या दोस्तांना आवडेल, असे दिसते.

“हा बाल सिंघम छोट्यांबरोबरच त्यांच्या पालकांचेही मनोरंजन करील,” असा विश्वास डिस्कवरी किड्‌स आणि वॉर्नर ब्रदर्स डिस्कवरी चॅनलचे प्रमुख उत्तम पाल यांनी व्यक्त केला आहे.