प्रसिद्ध गायिका सुहासिनी, हिने जागविल्या तिचे स...

प्रसिद्ध गायिका सुहासिनी, हिने जागविल्या तिचे सासरे कविवर्य शांताराम नांदगांवकर यांच्या स्मृती… (Singer Suhasini Recalls Sweet Memories Of Famous Lyricist Of Marathi Films Late Shantaram Nandgaonkar, On His 12th Death Anniversary)

‘मी आणि आमचे डॅडी’… सुहासिनी नांदगांवकर

माझ्या लहानपणीच माझे बाबा (वडील) वारले. मी जेमतेम १० वर्षांची होते. त्यामुळे बाबांचा सहवास अचानक हिरावून घेतल्यासारखा झाला आणि पुढे जवळ जवळ १८ वर्षांची होईपर्यंत ‘बाबा- बाबा’ अशी हाक मारणे बंद होते. परंतु १८ व्या वर्षी माझ्या आयुष्यात पुन्हा एकदा वडिलांसारखेच प्रेम व लाड करणारी व्यक्ती आली, ती म्हणजे कविवर्य शांतारामजी नांदगावकर. त्यांना सगळे डॅडी याच नावाने हाक मारत. म्हणून मुंबईत राहायला आल्यावर डॅडीच माझे बाबा झाले. मी त्यांना’ डॅडी’ म्हणूनच हाक मारू लागले आणि मनातल्या मनात जणू काही माझ्या बाबांशीच म्हणजेच जन्मदात्या वडिलांशीच मी संवाद साधू लागले.

मुंबईसारख्या महानगरात एक गायिका म्हणून वाटचाल करणे माझ्यासारख्या खान्देशातील एका छोट्याशा गावातून म्हणजेच अमळनेरातून आलेल्या मुलीला खूपच कठीण होते. परंतु डॅडींचा परिसस्पर्श लाभला आणि तारूण्यातच संगीताचे बाळकडू माझ्या आई-वडिलांकडून मिळालेल्या मला गायन कलेचा प्रवास टप्या टप्याने उलघडत गेला.

शांतारामजींना डॅडींना त्यांची तिनही मुले व मी आणि मराठी संगीत क्षेत्रातील, चित्रपट क्षेत्रातील सगळेच जण ‘डॅडी’ ह्याच नावाने हाक मारत. आणि खरोखरच शांतारामजींची वागणूक आणि त्यांचा स्वभाव देखील घरच्यांसाठी आणि बाहेरच्या प्रत्येकासाठी सुध्दा ‘डॅडी’ या संबोधनाला साजेसाच होता. अत्यंत प्रेमळ, बोलके, भावनाशील सर्वांचे ‘डॅडी’…..

शांतारामजींचा कलेच्या क्षेत्रातील जीवन प्रवास बहुतेक सगळ्या महाराष्ट्राला ज्ञात आहेच. आमच्या डॅडींच्या शब्दांत सांगायचं झालं तर,

“रखरखीत वाळवंटात उगवलेलं मी एक रोपटं”

हाफकिन इन्स्टिट्यूटच्या चाळीत निष्पाप बालवयात कलागुणांची पिवळी तांबूस पालवी फुटु, पहात १० वर्षांचा मी असतांनाच माझे दिलदार व प्रेमळ वडील अल्पशा आजाराने निधन पावले. मग काय सकस खतासाठी, प्रेमळ पाण्यासाठी, जिव्हाळ्याच्या हळूवार झुळुकीसाठी आसुसलेल्या या रोपाला पोसायला, उभं राहायला माझ्या आईनं जीवाचं रान केलं, अमाप कष्ट उपसले. आणखीनही आधार द्यायला अनेक हात पुढे आले नि रखरखीत वाळवंटात हे नंदनवन फुलून आलं केवळ मायेच्या या हस्तस्पर्शामुळेच.

वडिलांच्या पश्चात अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत आमच्या डॅडींना म्हणजेच छोट्या शांतारामला आई चंद्राबाईनं इ. ११ वी पर्यंत शिक्षण व अतिशय चांगले संस्कार आणि वळण दिले. म्हणूनच की काय ‘आई’ ह्या शब्दाचा फारच गहिरा अर्थ सांगताना आमचे डॅडी म्हणतात, “आई म्हणजे माता, जी आपल्या उदरात ९ महिने आपल्या गर्भाला वाढवते. दूध पाजून वाढवते, प्रेम देऊन मोठं करते व नंतर माणूस मरण पावल्यावर त्याला परत जी आपल्या पोटात, आपल्या सर्वांगात सामावून घेते ती ‘माती.’ ‘माता’ आणि ‘माती’ शब्दांत फक्त एका वेलांटीचेच अंतर आहे व ती वेलांटी म्हणजे आपली जीवन यात्राच.’’

डॅडी म्हणनूच म्हणायचे की ‘माता’ आणि ‘माती’ या दोन आयांमुळेच आपलं जीवन समृद्ध होतं. आमच्या डॅडींनी इयत्ता आठवीपासूनच कविता करायला सुरुवात केली. शालेय मासिकातून कविता छापून येऊ लागल्या. त्याकाळचे सुप्रसिद्ध शाहिर अमरशेख यांच्या पोवड्यांतून, ग. दि. माडगूळकरां सारख्या थोर कवींच्या काव्यांतून डॅडींना खूपच स्फूर्ती आणि उर्जा मिळाली.

त्यांच्या कवितांवर प्रेम करणाऱ्या आणि त्यांना काव्य लेखनासाठी स्फूर्ति देणाऱ्या, त्यांच्याबरोबर परळच्या शिरोडकर हायस्कूल मध्येच शिकणाऱ्या सुलोचना काजरोळकर ह्या मैत्रिणीशी डॅडींची गट्टी जमली व या गट्टीचे प्रेमात कधी रूपांतर झाले हे दोघांनाही कळलेच नाही व डॅडींची म्हणजेच शांतारामजींची मैत्रीण सुलोचना काजरोळकर वृंदा नांदगावकर झाली. १७ डिसेंबर १९६६ रोजी दोघांचे लग्न झाले. त्यांच्या या वृंदावनात तीन फुलं फुलली ती प्रशांत, शर्मिला व मिलींद.  आयुष्य जसजसे पुढे जात होते, डॅडीचे काव्यही बहरत होते. डॅडींची बरीच गाणी आकाशवाणी आणि दूरदर्शनवरून प्रसारित होत होती परंतु अगदी पहिले वहिले १९६३ साली, एच्.एम्.व्ही. रेकॉर्ड  कंपनीने ध्वनिमुद्रित केलेलं प्रसिद्ध झालेलं गीत म्हणजे “ही नव्हे चांदणी, ही तर मीरा गाते हारी रूप गोजिरे पूर्व दिशेला फुलते.” गायिका- सुमन कल्याणपूर ताईंनी गायिले होतं आणि त्याचं संगीत दशरथ पुजारी यांचं होतं. त्यानंतर आमच्या डॅडींनी कधीही मागे वळून पाहिले नाही. त्यांची एकापेक्षा एक सरस काव्य आणि गीते अनेक मान्यवर गायक-गायिकांनी गायली आहेत.

लता मंगेशकर, आशा भोसले, उषा मंगेशकर, कृष्णा कल्ले, वाणी जयराम, अनुराधा पौडवाल, कविता कृष्णमूर्ति, वाणी जयराम, माणिकताई वर्मा तसेच पुरुष गायकांमध्ये अरुण दाते, जयवंत कुळकर्णी, सुधीर फडके आणि अमराठी गायक येशूदास, किशोर कुमार, हेमंत कुमार, उषा उत्तुप इत्यादी अनेक प्रथितयश गायक/गायिकांनी डॅडींची गाणी गायलीत.

डॅडींचा आणखीन एक स्वभाव गुण म्हणजे उद्‌योन्मुख गायक / गायिका, कवि, लेखक यांना प्रोत्साहन देऊन त्यांना त्यांच्या कलेच्या द्वारे नावारूपास आणणे. उदा. अजित कडकडे, उदय कुमार उपाद्धे, अरूण इंगळे तसेच शकुंतला… ‘मी’ देखील अशीच एक होतकरू गायिका डॅडींच्या सहवासात आले आणि त्यांच्या गायन क्षेत्राच्या महासागरात सुहासिनी चितळेची सुहासिनी नांदगावकर म्हणून विहरू लागले, अर्थात त्यांची सून होण्याचा निर्णय हा सर्वस्वी प्रशांत (मोठा मुलगा) आणि माझा होता, परंतु डॅडींच्या व सासूबाईंच्या भक्कम साथीने व आशिर्वादानेच आम्हां दोघांचा संसार बहरला. आता आमच्या संसारात पूर्वा आणि ईश्वरी अशी दोन फुलपाखरे बागडत आहेत.                      

मी व प्रशांत, मिलींद, डॅडी आणि रेकॉर्डिंग स्टु‌डिओ हे जणू रोजचच रूटीन झालं होतं. त्यात डॅडींची एकापेक्षा एक वरचढ, चित्रपटाची गाणी, कैसेटस्‌ गाणी हा डोलारा वाढतच होता. रूपेरी वाळूत, ससा तो ससा, धुंदित गंधित, सजल नयन अशा अनेक भावगीतांपासून ते नवरी मिळे नवऱ्याला, धुमधडाका, अशी ही बनवाबनवी, गमंत जंमत अशा अनेक चित्रपटगीतांमुळे डॅडींचा काव्यमय आणि गतिमय प्रवास उजळून निघाला. आजमितीस डॅडींची जवळजवळ ५००० हून अधिक गाणी लिहिलेली आहेत.

एक अतिशय लोकप्रिय कवि, गीतकार असे बिरुद मिरवणाऱ्या आमच्या डॅडींना हिंदू ह्रदय सम्राट श्री. बाळासाहेब ठाकरेंनी सुद्धा शिवसेनेतर्फे विधान परिषद सदस्य म्हणून निवड करून आमदार पद बहाल केले. अतिशय संवेदनशील मनाचे डॅडी राजकारणात मात्र जास्त काळ रमू शकले नाहीत. मात्र राजकारणात प्रवेश झाल्यामुळे डॅडींसारख्या समाज कार्यप्रेमी माणसाला समाजाची आणखीनच सेवा करता आली. आमदार झाल्याने डॅडींनी अनेक गोर-गरीबांना मदत केली, अनेक “धर्मदाय संस्थांना” अर्थिक सहाय्य केले. तसेच अनेक आंगणवाडी शाळा, पाड्यावरच्या शाळांना आर्थिक सहाय्य केले. अशा आमच्या डॅडींना त्यांच्या ऐन उमेदीच्या काळातच ‘अल्झायमर’ (‘विस्मृती’) सारख्या असाध्य रोगाने पछाडले आणि आमचे हसरे- खेळकर, प्रेमळ, बोलके डॅडी एकदम अबोल आणि शांतगंभीर झाले, जणू आपल्याच कोषात गेले. असे गंभीर व शांत डॅडी आम्हाला बघायची जराही सवय नव्हती. आमचे शर्थीचे प्रयत्न, औषधोपचार, वैद्यकीय सल्ले सगळं सगळं करून झालं पण पूर्वीचे ते हसरे, खेळकर, प्रेमळ डॅडी आम्हाला गवसलेच नाहीत.   

आज म्हणजेच ११ जुलै २०२२ रोजी त्यांचा १२ वा स्मृति दिन आहे. या स्मृति-दिनाचे औचित्य साधून डॅडींनीच १९८७ साली स्थापन केलेल्या, “कवी शांताराम नांदगावकर फाऊंडेशन” तर्फे आम्ही सर्व नांदगावकर परिवार, तसेच त्यांची मानस कन्या नीला रविंद्र व चाहते परेश पेवेकर आणि फाऊंडेशनचे सर्व पदाधिकारी व सदस्यांच्या विचारांनी एक छोटासा घरगुती “स्मृती-दिन” साजरा करीत आहोत.!!

हा सोहळा अशासाठी की आमच्या डॅडींना आम्ही सर्वांनी, तसेच महाराष्ट्राच्या तमाम रसिकांनी कायम स्वरूपी हृदयात कैद करून ठेवलं आहे. डॅडींना विसरणं कदापि शक्य नाही कारण त्यांनी निर्माण केलेलं मराठमोळं साहित्य, काव्य, गाणी ही सतत आपल्या कानात रुंजी घालत राहतील तसेच महाराष्ट्रातल्या तमाम रसिकांच्या मनावर राज्य करत राहतील, हिच ईश्वरचरणी आमची प्रार्थना. डॅडींच्याच शब्द पुष्पात सांगायचं झालं तर —

“अशीच साथ राहू दे, फुलास सौरभाची,

अशीच रात रंगू दे, प्रसन्न चांदण्याची..!!”