गायक शंकर महादेवनच्या हस्ते ‘मी वसंतराव’ चित्रप...

गायक शंकर महादेवनच्या हस्ते ‘मी वसंतराव’ चित्रपटाच्या संगीताचे अनावरण (Singer Shankar Mahadevan Launches The Music Of Marathi Bioepic Film)

सुप्रसिद्ध गायक व संगीतकार शंकर महादेवन यांच्या हस्ते ‘मी वसंतराव’ या मराठी चित्रपटाच्या संगीताचे अनावरण करण्यात आले. आपल्या आक्रमक शैलीतील, अजोड गायकीने असंख्य संगीत रचना अजरामर करणाऱ्या डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या जीवनावर या संगीतमय चित्रपटाची प्रस्तुती जिओ स्टुडिओज्‌ने केली आहे. तर संगीत दिग्दर्शन व वसंतरावांची प्रमुख भूमिका राहुल देशपांडेने साकारली आहे.

“भारतीय चित्रसृष्टीच्या इतिहासातील ही अत्यंत विशेष घटना आहे,” असे या प्रसंगी सांगत शंकर महादेवन  यांनी राहुल देशपांडेच्या गायकीची प्रशंसा केली. तर ‘मी वसंतराव’ या चित्रपटातील प्रत्येक गाणे अप्रतिम ठरले आहे. हा चित्रपट इतिहास निर्माण करील, असेही ते पुढे म्हणाले.

वसंतरावांचे नातू असलेले राहुल देशपांडे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “मी फक्त साडेतीन वर्षांचा असताना माझ्या आजोबांचे निधन झाले. माझे दुर्दैव की, त्यांचे गाणे मी समक्ष फार ऐकू शकलो नाही. शिकलो नाही. परंतु मला गाणे शिकवून मोठा गायक बनविण्याची, त्यांची तीव्र इच्छा होती, असे माझी आजी व माझे बाबा यांनी सांगितले. अन्‌ मी गाणे शिकलो. नंतर वसंतरावांचा फोटो समोर ठेवून मी संगीत साधना केली. तेव्हा जी अनुभूती मला येत राहिली, ती या सिनेमातून उतरली आहे.”

‘मी वसंतराव’ चे निर्माते चंद्रशेखर गोखले, दर्शन देसाई आणि निरंजन किर्लोस्कर आहेत. “आजचा दिवस आमच्या दृष्टीने हळवा असून व्यक्तीमत्त्व वसंतराव देशपांडे हे सगळ्यात ऋषीतुल्य आहेत. आठ वर्षापासून निखिल साने यांनी आमची पाठ सोडली नाही,” अशा भावना चंद्रशेखर गोखले यांनी व्यक्त केल्या.

या चित्रपटाचे दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी यांनी सांगितले की, जणू खुद्द वसंतरावांनीच हा चित्रपट आमच्याकडून घडवून घेतला. “सर्वसाधारणपणे चित्रपट-नाटक याचे श्रेय दिग्दर्शकाकडे जाते. पण मी प्रामाणिकपणे सांगतो की, या चित्रपटात कलाकार-तंत्रज्ञ-गायक-वादक या सगळ्यांचा मोठा सहभाग आहे. सगळ्यांनी मनापासून, श्रद्धेने, एकत्रितपणे काम केले, त्याचे हे चांगले फळ आहे,” अशी श्रेयाची पावती त्यांनी उदारपणे दिली.

‘मी वसंतराव’ च्या म्युझिक अल्बममध्ये २२ गाणी असून प्रत्यक्ष चित्रपटात त्यापेक्षा अधिक गाणी आहेत. हा चित्रपट गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार असून रसिक श्रोत्यांना, वसंतरावांच्या चाहत्यांना संगीताची मोठी मेजवानी ठरणार आहे.

या प्रसंगी स्वतः राहुल देशपांडे व प्रियांका बर्वे यांनी चित्रपटातील गाणी सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली.