गायक आदित्य नारायण झाला बाबा; कन्यारत्न प्राप्त...

गायक आदित्य नारायण झाला बाबा; कन्यारत्न प्राप्त (Singer Aditya Narayan And Shweta Agarwal Blessed With Baby Girl)

गायक आणि ‘इंडियन आयडॉल’ या रिअॅलिटी शोचा सूत्रसंचालक आदित्य नारायणला कन्यारत्न प्राप्त झालं आहे. आदित्यने सोशल मीडियावर पोस्ट लिहित चाहत्यांना ही गोड बातमी सांगितली. २४ फेब्रुवारी रोजी आदित्यची पत्नी श्वेता अग्रवालने मुलीला जन्म दिला. ‘देवाने आमच्या घरी सुंदर चिमुकल्या परीला पाठवलं आहे’, असं कॅप्शन देत आदित्यने श्वेतासोबतचा लग्नाचा फोटो पोस्ट केला आहे.

आपल्या घरात मुलीचं आगमन व्हावं, अशी इच्छा आदित्यने याआधी मुलाखतींमध्ये बोलून दाखवली होती. अखेर त्याची ही इच्छा पूर्ण झाली आहे. “श्वेताला मुलगा होणार, असं अनेकजण म्हणत होते. पण मुलगी व्हावी अशी मनोमन इच्छा आहे. वडील आणि मुलीचं नातं हे खूप खास असतं आणि आमच्या घरी छोट्याशा परीचं आगमन झालं, याचा मला खूप आनंद आहे”, असं आदित्य म्हणाला.

‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत आदित्य पुढे म्हणाला, “माझ्या बाबांना सुखद धक्का बसला आहे. ते सतत बाळाकडे पाहत आहेत आणि तिला परी म्हणून हाक मारत आहेत. सुरुवातीला ते तिला उचलून घ्यायला घाबरत होते, पण काही दिवसांनी मीच बाळाला त्यांच्याकडे दिलं. तिचे डायपर्स बदलणं आणि इतर कामांना मी सुरुवात केली आहे. ती माझ्यासारखी दिसते असं मला वाटतं. देवाने तिच्या रुपात सुंदर भेट आम्हाला दिली आहे.”

आदित्य आणि श्वेताने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये लग्नगाठ बांधली. दोघेही बरीच वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. आदित्यने होस्टिंगपासून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे.

(फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)