उन्हाळ्यात चेहर्‍यावर व हातावर चट्टे उठतात… (Si...

उन्हाळ्यात चेहर्‍यावर व हातावर चट्टे उठतात… (Simple Treatment To Heal Dark Patches On Face And Hand Due To Summer Heat)

skin care


मला नेल आर्ट करून घेणं खूपच आवडतं; पण त्यासाठी खूप खर्च येतो. घरच्या घरी मला स्वतः स्वतःचं नेल आर्ट करता येईल का?

  • मेघना कुलकर्णी, अकोला
    तुम्हाला नक्कीच घरच्या घरी स्वतःच स्वतःचं नेल आर्ट करता येईल. सुरुवातीला व्यवस्थित जमलं नाही, तरी सरावाने ते अगदी उत्तम प्रकारे जमू शकेल. नेल आर्टसाठी आवश्यकतेनुसार विविध रंगाचे नेल पॉलिश, बेस कोट, टॉप कोट, बारीक ब्रश, खडे, टूथपिक इत्यादी साहित्य गरजेचं आहे. नेल आर्ट करण्यासाठी सर्वप्रथम नखं व्यवस्थित स्वच्छ करून घ्या. नंतर नखांवर बेस कोट लावा. तो सुकल्यावर त्यावर आवडीनुसार नेलपॉलिशचे कोट लावा. मग या नेलपॉलिशवर आवडीप्रमाणे खडे किंवा टूथपिकने इतर रंगाचे बिंदू किंवा ब्रशच्या साहाय्याने काँट्रास्ट रंगाचं कोणतंही डिझाईन करता येईल. हे सुकल्यानंतर, शेवटी नखांवर ट्रान्सपरंट टॉप कोट लावा.
  • उन्हाळ्यात माझ्या चेहर्‍यावर आणि हातावर चट्टे उठतात. यावर काही उपाय सांगाल का?
  • सुमन स्वर्गे, मनमाड
    उन्हाळ्यात उन्हामुळे तुमच्या चेहर्‍यावर आणि हातावर चट्टे उठतात, म्हणजे तुमची त्वचा खूपच संवेदनशील आहे. हे टाळण्यासाठी सर्वात उत्तम उपाय म्हणजे, उन्हाळ्याच्या दिवसात थेट उन्हात बाहेर पडणं टाळा. अर्थात, हे नेहमीच शक्य होईल असं नाही. मग जेव्हा कधी उन्हात बाहेर पडायचं असेल, तेव्हा शरीर अधिकाधिक झाकलं जाईल असे कपडे परिधान करा. सौम्य रंगाचे लांब हाताचे कुर्ते, स्कार्फ अशा पूर्ण तयारीनेच घराबाहेर पडा. तसंच उन्हात जाण्याच्या 20 मिनिटांपूर्वी चेहर्‍यावर आणि हातावर एसपीएस 30 किंवा 45 असलेलं सनस्क्रीन लावा.
  • कार्यालयात मला सतत कॉम्प्युटर हाताळावा लागतो. सतत कॉम्प्युटरच्या स्क्रीनकडे पाहिल्यामुळे डोळ्यांवर ताण येतो. आता तर डोळ्यांभोवती काळी वर्तुळही येऊ लागली आहेत. यावर काही तरी उपाय सुचवा.
  • कुसुम सोनाटकर, पुणे

बहुतेकांची ही समस्या असते. डोळ्यांवरचा ताण कमी करण्यासाठी सतत अधिक काळासाठी कॉम्प्युटरवर काम करणं टाळा. काम करताना दर 20 मिनिटांनी डोळ्यांना एखाद मिनिटाचा ब्रेक द्या. या वेळात कॉम्प्युटरकडे न बघता, इतरत्र बघा किंवा डोळे बंद ठेवा. डोळ्यावरचा हा ताण शिथिल करण्यासाठी इतरही उपाय करता येतील. जसं कापूस थंड दुधात किंवा चहाच्या पाण्यात भिजवून रात्री झोपण्यापूर्वी बंद डोळ्यांवर ठेवता येईल. यामुळे नक्कीच आराम जाणवेल.