सपाट पोटासाठी सोपे व्यायाम (Simple Exercises Fo...
सपाट पोटासाठी सोपे व्यायाम (Simple Exercises For Flat Tummy)


सुटलेल्या पोटाने शरीर बेडौल दिसतं, शिवाय आरोग्याच्या एक ना अनेक तक्रारीही सुरू होतात. हे पोट सपाट होण्यासाठी नित्यनेमानं काही सोपे व्यायाम करता येतील.
पोट सुटलंय, पोट वाढलंय, या तक्रारी आजच्या युगात सर्रास ऐकू येतात. सुटलेल्या पोटाने शरीर बेडौल दिसतं, शिवाय आरोग्याच्या एक ना अनेक तक्रारीही सुरू होतात. शरीर सुडौल दिसण्यासाठी सुटलेलं पोट सपाट होणं आवश्यक आहे. अन् पोट सपाट होण्यासाठी नित्यनेमानं व्यायाम करणं गरजेचं आहे. असेच काही घरच्या घरी करण्याजोगे सोपे व्यायाम-
अॅब्स

- पाठीवर झोपा. पाय गुडघ्यात वाकवा. पायाचे तळवे जमिनीला पूर्णतः टेकवा.
- दोन्ही हात मानेखाली ठेवून मानेला आधार द्या.
- आता एक दीर्घ श्वास घ्या.
- श्वास सोडत हळूहळू डोकं वर उचला आणि पाय उचलून गुडघ्यापासून 90 अंशात न्या. मानेवर ताण येणार नाही, याची काळजी घ्या.
- आता श्वास घेत पूर्वस्थितीत या.
ही क्रिया 10 ते 20 वेळा करा.
ऑब्लिक

- पाठीवर झोपा. पाय गुडघ्यात वाकवा. पायाचे तळवे जमिनीला पूर्णतः टेकायला हवेत.
- दोन्ही हात मानेखाली ठेवून मानेला आधार द्या.
- श्वास घेत मान वर उचला.
- श्वास सोडत उजवा खांदा वर उचलून डावीकडे वळा. खांदे शिथिल ठेवा. मानेवर ताण येऊ देऊ नका.
- पुन्हा श्वास घ्या आणि श्वास सोडत डावा खांदा वर उचलून उजवीकडे वळा.
- एकदा का ही क्रिया सहज करणं शक्य झालं की, नंतर एक पाऊल पुढे टाकत आपले पाय टेबल टॉप पोझिशनमध्ये ठेवून हा व्यायाम करता येईल.
ही क्रिया 10 ते 20 वेळा करा.
सिंगल लेग स्ट्रेच

- पाठीवर झोपा. पाय गुडघ्यात वाकवा.
- नंतर पाय उचलून गुडघ्यापासून 90 अंशात न्या.
मान अलगद वर उचला. - या स्थितीत श्वास घ्या.
- श्वास सोडत हळूहळू, एक पाय छायाचित्रात दाखवल्याप्रमाणे, आपल्या छातीजवळ आणा. एका हाताने गुडघ्याच्या बाजूला आधार द्या आणि दुसरा हात पोटरीकडे न्या. मग दुसरा पाय उचलून थोडा वर न्या आणि स्ट्रेच करा.
- श्वास सोडा आणि हळूहळू पूर्वीच्या अवस्थेत या.
- श्वास घ्या आणि दुसरा पाय उचलून ही क्रिया पुन्हा करा.
ही क्रिया 10 ते15 वेळा करा.
डबल लेग स्ट्रेच

- पाठीवर झोपा. पाय गुडघ्यात वाकवा.
- नंतर पाय उचलून, दोन्ही हातांनी गुडघ्याच्या बाजूने आधार देत मान उचलत, पाय गुडघ्यापासून 90 अंशात न्या (टेबल टॉप पोझिशन).
- श्वास सोडत हळूहळू हात डोक्यावरून मागे न्या आणि ताठ करा. त्याचप्रमाणे पाय जवळपास 45 अंशात ताठ (स्ट्रेच) करा.
- श्वास घेत हळूहळू पूर्वीच्या अवस्थेत या.
- ही क्रिया 10 ते 15 वेळा करा.