स्वयंपाकाचे सोपे मंत्र (Simple Culinary Ideas)

स्वयंपाकाचे सोपे मंत्र (Simple Culinary Ideas)

– आता हळूहळू उन्हाळ्याकडे आपली वाटचाल चालली आहे. काही लोक घरी आईस्क्रीम बनविण्याचा घाट घालतात. ते नेहमीच बाजारात मिळते, तसे होत नाही. तसे व्हावे तर त्यात थोडी दुधाची पावडर मिसळावी.

– घरोघरी दही विरजण घालण्याचा प्रघात आहे. पण ते घट्ट आणि मलईदार होत नाही, अशी आपली तक्रार असते. तेव्हा घट्ट दही पाहिजे असल्यास ते मातीच्या भांड्यात विरजावे.

– अंड्याचे ऑम्लेट हा आजकाल नाश्त्यातील आवश्यक पदार्थ आहे. त्यासाठी अंडे फेटताना त्यात चमचाभर दूध मिसळा. म्हणजे ऑम्लेट हलके व जाळीदार होते अन् त्याचा स्वादही छान होतो.

– आपले पदार्थ हॉटेलसारखे का होत नाहीत, असे घरच्यांना वाटत असते. मटार आणि पनीर यांची भाजी हा असाच एक कॉमन पदार्थ आहे. ही भाजी करताना त्यात एक कप दूध टाकावे. छान स्वाद येतो.

– पोळ्या करताना आपण तेच पीठ लाटताना वापरतो. त्याऐवजी पिठी म्हणून मैद्याचा वापर करा. पोळी पोळपाटाला चिकटत नाही अन् व्यवस्थित लाटता येते.

– आपण टोमॅटो, गाजर, मुळा, काकडी फ्रिजमध्ये साठवून ठेवतो. हे खूप दिवस फ्रिजमध्ये राहिल्यास मऊ पडतात. असे झाल्यास हे पदार्थ फ्रिजमधून काढून मिठाच्या पाण्यात घालून ठेवावे. पुन्हा ताजे होतील.

– लसूण  सोलताना खूप प्रयास पडतात. तेव्हा हाताला तेल लावा आणि सोला. लगेच सोलून होतो. त्याचप्रमाणे लसणाच्या पाकळ्या गरम पाण्यामध्ये भिजवून ठेवल्यास पटकन सोलला जाईल.

– गाजरांच्या हंगामात गाजर हलवा बनविण्याची, खाण्याची हौस असते. हा हलवा शिजवताना, गाजराच्या किसात थोडं तांदळाचं पीठ मिसळा. म्हणजे हलवा घट्ट होतो आणि चवही चांगली होते.

– पुदिना आणि कोथिंबीर यांची चटणी करताना, तिच्यात थोडासा लिंबाचा रस पिळावा. त्याने चटणीचा रंग हिरवागार राहतो.

– कारल्याची भाजी करताना कारली चिरा आणि त्या तुकड्यांवर मीठ टाकून ठेवा. काही वेळाने कारल्याचे तुकडे धुवून घ्या आणि भाजी करा. वेगळीच चव लागेल.

– कांदा रोजच्या जेवणात वापरायचा असतो अन् तो रोज आपल्या डोळ्यातून पाणी काढतो. ते टाळण्यासाठी कांदे दोन भागात कापून पाण्यात टाकून ठेवा. थोड्या वेळाने चिरा. अश्रू कमी होतील.