निरोगी व तंदुरुस्त राहण्याचे साधे व सोपे उपाय (...

निरोगी व तंदुरुस्त राहण्याचे साधे व सोपे उपाय (Simple And Easy Tricks To Remain Healthy And Fit)

– निरोगी आणि तंदुरुस्त राहणं प्रत्येकालाच हवं असतं. पण त्यासाठी नेमकं काय करावं, ते कळत नसतं. कोणी काय सांगतं त्यावर विसंबून करायला जावं तरी फिटनेस राखला जात नाही, असा बर्‍याच जणांना अनुभव येतो.
– पण गोंधळाची ही स्थिती बाजूला ठेवा. ऐकावं जनाचं आणि करावं मनाचं
या न्यायाने या साध्या, सोप्या गोष्टी आचरणात आणा. अन् बघा तुम्ही निरोगी आणि तंदुरुस्त राहाल.
– सकाळी लवकर उठण्याची सवय लावा. सकाळी उठल्यानंतर अंथरुणातच दिवसाची दिनचर्या कशी असावी ते ठरवा.
– सकारात्मक विचार करा. त्या विचारांनी आपली दिनचर्या आखा.
– सगळ्यात आधी, उठल्यावर एक ग्लास कोमट पाणी प्या.
– या कोमट किंवा सोसवेल इतक्या गरम पाण्यात मध व लिंबाचा रस घातल्यास, अधिक चांगलं.

– दररोज अर्धा तास व्यायाम, योगसाधना अथवा चालण्याचा व्यायाम न चुकता करा.

– सकाळची न्याहारी – अर्थात् ब्रेकफास्ट अवश्य करा. कारण आपल्याला निरोगी राहण्यासाठी ही न्याहारी फार गुणाची ठरते. संशोधनातून हे उघडकीस आलं आहे, की वेळेवर न्याहारी न करणार्‍यांपेक्षा ती करणार्‍यांमध्ये मधुमेहाचा धोका कमी असतो.
– त्याचप्रमाणे जे लोक वेळेवर न्याहारी घेत नाहीत, त्यांच्या कंबरेचा घेर, वेळेवर न्याहारी घेणार्‍यांपेक्षा अधिक असतो. कंबरेचा वाढलेला घेर म्हणजे आरोग्याचा बिघाड होय.
– दिवसभर व्यवस्थित पाणी प्या. म्हणजे डिहायड्रेशन होणार नाही व शरीरातील विषद्रव्ये कमी होतील.
– भरपूर पाणी पिण्याचा, एक फायदा असाही आहे की आपल्याला डोकेदुखी होणार नाही. म्हणजेच काय तर डोके दुखू लागल्यास थोड्या थोड्या वेळाने पाणी पित राहा. जेणेकरून शरीरात ओलावा राहील, अन् डोकेदुखी दूर होईल.

तब्येतीच्या लहानसहान तक्रारींवर घरगुती उपाय करा
– घसा दुखत असेल, घशात खवखव होत असेल अथवा खोकला थांबत नसेल तर चिमुटभर दालचिनी पावडर मधात मिसळा व ते चाटण चाटा.

– चिमुटभर दालचिनी पावडर जीभेवर ठेवून पाणी प्यायल्यास डोकेदुखी थांबते.
– हीच पावडर चहा, दह्यात टाका किंवा सॅलडवर भुरभुरवा. वजन कमी होण्यास मदत होईल.
– मायग्रेनचा त्रास अथवा साधी डोकेदुखी झाल्यास सफरचंदाच्या फोडीला मीठ लावून खा. आराम पडेल.
– सफरचंदात चांगले अ‍ॅन्टी-ऑक्सिडंट असल्याने पोटाच्या विकारांवर गुण येतो.

– सफरचंदात फायबर्सचे प्रमाण चांगले असल्याने, गुड बॅक्टेरियाची जोपासना करण्यास ते उपयुक्त ठरतात.
– आपला आहार पौष्टीक आणि संतुलित ठेवा. ऋतूमानाप्रमाणे फळे आणि भाज्या अवश्य खा. हिरव्या रंगाच्या भाज्या अधिक उपयुक्त ठरतील.
– जास्त खारट व अति गोड पदार्थ खाऊ नका.
– चहा-कॉफी आणि अल्कोहोल युक्त द्रव्यांचा अतिरेक करू नका.
– आपल्या आहारात प्रोटिन्स आणि फायबर्स तथा कॅल्शियमयुक्त पदार्थांचा समावेश करा.
– पपईमध्ये ए, बी, सी व्हिटॅमिन्स आणि अनेक प्रकारचे एन्झायम्स् असतात. त्याच्याने पचनशक्ती सुधारते.

– केळी जरूर खा. त्यामध्ये फायबर्स आणि कॅल्शियम जास्त प्रमाणात असल्याने आतड्यांना पोषक ठरतात.
– दूध, दही, ताक यांचाही माफक प्रमाणात आपल्या आहारात समावेश करा.
-पालेभाज्या अवश्य खा.

– आपण मांसाहारी असाल तर मासळीचे प्रकार खा. त्याच्याने मेंदुस चालना मिळते.
– अक्रोड खाण्याने देखील मेंदुस चालना मिळते.
– दोन जेवणांच्या मध्ये सुकामेवा, सुकी भेळ, सॅलड, सूप, ब्राऊन ब्रेड सॅन्डवीच हे स्नॅक्स म्हणून खा.
– फ्रुट सॅलड सुद्धा उत्तम पर्याय आहे.

– आपल्या रोजच्या सेवनात हिरवा चहा (ग्रीन टी) असू द्यात.
– काहीही खाल्ल्यावर लगेच पाणी पिऊ नका. थोड्या अंतराने प्या.

– रात्रीचे जेवण, झोपण्याच्या वेळेआधी 3 ते 4 तास आधी घ्या.
– दररोज 8 तासांची झोप घ्या. कोणत्याही कारणाने जागरण करू नका. झोपण्यापूर्वी थंड किंवा गरम दूध प्या. त्यात साखर कमी टाका.
– अंगातील रोग प्रतिकारक शक्ती वाढवा. संत्र, लिंबू, टोमॅटो, बेरीज्, द्राक्षे, गाजर, मेथी, पालक हे रोग प्रतिकारक शक्ती वाढवितात. त्यांचे सेवन जरूर करा.
– लसूण, आले, मशरूम, दही यांनीही रोग प्रतिकारक शक्ती वाढते. त्यांचा आहारात वापर ठेवा.

– योगासन, प्राणायाम, ध्यानधारणा यांनी रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यांचा अंगिकार करा.