पंजाबचा गायक सिद्धू मूसेवाला यांचं शेवटचं गाणं ...

पंजाबचा गायक सिद्धू मूसेवाला यांचं शेवटचं गाणं ‘जवानी में ही जनाज़ा उठेगा’ आणि शेवटची इन्स्टाग्राम पोस्ट होतेय व्हायरल (Sidhu Moosewala’s last Song ‘Jawani Mei hi Janaza Uthega’ And His Last Instagram Post Go Viral)

पंजाबचा गायक सिद्धू मुसेवाला (Sidhu Moose Wala)  यांची रविवारी गोळ्या झाडून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मानसाच्या जवाहरके गावाजवळ मूसेवाला यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या घटनेनंतर, मुसेवाला याला गंभीर अवस्थेत मानसा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पंजाबसह संपूर्ण भारतात खळबळ उडाली आहे.

सिद्धूच्या मृत्यूनंतर त्यांचं एक गाणं सोशल मीडियावर जोरदार ट्रेण्ड होऊ लागलं आहे. ‘द लास्ट राइड’ (The Last Ride) हे सिद्धूचं गाणं चाहते आणि फॉलोअर्स सोशल मीडियावर शेअर करत आहेत. १५ मे ला सिद्धूचं हे गाणं प्रदर्शित झालं होतं. त्यावेळी कोणाला कल्पनाही नव्हती की हे त्याच्या जीवनातील शेवटचं गाणं असेल आणि या गीतातील बोल अशाप्रकारे त्याच्याच बाबतीत खरे ठरतील.

सिद्धूचं हे गाणं रॅपर तुपाक शकुरला आदरांजली असल्याचं म्हटलं जातं. जो सिद्धूसाठी प्रेरणास्थान होता. रॅपर तुपाकची देखील १९९६ साली कारमध्ये गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. त्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी सिद्धूने ‘द लास्ट राइड’ हे गाणे तयार केले होते. त्यामुळे म्युझिक ज्याप्रमाणे दोघांच्याही आयुष्यात होते, त्याचप्रमाणे दोघांचीही हत्या सारख्याच पद्धतीने झाली असल्याचे म्हटले जात आहे.

‘द लास्ट राइड’ (The Last Ride Song) गाण्याचा आशय असा होता की, ‘त्याचा द्वेष अनेकांनी केला. मात्र त्याच्या प्रेमात अनेकजण होते. तो जगात प्रसिद्ध होता पण त्याच्या स्वत:च्या शहरातील अनेक लोक त्याला हरवण्यात अपयशी ठरले. या तरुण मुलाच्या चेहऱ्यावरील तेज हेच सांगतेय की त्याला तरुणपणीच मृत्युला सामोरं जावं लागणार आहे.’ त्याच्या गाण्यातील ‘जवानी में ही जनाज़ा उठेगा’ हे बोल दुर्दैवाने त्याच्या बाबतीतही खरे ठरले आहेत.

दरम्यान सिद्धू मुसेवाला याच्या मृत्यूपूर्वीची शेवटची सोशल मीडिया पोस्ट देखील व्हायरल होत आहे. मृत्यू होण्याच्या ४ दिवसांपूर्वी सिद्धूने ही पोस्ट केली होती.

सिद्धू मुसेवाला हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असायचा. तो नेहमी त्याच्या गाण्याचे व्हिडीओ आणि फोटो शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असायचा. सोशल मीडियावर त्याचा मोठा चाहता वर्ग आहे. सिद्धूच्या मृत्यूच्या चार दिवसांपूर्वी त्याने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. यात त्याने त्याच्या गाण्याचा व्हिडीओ इनस्टाग्रामवर शेअर केला होता. या व्हिडीओला लाखो व्ह्यूज मिळाले होते.

हे गाणे शेअर करताना त्याने पंजाबीमध्ये कॅप्शन दिले होते. “याला विसरुन जा, पण मला चुकीचे समजू नका”, असे त्याने कॅप्शन देताना म्हटले होते. त्याचे हे गाणे काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाले होते. त्याचाच व्हिडीओ त्याने शेअर केला होता.

आता सिद्धुच्या मृत्यूनंतर त्याचे शेवटचे गाणे आणि शेवटची इन्स्टाग्राम पोस्ट पाहता सिद्धूला त्याच्या मृत्यूचा आभास झाला होता की काय अशी चर्चा केली जात आहे. तसेच ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, अशी प्रार्थना चाहते करत आहेत.

पंजाब मध्ये सिद्धू तरुणांमध्ये अतिशय लोकप्रिय होते. त्यांचे लाखो फॉलोअर्स होते. गँगस्टर रॅपसाठी ते लोकप्रिय होते. रिपोर्टनुसार, मुसेवाला एका महिन्याला जवळपास ३५-४० लाख रुपये कमवायचे. एका कॉन्सर्टसाठी मूसेवाला २० लाख रुपये मानधन घ्यायचे. तर एका गाण्यासाठी ते ६ ते ८ लाख रुपये मानधन घ्यायचे, अशी माहिती आहे. जूनमध्ये मुसेवला वर्ल्ड टूर ट्रिपसाठी जाणार होते. परंतु, त्या आधीच त्यांची निर्घुणपणे हत्या करण्यात आली.

(फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)