डायटिंगचे दुष्परिणाम कोणते? (Side Effects Of Di...

डायटिंगचे दुष्परिणाम कोणते? (Side Effects Of Dieting)

वजन कमी करणं म्हणजे एक मोठ्ठा टास्क असतो. आजच्या धावपळीच्या जीवनात आणि अनियमित जीवनशैलीत लोकांचं वजन वाढण्याचं प्रमाण खूप वाढलंय. पण वाढलेलं वजन कमी करणं वाटतं तितकं सोपं नाही. टेलिव्हिजन, जाहिराती, होर्डिंग्स, सोशल मीडिया आणि आरोग्याशी निगडीत जवळजवळ सगळ्याच स्वास्थ्य, फिटनेस आणि फॅशनच्या मासिकांमध्ये डायटिंगचं महत्त्व दिलेलं असतं; सोबत त्याच्या दुष्परिणामांची देखील कल्पना दिलेली असते. सध्याच्या तरुण पिढीमध्ये वजन कमी करण्याची क्रेझ दिसून येते. डायटिंग जर योग्य पद्धतीने केलं तर त्याच्या दुष्परिणामांची शक्यता कमी असते. अन्यथा कोणते दुष्परिणाम घडू शकतात ते पाहूया.

शरीरातील पोषक तत्वं कमी होतात

तुम्ही दीर्घ काळ आणि कडक डाएट केला तर त्यामुळे शरीरात कार्बोहायड्रेट्स, प्रथिने, अ, ब, इ, क आदी जीवनसत्वं तसेच कॅल्शिअम, फॉस्फरस, सोडिअम यांसारखी खनिजं अशा पोषक तत्वांची कमतरता निर्माण होते. आपल्या आहारामध्ये या सर्वच पौष्टिक घटकांची आवश्यकता असते. डाएट करत असताना या पौष्टिक घटकांच्या अनुपस्थितीमुळे शरीरास अनेक व्याधी जडू शकतात.

चयापचय मंदावते

चयापचय ही अशी प्रक्रिया आहे, जी आपले शरीर कार्यान्वित ठेवण्यासाठी ऊर्जा उपलब्ध करून देते. परंतु डायटिंग जर लांबले तर शरीरातील ऊर्जा कमी होऊ लागते, आणि त्यामुळे चयापचय मंदावते. डाएट करत असताना दरम्यान भूक लागल्यानंतर जेव्हा शरीरास आवश्यक ऊर्जा मिळत नाही, अन्न मिळत नाही, तेव्हा उपवास घडतो आणि चयापचय क्रिया मंदावते. असे घडल्यास वजनही कमी होऊ लागतं.

मूड खराब होतो

डायटिंग करत असताना शरीरास सकस आहार मिळत नाही. त्यामुळे शरीरातील हार्मोन्स असंतुलित होतात, रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते आणि स्वभाव लहरी बनतो. भूक लागल्यानंतर शरीरास अन्न मिळालं नाही तर शरीरास थकवा येतो आणि मूड खराब राहतो.

डोकेदुखी

फोटो सौजन्य : फ्रीपिक डॉट कॉम

क्रॅश डायटिंग केल्याने वजन कमी होतं यात शंका नाही. परंतु कमी काळात वजन कमी केले तर सतत डोकेदुखीचा त्रास होतो. म्हणूनच आहारतज्ज्ञ देखील डायटिंग दरम्यान आहाराची जी यादी बनवितात त्यात थोड्या थोड्या वेळाने काही ना काही खाण्याचा सल्ला देतात. व्यायामाच्या आधी आणि नंतर भरपूर पाणी प्यायल्यास शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित राहते. तसेच डोकेदुखीचा त्रासही होत नाही.

थकवा आणि चिडचिडेपणा

फोटो सौजन्य : फ्रीपिक डॉट कॉम

वजन कमी करण्याच्या नादात आपण खूप वेळ उपाशी राहिलो तर सगळ्यात आधी जो दुष्परिणाम दिसतो तो असतो थकवा आणि चिडचिडेपणा येणे. उपाशी राहिल्याने जेवणातून मिळणाऱ्या पोषक तत्वांची शरीरास कमतरता जाणवते. त्यामुळे कोणतंही काम करावयास गेल्यास थकवा जाणवतो तसेच कोणत्याही कामात लक्ष लागत नाही, चिडचिड होते. ‘जर्नल ऑफ दि अमेरिकन डाएटिक असोसिएशन’ यांच्या अहवालानुसार कमी प्रमाणात कार्बोहायड्रेट असलेला आहार घेतल्याने शरीरातील ऊर्जा कमी होते आणि आपणांस अधिक थकवा जाणवतो.

बद्धकोष्ठता

फोटो सौजन्य : फ्रीपिक डॉट कॉम

कडक अशा डाएट नंतर बद्धकोष्ठता संभवणे ही सामान्य बाब आहे. आहारतज्ज्ञ मंडळी देखील पोषक तत्वे मिळतील असाच आहार घेण्याचा तक्ता लिहून देतात. डाएट करत असताना, ते आहारातील फायबरचं प्रमाण वाढवण्यास सांगतात. बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ नये यासाठी आहारात पालेभाज्या, हिरव्या भाज्या, फळं आणि भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.

मूतखडा (किडनी स्टोन)

डायटिंग दरम्यान खाण्या-पिण्याच्या अनेक सवयी बंद कराव्या लागतात. त्यामुळे शरीराचे पोषण कमी होऊ लागते आणि संपूर्ण शरीरावर त्याचा परिणाम दिसून येतो. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते आणि डिहायड्रेशनची समस्या वाढते. या डिहायड्रेशनमुळेच मूतखडा होण्याची शक्यता वाढते.

केस गळणे

फोटो सौजन्य : फ्रीपिक डॉट कॉम

आहारतज्ज्ञांच्या मते, वजन कमी करण्यासाठी आपण लो कॅलरी असलेले अन्न सेवन करतो. त्यामुळे शरीरातील ऊर्जेचे प्रमाण कमी होते. जेवणातून मिळणारे पौष्टिक घटक देखील कमी होत असल्याने केसांची रचना आणि वाढ या दोहोंवर त्याचा दुष्परिणाम होताना दिसतो आणि केस गळायला सुरुवात होते.

औदासिन्य

फोटो सौजन्य : फ्रीपिक डॉट कॉम

वजन कमी करण्याच्या प्रयत्नात जे लोक शरीरास आवश्यक आणि योग्य असा आहार घेत नाहीत त्यांना काही वेळा औदासिन्य जाणवते. अन्नातून कार्बोहायड्रेट्‌स आणि शर्करा न मिळाल्याने त्यांच्या शरीरातील सेरोटोनिनचे प्रमाण कमी होते. सेरोटोनिन हे हॅपी हार्मोन असते, जे आपल्याला आनंदी ठेवते. त्यामुळे शरीरात या हार्मोनचे प्रमाण कमी झाले की आपला ताण वाढतो आणि औदासिन्य निर्माण होतं.

मासिक पाळीच्या समस्या

डाएट गंभीरतेने पाळल्यास वजन कमी होतं; परंतु वजन कमी झाल्यानंतर पोषक तत्वांचं प्रमाणही कमी होतं. ज्याचा दुष्परिणाम मासिक पाळीवर होतो. योग्य आणि संतुलित आहार न घेतल्यामुळे हार्मोन्समध्ये बदल होतात आणि मासिक पाळी अनियमित होते.

आजारी पडणे

आठवड्यातील कमीत कमी चार दिवस भूकेवर नियंत्रण ठेवणं किंवा उपाशी राहणं, हे आपल्या आरोग्यासाठी नुकसानदायी होऊ शकतं. हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या तज्ज्ञांच्या मते, यामुळे लोकांना डोकेदुखी, अनिद्रा, कोरडी आणि मृत त्वचा, बद्धकोष्ठता, आळस आणि पोटांचे विकार यासंबंधीचे त्रास उद्‌भवू शकतात.

डायटिंग हा वजन कमी करण्याचा एकमेव उपाय नाही. वजन कमी करण्याचे अनेक पर्याय आहेत. डायटिंगमुळे शरीरात अनेक गुंतागुंत निर्माण होते. ‘डाएट’चे फॅड सांभाळताना आजकाल स्वतःवर मनानेच विविध प्रयोग केले जातात. असे करण्याने वजन कमी होत नाहीच, उलटपक्षी चुकीचे काहीतरी खाल्ल्याने तब्येतीवर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. खरे तर प्रत्येकाच्या आहारात काही गोष्टी समान असल्या, तरी उंची, कामाचे स्वरूप, व्यायामाची सवय, आजार किंवा व्याधी इत्यादी सर्व बाबी विचारात घेता, आहारतज्ज्ञांकडून आहाराचा तक्ता बनवून घेतला पाहिजे…म्हणजे डायटिंग करताना कोणत्याही दुष्परिणामांना सामोरं जावं लागणार नाही.